चिखलीहून मी अनिल मस्के, अरुण जैन यांच्यासोबत बुलडाणाकडं निघालो. गाडीत आमचा नास्तिक-आस्तिक हा विषय सुरू होता. थोड्याच वेळात आम्ही बुलडाणा इथं पोहचणार होतो. मला दुरून रस्त्याच्या कडेला पांढऱ्याशुभ्र धोतरामधली काही मुलं दिसली. ती मुलं हातात असलेल्या पात्रात बागेतील फुलं गोळा करीत होती. त्या मुलांचं ते सर्व दृश्य मोहकच होतं. मी अनिल मस्के यांना गाडी थांबवायला सांगितलं. गाडीची काच खाली केली. ती मुलं एकीकडं बागेतील फुलं तोडण्यात मग्न होती, तर त्याच वेळी अगदी मोठ्या आवाजात संस्कृतमधील श्लोक म्हणत होती.
मी अनिल आणि अरुण यांना म्हणालो, ‘‘आपण या मुलांशी जरा बोलू या.’’ आमची गाडी थांबली. आम्ही त्या मुलांच्या जवळ जाईपर्यंत त्यांचं तल्लीन होऊन श्लोक म्हणणं सुरूच होतं. मी त्या मुलांच्या समोर गेलो. त्यांनी लगेच त्यांच्या हातामधील फुलांचं पात्र खाली ठेवलं आणि हात जोडून वाकत ती म्हणाली, ‘‘जय श्रीकृष्ण.’’ आम्हीही हात जोडून म्हणालो, ‘‘जय श्रीकृष्ण.’’ प्रसन्न मुद्रेनं एखाद्यासमोर वाकून नतमस्तक होण्यात काय ताकद असते, याची अनुभूती आम्हाला आली.
त्यांच्यासोबत थोडं बोलणं झाल्यावर, ‘‘तुमचं गुरुकुल आम्हाला दाखवाल का?’’ अशी मी वासुदेव इंदलकर नामक साधकाला विनंती केली. त्यांनी लगेच होकार दिला. आम्ही आतमध्ये प्रवेश करत होतो. समोर मोठ्या कमानीवर लिहिलं होतं, बुलडाणा अर्बन वेद विद्यालय, वेदिक गुरुकुल, बुलडाणा.’ आतमध्ये प्रवेश केल्यावर कमालीची प्रसन्नता होती. आतमध्ये असणारं मंदिर, राहण्याची व्यवस्था, सारं काही एकदम अद्भुत होतं. असं वाटत होतं की, आपण कुठल्यातरी भव्य-दिव्य मंदिरामध्ये प्रवेश करतोय.
नेमकाच यज्ञ केला होता. त्या यज्ञामुळं सगळीकडं दरवळणारा सुगंध मनाला प्रसन्न करून टाकत होता. असं वाटत होतं की, तिथं असणाऱ्या झाडाखाली शांतपणे बसून राहावं, बाकी काहीही नको. माझ्यासोबत असलेले वासुदेव मला तिथं असणाऱ्या अनेक भागांची माहिती करून देत होते. असं वाटत होतं की, त्या प्रत्येक विभागामध्ये जावं आणि प्रत्येक गोष्टीला स्पर्श करावा. शंख, टाळ, मृदंग, वेगवेगळे ग्रंथ... विशेष म्हणजे आपण कधी पाहिले नसतील इतके संस्कृत भाषेमधील ग्रंथ तिथं होते. ते गुरुकुल नव्हतं, ते सेवाभावीवृत्तीनं नटवलेलं एक देवघर होतं. तिथली अत्यंत नम्र, अभ्यासू असणारी मुलं एकापेक्षा एक सरसपणे आपल्या बुद्धीची ओळख सांगणारी होती. मी जगातल्या अनेक शाळांमधील संस्कार, तिथलं वातावरण पाहिलं आहे; पण या शाळेमधलं वातावरण अगदी वेगळं होतं.
शाळेमध्ये दिलं जाणारं ज्ञान एका धार्मिक चौकटीमधलं असलं, तरीही ते समाजाच्या उन्नतीसाठी वापरलं गेलं पाहिजे, याची शाश्वती मिळत होती. आपल्या शाळा डॉक्टर, इंजिनिअर बनवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, असं हल्ली वाटायला लागलं; पण मी ज्या गुरुकुलला पूर्णपणे समजून घेत होतो, ते गुरुकुल ज्ञान देणारं काशीपीठ होतं.
ती शाळा ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव महाराज निर्माण करणारी शाळा होती. मी त्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सगळे गुण अगदी बारकाईनं पाहत होतो. केवळ ब्राह्मण समाजाची मुलं तिथं शिक्षण घेत नव्हती, तर अठरापगड जातीतली मुलं तिथं वेदांचं शिक्षण घेत होती; वेगवेगळ्या भाषा, संस्कृतींचा अभ्यास करत होती.
अनेक मुलांना आई-वडील नाहीत, अशीही मुलं होती. कोणी असो की नसो, एकदा त्या गुरुकुलमध्ये गेलं की ज्ञान अवगत करण्याच्या पुढं तुम्हाला कुठलीही मोह-माया होत नाही, हे तिथल्या वातावरणावरून दिसत होतं. माझ्यासोबत असणारे अनिल आणि अरुण हे दोघंही तिथल्या मुलांशी बोलण्यामध्ये आणि तिथलं सगळं काही बारकाईने समजून घेण्यामध्ये मग्न झाले होते.
मी एका मुलाशी बोलून त्याला पुढं काय करायचंय, इथं काय शिकायला मिळतं, हे सगळं काही जाणून घेत होतो. आपल्या इतिहासानं, संत-महात्म्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे, ते कदाचितच इतर कोणाला मिळालं नसेल, ती सगळी मौल्यवान संपत्ती आपण आपल्या पिढीमध्ये किती रुजवतो, हा प्रश्न कायम आहे. तिथला विद्यार्थी दीपक मला सांगत होता, ‘‘माझ्या घरी पूर्वीपासूनच पूजा-अर्चा केली जायची. माझे आजोबा, बाबा हे पूर्वीपासून पुजारी होते.
माझे दूरचे काका परदेशामध्ये राहतात, ते एकदा बोलता बोलता मला म्हणाले, ‘आमच्याकडं परदेशात पूजा करणाऱ्यांची खूप वानवा आहे,’ तेव्हा मी ठरवलं होतं, आपण परदेशामध्ये जाऊन पुरोहित बनावं, तेच करिअर करायचं. एक तर धर्म-संस्कृती जपण्याचं काम माझ्या हातून घडेल. शिवाय, परदेशात जाऊन मला काहीतरी बनायचं हे माझं स्वप्नही पूर्ण होईल.’’
तिथं कोणाचे वडील रिक्षावाले होते, कोणाची आई मोलकरीण आहे. त्यांना प्रवेश देताना ते कुठल्या जातीचे-धर्माचे आहेत, ते किती श्रीमंत आहेत, ते काही पैसे देतील का, यावर त्यांचा प्रवेश होत नाही; तर बुद्धीच्या जोरावर, त्यांना कुठल्या विषयात आवड आहे, ते त्या विषयाला किती न्याय देतात हे लक्षात घेऊन, त्यांचा तिथं अगदी नाममात्र पैशांवर प्रवेश होतो. वासुदेव हे युवक मला तिथले प्रधान आचार्य सचिन पचौरी (८४३०३९५३५५) यांच्याकडं घेऊन गेले, सोबत तिथलेच रमण जोशी गुरुजीही होते.
सचिन यांच्याशी मी गप्पा मारत होतो. बोलता बोलताना मला सचिन म्हणाले, ‘‘पूजा-पाठ हा विषय आहेच आहे; पण कीर्तन करणं, सामाजिक विषयामध्ये आवड निर्माण व्हावी, संस्कृतमध्ये अनेक ठिकाणी पंडित म्हणून जाता यावं. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी परदेशांत पूजा-अर्चा करणाऱ्या पंडितांची खूप मागणी आहे. अशा अनेक विषयांच्या अनुषंगानं हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे.
यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे चार वेद आहेत. या चार वेदांमध्ये सात वर्षांच्या काळात यजुर्वेद हा पूर्ण होतो, ज्यामध्ये पूजा आणि पांडित्य पूर्णतः शिकवलं जातं. आता आमची पहिली तुकडी बाहेर पडेल.’’ आम्ही बोलत असताना सचिन यांची मुलगी कृतिका त्या ठिकाणी आली. एक श्लोक समोर ठेवत, तिच्या वडिलांना विचारत होती, या श्लोकाचा अर्थ काय आहे? त्यांनी त्याचा अर्थ सांगितला आणि कृतिका पुन्हा ते बाकीचे श्लोक वाचण्यामध्ये मग्न झाली.
मी म्हणालो, ‘‘इथं मुलींना प्रवेश नाही का?’’ ते म्हणाले, ‘‘नाही, हे शिक्षण फक्त मुलांसाठीच आहे.’’ आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत असताना, ज्या राधेश्याम चांडक यांनी हे गुरुकुल सुरू केलं, त्यांची त्यामागे नेमकी धारणा काय होती, यावर आम्ही चर्चा करत होतो. राधेश्याम चांडक, त्यांच्या आईची शिकवण, धर्माविषयी असलेला लळा यातून त्यांनी या गुरुकुलाची स्थापना केली होती.
राधेश्याम चांडक यांच्याविषयी सचिन गुरुजी ज्या पद्धतीनं सांगत होते, त्यावरून त्यांना भेटावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली होती. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून असं वाटत होतं की, यांच्या आई-वडिलांची मोठी पुण्याई म्हणून इथं यांना शिक्षण घ्यायला मिळतं. या सर्वांचं उत्तम करिअर होणार, त्यांना परदेशांतही खूप चांगल्या संधी आहेत. त्यापेक्षाही आपल्या संस्कृतीला कोळून पिण्याचं काम ही मुलं करतात, याचाही प्रत्यय तिथं सुरू असलेल्या अनेक प्रयोगांतून येत होता.
किती आणि काय काय तिथं शिकायला मिळेल असंच काही होतं. ज्या राधेश्याम चांडक यांनी हे सगळं उभं केलं, त्यांची मला भेट घ्यायची होती. हे गुरुकुल, धर्माचा प्रचार, ही सगळी मुलं घडवण्यामध्ये नेमकं त्यांचं व्हिजन काय होतं, हे मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं होतं. मी सचिन सरांना विचारलं, ‘‘मला राधेश्याम चांडक यांना भेटायचंय, ते मला कुठं भेटतील?’’ ते म्हणाले, ‘‘भाईजी या वेळी तुम्हाला शाळेत भेटतील.’
आम्ही चांडक म्हणजे भाईजी यांचा पत्ता घेतला आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. भाईजी जिथं होते, ते एका मोठ्या शाळेचं प्रांगण होतं. आजूबाजूला मुला-मुलींचं वसतिगृह, शाळा, कॉलेज तिथं होतं. तिथं खेळाचं मैदान खूप छान होतं. त्या मैदानाच्या शेजारी एक उघडी जिम होती. त्या उघड्या जिमवर एक व्यक्ती व्यायाम करत होती. माझ्यासोबत असणाऱ्या अनिल आणि अरुण यांनी मला दुरूनच दाखवलं आणि ते म्हणाले, ‘‘हेच भाईजी आहेत.’
आम्ही भाईजी यांच्या दिशेनं निघालो. आम्ही तिथं पोहोचलो. अनिल यांनी भाईजी यांच्याशी माझी ओळख करून दिली. एवढा मोठा माणूस; पण प्रचंड नम्र. मी भाईजी यांना म्हणालो, ‘‘आम्ही तुमच्या गुरुकुलाला भेट दिली. तो खूप चांगला उपक्रम आहे. मी राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये फिरतो; पण इतका वेगळा उपक्रम मी कधी पाहिला नाही.’
भाईजी म्हणाले, ‘‘आपण जे काही करणार आहोत, ते सगळं एक दिवस व्यर्थ जाणार आहे; पण आपण धर्मासाठी, संस्कारांसाठी, तत्त्व-मूल्यांसाठी, एखाद्याचं आयुष्य उभं करण्यासाठी जे काही करू, ते चिरंतर टिकणारं आहे. त्यातूनच हे गुरुकुल उभं राहावं, त्यातून मुलं घडावीत, त्यांनी धर्मासाठी आपलं आयुष्य खर्ची करावं, नीतिमूल्यं काय आहेत हे समाजाला शिकवावं, ही धारणा पुढं आली.’’
आमच्या खूप गप्पा झाल्या, आम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोललो. भाईजी यांच्या आजूबाजूला असलेल्या अनेक शाळांमध्ये गरिबांची मुलं शिकून मोठी कशी झाली याची अनेक उदाहरणं भाईजी सांगत होते. आम्ही भाईजी यांच्याकडं नाश्त्याला बसलो. बोलता बोलता भाईजी म्हणाले, ‘‘प्रत्येक माणसाचा आई हा हळवा कप्पा असतो, तसं माझ्या बाबतीतही आहे. माझी आई माझ्या रोमारोमांत आहे.
तिनं माझ्यावर केलेले संस्कार खूप खोलवर रुजलेले आहेत. ती सातत्यानं म्हणायची, ‘माणुसकीची जपणूक झाली पाहिजे.’ मी जे गुरुकुल उभं केलं आहे, ते त्या माणूसपणासाठीच आहे. अठरापगड जातींच्या माणसांनी संस्कृती आणि संस्कृतला आपलंसं केलं, तर त्याला पांडित्य मिळू शकतं. त्यांनी चांगुलपणाची कास धरली, तर त्याला उत्तम माणूसपण मिळू शकतं. ही सगळी मुलं याच धाटणीतून तिथं घडलेली आहेत.’’ भाईजी यांचा शब्द न् शब्द ऐकावंसं वाटत होतं.
आम्ही भाईजींकडून निघालो. आम्ही दिसेनासं होईपर्यंत भाईजी आमच्याकडंच पाहत होते. मीही आमच्या गाडीच्या काचेमधून भाईजी यांच्याकडं एकटक पाहत होतो. ज्या भावनेतून ते गुरुकुल आणि ती मुलं घडत होती, त्या शाळेत गरिबांची मुलं शिकत होती, त्यामागे खूप मोठा उद्देश होता. कदाचित तो उद्देश तुम्हाला सगळ्यांना कळाला तर धर्माची भाषा माणुसकीसाठी नेमकी कशी वापरतात हे पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाही. बरोबर ना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.