रा. रं. बोराडे : एक नातं, समजण्यापलीकडचे

रा. रं. बोराडे हे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. बोराडे सर यांना साहित्य क्षेत्रात कोणी ओळखत नाही, असे शोधूनही सापडणार नाही.
RR Borade
RR BoradeSakal
Updated on

रा. रं. बोराडे हे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. बोराडे सर यांना साहित्य क्षेत्रात कोणी ओळखत नाही, असे शोधूनही सापडणार नाही. त्यांचे नाव मोठे होण्यामध्ये त्यांचे साहित्य आणि त्यांचा कमालीचा साधेपणा कारणीभूत आहे. मराठवाड्यात दोन माणसे अशी आहेत ज्यांचा कनेक्ट तीन पिढ्यांशी समान आहे. त्यातील एक साहित्य क्षेत्रात रा. रं. बोराडे सर आणि दुसरे पत्रकारितेच्या क्षेत्रात आदरणीय प्रा. सुरेश पुरी सर.

बोराडे सरांच्या अनेक कादंबऱ्या आजही साहित्य क्षेत्रात चर्चेचा आणि आवडीचा विषय आहेत. सध्याच्या काळात ग्रामीण साहित्य, मराठी साहित्याची मागणी खूप वाढली आहे, ज्या मागणीत रा. रं. बोराडे सर यांच्या साहित्याचे नाव पुढे येते. ग्रामीण साहित्यनिर्मितीमुळे ग्रामीण जीवन काय असते, हे बारकाईने लोकांसमोर यायला लागले. ग्रामीण जीवनातील प्रश्न, याबद्दल साहित्य निर्मितीतून वाचा फुटायला लागली. ग्रामीण भागातून अनेक नवे साहित्य निर्माण होताना आपल्याला दिसत आहे, त्यामध्ये अशोक पवार, किशोर बळी, नवनाथ गोरे अशी अनेक नावे घेता येतील, ज्यांच्यामुळे आज साहित्याला एक उंची मिळाली आहे.

ग्रामीण साहित्य हा विषय, हे क्षेत्र पुढे नेण्याचे श्रेय जाते ते अर्थात बोराडे सर यांना. बोराडे सरांच्या साहित्यनिर्मितीतून ग्रामीण भागातील जीवन नेमके काय असते, हे प्रामुख्याने समोर आले. मराठवाड्यात जन्म झालेले बोराडे सर यांनी मराठवाड्यातील जीवन कसे विस्कळित आहे, याचे आपल्या साहित्यातून चित्र रेखाटले आहे. सरांची साहित्यिक म्हणून सुरुवात ‘सकाळ’मधूनच झाली. सकाळ वृत्तपत्राचा विकास होत असताना ‘सकाळ’ने अनेक उपक्रम राबविले होते आणि या उपक्रमांचा भाग म्हणून बोराडे सर साहित्यकार म्हणून प्रथम नावारूपास आले. शालेय पातळीवर ‘सकाळ’ने नियतकालिक ही स्पर्धा घेतली होती. विद्यार्थीदशेत असताना सरांनी यात सहभाग घेतला आणि त्यांच्या ‘वसुली’ या कथेला पहिले बक्षीस मिळाले. इथूनच एक प्रकारे साहित्यनिर्मितीचा वेग वाढला. पुढे ते प्राध्यापक आणि प्राचार्य झाले.

रावसाहेब सरांचे साहित्य आजही तेव्हाइतकेच जिवंत वाटते. पहिल्या क्रमांकावर असलेली त्यांची कादंबरी ‘पाचोळा’. ‘पाचोळा’मधील संवाद आजही तितकेच काळजाला भिडतात, जितके ते पन्नास वर्षांपूर्वी भिडत होते. खेड्यातील शिंप्याचे जीवन कसे अवघड होऊन गेले आहे, यावर त्यांनी तेव्हाच्या काळात कादंबरीत प्रकाश टाकला. माणसाच्या जीवनातील साध्या- साध्या गोष्टी, माणसाचे काळाच्या प्रवाहात कसे जीवन बदलून टाकतात, यावर त्यांनी मार्मिक असे भाष्य केले आहे. कादंबरीत गंगारामचा मृत्यू झाला, तरी वाचकांच्या मनात मात्र अनेक प्रश्नांचा जन्म होतो आणि मला वाटते, हेच सरांच्या लेखणीचे कसब आहे. ‘पाचोळा’ कादंबरीने ग्रामीण साहित्याला बळकटी मिळवून दिली. आज त्यांच्याकडून अनेक युवक प्रेरणा घेऊन साहित्य क्षेत्रात येण्याचे धाडस करत आहेत. फक्त गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची.

दादा बोराडे सर हे माझे मामा साहित्यक प्रा. फ. मुं. शिंदे यांचे शिक्षक, गुरू. खरेतर फ. मुं. शिंदे सरांकडून औरंगाबादला विद्यापीठात शिकायला असताना अनेक वेळा बोराडे सरांचे नाव ऐकले होते. विद्यापीठांमध्ये नाट्यशास्त्र विभागात अनेक वेळा नाटकांचे प्रयोग व्हायचे, नाटकाचे प्रशिक्षण वर्ग भरायचे. तेव्हा बोराडे सर यांना आवर्जून निमंत्रित केले जायचे. अत्यंत साधा माणूस, लेखक, प्रचंड रसग्रहण करणारा माणूस आणि हसून कमीत कमी बोलणारा, उत्तम कथाकार, एवढीच त्यांची सुरुवातीला ओळख होती; पण जसे मी त्यांचे साहित्य वाचत गेलो, त्यांच्या व्याख्यानांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत गेलो, तसे मला बोराडे सर काय आहे हे कळायला लागले. ओळख झाली, मैत्री झाली आणि एखाद्या गुरूप्रमाणे सरांनी पाठीवर सातत्याने शाबासकी द्यायला सुरुवात केली. बोराडे सर आज मोठे का आहेत, याचे कारण त्यांनी नव्या साहित्यिकांचा एक कारखाना, त्यापुढे जाऊन भलामोठा कारखाना राज्यात उभा केलाय.

त्या कारखान्यात निर्माण होणारा तो प्रत्येक साहित्यिक आज तुम्हाला अनेक क्षेत्रात पाहायला मिळेल. तुम्ही कसे लिहिता, वाचक तुमच्या साहित्याला कसा प्रतिसाद देतात, यावरून लेखकाची परीक्षा होत असते. यापलीकडे जाऊन तुम्हाला मानवी जीवनातील सत्य घटनांशी संबंधित असलेले साहित्य निर्माण करण्याचं प्रशिक्षण जो कोणी देतो किंवा तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास जो कोणी भरतो, तो तुमचा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतो. त्या वास्तववादी मार्गदर्शनाचे काम सातत्याने बोराडे सर करत असतात, हे मला आवर्जून या लेखाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते. त्यांची फार वेळा भेट झाली नाही; पण सातत्याने फोनवर बोलणे होते. माझ्या लिखाणाच्या निमित्ताने ते सतत मला सांगत असतात, सूचना करत असतात. माझे ‘सकाळ’मध्ये नियमितपणे प्रकाशित होणारे लेख वाचून सर म्हणतात, ‘एवढ्यावरच हा विषय थांबून चालणार नाही. संदीप, या तुमच्या विषयावर कादंबरी आली पाहिजे.’ मलाही ते पटते आणि अनेक विषय मी पुस्तकाच्या रूपाने समोर आणले आहेत. त्याला कित्येक वेळा रा. रं. बोराडे सर हे कारणीभूत होते. त्यांना या वयात फार दिसत नाही. ऐकायला बरोबर येत नाही; तरीही त्यांच्यामधली वास्तव जीवनातील साहित्य आत्मसात करण्याची, नवे साहित्य निर्माण करायची धडपड काही संपलेली नाही, असे वाटते. औरंगाबादला गेले, की त्यांच्याशी बोलत-बोलत त्यांचा हात हातामध्ये घ्यावा आणि त्यांच्यामध्ये असलेली साहित्यरूपी आणि सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये घ्यावी, असे वाटते. मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा मी तसे करतो.

खूप कमी माणसे आज समाजामध्ये समाजजीवनाचं चित्रण आपल्या लेखणीच्या माध्यमातून करतात, असे बोराडे सर मला सातत्याने सांगत असतात. बोराडे सरांची शाबासकीची थाप म्हणजे एखादा मोठा पुरस्कार मिळाल्यासारखे असते. जो पुरस्कार दर रविवारी न चुकता मला मिळतोच. हा केवळ माझा एकट्याचा अनुभव नाही, तर असे अनेक लेखक मित्र मला सातत्याने बोराडे यांनी दिलेल्या शाबासकीबाबत बोलत असतात. माझ्या आगामी पुढच्या महिन्यात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत ‘ऑल इज वेल’ या पुस्तकाला बोराडे सरांनी प्रस्तावना लिहून त्या पुस्तकाची उंची वाढवली आहे.

बोराडे सरांच्या ‘पाचोळा’ कादंबरीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. 1971 साली मौज प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केली होती. आजही अनेक तरुणांच्या मनात ही कादंबरी घर करून आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्र जणू काही आपणच जगत आहोत, असा आभास झाल्याशिवाय राहत नाही. पेरणी (1962), ताळमेळ (1966), मळणी, वाळवण (1976), राखण, (1977), कणसं आणि कडबा (1994), नातीगोती (1995) असे एकूण 15 कथासंग्रह प्रकाशित झालेत. ग्रामीण भागातील अगदी छोट्या छोट्या बाबींचे सरांनी विवेचन केलेल्या कादंबऱ्या आपल्याला मोठी शिकवण देतात.

हे लिहिण्याचे निमित्त म्हणजे आज सकाळी जेव्हा फेसबुक ओपन केले तेव्हा फेसबुकने आज आठवण करून दिली की, बोराडे सर आणि माझ्या मैत्रीला फेसबुकवर नऊ वर्षे झाली. कधी कधी तंत्रज्ञान आपल्याला नकळतपणे अनेक गोष्टींची आठवण करून देते. ‘पाचोळा’लासुद्धा पन्नास वर्षे झाली आणि योगायोग म्हणजे आमच्या मैत्रीची फेसबुकने आठवण करून देऊन त्यास चार चांद लावले. नव्वद वर्षांचे तरुण असणारे रावसाहेब बोराडे सर, हे सतत मला मार्गदर्शन करत आलेले आहेत. आजही फेसबुकवर ते अनेक तरुणांशी संवाद साधतात. त्यांना बोलके करतात. मैत्री फेसबुकवर असो की अस्सल जीवनातील, मैत्री ही मैत्री असते. मैत्रीला कुठलेही बंधन नसते... ती अनमोल आणि अतुट असते... आपली मैत्री नेहमीच फुलत राहो... तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहावेत हीच आपेक्षा, हीच सदिच्छा आहे सर. आणि धन्यवाद फेसबुक आज तुझ्या नोंदीमुळे मला व्यक्त होता आले. सर, आपल्याला पुढील साहित्य क्षेत्रातील भरभराटीसाठी, छान तब्बेतीसाठी खूप खूप शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.