विकास झाला, अशा कितीही गप्पा मारा; पण मराठवाड्याच्या वाट्याला आलेला दुष्काळ काही कमी झालेला नाही. उन्हाळ्यात सोडा, सध्याही मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा कायम आहेत.
विकास झाला, अशा कितीही गप्पा मारा; पण मराठवाड्याच्या वाट्याला आलेला दुष्काळ काही कमी झालेला नाही. उन्हाळ्यात सोडा, सध्याही मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा कायम आहेत. मी जालन्यावरून औरंगाबादच्या दिशेने जात होतो. एक घागर डोक्यावर, एक घागर हातात घेऊन, घरापासून लांबच्या लांब पाणी आणायला जाणाऱ्या महिला जागोजागी रस्त्याने दिसत होत्या. या दिवसांतही दुष्काळाची तीव्रता किती कमालीची होती, हा दुष्काळ किती खोलपर्यंत गेलाय, हे पाहण्यासाठी मी मुख्य रस्त्यापासून थोडं दूर असलेल्या काही गावांमध्ये फेरफटका मारत होतो. आमची गाडी जालना जिल्ह्यातील ‘गोसेगाव’ इथं येऊन थांबली. माझ्यासमोर एका महाराजांची मिरवणूक सुरू होती.
मिरवणुकीत अनेक साधूंसह गावातील लोकही भक्तिभावाने तल्लीन झाले होते. मी गावातल्या एका व्यक्तीशी बोलत होतो. त्यांना मी विचारलं, ‘‘ही मिरवणूक कधी संपेल, मला काही कळेल का?’’ ते म्हणाले, ‘‘अहो, हे महाराज नाहीत, आमच्या गावाचे अप्पा आहेत.’ मी म्हणालो ‘‘अप्पा म्हणजे कोण?’ ‘अहो, ‘अप्पा’ म्हणजे हॉटेलवाला अप्पा.’ मला काही कळेना. ती मिरवणूक थांबली. त्या अप्पा महाराज’ यांच्या गळ्यात पडलेल्या माळांमुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता.
मी पुन्हा त्या माणसाला विचारलं, ‘कोण आहेत हे अप्पा?’ ते म्हणाले, ‘अप्पा आमच्या गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा. गरिबीतून वर आला. तरुण होईपर्यंत त्याला एका वेळेचं जेवण मिळायचं नाही. जेव्हा त्याला ते मिळायला लागलं, तेव्हा त्याने इतरांना भरभरून दिलं. त्यांनी इतकं दिलं की, आज लोकांनी देवासोबत, मोठ्या साधूंसोबत त्यांचीही गावातून मिरवणूक काढली, त्यांनाही भगवे कपडे घातले.’’ मला आश्चर्य वाटलं. मला ‘अप्पा’ नावाचं पूर्ण रसायन समजून घ्यायचं होतं. मी त्यांच्याजवळ गेलो. तेव्हा अप्पा महाराज यांनी आपले कपडे बदलले होते. अप्पा म्हणजे भारदस्त गडी, छान तरणाबांड तरुण. मी माझी ओळख सांगितली. आम्ही बोललो. त्यांच्या बोलण्यातून अनेक विषय पुढे येत होते. त्यांना जिल्हाभरातून ‘अन्नदान करा’ असं सांगणारे अनेक जण येत होते.
मी ज्या अप्पा महाराज यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव अप्पासाहेब श्रीराम घोडे (९४२१३१७६३५). अप्पा हे मूळचे गोसेगावचे ! (ता. भोकरदन, जि. औरंगाबाद) आता अप्पासाहेब हे औरंगाबाद येथील गारखेडा परिसरात राहतात. अप्पासाहेब यांना त्यांच्या आई बायजाबाई आणि आजोबा चिमाजी यांच्यामुळे अन्नदान करण्याची सवय मोठ्या प्रमाणावर लागली. ती सवय इतक्या मोठ्या प्रमाणावर लागली की, अन्नदान त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं.
जसा करता आला तसा व्यवसाय, जसा जमला तसा प्रपंच आणि पूर्णवेळ अन्नदान, असा अप्पासाहेब यांच्या आयुष्याचा क्रम बनला आहे. किती ते किस्से आणि किती त्या आठवणी, अन्नदान या विषयाला घेऊन अप्पासाहेब मला सांगत होते. माझं आणि अप्पासाहेब यांचं बोलणं तसं पूर्ण झालं नव्हतं. मी अप्पासाहेब यांना म्हणालो, ‘‘तुम्ही निघालेले दिसताय, मलाही औरंगाबादला जावं लागेल.’’ अप्पासाहेब म्हणाले, ‘‘मलाही औरंगाबादला जायचं आहे. सोबत निघू, म्हणजे बोलता येईल.’’ आम्ही दोघंही एका गाडीत बसलो. पुन्हा गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांमधून अनेक विषय पुढे आले.
औरंगाबादच्या रामनगर भागात अप्पासाहेब यांनी त्यांची गाडी थांबवली. मला अप्पासाहेब यांनी गाडीच्या खाली उतरायला सांगितलं. अप्पासाहेब म्हणाले, ‘‘ही जागा बघताय सर, ज्या दिवशी मी गाव सोडून औरंगाबादमध्ये आलो, त्या पहिल्या रात्री या जागेवर इथं फूटपाथवर मी पेपर टाकून झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर मी दुपारपर्यंत उपाशी आहे हे लक्षात आल्यावर एका रसवंतीवाल्याने मला जेवू घातलं. मी त्यांच्याकडेच काम करायला लागलो. असं काम करता करता दिवस जाऊ लागले. मग माझे दोन्ही मोठे भाऊ औरंगाबादला आले. आम्ही तिघांनी मिळून औरंगाबादमध्ये हायकोर्टाला लागून ‘त्रिमूर्ती अप्पा’ या नावाने छोटासा चहाचा स्टॉल सुरू केला. तिन्ही भावांचा असल्यामुळे ‘त्रिमूर्ती’ असं नाव ठेवलं.’’
आम्ही पुन्हा शहराच्या दिशेने निघालो. मला अप्पासाहेब यांनी आमच्या ‘सकाळ’ कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ‘सोनिया’ या हॉटेलमध्ये सोडलं. मागून माझी गाडीही आली. निघताना सकाळी नाश्त्यासाठी आमच्या हॉटेलमध्ये या, असं अप्पासाहेब यांनी सांगितलं. मीसुद्धा होकाराची मान हलवली. सकाळी आठ वाजता ‘हॉटेल त्रिमूर्ती’ इथं मी पोहोचलो. पाहतो तर काय, तेवढ्या भल्यापहाटे हॉटेल दिसत नव्हतं एवढी मोठी गर्दी. अप्पासाहेब नुकतेच आले होते.
मला त्यांनी बोलावलं. समोर असलेल्या भद्रा मारोतीच्या फोटोला त्यांनी हार घातला. समोर ठेवलेल्या गल्ल्यात त्यांनी पैसे टाकले. मी विचारलं, ‘हे पैसे कशासाठी?’ तेव्हा अप्पासाहेब म्हणाले, ‘‘दररोज टाकलेली ही रक्कम मी वर्षाकाठी बाहेर काढतो, ती दहा लाख रुपयांच्या घरात जाते. त्या पैशांतून ग्रामीण भागातील शाळांना खाऊ पुरवण्याचं काम मी करतो. हा माझा खाऊचा गल्ला आहे.’’ त्या हॉटेलमध्ये समोसा राइस, पालक राइस, आलूवडा राइस असे खूप चवदार असणारे पदार्थ मी चाखले. अप्पासाहेब यांची स्वतःची एक रेसिपी होती. तिथं असणाऱ्या पदार्थांची किंमत तरी किती? अगदी कमी. एकीकडे माणसं चवीने खात होती, तर दुसरीकडे त्याच हॉटेलच्या बाहेर असणाऱ्या भिकाऱ्यांच्या एका लाइनला अप्पासाहेब जेवण वाढत होते.
‘मी निघतो,’ असं म्हटल्यावर अप्पासाहेब अगदी हात जोडून माझ्यासमोर येऊन म्हणाले, ‘‘माझी विनंती आहे, आपले पाय माझ्या घराला लागावेत.’’
अप्पासाहेब यांच्यासोबत मी त्यांच्या घरी गेलो. घरात प्रवेश करताक्षणी, भलामोठा फोटो, ज्याला हार घातला होता, तो मी पाहिला. मी अप्पासाहेब यांना विचारलं, ‘‘हे कोण आहेत?’’ अप्पासाहेब म्हणाले, ‘‘माझे मोठे भाऊ दादासाहेब आहेत, ते वारले.’’ त्यांच्या बोलण्याने घरात एकदम शांतता पसरली. अप्पासाहेब यांची मुलगी माधवी ऊर्फ अमृता बाहेर पक्ष्यांना दाणे टाकत होती, मुलगा सूरज झाडांना पाणी टाकत होता. अप्पासाहेब यांच्या पत्नी कविता घरात मसाला कुटण्याचं काम करीत होत्या, जो मसाला हॉटेलसाठी लागणारा होता. अप्पासाहेब यांचे दोन नंबरचे मोठे भाऊ आदिनाथ, या सर्वांची अप्पासाहेब यांनी माझ्याशी ओळख करून दिली. त्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक चमक होती. त्या चमकेला दातृत्वाच्या भावनेतून चार चाँद लागले होते. अप्पासाहेब म्हणाले, ‘‘आमच्या वारलेल्या मोठ्या भावाने आम्हाला वडिलांच्या सावलीप्रमाणे वाढवलं, ते स्वतः उपाशी राहायचे; पण आम्हाला खाऊ घालायचे.’ आपल्या भावाच्या आठवणीने त्या दोन्ही भावांच्या डोळ्यांत अश्रू आले.
अप्पासाहेब आणि त्यांचे भाऊ आदिनाथ मला सांगत होते, ‘‘सध्या दोन मोठी मंदिरं रंगवून देण्याचं काम सुरू आहे. तिथं सात दिवसांच्या पंगतीपण द्यायच्या आहेत. आम्ही काय केलं हे आम्ही सहसा कुणालाही सांगत नाही; पण तुम्ही खूप खोलात जाऊन विचारल्यामुळे सांगितलं. खरंतर आम्ही काही करत नाही, तो पांडुरंगच आमच्याकडून करून घेतो.’’
मी अप्पासाहेब यांच्या घरून निघालो. आतापर्यंत भंडारा आणि त्यातून होणारं अन्नदान मी ऐकलं होतं; पण आज ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. मी नांदेडमध्ये असताना माझं कार्यालय अगदी गुरुद्वाराला लागून होतं. मला काय तिथं येणाऱ्या प्रत्येकाला आजही माहिती नाही की, तिथं सुरू असलेल्या ‘लंगर’ म्हणजे भाविकांच्या पंगतीला धान्य कोण पुरवतं ? कदाचित असे औरंगाबादमधले अनेक अप्पासाहेब त्यामागे असतील. ते सारे जण अगदी अप्पासाहेब यांच्यासारखंच आपण काहीतरी करतो, याचा गाजावाजा न करता, त्यांचं काम ते नित्यनेमाने करतात. चला, तुम्ही-आम्हीही अप्पासाहेब बनू आणि भुकेलेल्यांना चार घास खायला देऊ... आपली तयारी आहे ना, अप्पासाहेब होण्याची?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.