गोव्यामधल्या भेटीगाठी झाल्यावर मी निघालो. वाटेत मडगावला कुल्फी खाण्यासाठी रस्त्यावर रांगच रांग लागली होती. माझा सारथी गणेश मला म्हणाला, ‘साहेब, ही फार लोकप्रिय कुल्फी आहे.’ मी खाली उतरलो. त्या कुल्फीवाल्याच्या रांगेमध्ये मीही सहभागी झालो. पाठीवर थैली, डोक्यावर टोपी, अंगात मळकट असलेले कपडे घालून एक माणूस मला कुल्फी द्या, असा आग्रह त्या कुल्फीवाल्याकडं धरत होता. दुरून पाहता क्षणी असं वाटलं, की हा कोणीतरी वेडा माणूस फुकट कुल्फी मागत असेल, असा त्याचा अवतार होता.
कुल्फी घेण्यासाठी जेव्हा माझा नंबर आला, तेव्हा मी त्या माणसालाही एक कुल्फी द्या, मी त्याचे पैसे देतो, अशी विनंती कुल्फीवाल्याला केली. कुल्फीवाला म्हणाला, ‘अहो दादा, हा ‘वेडा पिंजारी’ आहे. याचा रोजचाच त्रास आहे. चार पैसे कुणी तरी त्याला दिले, की लगेच घेऊन येतो अन् कुल्फी मागतो. त्याला दिवसाकाठी मीही अशीच एक-दोन वेळा कुल्फी देत असतो.
बिचारा पिंजारी...! मला रात्री कुल्फीचा गाडा ढकलण्यासाठी बिचारा मदत करतो.’ त्या वेड्याला घेऊन तो कुल्फीवाला सहजपणे बोलून गेला. कुल्फीवाल्यानं मला आणि त्या माणसाला दोघांनाही कुल्फी दिली. तो माणूस कुल्फी खाण्यामध्ये मग्न होता.
त्या माणसाच्या डोळ्यांमधली आग, त्याची लांब लांब बोटे आणि झुपकेदार केस पाहून हा माणूस भूतकाळानं खूप पछाडलेला असावा, असा मी अनुमान काढत होतो. मी कुल्फी खाता खाता सहज त्या कुल्फीवाल्याला विचारले. ‘कोण आहे हा वेडा पिंजारी आणि रोज इथंच का येतो.’ कुल्फी विकणारे दोघे जण होते, ते एकमेकांकडं पाहत होते.
कुल्फीवाला मला म्हणाला, ‘साहेब ‘तो’ राहतो स्मशानभूमीमध्येच, तिथंच झोपतो.’ मी पुन्हा कुल्फीवाल्याकडं गेलो आणि माझ्यासाठी आणि त्या माणसासाठी अजून एक-एक कुल्फी घेतली. कुल्फीवाला म्हणाला, ‘आता ही शेवटची कुल्फी आहे बरं का.’ पिंजारीला म्हणालो, ‘तुमचं नाव पिंजारी आहे का आडनाव, तो हसला आणि म्हणाला, ‘माझं नावच पिंजारी आहे.’ त्यानं दोन मिनिटांत कुल्फी खाल्ली. तो आता निघण्याच्या तयारीमध्ये होता.
मी त्याला म्हटलो, ‘कुठं राहता, तुम्ही मूळचे गोव्याचे का?’ तो गंभीर झाला आणि माझ्याकडं एकटक पाहत होता. तो म्हणाला, ‘इथंच राहतो, पुढच्या स्मशानभूमीत.’ मला काही कळेना, मी पुन्हा त्याला म्हणालो, ‘तिथं कुणी नातेवाईक काम करतात का?’ तो म्हणाला, ‘नाही.’ ‘तो’ स्मशानभूमीकडं निघाला. मीही त्याच्या मागं निघालो.
स्मशानाच्या गेटमधून आत जाताना त्यानं मागं वळून पाहिलं. मी त्याला दिसलो, पण न थांबता तो तसाच निघून गेला. त्या गेटवर एक महिला झाडू मारत होती. मी त्या महिलेजवळ जाऊन थांबलो. ती महिला घाम पुसत होती. मी तिला म्हणालो, ‘तो आत गेलेला वेडा इथंच राहतो काय?’ त्या महिलेनं माझ्याकडं रागानं पाहिलं आणि मला म्हणाली, ‘कोण म्हणतं तो वेडा आहे म्हणून.
इथं स्मशानभूमीत राहायला मिळावं म्हणून त्यानं वेड्याचं सोंग घेतलंय.’ मी म्हणालो, ‘तसं का?’ ती बाई म्हणाली, ‘ती फार मोठी कहाणी आहे.’ मी म्हणालो, ‘असं काय झालं मला सांगा ना...!’ ती सांगायला तयार नव्हती. खोदून खोदून विचारल्यावर तिनं माझ्याशी बोलायला सुरुवात केली.
पिंजारी दायमा मूळचा महाराष्ट्रातील नगरचा, नोकरीच्या निमित्तानं तो गोव्याला आला. काबाडकष्ट करून पिंजारीनं एक छोटं घर घेतलं. तो ज्या छोट्या कंपनीत काम करायचा, तिथं त्याचं विजया या मुलीवर प्रेम बसलं. घरच्यांचा विरोध पत्करून विजयासोबत पिंजारीनं लग्न केलं. दीड वर्ष त्यांचा संसार खूप सुखात चालला.
दीड वर्षांनी विजयानं कॅसिनोमध्ये जॉब सुरू केला. एक दिवस पिंजारी घरी आला, पण विजया घरी नव्हती. पिंजारीनं तिच्या जॉबच्या, नातेवाईक अशा सर्व ठिकाणी विजयाची विचारपूस केली, पण तिचा पत्ता लागेना. शेवटी पिंजारीनं पोलिसात तक्रार दिली. चार दिवसांनी पिंजारीला अजून एक धक्का बसला. विजयाच्या आई-बाबांनी आमच्या मुलीला पिंजारीनं म्हणजे तिच्या नवऱ्यानं मारलं, अशी पोलिसांत तक्रार दिली.
पिंजारीसमोर पोलिसांचं नवं संकट उभं राहिलं. नऊ दिवसांनंतर विजयाची डेड बॉडी समुद्राकाठी सडलेल्या अवस्थेत सापडली. अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली पिंजारीला खूप त्रास दिला. या सर्व कालावधीमध्ये पिंजारी विजयाच्या विरहानं वेडा झाला. पिंजारीच्या आई-बाबांना काही महिन्यांनी हे सगळं कळलं. ते नगरहून गोव्याला आले. पिंजारी आता हाताबाहेर गेला, हे लक्षात आल्यावर त्यांनी पिंजारीला नगरला नेलं.
चार महिन्यांनंतर पिंजारीचं पुन्हा लग्न लावलं. लग्न झाल्यावरही विजयाच्या विरहाचा परिणाम खूप तीव्रतेनं झाला. मी माझ्या विजयाकडं गोव्याला जातो, असं म्हणत एक दिवस सर्व सामान बांधून पिंजारी गोव्याला निघाला. गोव्यात येऊन घरी गेल्यावर पिंजारीला समजले, की पिंजारीचं घर द्वेषानं विजयाच्या भावानं ताब्यात घेतले. आता पिंजारी पूर्णपणे रस्त्यावर आला होता.
मी त्या झाडू मारणाऱ्या महिलेपासून आतमध्ये गेलो. मी दूर नजर टाकली. पिंजारी त्या झाडू मारणाऱ्या बाईने सांगितल्याप्रमाणे विजयाच्या समाधीसमोर बोलत बसला होता. मी जाऊन त्याच्याजवळ थांबलो, तो तेव्हा एकदम शांत झाला. मी थोडा वेळ थांबलो, पिंजारी आता काही बोलणार नाही, हे माझ्या लक्षात आल्यावर मीच म्हणालो, ‘मला तुमची सारी कहाणी त्या बाईंनी सांगितली.’ पिंजारीनं माझ्याकडं सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं.
तो तसा वेडा नव्हताच. मी म्हणालो, ‘तुमची दुसरी बायको कुठं आहे ?’ तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, ‘तुमच्याशी गेटवर जी बोलत होती तीच तर माझी दुसरी बायको आहे.’ मी एकदम शांतच झालो. पिंजारीला काय बोलावं हे मला काही कळेना. मी मागं वळून पाहिलं तर गेटवर ती बाई देखील नव्हती.
मी पिंजारीला म्हणालो, ‘असं वेड्याचं सोंग घेऊन किती दिवस राहणार आहेस?’ हातातली फुलं विजयाच्या समाधीवर ठेवत पिंजारी म्हणाला, ‘जोपर्यंत मला विजया तिच्याकडं बोलवत नाही तोपर्यंत.’ मला बोलायचं काहीच सुचत नव्हतं. मी पिंजारीच्या हातातली काही फुलं घेतली आणि विजयाच्या समाधीवर वाहिली. पिंजारीकडं एक नजर टाकून माझ्या रस्त्याला लागलो. त्या गेटवर, बाजूला असलेल्या त्या फाटक्या घरात पिंजारीची दुसरी बायकोही नव्हती. विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.