मी बीडहून कार्यालयीन काम आटोपून रात्री खासगी कंपनीच्या गाडीने पुण्याला निघालो. माझ्या बाजूला एक युवक फोनवरून मोठमोठ्याने बोलत होता.
मी बीडहून कार्यालयीन काम आटोपून रात्री खासगी कंपनीच्या गाडीने पुण्याला निघालो. माझ्या बाजूला एक युवक फोनवरून मोठमोठ्याने बोलत होता. ‘तुम्ही काळजी करू नका, ते बरोबर पोहोचतील, मी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, मी त्यांना मदत केली आहे.’’ त्याचं बोलणं संपलं. मी त्या युवकाला म्हणालो, ‘काय, झालं का बोलणं तुमचं?’ तो अगदी शांतपणे म्हणाला, ‘हो ना दादा, झालं.’ मी पुन्हा त्याला म्हणालो, ‘तुमचा काय टुरिस्टचा व्यवसाय आहे का?’ तो मला म्हणाला, ‘नाही. मी परदेशात, रोमानिया इथे कॉमल्स इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरीला आहे.’
आमच्या गप्पा सुरू झाल्या. हा अठ्ठावीस वर्षांचा तरुण अनेक युवकांना नोकरीसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवत होता. त्याच्या बोलण्यातून मला ते समजलं. मी पुन्हा विचारलं, ‘‘तुम्ही मुलं पाठवण्यासाठी किती पैसे घेता? तुमची एजन्सी आहे का? तुम्ही हे काम करण्यामागचा हेतू काय आहे?’’ त्यानंतर त्या तरुणाने मला जे काही सांगितलं, ते सगळं सुखद होतं. त्या युवकाचा प्रवास, तो आता ज्या देशामध्ये गेलाय तिथला सगळा प्रवास. आता तो अनेक युवकांसाठी स्वतः देत असलेलं योगदान, त्यातून झालेला त्याचा सगळा प्रवास, हे सगळं एक इतिहास झाला होता.
मी ज्या युवकाशी बोलत होतो त्याचं नाव उदय बादाडे (९७६३७६१९४९). उदय बादाडे हा बीड जिल्ह्यातील वाघोला या गावचा. वाघोला माजलगाव तालुक्यात येतं. बी.ए. झालेल्या उदयला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला होता. उदयने बीड, पुण्यात नोकरी केली. त्या नोकरीतून भागेना म्हणून उदयने नोकरी सोडली. दुधाचा व्यवसाय सुरू केला. माजलगावला हा व्यवसाय काही दिवसांत बंद करावा लागला. विजेच्या भारनियमनाची समस्या इतकी तीव्र होती की, आणलेला माल अनेक वेळा नासून जायचा. विविध समस्यांमुळे आपण जगायचं कसं, हा प्रश्न उदयसमोर पडला होता.
उदय मला सांगत होता, ‘‘गरज माणसाला सगळं काही करायला भाग पाडते. चांगला जॉब मिळेल, चांगला व्यवसाय करू, या दृष्टिकोनातून मी खूप चाचपणी केली, बहुतांश ठिकाणी प्रयत्न केले, पण यश काही येईना. सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाची अडचण. व्यवसाय - उद्योग सुरू करायचा असेल, तर भागभांडवल कुठून आणायचं? बँकेतून पैसे घेतले तर व्याजासह ते भरायचे कसे? नोकरी केली तर तेवढ्या पैशांमध्ये खर्च भागणार नाही, हे ठरलेलं होतं. मी बी.ए. का झालो? बीड जिल्ह्यात सोडा, तर देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात केवळ बी.ए.वर नोकरी लागणार नव्हती. चार बहिणी, एक एकर शेती, प्रचंड दारिद्र्य आणि खूप मोठं स्वप्न यांचा कुठेही ताळमेळ लागत नव्हता.’’
मी उदयला म्हणालो, ‘‘एक तर तू बी.ए. झालेला आणि दुसरं परदेशात जाऊन नोकरी करत आहेस, हे काही मला कळालं नाही.’’ तो उत्साहाने म्हणाला, ‘‘संभाजी ब्रिगेडने ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा’ नावाने एक फेसबुक पेज सुरू केलं. त्यात प्रवीणदादा गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातल्या यशस्वी झालेल्या अनेक मान्यवरांचा सहभाग आहे.
आपल्या मराठी तरुणांनी अटकेपार झेंडा लावला पाहिजे; परदेशात जाऊन शिक्षण, उद्योग, नोकरी केली पाहिजे, या भावनेतून हा ग्रुप स्थापन झाला. मी प्रवीणदादा गायकवाड यांचं या ग्रुपवर भाषण ऐकलं. त्यानंतर त्यांचे काही लेखही वाचले. परदेशात नोकरी कशी करायची, पासपोर्ट- व्हिसापासून ते तिथं राहण्यापर्यंत, नोकरीच्या संधीपर्यंत सगळे विषय सांगितले जातात तिथं. एवढंच नाही, तर अनेक वेळा ही मंडळी पदरमोड करून गरिबांच्या अनेक मुलांना परदेशात पाठवतात. मी सर्वांत अगोदर एक ‘स्किलिंग’चा कोर्स शिकलो. सुरुवातीला कुवेत, मग ओमान अशा ठिकाणी ‘टेक्निशियन’ म्हणून काम केलं. आता मी रोमानिया या ठिकाणी आहे. वयाच्या तेविसाव्या वर्षी मला पुण्यात आठ हजार रुपये मिळायचे, आता परदेशात मला ८० हजार मिळतात. शिवाय कंपनीकडून राहण्यासाठी, खाण्यासाठी, ये-जा करण्यासाठी सर्व सोयी-सुविधा आहेत. हे जवळजवळ सगळ्या देशांमध्ये आहे. बरं, मी परदेशात एकटा गेलो आणि थांबलो असं नाही. मी दीडशे लोकांना घेऊन गेलो. नातेवाईक, मित्र, ओळखीचे आणि आमच्या मिशनच्या माध्यमातून आलेले सर्व जण. एकही परदेशातून परत आला नाही. कुणालाही अडचण आली नाही. ही मिशन मी एकटा चालवत नाही, तर शेकडो त्याचा भाग आहेत. आमच्या ग्रुपशी जोडलेला प्रत्येक जण किमान शंभर मुलं परदेशात घेऊन जात असेल...’’ मी थक्क होऊन हे सारं ऐकत होतो.
उदय माझ्यासमोर एक केस स्टडी होता, जो परदेशात जाऊन मोठ्या पगारावर काम करतोय. उदयने माजलगावला घर घेतलं. आता सोलापूरमध्येही तो घर घेतोय. उदयने ठरवलं होतं, मला काही तरी करायचं आणि त्याने ते करून दाखवलं. ते होण्यामागे त्याला मदत करणारे अनेक हात होतेच, शिवाय त्यानेही अनेकांना मदत केली. हा मदतीचा ‘सिलसिला’ एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून हजारो जणांकडे सुरू आहे.
उदय माझ्याशी बोलताना अनेक वेळा अजयसिंह सावंत यांचं नाव घेत होता. अजयसिंह यांनी मदत केली, त्यांनी व्हिसा काढून दिला, त्या देशामध्ये बोलले, त्यांनी अनेकांना पैसे दिले... ‘मराठी माणसांची आर्थिक क्रांती’ या चळवळीत ग्राउंडवर काम करणारे सर्वेसर्वा अजयसिंह आहेत, असं उदय वारंवार मला सांगत होता. मला त्यांना भेटायचं होतं. रात्री झोपताना दोन कधी वाजले हे कळालं नाही. सकाळी आम्ही पुण्यात पोहोचलो. उदयचा निरोप घेतला. उदयकडून मी अजयसिंह यांचा संपर्क क्रमांक घेतला आणि मी त्यांना भेटण्यासाठी निघालो. अजयसिंह (९८८१२५४३४५) यांचा वेळ घेऊन मी त्यांच्या घरी पोहोचलो. कर्माने, मनाने श्रीमंत असणाऱ्या अजयसिंह यांनी परदेशांमध्ये मुलं पाठवण्याच्या कामासाठी जे योगदान दिलं होतं, त्याविषयी कितीही लिहिलं तरी ते कमी पडेल. अजयसिंह यांच्या कामाचा खरोखर एक इतिहास झाला होता. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी किती मुलं पाठवली, त्याचं स्वरूप कसं आहे, आमच्याकडे मुलं कशी येतात, आम्ही त्यांना कसं पाठवतो, याची माहिती मला ते सांगत होते.
जसं उदयने मला अजयसिंह यांचं नाव सांगितलं होतं, तसं अजयसिंह यांनी मला या सगळ्या चळवळीचे जनक, गरिबांच्या मुलांसाठी स्वतः पदरमोड करणारे, अनेक उपक्रम राबवून या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना परदेशात जाण्यासाठी प्रोत्साहित करणारे प्रवीण गायकवाड यांचं नाव सांगितलं. गायकवाड यांच्याविषयी अजयसिंह जे मला सांगत होते, त्यावरून ते एक वेगळं रसायन होतं. परदेशात मुलं पाठवण्याबाबत मी प्रवीणदादा गायकवाड यांना भेटायला गेलो. त्या भेटीत ते माझ्याशी चार तास बोलले. मला प्रवीणदादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड एवढंच माहिती होतं; पण हे रसायन काही औरच होतं. ते बोलत होते आणि मी ऐकत होतो.
तंजावरपासून पेशावरपर्यंतचा मुलूख आपला आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं होतं, त्यामागे महाराजांची फार मोठी दूरदृष्टी होती. त्यातून त्यांना रयतेला एक दिशा आणि प्रेरणा द्यायची होती. आपल्या लोकांनी केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता तंजावरपासून पेशावरपर्यंत मुलूखगिरी करून आपलं वर्चस्व निर्माण केलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांमध्ये संपूर्ण जग पसरलं आहे. या देशांत लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे, तिथं संधी खूप आहेत. भारतातील पंजाबी, सिंधी, केरळी, तमीळ, गुजराती, मारवाडी या लोकांनी जगातल्या संधी हेरल्या, तिथं जाऊन ते या देशात राजे झाले. आम्ही मराठी तरुणही आता मागे राहणार नाही. आता मोहीम एकच, वर्षभरात किमान दोन ते तीन हजार तरुण बाहेर गेले पाहिजेत, उद्योगाकडे वळले पाहिजेत. गायकवाड (८९७५५५८८००) केवळ बोलत नव्हते, तर त्यांनी ते करून दाखवलं होतं.
प्रवीणदादा गायकवाड यांच्या घरून मी मुंबईकडे निघालो. दिवसभर या विषयावर चर्चा करून, विविध दाखले ऐकून माझं डोकं परिपूर्ण झालं होतं. आपणही या ‘मिशन’चा भाग झालं पाहिजे असं वाटत होतं. उदय बादाडे, अजयसिंह सावंत खास आणि प्रवीणदादा गायकवाड हे तिघेजण तीन पिढ्यांचे. हे तिघेही माझ्यासाठी एक केस स्टडी होते. प्रत्येकाकडे त्यांचे वेगवेगळे प्रचंड अनुभव होते. उदयला ‘परिस्थिती’ने शिकवलं, त्या शिकवणीतून तो या वाटेवर चालू लागला, अनेकांना मदत करू लागला. अजयसिंह यांनी एक ‘चळवळ’ म्हणून स्वतःला या कामामध्ये वाहून घेतलं, ज्या चळवळीने राज्य व्यापलं होतं. प्रवीणदादा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘विचारांचं मिशन’ आहे म्हणून या ‘मिशन’साठी अवघं आयुष्य पणाला लावलं, बहुजनांच्या हजारो मुलांना उभं केलं. ते रोज या चळवळीसाठी किमान दीडशे किलोमीटरचा प्रवास करतात, असं त्यांच्या चालकाने मला सांगितलं.
त्यानंतर सलग पाच दिवस मी या विषयावर खूप अभ्यास केला. अनेक मुलांचे अनुभव ऐकले, त्यांना भेटलो. माझ्या दृष्टीने ही ‘चळवळ’ म्हणजे आर्थिक क्रांतीच्या दिशेने पडणाऱ्या पावलांच्या खुणा आहेत. जोपर्यंत इथला प्रत्येक मराठी तरुण आर्थिक बाबतीत सक्षम होणार नाही, त्या तरुणांमध्ये जगभर ‘भ्रमंती’ करण्याचा आत्मविश्वास बळावणार नाही, तोपर्यंत आमचं राज्य, देश सक्षम होणार नाही. अनेकांनी मिळून सुरू केलेल्या या ‘आर्थिक क्रांतीच्या’ चळवळीत लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही-आम्हीही सहभागी होऊ या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.