चांगुलपणाची पेरणी..!

मुंबईलगत असणाऱ्या मोखाडा भागात मागच्या आठवड्यात काही कामानिमित्ताने मी गेलो होतो. मोखाडा भागात असणाऱ्या अनेक गावांत मी फिरलो. दारिद्र्य, मागासलेपण या भागात अगदी ठासून भरलंय.
चांगुलपणाची पेरणी..!
Updated on
Summary

मुंबईलगत असणाऱ्या मोखाडा भागात मागच्या आठवड्यात काही कामानिमित्ताने मी गेलो होतो. मोखाडा भागात असणाऱ्या अनेक गावांत मी फिरलो. दारिद्र्य, मागासलेपण या भागात अगदी ठासून भरलंय.

मुंबईलगत असणाऱ्या मोखाडा भागात मागच्या आठवड्यात काही कामानिमित्ताने मी गेलो होतो. मोखाडा भागात असणाऱ्या अनेक गावांत मी फिरलो. दारिद्र्य, मागासलेपण या भागात अगदी ठासून भरलंय. रस्त्यावरून ‘अनवाणी’ पायांनी ये-जा करणारी शाळकरी मुलं; डोक्यावर भलंमोठं ओझं घेतलेल्या, अंगावर जेमतेम कापड असणाऱ्या महिला... हे सगळं चित्र मला त्या रस्त्यावरून प्रवास करताना दिसत होतं. ती ‘अनवाणी’ मुलं माझं लक्ष वेधून घेत होती. त्या मुलांकडे बघून मला यातना होत होत्या. मी गाडीच्या खाली उतरलो, त्या मुलांशी बोललो. खिशात हात घालून, चपला - बूट घ्या, असं म्हणून मी त्यांना पैसे देत होतो; पण ती मुलं काही केल्या पैसे घेईनात. आदिवासी समाज हा इथला मूळ निवासी, राजा. जितका तो प्रामाणिक, इमानदार, तितका स्वाभिमानीही. बराच वेळ मी बोलल्यावर ती मुलं बोलायला लागली. त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या घरून शिकताना किती विरोध होतो, हे ती मला सांगत होती.

मी त्या मुलांशी बोलत असताना, दोन-तीन मुली सायकलवरून त्या मुलांच्या घोळक्याजवळ येऊन थांबल्या. सायकलवरच्या मुली आणि त्या मुलांच्या सोबत असणाऱ्या मुली एकमेकांशी बोलत होत्या. ‘‘तुला सायकल मिळाली, माझ्या सविता नावाच्या मैत्रिणीलाही मिळाली, सायकलवाटप करणाऱ्या त्या काकांनी मला सांगितलं, थोडे दिवस जाऊ द्या, तुम्हालाही सायकली देऊ.’’

बोलता-बोलता त्या घोळक्यामधला रवी नावाचा मुलगा मला म्हणाला, ‘मोखाडा परिसरातील काही गावांमध्ये, काही माणसं मागच्या आठवड्यात सायकली घेऊन आली होती. त्यांमध्ये बहुतांशी सायकली जुन्या होत्या. गावातून आसपासच्या शाळेसाठी ये-जा करणाऱ्या अनेक मुलींना त्यांनी सायकली दिल्या. आता पुढच्या गावात सायकलींचं वाटप करण्यासाठी आम्ही चाललो, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.’ मी शाळेपर्यंत त्या मुलांसोबत गेलो. त्या सायकली कुणी दिल्या असतील, का दिल्या असतील, असे प्रश्न मला पडले होते. त्याच गावातल्या विठ्ठल नखाते यांना भेटलो. हे ते गृहस्थ होते, ज्यांनी त्या सायकलवाटप कार्यक्रमाचा संयोजक म्हणून आपला सहभाग नोंदविला होता. त्या मुलांनी नखातेंबद्दलची माहिती मला सांगितली होती. नखाते यांच्याशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितलं, ‘रेल्वेमध्ये टी.सी. असणारे अनेक जण एकत्रित आले, त्यांनी मुंबईच्या अनेक सोसायट्यांमध्ये फिरून, जुन्या सायकली मागून त्या एकत्रित केल्या. अनेक गरीब, आदिवासी भागांत फिरून मुलींना वाटल्या.’ नखाते रेल्वेच्या त्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी बरंच सांगत होते. त्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोखाडा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये जाऊन तिथं सायकली वाटप केल्या होत्या. गावापासून ते शाळेपर्यंतचा रस्ता कापताना एक-दोन तास असा वेळ लागायचा, त्यातून वारा -पाणी हे आलंच. अंगावर ठिगळांचं कापड, पायांत चप्पल नाही, अशा सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच सायकलींबाबत त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असावा, असं मला वाटत होतं.

सायकलींमुळे मी त्या मुलींच्या डोळ्यांमधला आनंद पाहत होतो. कित्येक किलोमीटर पायी प्रवास करताना त्यांना होणारा त्रास प्रचंड वेदना देणारा होता. शाळेसाठी पायपीट करणारी ती बहुतांशी सगळी मुलंही गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं होती. मी मोखाडा परिसरातल्या ज्या ज्या गावांत गेलो, तिथं मला हे रेल्वेचे अधिकारी सायकली वाटपासाठी आल्याचं सांगितलं जात होतं. दुसऱ्या दिवशी मुंबईत गेल्यावर मी त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. ‘द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई’ असा सीएसटी रेल्वे स्टेशनच्या वर असलेल्या मजल्यावरील बोर्ड मला दिसला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम लोकांसाठी, गरिबांसाठी असतात. टीसी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं, ते किती पैसे घेतात, ते किती दंड ठोठावतात, ते कसे त्रास देतात; पण इथं मात्र सगळे टीसी मिळून काहीतरी वेगळं काम करतात, हे मला पहिल्यांदा कळलं. मला ज्या धोंडू विश्वनाथ चिंदरकर (८६९३०९२२११) आणि हरिश्चंद्र मधुकर मोंडकर या दोघांचा संपर्क दिला होता, त्या दोघांशी मी अगोदर फोनवर बोललो होतो. त्यांची मी वेळ घेतली होती. मी त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलो. मी येण्याच्या अगोदरच त्या कार्यालयात दोन महिला आणि त्यांची दोन लहान लहान मुलं यांच्याशी चिंदरकर आणि मोंडकर (९१६७०८९०३६) काहीतरी गंभीर सुरात संवाद साधत होते.

मी बाजूला बसलो, त्यांचा संवाद सुरू होता. त्यातली बुरखा घालून आलेली एक महिला म्हणत होती, ‘‘माझे सासू, सासरे आजाराने त्रस्त आहेत. मुलाचा प्रवेश पैशांमुळे रखडला आहे. नातेवाइकांकडे पैशांची मागणी केली तर त्यांनी हात वर केले.’’ दुसरी महिला तोंडाला पदर लावत म्हणत होती, ‘‘माझ्या पतीच्या निधनानंतर काही पैसे होते, ते आता संपले आहेत. मुलांच्या शाळेच्या ‘फी’लासुद्धा पैसे नाहीत.’’ ते दोघेजण त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते. त्या दोघांनी त्या दोन्ही महिलांना काय सांगितलं माहिती नाही. त्या दोघी प्रसन्न होऊन परतल्या. त्या महिला गेल्या. मी पुढे येऊन त्यांना भेटल्यावर त्या दोघांनी माझं स्वागत केलं. मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला.

आमची दखल घेण्यासाठी कुणी येईल असं कधी वाटलंच नाही, असं ते दोघे म्हणत होते. १९८७ ला व्ही. जी. शिंदे, डी. डी. फडणीस या दोघांनी सेवेच्या उद्देशाने, टीसी परिवारातील सर्वांना प्रोत्साहित करता यावं, या उद्देशाने या ट्रस्टची स्थापना केली. चिंदरकर आणि मोंडकर यांच्यासारखे सेवाभावी टीसी, अधिकारी यांनी सगळ्या टीसींना सोबत घेऊन हा सेवाभावी वारसा पुढे कायम ठेवला आहे. या ट्रस्टने सामाजिक कामाने कमालीची उंची गाठली होती. अनेक लोकहिताचे उपक्रम त्यांनी राबविले. त्यांच्या उपक्रमाचे अल्बम, वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, त्यांनी राबवलेले अनेक उपक्रम हे सगळं पाहून मी थक्क झालो.

सर्व मोठी माणसं एकत्रित आली तर त्याचं काय होऊ शकतं, याचं ते उत्तम उदाहरण होतं. मी चिंदरकर, मोंडकर यांना विचारलं, ‘‘त्या दोन ज्या महिला आल्या होत्या, त्या कोण होत्या?’’ त्यावर ते दोघे म्हणाले, ‘‘या दोन्ही महिला आमच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडलं होतं. त्या कुटुंबाला सरकारी मदत मिळालीच, शिवाय आमच्या ट्रस्टकडून आम्ही वारंवार मदत केली.’’

‘घराचा कमावता माणूस जर उमेदीच्या काळात गेला, तर कुटुंबाची काय अवस्था होते’ हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणं ते दोघेही मला सांगत होते. ही मंडळी फक्त रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठीच मदत करतात असं नव्हे; तर जे कुणी गरजू येतील त्यांच्यासाठीही हे मदत करत होते. पूर, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, गरजूंच्या शाळेची फी आणि आता सायकल वाटपासारखा सामाजिक उपक्रम, असे अनेक उपक्रम हा ट्रस्ट राबवीत होता. सायकल देण्याच्या उपक्रमाबाबत चिंदरकर म्हणाले, ‘‘मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या अनेक ग्रामीण भागांत शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही आसनगावसारख्या अनेक गावांमध्ये फिरलो, तिथे असं लक्षात आलं, की ही माणसं, त्यांचं जगणं अजून एक पिढी मागे आहे. त्यांची मुलं तर खूप मागास आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. या गावांत काय करता येईल यासाठी आम्ही अवघी सुटी आणि सुटीचे दिवस घालवले.

आता कुठे आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. आम्ही मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी आवाहन केलं आहे की, तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या सायकली आम्हाला द्या. आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही जे काही चांगलं काम करतो, त्याचं सगळं श्रेय या दान करणाऱ्या सर्व माणसांचं आहे. आम्ही केवळ ‘पोस्ट मास्तर’ची भूमिका बजावतो.’’ मी या दोघांशी बोलता-बोलता मध्येच म्हणालो, ‘‘तुम्ही इतक्या गरजू लोकांना मदत करता, अनेक दुःखितांचे अश्रू पुसता, यासाठी पैसा तर मोठ्या प्रमाणावर लागतो, तो कसा येतो?’’ यावर मोंडकर म्हणाले, ‘‘आम्ही सगळेजण आमच्या टीममधून पैसे गोळा करतो, आम्ही चांगलं काम करतोय, हे कळल्यामुळे अनेक जण मदत करतात. एकाला एक, करत-करत आज हे काम खूप मोठं झालं आहे.’’ मोंडकर त्यांचे अनुभव सांगताना म्हणाले, ‘‘मुंबईच्या सर्व लोकलमध्ये, राज्यात आणि राज्यातून राज्याबाहेर ये-जा करणाऱ्या रेल्वेमध्ये असे विषय असतात, ज्यातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आमचे हजारो टीसी पुढाकार घेतात. चुकलेल्या माणसांना पोलिसांच्या मदतीने घरी सोडण्यापासून, रेल्वेत सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे, अशी अनेक कामं हे लोक करतात.’’

त्यांचे अनेक विषय आणि ते करत असलेल्या मदतीच्या कामाचं स्वरूप ऐकूनच मी चकित झालो होतो. मी ‘त्या’ कार्यालयातून बाहेर पडलो. टीसी या घटकाबाबत एकूण समाजात काय चित्र असतं, मीसुद्धा काय विचार करीत होतो. प्रत्यक्षात ही माणसं किती मोठं सामाजिक काम करतात, हा विचार माझ्या डोक्यात सुरू होता. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या ‘ट्रस्ट’कडून सर्वार्थाने मदत घेतली पाहिजे आणि जे मदत करू शकतात, त्यांनी या चांगल्या कामाला गती मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. समाजात या रेल्वे ट्रस्टसारखी चांगुलपणाची पेरणी करणारे घटक वाढले पाहिजेत, तरच अनेक दुःखितांचे अश्रू कमी होतील. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुमचे आमचे हात या कामाला हातभार लावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.