बुलडाणा येथील पत्रकार संघाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून मी काही भेटीगाठींसाठी बुलडाणा परिसरात फिरत होतो.
बुलडाणा येथील पत्रकार संघाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून मी काही भेटीगाठींसाठी बुलडाणा परिसरात फिरत होतो. गोंधनखेड शिवार वरवंड भागात रस्त्याच्या एका बाजूला एका रांगेत विचित्र लोकांची कटिंग-दाढी करण्याचं काम एक तरुण करत होता. ते मी पाहिलं. अशी विचित्र दिसणारी एवढी माणसं कोण आहेत, ती इथं का आली असतील, असे प्रश्न मला पडले. मी गाडी बाजूला थांबवली. मी बारकाईने त्या सर्वांकडे पाहत होतो. कोण जोरात ओरडत होतं, कोणी मोठमोठ्याने हसत होतं, कोणी किंचाळत होतं, तर कोणी जोरजोराने डोकं खाजवत होतं... त्या माणसांच्या जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. तशात एक तरुण त्यांच्या हाताला धरून त्यांना खाली बसवत होता, पाणी पाजत होता, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत होता व त्यांचे केस कापत होता. मला फार आश्चर्य वाटलं. मी आणि माझ्यासोबत असणारी काही पत्रकार मंडळी त्या माणसांच्या दिशेने चाललो होतो. त्या गेटमध्ये प्रवेश करताना ‘दिव्या फाउंडेशन, बुलडाणा’ असा फलक लागला होता.
माझ्यासोबत असणारे पत्रकार अनिल मस्के, अरुण जैन या दोन्ही पत्रकारांना या ट्रस्टच्या कामाविषयी बरीचशी माहिती होती, ती माहिती ते मला सांगत होते. आम्ही त्या केस कापणाऱ्या युवकापर्यंत जाऊन पोहोचलो. अरुण जैन यांनी त्या केस कापणाऱ्या युवकाशी माझा परिचय करून दिला. मी त्या युवकाशी बोलत होतो. एक दहा वर्षांची मुलगी त्या युवकाकडे पळत आली आणि त्याला म्हणाली, ‘बाबा, माझी अभ्यासाला बसायची वेळ झाली आहे, माझं सगळ्यांना कपडे वाटून झालं आहे.’ मी त्या युवकाला विचारलं, ‘ही मुलगी कोण आहे?’ तो युवक म्हणाला, ‘ही माझी मुलगी स्वराली आहे. माझ्या सगळ्या कामात ती हातभार लावत असते. तिला या कामात आवड आहे.’ त्या युवकाचं ते वाक्य ऐकून आम्ही सर्वजण आश्चर्याने भुवया उंचावत होतो. तो युवक, ती लहान मुलगी ज्या माणसांची सेवा करत होती, ती सर्व माणसं गंभीर स्वरूपाची मनोरुग्ण होती. त्यांची सेवा करणं तर सोडा, त्यांच्याजवळ जाण्याचीही हिंमत आपण करू शकत नव्हतो, तिथं ही माणसं त्यांची सेवा करीत होती.त्या युवकाशी आमच्या गप्पा झाल्या. तो सगळा प्रोजेक्ट त्यांनी आम्हाला फिरवून दाखवला. तिथं असणाऱ्या सर्व रुग्णांना, काम करणाऱ्या माणसांना आम्ही भेटलो. त्यांनी केलेला सर्व प्रवास, शेकडो जणांना ‘परत दिलेलं माणूसपण’ पाहून कोणालाही धक्का बसेल, असाच त्या युवकाच्या कामाचा सर्व प्रवास होता.
मी ज्या युवकाशी बोलत होतो, त्यांचं नाव अशोक काकडे (९२६०००८००२)! अशोक सात वर्षांपूर्वी सैलानीबाबांच्या यात्रेमध्ये गेले होते. तिथं त्यांना अनेक मनोरुग्ण भेटले. काहींना परिस्थितीने टाकून दिलं होतं, तर काही मानसिक रुग्ण बनून त्या भागात कसलाही कापडाचा तुकडा अंगावर नसताना फिरत होते. काही मनोरुग्णांशी बोलल्यावर अशोक यांच्या लक्षात आलं की, या रुग्णांवर योग्य ते उपचार केले, त्यांना आधार दिला, तर त्यांचं हरवलेलं माणूसपण त्यांना परत मिळू शकतं.
अशोक यांनी सुरुवातीला चिखलीमध्ये काही रुग्णांवर उपचार केले, त्यांतील अनेक रुग्णांना ते बरे झाल्यावर त्यांच्या घरी नेऊन सोडलं. कित्येक वर्षांनंतरच्या भेटीनंतर कुटुंबीयांना जो आनंद झाला होता, हा आनंद असाच डोळ्यांनी सतत पाहायचा, हीच आस उराशी बाळगून आता हेच काम पुढे करायचं, असं अशोक यांनी ठरवलं. अशोक सरकारी बँकेमध्ये मॅनेजर होते, त्यांनी ती नोकरी सोडून देऊन पूर्णवेळ या टाकून दिलेल्या, रस्त्यावर वेड्यासारखं फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी काम सुरू केलं.
अशोक यांच्या पत्नी पोलिस विभागात काम करतात. आपले यजमान असं काम करणार हे ऐकूनच आधी त्यांना वाईट वाटलं. अशोकची आई मंगला आणि वडील रामदास यांनाही आपला मुलगा या स्वरूपाचं काम करण्याचा निर्णय घेतो याचं वाईट वाटलं.
अशोक यांच्या पत्नी ज्योती मला सांगत होत्या, ‘अनेक वर्षं आपल्या कुटुंबापासून वेगळं झालेली माणसं अशोकमुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटली; जी वेडी होती, ती बरी झाली. या चांगल्या कामासाठी अनेक जण भरभरून आशीर्वाद देऊ लागले. हे सारं मी डोळ्यांनी पाहत होते. अशोकचं काम मला त्याच्या पदापेक्षा, नोकरीतून मिळणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी मोठं वाटत गेलं. तेव्हाच मी ठरवलं, अशोकच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं.’ ‘एखादा माणूस घरातून दहा वर्षांपासून बेपत्ता आहे, त्याची मुलं-बाळं वाऱ्यावर आहेत, अशा माणसाला त्याच्या नातेवाइकांसह माणूसपण मिळवून देणं, यापेक्षा मोठं काम कोणतं असू शकतं?’ अशोक यांची पत्नी ज्योती मला प्रतिप्रश्न करत होत्या. सुरुवातीला अशोक यांनी चिखलीमध्ये मनोरुग्णांच्या कामाला सुरुवात केली. मग बुलडाणा इथं त्यांनी छोट्या भाड्याच्या खोलीत काम सुरू केलं. पंचक्रोशीत आसपास सर्वदूर अशोक यांच्या कामाची माहिती पोहोचली, तेव्हा अनेक मनोरुग्णांना त्यांच्याकडे सोडण्याचं काम होऊ लागलं.
मनोरुग्णांची संख्या वाढत गेली, जागा कमी पडू लागली. आपलं स्वतंत्र प्रोजेक्ट असलं पाहिजे, निवारा असला पाहिजे, ही भावना अशोक यांच्या मनात आली. अशोक यांनी त्यांच्या पत्नीच्या पगारावर कर्ज घेतलं. आपल्या आईचं मंगळसूत्रही गहाण ठेवलं. त्यातून गोंधनखेड शिवारामध्ये या ‘दिव्या फाउंडेशन’चं काम उभं राहिलं. हा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून देशातल्या कानाकोपऱ्यांमधून असणारे अनेक मनोरुग्ण पोलिस संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ‘दिव्या फाउंडेशन’मध्ये येतात.
आम्ही जेव्हा काही मनोरुग्णांशी बोलत होतो, तेव्हा त्यांतला एक जण उठला आणि त्याने मला विचारलं, ‘तुम्ही गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यकर्ते आहात का?’ मला काही कळेचना. तो पुन्हा म्हणाला, ‘गोपीनाथराव मुंडेंची माणसं आहात तर ‘गोपीनाथराव अमर रहे’ असं म्हणा ना..!’ मी अशोक यांना त्या प्रश्न विचारलेल्या तरुणाविषयी विचारलं, तेव्हा अशोक म्हणाले, ‘हा अरुण जाधव, बीडचा आहे. अनेक वर्षांपासून इथं राहतो. त्याची ओळख पटल्यावर आम्ही त्यांच्या घरी त्याला नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला आई-वडील नाहीत, त्याच्या मोठ्या भावाने त्याला स्वीकारलं नाही. तो मुंडे साहेबांचा खास भक्त आहे.’ मागच्या सात वर्षांमध्ये अशोकला आलेले अनेक अनुभव अशोक सांगत होते. नगरमधल्या सोयगावमधून जावेद पठाण नावाची व्यक्ती पंधरा वर्षांपासून बेपत्ता होती. जावेदच्या घरच्यांनी त्याच्या फोटोवर हार चढवला होता. जावेदला तो कुठून आला? तो कसा आला? हे सुरुवातीची दोन-तीन वर्षं काही कळालं नाही. मग त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. एक दिवस त्याची हरवलेली स्मृती परत आली. अशोक स्वतः त्याला त्याच्या घरी घेऊन गेले. जावेदला पाहून त्याचे आई- वडील, जावेदची मुलं, बायको किती रडत होते, हा प्रसंग ऐकताना आमच्याही अंगावर काटा येत होता.
मी अशोक यांना म्हणालो, ‘या सगळ्या माणसांना ‘माणूसपण देताना’ तुम्ही तुमचं आयुष्य विसरलात. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा कधी विचार केलात का?’ त्यावर अशोक म्हणाले, ‘मी आणि माझी पत्नी ज्योती, आम्ही दोघांनी ठरवलंय की, एका मुलीवर थांबायचं आणि आम्ही तसं केलंही.’ अशोकचा एक एक निर्णय काळजाचे ठोके चुकवणारा होता. मी त्यांचं सर्व शांतचित्ताने ऐकत होतो. मी जेव्हा जाण्यासाठी निघालो, तेव्हा स्वराली हिने स्वतः तयार केलेलं ग्रीटिंग मला दिलं. एका मोठ्या दवाखान्यात ती सगळ्या मनोरुग्णांना डॉक्टर होऊन तपासते आणि बाजूला अशोक आणि ज्योती उभे आहेत, हे तिने बनवलेलं ग्रीटिंग खूप विचार करायला लावणारं होतं. शेकडो माणसं वेडी आहेत, त्यांचं सर्व करायचं, उद्या चूल पेटेल का नाही, हे माहिती नाही... अशा अशोकच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. तो हा सगळा गाडा ओढतो कसा, याचं उत्तर ना त्याच्याकडे होतं ना आमच्याकडे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.