परंपरेनं काळवंडलेलं आयुष्य…!

सकाळीच मित्र विजय जाधवचा फोन आला. म्हणाला, ‘संदीप, बाबा गेले.’ मी म्हणालो, ‘‘कधी?’. तो म्हणाला, ‘आता सात वाजता, सायंकाळी अंत्यसंस्कार आहेत.’
Father Funeral
Father FuneralSakal
Updated on

सकाळीच मित्र विजय जाधवचा फोन आला. म्हणाला, ‘संदीप, बाबा गेले.’ मी म्हणालो, ‘‘कधी?’. तो म्हणाला, ‘आता सात वाजता, सायंकाळी अंत्यसंस्कार आहेत.’ असे म्हणत जड अंतःकरणाने विजयने फोन ठेवला. मी गडबडीने नाशिक गाठले. काकांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आम्ही स्मशानभूमीत पोहोचलो. अंत्यसंस्काराचे विधी करणाऱ्या तरुणाच्या मंत्रोच्चाराचे सूर त्या शांततेत ऐकू येत होते.

काकांच्या चितेची आग शांत झाली होती. मी तिथे बसून होतो. मगाचा मंत्र म्हणणारा तरुण फोनवर बोलत होता. त्याने फोन ठेवला. माझ्याकडे पाहिले आणि मला विचारले, ‘तुम्ही जाधवांचे नातेवाईक का?’ मी म्हणालो, ‘नाही. त्यांच्या मुलाचा मित्र आहे.’ आम्ही दोघे जण बोलत बोलत कधी या चितेवरची, तर कधी त्या चितेवरची अर्धवट जळालेली लाकडे पुढे ढकलत होतो. मी त्या तरुणाशी बोललो आणि सुन्न झालो.

कर्माने, परंपरेने, भावनेने माणूस किती अडकतो, त्याच्या आयुष्याचा कसा गुंता होऊन जातो. याचा तो तरुण नेमकं उदाहरण होता. मी ज्याच्याशी बोलत होतो, तो जनार्दन कावडेकर.

जनार्दन वडिलांपासून चालत आलेला हा व्यवसाय करतो. त्याला तीन भाऊ आहेत. त्यापैकी जो शिक्षक आहे, त्याचे लग्न झालंय. तो यांच्याबरोबर राहत नाही. जनार्दनच्या घरी आई आणि वडील दोघेही खाटेवर झोपून आहेत. अंत्यसंस्कारांचा विधी करतो म्हणून जनार्दन आणि त्याच्या भावांसोबत कोणतीही मुलगी लग्न करायला तयार नाही. तो उच्चशिक्षित आहे, तरी वडिलांच्या आग्रहाखातर विधीचे काम करतो.

जनार्दनचे वडील, श्रीधर यांना अर्धांगवायूचा झटका आला. ते अंथरुणावरच पडून राहिले. दुसरे दोघे भाऊ लग्न, इतर समारंभ यांसाठी विधी करतात. ते काही दिवस स्मशानभूमीमध्ये यायला लागले तर त्याला, अपशकुनी म्हणून कोणी चांगल्या विधीसाठी बोलवत नव्हते. मग बाबांनी ठरवून दिले, मी अंत्यसंस्काराचा विधी करणार. दोन्ही भाऊ शुभकार्याचा विधी करणार. ते दोघे अंत्यसंस्काराचा विधी करण्यासाठी जायचे. हे सगळ्या पाहुण्या मंडळींना माहीत होते. त्यामुळे ते माझ्यापेक्षा मोठे असूनही त्याचा विवाह अजून झाला नाही.

विधी करायला ब्राह्मण लागतो. तो लोकांच्या इच्छेनुसार, परंपरेनुसार काम करतो. त्या इच्छा आणि परंपरा पूर्ण करताना त्या ब्राह्मणाच्या आयुष्याचे मात्र वाटोळे होते, हे कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणायला चार पैसे मिळतात, पण ज्या पैशांत समाधान नाही, सुख नाही, तो पैसा काय कामाचा. असेच मला जनार्दनशी बोलून वाटत होते.

जनार्दन म्हणाला, `` हे केवळ एका नाशिकमध्येच आहे, असे नव्हे. माझे, माझ्या भावांचे नाही, तर राज्य आणि राज्याबाहेर, प्रत्येक ठिकाणच्या विधी करणाऱ्या ब्राह्मणांची अवस्था सारखीच आहे. त्यांना मुली देण्याचे सोडाच, पण त्यांच्यासोबत कोणी नातेसंबंध ठेवायलाही तयार नसतात.’

तो विधी करणारा, समोर आला तर अपशकुन समजला जातो. जनार्दन इतका प्रामाणिक होता, की कोणी त्याला पैसे पुन्हा देतो म्हटले तर त्यांना तो परत मागायचाही नाही. विधी करणारा ब्राह्मण आज लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा शिकार होऊन बसलाय.

जनार्दनच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर द्यावं असं मला वाटत होतं. आता मी निघणार इतक्यात अजून एक प्रेतयात्रा आली. त्यांचा सर्व विधी जनार्दनने केला. त्यानंतर तो घरी निघाला. मी जनार्दनला म्हणालो, ‘‘मी तुम्हाला घरी सोडतो,’’ तो म्हणाला, ‘‘ तुम्ही नका त्रास घेऊ, जाईन मी.’’ जनार्दनचं व्यक्तिमत्त्व हवेहवेसे होते. मी जनार्दनला गाडीत बसवले आणि जनार्दनच्या घराच्या दिशेने निघालो.

जनार्दन म्हणाला, ‘‘ तुम्ही आलाच आहात तर वडिलांशी बोलून जा. त्यांनाही बरं वाटेल.’’ मी जनार्दनच्या घरामध्ये गेलो. घरातल्या एका खोलीत एका खाटेवर जनार्दनचे वडील खोकत पडले होते. जनार्दनने माझी त्यांच्याशी व आईशी ओळख करून दिली. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले अनेक अनुभव ते मला सांगत होते. पूर्वीचे लोक माणूस गेल्यावर कसा दान-धर्म करायची. आताची माणसे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये गेल्यावर तिथून कधी निघतोय असे करतात. असे अनेक अनुभव ते मला सांगत होते.

जनार्दनचे वडील म्हणाले, ‘‘माझ्या आजोबांनी मला सांगितले, आपली ही विधीची आणि पूजेची प्रथा पिढ्यानपिढ्या चालली पाहिजे. हे खूप मोठे पुण्याचे काम आहे. हे केले तरच आपल्याला मोक्ष मिळेल.’’ मी म्हणालो, ‘‘काका, जनार्दनची नोकरी करायची इच्छा आहे.’’ काका देवघराकडे बोट दाखवत म्हणाले, ‘‘त्याची काय इच्छा आहे, त्याप्रमाणे आपण वागायचे असते. ’’

जनार्दनची आई, नीलिमा यांच्या हाताला लकवा जाणवत होता. त्या म्हणाल्या, `` आपले आयुष्य किती आहे आता? पोरा-बाळांचे दोनाचे चार हात झालेले पाहिले असते, तर सुखासुखी मरण आले असते, पण सगळंच अवघड आहे. ’’ जसा एखादा माणूस गेल्यावर घरात वाईट अवस्था असते, तशी अवस्था या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होती.

त्यात केवळ जनार्दन तेवढा सकारात्मक होता. त्यामुळे त्याच्या विधी करण्याच्या मंत्राला आपोआप सकारात्मकतेचा सूर लागायचा. काका म्हणाले, `` आता पितृपंधरवडा संपला की स्थळ पाहायला सुरवात करू आणि हो, जे अंत्यसंस्काराचे विधी करतात, त्या अनेकांची लग्न आयुष्यभर झालेली नाहीत, त्यामुळे ते सुखी नाहीत असे अजिबात नाही. ’’ आम्ही बराच वेळ बोलत बसलो. मी तिथून निघालो.

समाजामध्ये आजही किती विक्षिप्तपणा सुरू आहे. त्यातून त्रास किती होतो, याचे जनार्दनचे कुटुंब उत्तम उदाहरण होते. कर्म आणि परंपरा चालवत असताना कित्येकांचे आयुष्य बरबाद होते, याकडे तुम्ही-आम्ही अजिबात लक्ष देत नाहीत. त्यात पहिली शिकार होते, बारा बलुतेदारांची. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत असे अनेक जनार्दन सर्वकाही असून समाधानी असणार नाहीत. एक भट, ब्राह्मण त्याचे वाईटपण म्हणून शिव्यांच्या लाखोल्या वाहण्यापेक्षा, त्यांच्याभोवती असणाऱ्या प्रश्नांसाठी आम्ही काही केले, तर आमच्यामधली माणुसकी शिल्लक आहे, असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.