मुंबईतली वाहतूक म्हटलं की अंगावर काटा येतो, त्यामुळे मुंबईत काम असलं की, मी नेहमी गाडीऐवजी लोकलने जाणं पसंत करतो.
मुंबईतली वाहतूक म्हटलं की अंगावर काटा येतो, त्यामुळे मुंबईत काम असलं की, मी नेहमी गाडीऐवजी लोकलने जाणं पसंत करतो. त्या दिवशी सर्व कामं आटोपून रात्री परत नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मी सीएसटीला आलो, तर माझी शेवटची ट्रेन चुकली होती.
सीएसटीच्या बाहेर पडून जे वाहन मिळेल त्याने पुढे निघावं, या हेतूने मी बाहेर आलो. बाहेर पडताना पंधरा-सोळा वर्षांची एक मुलगी मला विचित्र खाणाखुणा करत होती. मी त्या मुलीकडे दुर्लक्ष करत माझ्या रस्त्याने चाललो होतो. पुढे अजून दुसरी एक मुलगी भेटली, तिने तर माझा रस्ताच अडवला. मी तिचा हात बाजूला काढून पुढे गेलो. थोडा पुढे गेल्यावर अजून एक महिला भेटली, तीही त्या दोन मुलींसारखंच करत होती.
मी तिथूनही जोरात निघण्याच्या तयारीत होतो, तेव्हा ती बाई मला जोरात म्हणाली, ‘साहेब, परवापासून एकही गिऱ्हाईक भेटलं नाही. काही खायला तरी देऊन जा.’ तिचा तो केविलवाणा आवाज ऐकून मी तिच्याकडे पाहिलं. अगदी पस्तिशीमधली ती एक महिला होती. मी खिशामध्ये हात घातला. बाजूला एक म्हातारा माणूस वडापाव विकत होता. त्याच्याकडून मी वडापाव घेतले आणि त्या महिलेला दिले. तिने वडापाव खायला सुरुवात केली. तिला वडापाव खाताना पाहून पलीकडे असलेल्या त्या दोन्ही मुली तिच्याकडे आल्या. त्या वडापाव खाणाऱ्या महिलेने माझ्याकडे नजर टाकून त्या दोन्ही मुलींनाही द्या, असा सूचनावजा इशारा केला. मी अजून काही वडापाव घेत त्याही मुलींना दिले.
त्या तिघींच्या बोलण्यातून कळालं, त्या तिघीही सख्ख्या बहिणी आहेत. मी निघणार तेवढ्यात ती महिला जवळ आली आणि मला म्हणाली, ‘साहेब, आम्ही शरीर विकणाऱ्या महिला आहोत हे खरं आहे; पण हातात असलेल्या अन्नाची शपथ घेऊन सांगतो, कालपासून खरंच पोटात अन्नाचा कण नव्हता. भीक मागायला गेलो तर आम्ही फसवतोय, आम्ही खोटारड्या आहोत, अशा नजरेने लोक पाहतात. अनेक वेळा शरीरासोबत कुणाचा सौदा होत नाही. जे पुढे येऊन करू पाहतात, ते शरीराचे लचके तोडणारे असतात, हे त्यांच्या वर्तनावरून, चेहऱ्यावरूनच कळतं. कोरोनाच्या माहासाथीपासून आमचा व्यवसाय तसा आजही जवळपास बंदच आहे.’ ती महिला माझ्याशी प्रामाणिकपणे बोलत होती.
त्या तिन्ही महिलांबद्दल माझ्या मनात असलेला द्वेष थोडासा बाजूला ठेवत मी त्यांच्याशी बोलत होतो. तो वडापाववाला काका, गेल्या पंधरा वर्षांपासून त्याच परिसरात रात्री वडापाव विकायचं काम करतो. मी त्या काकांना म्हणालो, ‘या तिन्ही महिलांना रात्रीच्या वेळी असं रस्त्यावर उभं राहण्याची हिंमत कशी येत असेल? पोलिस त्यांना काही करत नाहीत का?’ मी आपले भाबडे, लहान मुलासारखे प्रश्न त्या काकांना मुद्दाम विचारत होतो. ते मला अगदी शांतपणे म्हणाले, ‘दोन दिवस उपाशी राहून पाहा, म्हणजे पोटासाठी कुठलंही पाऊल उचलण्याची हिंमत आपोआप येईल.’ त्या काकांचे शब्द कलियुगातली आधुनिक स्वरूपाची गीता होती.
तो वडापाववाला म्हणाला, ‘आजही तिघीजणी रिकाम्या हाताने परत येत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून यांची हीच अवस्था मी पाहत आहे.’ त्या तिन्ही महिला वडापाववाल्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘बापू, अजून भूक लागलीय, एकेक वडापाव द्या.’ तो वडापाववाला बापू म्हणाला, ‘मी फुकट देणार नाही, पैसे आहेत का?’ त्या बिचाऱ्या शांतपणे उभ्या राहिल्या. त्या तिघींच्या मेकअपने बरबटलेल्या चेहऱ्यावर येत असलेल्या घामाच्या धारा त्या पदराने पुसत होत्या. ती मोठी बहीण माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘साहेब, अजून एक-एक वडापाव आम्हाला खाऊ घाला.’ मी त्या बापूंना पैसे दिले. त्यांनी त्या तिघींना वडापाव, पाणी दिलं. त्या फार खुलून बोलण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हत्या.
मी त्या मोठ्या बहिणीला म्हणालो, ‘तू मोठी बहीण असून तुला लाज नाही वाटत, तुझ्या लहान बहिणींना असा व्यवसाय करण्यासाठी मजबूर करायला?’ ती मोठी बहीण एकदम शांत झाली. छोट्या-छोट्या त्या दोन्ही बहिणींना माझ्या बोलण्याचा एकदम राग आला. त्या दोघींचा राग शांत करत ती मोठी बहीण म्हणाली, ‘काय सांगायचं साहेब, सगळा नशिबाचा फेरा.’ ...हळूहळू आमच्यातला संवाद वाढू लागला, एकमेकांवर विश्वास बसू लागला लागला. त्यांनी मला ग्राहक म्हणून येता का, असं विचारलं होतं, हेही त्या आता विसरून गेल्या होत्या. खरंतर आपल्यावर आलेला प्रसंग, आयुष्याची विस्कटून गेलेली घडी, आपलं दुःख ऐकायला जर कोणी मिळालं, तर माणूस तो खांदा सोडत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तर असा खांदा जर कुणाला मिळाला, तर तो खांदा घड्याळाच्या काट्याच्या स्पीडसारखा पळू लागतो.
हे जग स्वार्थाने प्रचंड बरबटलेलं आहे. पैशांच्या लोभापोटी स्वतःचा बापसुद्धा वाटेल ते करतो. त्या तिघी बहिणींनी आयुष्यात घेतलेला अनुभव लोकांपर्यंत कसा मांडावा, हा प्रश्न मलाही पडला होता. त्यांच्याशी बोललेल्या त्या दोन तासांत त्यांच्याकडून ऐकलेला त्यांचा जीवनपट कसा मांडायचा?
मी ज्या तिघींशी बोलत होतो, त्या तिघींमधली मोठी बहीण अंजना, दोन नंबरची रंजना, सर्वांत लहान सगुणा. तिघी उत्तर प्रदेशमधल्या. आई-वडील आणि अकरा भावंडांचा परिवार या तिघींचा होता. या तिघींचे वडील रामनाथ त्रिपाठी हे हाथरस इथं जुगार अड्डा चालवतात. त्याच भागात असणाऱ्या एका खासगी दवाखान्यामध्ये या तिघींची आई गीता नर्सचं काम करते. जुगारी असणं आणि दारूच्या आहारी जाणं हे त्रिपाठी कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या नसानसांमध्ये भिनलेलं होतं. मागच्या दोन पिढ्या पुढच्या तिसऱ्या पिढीवर कर्जाचा भार टाकून निरोप घेतात असं सतत सुरू असतं. या तिघी बहिणींच्या वडिलांना प्रश्न पडला की, आपण हे सगळं कर्ज फेडायचं कसं? मुंबईमध्ये देहविक्रय करण्याच्या व्यवसायात असणाऱ्या एका व्यापाऱ्याला एका मित्राच्या मदतीने त्रिपाठी यांनी आपल्या तिन्ही मुली विकल्या, त्यांचा सौदा केला. नातेवाइकांना, मुलींच्या आईला या बापाने या तिन्हीही मुलींना मुंबईत काम करायला पाठवतोय, असं सांगून पाठवून दिल्या. जेव्हा मुली इथं आल्या, तेव्हा त्यांना वास्तव समजलं. त्या हादरून गेल्या. जसं जमेल तसं त्यांनी तिथून पळण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण त्यांचा प्रयत्न सातत्याने हाणून पाडण्यात आला. कालांतराने त्या इथल्या कामात रुळल्या, मग त्यांनी परत जाण्याचा विचार सोडून दिला.
अंजना सांगत होती, ‘माझ्या आईला आता काम होत नाही. वडील पूर्णवेळ दारू पिऊन पडलेले असतात. ज्या व्यापाऱ्याला आम्हाला विकण्यात आलं होतं, त्या व्यापाऱ्याला आम्हाला रोजचा हिशेब द्यावा लागतो. आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो, तर आमच्या अंगाचं कातडं सोलून निघेल, इथपर्यंत आम्हाला मारलं जातं.’
आम्ही बोलत असताना मोठी असणाऱ्या अंजनाला व्हिडिओ कॉल आला. ‘तिकडं काय करतेस’ असा एका वयस्कर महिलेचा आवाज आला. ती त्यांची आई होती. ती म्हणाली, ‘‘इतक्या रात्री कुठं फिरताय?’ त्या तिन्ही बहिणी म्हणाल्या, ‘एका मैत्रिणीचा वाढदिवस होता म्हणून बाहेर फिरायला आलो होतो.’ आई रडत तिकडून विचारत होती, ‘मला भेटायला कधी येणार? मी मेल्यावर भेटायला येणार का? मला तुमचा पैसा नको, तुम्ही भेटायला या.’
त्या तिघीजणींनी होकाराची मान हलवली व फोन ठेवला. काही वेळ त्या एकदम शांत झाल्या. काही वेळाने आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं. त्यांचं रोजचं काम आणि त्या कामातून आयुष्याची होत असलेली घुसमट त्या तिघीजणी मला सांगू लागल्या. ‘‘खूप जिद्द पकडून आम्ही गावी वापस गेलो आणि तो व्यापारी परत आला, त्याने बोंब ठोकली, तर अख्ख्या खानदानाचं नाक आमच्या कामामुळे, बापाच्या वर्तनामुळे कापलं जाईल. अजून आमचं कोणाचंही लग्न झालेलं नाही.’
पुन्हा मोठ्या बहिणीला फोन आला. पलीकडून बोलणारा माणूस ‘आज पैसे नाही मिळाले तर याद राखा’ अशी धमकी देत होता. कुठल्याही महिलेवर येऊ नये, असा प्रसंग या तिन्ही बहिणींवर आला होता. ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशा अवस्थेमध्ये अडकलेल्या या बहिणींचं आयुष्य एकदम नरकासमान होऊन गेलंय. त्या तिघीही आपलं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने जीव मुठीत धरून जगत होत्या. एकीकडे घराची, दुसरीकडे पोटाची खळगी, तिसरीकडे जगाची रीतभात, या सगळ्यात त्यांच्यासमोर फक्त अंधार होता. उद्या काय होईल याची शाश्वती नाही.
नटूनथटून नव्या ग्राहकाला शोधत असताना मनामध्ये आणि आयुष्यात कुठलंही दुःख नाही, असा आविर्भाव चेहऱ्यावर आणायचा, तशाच आयुष्याचा एक-एक दिवस काढत राहायचं. काय त्यांचं आयुष्य... मी विचार करत थांबलो होतो. शेवटी मला गाडी मिळाली आणि त्या तिघींचा निरोप घेऊन मी नवी मुंबईच्या दिशेने निघालो.
मुंबईची अशी भयानक रूपं आहेत. अशा अडगळीत अडकलेल्या अनेकींना मुंबईने शाबूत ठेवलं आहे. या तिघींसारख्या कित्येक जणी पावलोपावली इथं शिकार झाल्या असतील. त्यांची शिकार करू पाहणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला, त्या स्त्रीच्या आतमध्ये किती दुःख दडलं आहे हे पाहण्यासाठी वेळ आणि मन असेल का, हाही प्रश्नच आहे !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.