त्या दिवशी मी मनमाडमध्ये होतो. मनमाडवरून चार तासांनंतर मला पुढे संभाजीनगरला जाणारी गाडी पकडायची होती. त्या उन्हामध्ये स्टेशनला बसलो. मनमाड स्टेशनमधल्या भोंग्यावरून कानावर होणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्यामुळे कानाला प्रचंड त्रास होत होता.
मी स्टेशन मास्तरकडे गेलो. प्रचंड आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना मी सांगितलं. त्यांनी त्याच त्या सातत्याने कानावर पडणाऱ्या जाहिराती बंद केल्या. मी तिथं गाडीची वाट बघत बसणाऱ्या अनेक प्रवाशांना विचारलं, ‘तुम्हाला या जाहिरातींचा त्रास होत नाही का?’ ते म्हणाले, ‘होतो, पण सांगायचं कुणाला?’ मनमाड तसं मोठं रेल्वे स्टेशन.
राज्यातल्या सगळ्या विभागांना जोडणारं रेल्वे स्टेशन म्हणून या स्टेशनकडे बघितलं जातं. तिथली अस्वच्छता, कर्कश्श वाजणारे स्पीकर पाहून तिथं थांबायलाही नकोसं होत होतं.
माझी संभाजीनगरला जाणारी गाडी किती नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे, याची मी माहिती घेतली आणि त्या दिशेने निघालो. वर पायऱ्या चढत असताना मला बासरीचे स्वर ऐकू आले.
‘पंख होते तो उड आती रे...’ हे गाणं जणू काही त्या बासरीमधल्या सुरांसाठीच बनवलं आहे की काय, असं वाटत होतं. मी वर गेलो आणि पलीकडच्या बाजुकडे एक नजर टाकली. पलीकडे दोघेजण शेवटच्या पायरीवर बसले होते. एक जण बासरी वाजवत होता, दुसरा त्या बासरी वाजवणाऱ्याच्या खांद्यावर मान टाकून ती बासरी शांतपणे ऐकत होता.
मी वर उन्हात थांबून ती बासरी ऐकत होतो. दर दहा-वीस मिनिटांनी धाडधाड करत रेल्वे येत होती, थांबत होती आणि पुढे जात होती. एवढ्या मोठ्या रेल्वेच्या आवाजामुळेही ती बासरी मात्र कानातला गोडवा काही कमी होऊ देत नव्हती. किती वेळ बासरी ऐकायची... आता पायांना मुंग्या आल्या. मी हळूच दबक्या पावलांनी त्या बासरी वाजवणाऱ्याजवळ गेलो. माझी सावली त्यांच्या अंगावर पडल्यापडल्या त्यांनी मागे वळून पाहिलं.
मला पाहून ते शांत झाले. मी मात्र आश्चर्यचकित झालो. कारण समोर ते दोन तृतीयपंथी होते. जो बासरी वाजवत होता, तो हात पुढे करत मला म्हणाला, ‘साहेब, काही पैसे द्या ना, भूक लागली हो.’ मी एक नोट त्यांच्या हातावर ठेवली आणि त्याला म्हणालो, ‘पंख होते तो उड आती रे...’ हे गाणं परत बासरीवर म्हण ना. मी तसं बोलल्या बोलल्या हातात ठेवलेल्या नोटेवर त्यांनी नजर न टाकता माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं.
कलेला मूल्यापेक्षा दाद महत्त्वाची असते, हे चित्र मला तिथं दिसत होतं. त्या दोघांशीही मला बोलायचं होतं. मी त्या दोघांची नावं विचारली, एकाचं नाव होतं रुक्मिना आणि दुसऱ्याचं सकीना. मी रुक्मिनाला म्हणालो, ‘ही मराठवाडा एक्स्प्रेस गाडी नेहमी अशी उशिराच येते का?’ रुक्मिना म्हणाली, ‘काय खरं नाही साहेब.
ही गाडी नेहमी उशिराच येते.’ ते जिथं बसले होते आणि मी जिथं उभा होतो तिथं उन्हाची तिरीप हळूहळू प्रवेश करत होती. आम्ही तिथून उठलो आणि पुढे असलेल्या एका छोट्याशा छताखाली जाऊन बसलो. मी माझा लॅपटॉप काढला आणि ते येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून पैसे मागत होते.
लॅपटॉपमध्ये माझं फार मन लागेना. सकीना आणि रुक्मिना या दोघांचं नेमकं काय चाललंय याकडेच माझं लक्ष होतं. एक गाडी आली आणि आमच्या आजूबाजूला असणारे सगळे प्रवासी त्या गाडीमध्ये गेले. आमच्या आजूबाजूचा सगळा परिसर रिकामा झाला. बाजूला छान गरम गरम कांदा-भजीचा वास येत होता.
मनमाडपासून पुढे आता मराठवाडा सुरू होणार होता. त्या कांदा-भजीला मराठवाड्याच्या चवीचा वास होता. मी कांदा-भजी घेतली. बाजूला असलेल्या रुक्मिना आणि सकीनाला आवाज दिला. तेही आले. आम्ही तिघंही कांदा-भजी खात तिथं उभे होतो. कांदा-भजी खाताना सुरुवातीला त्या दोघांनी एकमेकांना घास खाऊ घातला. मी त्या दोघांनाही म्हणालो, ‘तुमचं एकमेकांवर खूप प्रेम दिसतं.’’ ते हसले. पुढे काहीही बोलले नाहीत.
मी म्हणालो, ‘‘खरंच प्रेम आहे का तुमचं? का उगीच?’ ते म्हणाले, ‘आम्ही मागच्या चार वर्षांपासून नवरा-बायको म्हणून सोबत राहतोय.’’ त्यांचं ते बोलणं ऐकून मी एकदम भुवया उंचावल्या. मी पुन्हा म्हणालो, ‘‘तुमचं घर कुठे आहे? किती वर्षं झाली तुम्ही बाहेर आहात.
केवळ हे मागून खायचं काम करता की आयुष्याचा अन्य काही विचार करता?’ माझ्या प्रश्नांचा भडिमार पाहून त्या दोघांनी चांगुलपणाची एक-दोन वेळा मान हलवली.
आम्ही भजी खात असताना अजून एक तृतीयपंथी तिथं आला, त्यालाही आम्ही गरम गरम भजी खायला दिली. रुक्मिना आणि तो नवीन आलेला तृतीयपंथी यांच्यामध्ये संवाद खुलल्यानंतर बिचारा सकीना थोडासा नाराज वाटत होता.
मी तोच धागा पकडत सकीनाला म्हणालो, ‘‘सकीना, रुक्मिना नवीन मित्र भेटल्यामुळे खूप आनंदी दिसते.’’ त्यावर थोड्या चिडक्या स्वरात सकीना म्हणाला, ‘‘त्याला अधूनमधून असे नवीन भेटणारे मित्र फार आवडतात.’
हे ऐकून बिचाऱ्या रुक्मिनाचा चेहरा पडला होता. तो तिसरा आलेला तृतीयपंथी आल्यापावली पुन्हा परत गेला. हे दोघेजण माझ्याजवळच थांबले होते. ते दोघे कसे भेटले, त्यांचा प्रवास कसा झाला, असं सगळं ऐकता ऐकता आमचा तीन तासांचा वेळ कसा गेला कळालं नाही. मध्येच आम्ही काहीतरी खात होतो, मध्येच काहीतरी थंड पीत होतो. मात्र, आमच्या गप्पा काही थांबत नव्हत्या.
मी ज्या रुक्मिनाशी बोलत होतो, तो मूळचा सांगलीचा. त्याच्या घरातले सगळे वारकरी संप्रदायाचे. गाणं म्हणणे, तबला वाजवणे, बासरी वाजवणे, हे सगळं घरातच होतं. तेव्हाचा रुक्मिना जसा जसा वाढत होता, मोठा होत होता, तसा त्याच्या सगळ्या हालचाली महिलांसारख्या होत्या. घरात तीन बहिणी लग्नाच्या, दोन मोठे भाऊ, चुलता-चुलती, मोठा परिवार. या सगळ्यांना रुक्मिना याचं हे महिलेसारखं वागणं प्रचंड खटकायला लागलं.
घरी येणारे पाहुणे, सण-उत्सव या सगळ्यांवर रुक्मिनामुळे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं. रुक्मिना पंधरा वर्षांचा झाला, तेव्हा घर सोडायचा निर्णय घेतला. आपल्या गुरूच्या सल्ल्याने तो काही दिवस संभाजीनगरमध्ये थांबला.
एका भांडणात रुक्मिनाने सकीनाला मदत केली, तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी मंदिरात जाऊन लग्नही केलं. ते पुढे सकीनाच्या घरी मनमाडमध्ये राहू लागले. मनमाडमध्ये त्यांना चार वर्षं झाली.
सकीना मूळचा जालन्याचा. सकीर असं सकीनाचं पहिलं नाव होतं. सकीनाचे वडीलच त्याला छक्का छक्का म्हणून बोलवायचे. हा अधिक दिवस आमच्या घरी राहिला तर आमच्या नावाला कलंक लागेल, असं म्हणत सकीनाच्या वडिलांनीच सकीनाला घराच्या बाहेर काढलं.
सकीना हा तृतीयपंथी निघाला, हे जेव्हा त्याच्या आईने ऐकलं, तेव्हापासून सकीनाची आई आजारी पडली, जी आजपर्यंत उठली नाही. तिकडे रुक्मिनाचे सगळे नातेवाईक आजही रुक्मिनाचं तोंड पाहायला तयार नाहीत. प्रत्येकाला स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचं पडलं आहे.
लग्नकार्य, सोहळे यामध्ये सकीना आणि रुक्मिना या दोघांनी कधीच सहभागी व्हायचं नाही असं त्यांच्या घरच्यांनी त्यांना बजावून सांगितलं. पण आईचं काळीज शेवटी आईचंच असतं. मुलगा असो मुलगी असो की तृतीयपंथी, तिने त्याला गर्भामध्ये वाढवलेलं असतं.
जेवढं आईचं प्रेम मुलावर असतं, तेवढं मुलांचंही प्रेम आईवर असतं. आईच्या आठवणी, आईने लावलेला जीव, याविषयी मी जेव्हा त्या दोघांशी बोलत होतो, तेव्हा दोघांनाही त्यांचे अश्रू आवरत नव्हते. ते दोघेजण का रडतात, हे येणारे-जाणारे आवर्जून पाहत होते.
रुक्मिना भानावर येत म्हणाला, ‘जेव्हापासून आम्ही दोघेजण सोबत राहतोय, तेव्हापासून आमचं दुःख जवळजवळ संपलेलं आहे. आमचे भाऊ-बहीण आणि त्यांचे नवरे, त्यांच्या बायका अक्षरशः कुत्र्या-मांजरासारखं भांडण करतात. कुणाकडे सुख आहे का नाही, असा प्रश्न पडतो.
जेव्हा आई हे सगळं फोनवर सांगते तेव्हा असं वाटतं की, बरं झालं आपण तृतीयपंथी झालो. आपण बाई किंवा पुरुष झालो असतो, तर आपणही असं कुत्र्या-मांजरासारखं भांडत बसलो असतो.’
मी शिक्षणाचं, कामाचं याविषयी दोघांशी बोलत होतो, तर सकीना म्हणाला की, ‘मला शिक्षणाची आवड होती. कुठंतरी आपण काम करावं, सन्मानाने जगावं, असंही वाटत होतं. तसे प्रयत्न केले, पण लोकांना ते आवडत नाही असं दिसायला लागलं. ‘छक्का आला रे आला’ इथूनच लोकांची सुरुवात होते. कामाचं आणि शिक्षणाचं काय स्वप्न पाहावं सांगा?’ सकीनाने मलाच उलट प्रश्न विचारला. माझ्याकडेही काही उत्तर नव्हतं.
त्या स्टेशनवर असणारी अनेक लहान-लहान मुलं सकीना आणि रुक्मिनाला पाहून त्यांच्याकडे पळत आली. त्या दोघांनी त्यांची विचारपूस केली. त्या सगळ्या मुलांना त्या दोघांनी भजी खाऊ घातली. मी ते सगळं बारकाईने पाहत होतो. ती मुलं परत गेली.
मी सकीनाला विचारलं, की हे कोण होते. तेव्हा सकीना म्हणाला, ‘ही सगळी अनाथ मुलं आहेत. रात्रभर या स्टेशनला झोपतात. आमच्याकडे जेव्हा पैसे येतात, तेव्हा आम्ही त्यांना खायला देतो. या मुलांमध्ये आमची बहीण-भाऊ दिसतात.’
देण्यासाठी तुमच्याकडे दानत लागते, श्रीमंती असो की नसो हा पुढचा भाग; पण त्या दोघांमधली दानत मला दिसत होती. सकीनाचे वडील म्हणायचे की, ‘आम्ही मागच्या जन्मी पाप केलं म्हणून तू आमच्या पदरी आलास.’
रुक्मिनाचा भाऊ म्हणायचा, ‘आमचं नशीब खोटं म्हणून तू आमच्या घरात जन्माला आलास. ‘‘कोणामुळे काय झालं माहिती नाही; पण आम्ही या समाजासाठी एक चेष्टेचा विषय ठरलोय...’’ त्यांचे रोज येणारे वाईट अनुभव ते सांगत होते आणि मी ऐकत होतो. या जन्मी त्यांनी पुण्य केलं, तर दुसरा जन्म चांगला मिळेल?
मी त्या दोघांचा निरोप घेऊन आता तिथून निघणार तेवढ्यात सकीनाच्या आईचा फोन आला. सकीना माझ्याविषयी त्याच्या आईला बोलत होती. तो फोन माझ्या हातामध्ये दिला. सकीनाची आई तिकडनं मला सांगत होती, ‘‘माझा सकीना हुशार आहे.
अल्लाच्या मनात काय होतं माहिती नाही, त्याला असं जन्माला घातलं. त्याला चार पैसे द्या, त्यांनी काही खाल्लं की नाही त्याला विचारा.’’ आई अत्यंत केविलवाण्यापणाने मला विचारत होती. अश्रूंनी भरलेले डोळे पुसत सकीनाने आईचा फोन ठेवला.
माझ्या गाडीचा आवाज आला आणि मी त्या दोघांकडेही जातो आता, या भावनेतून पाहिलं. रुक्मिना मला म्हणला, ‘दादा, चाललात का तुम्ही?’ मी होकाराची मान हलवली. खिशात हात घातला आणि काही पैसे रुक्मिनाच्या हातावर ठेवले.
रुक्मिनाने ते पैसे माझ्या खिशात परत ठेवत, ‘तुम्हाला शपथ आहे, नको दादा’ असं म्हणाला. मी गाडीत चढत होतो तितक्यात सकीनाने माझ्या हाताला अत्तर लावलं. ते दोघेजण गाडीच्या बाहेर खिडकीसमोर माझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहत होते. जसं त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडून दिलं होतं, तसं मीही त्यांना सोडून जात होतो.
आजच त्यांना भेटलो, एक दादा म्हणून त्यांनी माझ्याशी जोडलेलं भावनिक नातं मलाही प्रचंड भावलं होतं. त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांची जवळीकता आणि त्यांच्यामध्ये असलेला प्रचंड आनंद आणि बरंच काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. ओसंडून वाहणारी श्रीमंती आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दाखवलेली दानत यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.
मनाची श्रीमंती आणि आपलेपणाची सातत्याने जपली गेलेली भावना हे सगळं रुक्मिना आणि सकीनामध्ये अगदी ठासून भरलं होतं. म्हणूनच त्यांच्या श्रीमंतीला सीमा नव्हत्या. शिटी वाजली, गाडी सुटली आणि त्या दोघांनी अजून एकदा आपले पाणावलेले डोळे पुसले. मी संभाजीनगरमध्ये जाईपर्यंत त्या दोघांचाच विषय माझ्या डोक्यामध्ये चालला होता, जो आजही कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.