दिशादर्शकाची दशा...!

संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर मी उतरलो. गर्दीमधून गाडीपर्यंत पोहोचलो, गाडीत बसणार इतक्यात माझा हात पकडत ते गृहस्थ म्हणाले, ‘संदीप ना तुम्ही? मी म्हणालो, ‘तुम्ही भीमसेन सरकटे ना?’ ते म्हणाले, ‘हो’.
railway platform
railway platformpune
Updated on

संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर मी उतरलो. गर्दीमधून गाडीपर्यंत पोहोचलो, गाडीत बसणार इतक्यात माझा हात पकडत ते गृहस्थ म्हणाले, ‘संदीप ना तुम्ही? मी म्हणालो, ‘तुम्ही भीमसेन सरकटे ना?’ ते म्हणाले, ‘हो’. पंधरा वर्षानंतर भेटतोय आपण असे मी त्यांना म्हणालो.

भीमसेन यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाल्याचे मला जाणवले. मी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला अर्धांगवायू झालाय का? त्यांनी होकार दर्शवला. मी आमच्या ड्रायव्हर मामाला त्यांची ओळख करून दिली. ‘हे भीमसेन सरकटे, मी जेव्हा इथं पत्रकारिता करीत होतो, तेव्हा ते धाडसीपणे पत्रकारिता करायचे. नेहमी लोकहिताची बाजू लावून धरायचे.’ मामानेही भीमसेन यांना नमस्कार केला.

मी त्यांना विचारलं ‘आज स्टेशनला कसे काय आलात?’ भीमसेन म्हणाले, ‘भावाला सोडायला आलो होतो. आता रिक्षाची वाट बघतोय.’ मी म्हणालो, मी तुम्हाला सोडतो चला.’ भीमसेन माझ्या गाडीमध्ये बसले. सिडको एन सिक्समध्ये सिंहगड कॉलनी आहे. तिथे भीमसेन सरकटे (८२७५२३८४८४) आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या रूममध्ये राहतात.

एके काळी पत्रकारिता गाजवणारे भीमसेन आज आजारामुळे ‘मला कुणीतरी काम द्या’ अशी विनंती अनेकांना करत आहेत. त्यांचं कुटुंब, त्यांची पत्रकारिता, आजारपण, कुटुंबाची वाईट अवस्था. यावर प्रवासादरम्यान आम्ही चर्चा केली. वाटेत नाश्ता सुरू असतानाही आमच्या गप्पा सुरू होत्या. एके काळी पत्रकारितेमधून भीमसेन यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना, मुजोर राजकारण्यांच्या डोळ्यात पाणी आणले. आज नियतीच्या खेळामुळं भीमसेनच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे.

आजारमुळे नोकरी गेली, त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी अनेकांना मदत मागण्याचे धाडस भीमसेन यांनी केले. आजाराचा ठपका, त्यात कोरोना यांमुळे अनेकांचे उंबरठे झिजवूनही आज भीमसेन यांना कोणी नोकरी देईना. नाश्ता घेऊन आम्ही भीमसेन यांच्या घरी गेलो. घरामध्ये भीमसेन यांच्या पत्नी विजया, मुलगा रोहित, मुलगी मानसी हे तिघेही होते. भीमसेन यांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली. सर्व घरामध्ये मी नजर टाकली तर भीमसेन यांना मिळालेले पुरस्कारच पुरस्कार होते.

भीमसेन यांनी दिलेल्या बातम्यांच्या कात्रणांचा ढीग घरामध्ये होता. आम्ही काहीतरी बोलणार इतक्यात भीमसेन यांची मुलगी मानसी म्हणाली, ‘‘बाबा, घरमालक पैशांसाठी आले होते. ते म्हणाले, तुमचे दहा महिन्यांपासूनचे घरभाडे थकले आहे.’’ भीमसेन माझ्याकडे बघत अगदी शांत बसले.

सरकटे वहिनी चहा टाकायला आतमध्ये गेल्या. भीमसेन माझ्याशी बोलत बोलत आईच्या फोटोवर असलेला सुकलेला फुलांचा हार काढत होते. भीमसेन फोटोकडे पाहत म्हणाले, ‘संदीप, ही माझी आई, २००३ ला मी एका दैनिकात काम करीत होतो. तेव्हा मला तिथे तीन हजार रुपये पगार होता. भाड्याची रूम घेऊन आम्ही इथेच राहायला सुरुवात केली होती. तेव्हा आई माझ्याकडे काही दिवस होती.

तिला गावी जाताना साधे शंभर रुपयांचे लुगडे घेण्याचीसुद्धा माझी ऐपत नव्हती. आई गावी जाताना मला एवढेच म्हणाली, ‘बाबा, काळजी नको करू नकोस. तुझी परिस्थिती एक दिवस सुधारणार आहे.’ त्यानंतर वर्षातच आईचं निधन झालं. वडील अगोदरच गेले होते. मला तीन भाऊ आहेत. आज त्यांनी दिवसभरात काम केले तर संध्याकाळी घरी चूल पेटते.’ भीमसेन, त्यांचे कुटुंब, त्यांची अवस्था, याविषयी माझ्याशी बोलत होते.

मी भीमसेन यांना म्हणालो, ‘तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत होतात, त्यांनी आजाराच्या काळात मदत केली नाही का?’ भीमसेन काहीतरी बोलणार इतक्यात त्यांच्या पत्नी आमच्यापुढं चहा ठेवत म्हणाल्या, ‘आपल्यावर जेव्हा संकट येते ना तेव्हा आपले कोणी नसते. मी लग्न झाल्यापासून यांना सतत सांगायची, चार पैसे जवळ लावून ठेवा. आजारपण, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्न आहेत. यांनी माझे कधीही ऐकले नाही.

जो कोणी मदतीसाठी येईल त्याच्यावर हे खुशालपणे त्यांना पगारच्या स्वरूपात मिळणाऱ्या चार पैशांतून दोन पैसे मदत द्यायचे. पत्रकार, पत्रकार काही नसते. एकदा तुमचे हात-पाय गळले ना की कोणी तुम्हाला विचारत नाही. आज हा माणूस असा घरात पडून आहे. मला कुठे नोकरी मिळाली नाही.

उद्या माझी लेकरे काय खातील, याची मला सतत काळजी वाटत असते,’ असे म्हणत आपला पदर डोळ्याला लावत विजया वहिनींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भीमसेन म्हणाले, ‘माझ्या पत्नीचे एम.ए. बीएड शिक्षण आहे. आम्ही नोकरीसाठी प्रयत्न केले होते, पण दहा आणि पंधरा लाख रुपये त्या वेळी शिक्षकांच्या नोकरीसाठी मागायचे, कुठून देणार एवढे पैसे?’

आम्ही गंभीर विषयावर बोलत होतो. तेव्हा अचानक दरवाजाची कडी वाजली. भीमसेन यांचा मुलाने दरवाजा उघडला. दोन पिशव्या घेऊन एक माणूस बाहेर होता. रोहित आमच्याकडे पाहत म्हणाला, ‘बाबा, प्रकाशकाका आलेत.’ भीमसेन त्यांना म्हणाले, ‘या या, आतमध्ये या.’ मी जाऊन प्रकाश यांना मिठी मारली. प्रकाश जोशी संभाजीनगरमधील एक वरिष्ठ पत्रकार.

आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले. जुन्या पत्रकारांना अडीअडचणीच्या काळात मदत करणे आणि पत्रकारितेमध्ये नव्याने येणाऱ्या मुलांना चांगले वळण लावत त्यांना पत्रकारितेची नीतिमूल्यता शिकवण्यामध्ये प्रकाश जोशी सर यांचा सिंहाचा वाटा असायचा. भीमसेन म्हणाले, ‘जोशी सर नेहमी किराणा सामान भरत असतात. त्यांच्यासारख्या अनेक पत्रकार मित्रांनी मला मदत केली. त्यांचे उपकार कुठे फेडावेत हे मला कळत नाही,’ असे म्हणत भीमसेन रडायला लागले. जोशी सर भीमसेन यांची समजूत काढत म्हणाले, ‘वेळ सर्वांवर येते. उद्या दसरा आहे, घरी काही नसेल हे मला माहिती होते. माझ्या घरचे आणि हे सामान एकत्रित घेतले.’

मी, प्रकाशसर, भीमसेन, वहिनी आम्ही गप्पा मारत बसलो होतो.

मी दोन दिवस संभाजीनगर शहरामध्ये होतो. त्या दोन दिवसांत मी अनेक पत्रकारांना भेटलो, त्यांची परिस्थिती विचारून घेतली, तर त्यातल्या ८५ टक्के पत्रकारांची अवस्था भीमसेन सरकटे यांच्यासारखीच होती. पगार वाढणार नाही, इथेच राहायचे, महागाई वाढते, उद्या काय खायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे, फी कशी भरायची याची काळजी या पत्रकारांनी प्रथम करायला पाहिजे; पण हे पत्रकार, मात्र समाजामधले चांगुलपण टिकले पाहिजे, मूल्यांची पत्रकारिता केली पाहिजे यासाठीच आग्रही आहेत.

पगार, भाड्याचे घर, मुलांचे शिक्षण आणि वाऱ्यावरचा संसार या सगळ्यांची जुळवाजुळव करताना ते ज्या संस्थेमध्ये काम करतात, तिथे पत्रकारितेपेक्षा जास्त टेन्शन मार्केटिंगचे आहे. या सर्वांचा ताण आणि त्यातून पॅरालिसिससारख्या धक्कादायक आजाराची होणारी शिकार ही अवस्था केवळ एका संभाजीनगरपुरती मर्यादित नव्हती. मी जेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, अनेक पत्रकारांना भेटलो, तिथे असणाऱ्या ८५ टक्के पत्रकारांची, त्यांच्या कुटुंबीयांची हीच अवस्था होती.

आधी कुटुंब, मग समाज, मग तत्त्वमूल्यांची पत्रकारिता. हे सूत्र पत्रकार आज नाही अनादी काळापासून विसरून गेला आहे. त्यातूनच मग भीमसेन सरकटे यांसारखी अनेक प्रकरणे पुढे येतात. पत्रकारितेच्या संस्था, तुम्ही-आम्ही सारे जण अशा अडचणीमध्ये सापडलेल्या त्या पत्रकारांना मिळून मदत करू. तत्त्व- मूल्यांची पत्रकारिता करणारा पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल. नाहीतर एक दिवस सारे विकोपाला जाईल, बरोबर ना... ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.