आत्मिक ऊर्जेचा झरा…

मला महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवर जाऊन काही गावांना भेटी देऊन सीमावर्ती भागातल्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या.
Mathadhipati Sadanand Shivshankar Mathpati
Mathadhipati Sadanand Shivshankar MathpatiSakal
Updated on

मला महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवर जाऊन काही गावांना भेटी देऊन सीमावर्ती भागातल्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. आम्ही प्रवासाला निघालो. आम्ही काहीतरी खावं, या विचारानं रामलिंग मुदगड या गावात येऊन थांबलो. आता येथून पुढं १५ किलोमीटरवर कर्नाटकची सीमा होती. त्या गावातून एका रस्त्यानं जाणाऱ्या गाड्या आणि माणसांची वर्दळ पाहून मी त्या हॉटेलवाल्याला विचारलं, की एवढी सगळी माणसं तिकडं जातात तरी कुठं?

तो हॉटेलवाला मला म्हणाला, ‘आमच्या गावात श्रीक्षेत्र रामलिंगेश्वर महाराज संजीवन समाधी मठ आहे, तिथं ही सर्व माणसं चालली आहेत.’ मी पुन्हा त्यांना म्हणालो, 'ही मंडळी तिथे जाऊन काय करतात?’ तो पुन्हा सांगू लागला, `त्या मठाच्या महाराजांना भेटण्यासाठी अनेक माणसे येत असतात. शनिवारी आणि रविवारी महाराजांची गादी असते. याच दोन दिवसांत महाराज रमल विद्येच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात.’’

महाराज, संस्थान, मठ, रमल विद्या हे सगळे विषय त्या माणसाच्या चर्चेमधून माझ्या कानावर पडत होते. मी विचार केला, की आपण जाऊन तिथं नेमकं चाललंय काय हे पाहावं. आमची गाडी त्या संस्थानाकडं गेली. महाराजांच्या दर्शनासाठी इकडं रांग लागली होती. एकीकडं लोक एकमेकांची खुशाली विचारत होते, तर दुसरीकडं जेवणाची पंगत सुरू होती. हे सारं काही एकाच वेळी सुरू होते. गोंधळ नाही, कसली गडबड नाही. अगदी शांततेत एखादं कुटुंब तिथं राहावं या पद्धतीनं त्या मठामधलं काम सुरू होतं.

मी सरळ त्या रांगेच्या एका कडेनं जिथं ते गुरुदेव बसले होते त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. रमल विद्येच्या माध्यमातून फासे टाकणं आणि त्या फासे टाकण्यावरून समोरच्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं, समस्येचं निरसन करणं, त्याला पर्यायी मार्ग सांगणं, असं त्या गुरुदेवांचं करणं सुरू होतं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं. ते येईल त्याला उत्तर देत होते. तुम्ही जेवलात का? जेवून जा. अशी सर्वांची खुशाली विचारणं सुरू होतं.

मित्र रामेश्वर धुमाळ पुढं गेले आणि त्यांनी माझा गुरुदेवांशी परिचय करून दिला. गुरुदेवांनी रांगेमध्ये असणाऱ्या सगळ्यांना हात वर करत सांगितले. आता आपण सगळे जण मिळून दुपारचे जेवण घेऊ. पुन्हा मग मी सगळ्यांशी बोलतो. असे म्हणत महाराजांनी सगळ्यांना जेवणासाठी पाठवून दिले. मी, धुमाळ, गुरुदेव आम्ही तिघं जण बोलत होतो.

संस्थान, गुरुदेव, गुरुदेवांची चालत आलेली गादीची परंपरा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून सातत्याने येणाऱ्या माणसांची संख्या, मंत्री, आमदार, खासदार, चित्रपटसृष्टीत काम करणारी माणसंही त्यांच्याकडे कशी येतात हे सारे ते सांगत होते.

उच्चशिक्षित असणारे ते गुरुदेव कोण होते आणि आता ते सगळे का करतात, हा सगळा इतिहास गुरुदेवांनी चर्चेमधून माझ्यासमोर ठेवला. मी ज्या महाराजांशी बोलत होतो त्यांचे नाव सदानंद शिवशंकर मठपती गुरुदेव (९८५०४१४०७०) ते श्री क्षेत्र रामलिंगेश्वर मठ संस्थानचे पाचवे मठाधिपती. पंचक्रोशीसह तीन राज्यांतल्या वेगवेगळ्या गरजू, श्रद्धाळू माणसांच्या आयुष्यामध्ये ते एक भक्कम आधार म्हणून उभे आहेत.

रमल विद्येच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचं काम इथं केलं जात असल्याचं पाहायला मिळत होतं. आम्हा तिघा जणांना आतमध्ये जेवणाचे ताट आणून देण्यात आले. गुरुदेव म्हणाले, आपण बाहेर सगळ्यांमध्ये जाऊन बसून जेवण करू. जेवतांनाही गुरुदेव विषयावर चर्चा करत होतो. त्या विषयामध्ये मुलांचे शिक्षण, आरोग्य, विज्ञान यावर गुरुदेव यांचा अधिक भर होता.

तिथं गेल्या अनेक वर्षांपासून येणारे गिरिजाकांत वैरागकर हे शिक्षक मला भेटले. ते मला सांगत होते, विज्ञानाची, स्वच्छतेची कास धरत महाराजांनी इथे अनेक प्रयोग कसे केले आहेत. गुरुदेव पंचक्रोशीत असणाऱ्या अनेक गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न इथपासून ते उच्च शिक्षणासाठी पुढाकार कसे घेतात. १६ घरांचे शास्त्र असणाऱ्या प्राचीन विद्येचा आविष्कार असणारी विद्या महाराजांना चांगली अवगत आहे.

त्या विद्येच्या माध्यमातून ते अनेक प्रयोग करत असतात. दूरदृष्टी, आत्मिक समाधान, अध्यात्म याची सांगड घालत सदानंद गुरुदेव यांनी अनेक अडचणींवर केलेल्या प्रयोगाचा मी साक्षीदार आहे. अनेकांशी बोलल्यावर आम्ही पुन्हा गुरुदेवांकडे गेलो. महाराज अनेकांशी बोलण्यात मग्न होते. आम्ही निघतो असे म्हणत गुरुदेव यांचा निरोप घेतला. आम्ही त्या संस्थांनावरून निघालो. पुढं जाताना मी एकदा मागं वळून पाहिले.

मी दूर गेलो तरी सदानंद गुरुदेव माझ्याकडं एकटक लावून पाहत होते. काय माहिती त्यांना अजून मला काय काय सांगायचे होते. मी बाहेर पडलो, माझ्या कामाला लागलो. माझं काम सुरूही होते, पण मन मात्र सदानंद गुरुदेव यांनी सुरू केलेल्या चांगुलपणातल्या अनेक उदाहरणांमध्ये अडकून पडलं होतं. असे सदानंद गुरुदेव आपल्या अवतीभवती असणं फार आवश्यक आहे, बरोबर ना..?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.