दोष कुणाचा; शिक्षा कुणाला...

काही झोपड्यांची दारं देवाच्या नावावर लावली होती. त्या झोपड्यांकडे पाहून असं वाटत होतं की, ही मुंबई जितकी मायानगरीच्या नावाखाली झगमगत आहे, तितकीच झोपडपट्ट्यांच्या नावाखाली. तिथलं दारिद्र्य गगनात मावणार नाही एवढं होतं.
Torture
TortureSakal
Updated on
Summary

काही झोपड्यांची दारं देवाच्या नावावर लावली होती. त्या झोपड्यांकडे पाहून असं वाटत होतं की, ही मुंबई जितकी मायानगरीच्या नावाखाली झगमगत आहे, तितकीच झोपडपट्ट्यांच्या नावाखाली. तिथलं दारिद्र्य गगनात मावणार नाही एवढं होतं.

मुंबईच्या गर्दीत कधी काय हरवेल ते सांगता येत नाही. मी मात्र त्या दिवशी वाहतूक कोंडीत अडकलो होतो. नवी मुंबईतून मला धारावीला जायचं होतं. पत्रकार संजय वफळे या विदर्भातल्या पत्रकार मित्राच्या लहान मुलाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांना भेटण्यासाठी मी निघालो होतो. संजय दवाखान्यातून गावी जाताना त्यांच्या बहिणीकडे थांबले होते. रविवार असूनही वाहतूक कोंडी प्रचंड होती. दिलेल्या पत्त्यावर गेलो, तर संजयच्या घराला कुलूप होतं. संजयला फोन लावला, संजय म्हणाले, ‘अहो, मी जरा दवाखान्यात आलो आहे. आताच तुमची वाट पाहून निघालो. मी बहिणीला खाली वॉचमनला सांगायला सांगतो. तुम्ही कृपया खाली बसा. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो.’ मी लिफ्टने खाली येण्यापूर्वीच वॉचमन काका लिफ्टच्या बाहेर उभे होते. मी बाहेर आल्या आल्या काका म्हणाले, ‘तुम्ही काळे साहेब ना?’ मी ‘हो’ म्हणालो. ‘या, तुम्हाला वरच्या बाईसाहेबांनी माझ्याकडे बसायला सांगितलं आहे.’ मी होकाराची मान हलवली. एक हात तुटलेल्या खुर्चीवर त्यांनी मला बसवलं. मी बसलो. तितक्यात मला एक फोन आला. मी गेटच्या बाहेर गेलो. बोलत बोलत नजर जाईल तिकडे झोपड्याच झोपड्या होत्या. ही माणसं कशी राहत असतील, असा प्रश्न माझा मलाच पडला होता.

काही झोपड्यांची दारं देवाच्या नावावर लावली होती. त्या झोपड्यांकडे पाहून असं वाटत होतं की, ही मुंबई जितकी मायानगरीच्या नावाखाली झगमगत आहे, तितकीच झोपडपट्ट्यांच्या नावाखाली. तिथलं दारिद्र्य गगनात मावणार नाही एवढं होतं. मी मागे वळून पाहिलं तर ते वॉचमन काका एक हात डोळ्याखाली घेऊन, दुसऱ्या हाताने मला बोलावत होते. मला वाटलं संजय आले, म्हणून ते मला बोलावत असतील. मी त्यांच्याजवळ गेलो. काका अगदी नम्रपणे मला म्हणाले, ‘चहा झाला आहे साहेब, चला ना...!’ काकांच्या आदरावरून मला लक्षात आलं, हे इथले नाहीत. मी काकांना म्हणालो, ‘कोणतं गाव तुमचं काका?’ माझे शब्द कानी पडताच काकांनी मान खाली घातली आणि काका म्हणाले, ‘मुंबईच आहे जी.’ जी म्हणाल्या म्हणाल्या मी काकांना म्हणालो, ‘तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे ना !’ काका हलक्या सुरात म्हणाले, ‘गडचिरोली नाही चंद्रपूर.’ मी म्हणालो, ‘‘काय काका, तुम्ही आपल्या गावाचं नाव अभिमानाने सांगायचं ना !’’ काकांनी बाजूला असलेल्या काकूंकडे चोरट्या नजरेने पाहिलं. गावाचं नाव काढलं की, ही माणसं दबक्या आवाजात का बोलत होती, मला काही कळेना? त्यांचं आदरातिथ्य पाहून वाटत होतं, मुंबईत जी काही ‘माणुसकी’ शिल्लक आहे, ती या मुंबईबाहेरून गावकुसातून आलेल्या माणसांमुळेच!

काकू मेथीची भाजी निवडत होत्या. काका गेटच्या दिशेने नजर रोखून बसले होते. आतमध्ये अजून एक कुणीतरी होतं, हे भांड्यांच्या आवाजावरून कळत होतं. मी त्या काकूंना विचारलं, ‘‘आतमध्ये कोण आहे?’’ काकू म्हणाल्या, ‘माझी मुलगी.’ मी म्हणालो, ‘‘तिघेजण राहता का तुम्ही इथं?’ काका म्हणाले ‘हो.’ आता आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत होतो. त्या खुर्चीवर बसून मला कंटाळा आला. मी त्या काकूंकडे ती भाजी निवडताना पाहिलं. ती भाजी निवडणं तसं सोपं होतं; पण काकू त्याला अवघड करीत होत्या. मी माझ्या गावी पाटनूरला आईला लगेच मेथीची भाजी निवडून द्यायचो, हे मला पटकन आठवलं. मला एकदम काय झालं माहिती नाही. मी खुर्ची बाजूला केली आणि त्या छोट्या टाकलेल्या सतरंजीवर जाऊन बसलो. त्या काकूंना मी जवळ आल्याचं पाहून एकदम भीती वाटली. मी म्हणालो, ‘अहो काकू, तुम्ही भाजी अवघडपणे निवडताय ना..!’ मी ताव ताव करत अर्धी भाजी निवडली. काकू मला शांतपणे म्हणाल्या, ‘आता डोळे साथ देत नाहीत हो.’ काकूंचे ते शब्द ऐकून माझ्या लक्षात आलं, आपण ‘त्या’ काकूंना चुकीचं बोललो. आम्ही भाजी निवडण्यात गुंग झालो, तेवढ्यात काकांनी आवाज दिला, ‘वरच्या बाईसाहेब आल्या.’ मी वर मान केली, तर संजय, त्यांची पत्नी अनघा, लहान मुलगा पार्थ, संजयची बहीण विजयमाला आले होते.

संजयने मला पाहिलं आणि म्हणाले, ‘‘सर तुम्ही पण ना, लगेच लोकांमध्ये मिसळता, त्यांच्याशी बोलता.’’ संजयचं बोलणं ऐकून मीही त्याला दाद दिली. संजय म्हणाले, ‘‘चला, आपण वर जाऊ या.’’ मी म्हणालो, ‘‘अहो थोडीशी तर भाजी राहिलीय, ती पूर्ण करतो आणि मग येतो.’’ संजय म्हणाले, ‘‘लेकरू माझ्या हातावर झोपलंय, त्याला वर टाकून येतो.’’ संजय, त्याची पत्नी, मुलगा वर गेले. ही मंडळी मध्येच आल्यामुळे आमच्या रंगलेल्या गप्पांत मध्येच खंड पडला. आम्ही पुन्हा त्या गप्पांना सुरुवात केली.

संजयची बहीण बोलता बोलता म्हणाली, ‘लई मेहनती आणि जीव लावणारं कुटुंब आहे हो हे. यांच्यावर संकट ओढवलं. मी या सर्वांना आग्रह धरला. इथल्या लोकांशी नका वाद घालू, चला माझ्याबरोबर मुंबईला असं म्हणत, आम्ही यांना घेऊन आलो.’’ संजयची बहीण बोलता बोलता ‘अतिप्रसंग’ हा शब्द बोलून गेली. सगळे एकदम शांत झाले. पुन्हा संजयच्या बहिणीच्या लक्षात आलं, आपण काहीतरी बोलून गेलो. मी म्हणालो, ‘‘अतिप्रसंग म्हणजे? असं काय झालं होतं?’ संजयच्या बहिणीसह सगळेजण एकदम शांत बसले. मी खूप खोदून खोदून विचारल्यावर कुठे संजयची बहीण बोलायला लागली, ‘‘सर, खरंतर आम्ही हे कोणाला कधी बोललो नाही, आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून सांगते. आमच्या गावाकडचं हे कुटुंब. एक मुलगी, दोन मुलं, मुलांच्या बायका, त्यांची मुलं असा सगळा हसता खेळता परिवार होता. काकू-काका हे एकदम गरीब घरचे. आपली रोजीरोटी करत सुखात राहायचं, असं त्यांचं चाललं होतं.’’ मध्ये बघत थोड्या दबक्या आवाजात संजयची बहीण म्हणाली, ‘‘काकांची मुलगी रंजना (हे बदललेलं नाव आहे.) ही शेतावर एकाच्या शेतात रोजमजुरी करण्यासाठी गेली होती. ती एकटी असल्याचं पाहून त्याच शेतमालकाने जबरदस्तीने रंजनावर अतिप्रसंग केला. रंजना रडत रडत घरी आली. रस्त्याने येताना सगळ्यांना काहीतरी चुकीची घटना घडल्याचं कळलं.

रंजनाच्या घरामधून सगळ्या गावामध्ये ही वार्ता पसरली. जे झालं ते आपण शांततेने निमूटपणे सहन करायचं, तसंच राहायचं, या भूमिकेतून हे कुटुंब चार दिवसांनंतर आपल्या नियमित कामाला लागलं होतं. त्या गावामध्ये दोन गट होते. त्या दोन गटांमध्ये उचकवणारे कमी नव्हते. त्यातल्या एका गटाने हे सगळं प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत नेलं. तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल, नाहीतर समाजातून तुम्हाला वाळीत टाकतो, अशा शब्दांत रंजनाच्या कुटुंबीयांना गावातील एका गटाने सुनावलं. दुसरा गट तुम्ही पोलिस स्टेशनला गेलात तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, अशा तोऱ्यात होता. पोलिस तक्रार नाही केली तर पोरीतच काही तरी खोट आहे असं म्हणणारा एक गट होता. पोलिस स्टेशनला नाही गेलात तर गाव सोडावं लागेल, अशाही धमक्या या परिवाराला येत होत्या. शेवटी जड अंतःकरणाने या परिवाराने पोलिस स्टेशन गाठलं. गुन्हा दाखल झाला. आरोपीला अटक झाली. अनेक वर्षं केस चालली. निकालामध्ये आरोपी निर्दोषपणे बाहेर सुटला.’

माझं सगळं लक्ष संजयच्या बहिणीच्या बोलण्याकडे होतं. मी हे पाहिलंच नाही की, समोरच्या काकू धाय मोकलून रडत होत्या. आम्ही त्यांची समजूत काढू लागलो. संजयच्या बहिणीला मी म्हणालो, ‘बरं झालं तुम्ही यांना शहरामध्ये घेऊन आलात.’’ संजयची बहीण म्हणाली, ‘‘यांचे लोकांनी फार हाल केले होते. पोरीचं वय जात होतं. कोणी पाहुणे लग्नासाठी तयार नव्हते. दोन्ही मुलांच्या सुनांनी वेगळं राहणं पसंत केलं. आम्ही जेव्हा गावी गेलो, तेव्हा हे सगळं मला कळालं. मी यांना शहरात घेऊन आले आहे.’’ मी विचार करत होतो, यात रंजनाचा, तिच्या आई-वडिलांचा काय दोष; त्यांना शिक्षा का बरं! करणारा एखादा कुकर्म करून जातो; पण त्याचा प्रचंड स्वरूपातला होणारा त्रास किती गंभीर असतो. समाजातून काढलं जातं, बोलणं बंद केलं जातं, जातीमधले रोटीबेटीचे व्यवहार बंद केले जातात, टोचून बोललं जातं.... त्याच घरातली माणसं एकमेकांची राहत नाहीत. आता पुढे काय होईल, या काळजीने मन उबगून जातं. आयुष्य काळवंडतं. या सगळ्यांमध्ये ती मुलगी, महिला, जिच्यावर हा सगळा प्रसंग ओढवतो, तिचं बिचारीचं आयुष्य एखाद्या चालत्याफिरत्या मेलेल्या शरीरासारखं होतं.

मी एकदम भानावर आलो. ‘‘सगळं गाव तो माणूस सुटून आल्यावर आमच्याकडे शंकेच्या नजरेने पाहू लागलं. तुमच्या पोरीमध्येच काहीतरी खोट असेल, तिने त्या माणसाला फूस लावली असेल, तिलाच काहीतरी पैशांची हौस असेल, असे आरोप आमच्यावर केले जाऊ लागले.’’ त्या काकू त्यांच्यावर झालेला सगळा प्रसंग सांगत होत्या. काकू म्हणाल्या, ‘‘बाईसाहेब आमच्या गावातल्या गुरुजींच्या कन्या, त्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं. आम्ही मुंबईत आलो.’

वॉचमन म्हणून असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची वेगळी कहाणी आहे हे खरं असतं. मी तिथून निघालो. रंजनासारख्या खितपत पडलेल्या अनेक मुली, महिला आपलं आयुष्य मुठीत धरून काढत असतील. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. मानसिक विकृती, शारीरिक आघात या माध्यमातून रसातळाला गेलेली अनेक कुटुंबं... रंजनासारख्या अनेक सुकुमार कळ्यांना, स्त्रियांना कायमस्वरूपी स्वतःला संपवून घ्यावं लागतं. हे त्यांचं दुर्दैव आहे की मग तो संस्काराचा भाग आहे, का विचारक्षमतेचा, हा अवघड प्रश्न आहे, यावर चिंतन करावं लागेल, प्रसंगी अशा विकृतीला ठेचावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.