एका कामानिमित्त परवा वाशीला गेलो होतो. वाशीभोवती असणाऱ्या खाडीचं सौंदर्य खूप छान आहे. त्या खाडीकडे पाहिल्यावर अथांग समुद्राचा भास होतो.
एका कामानिमित्त परवा वाशीला गेलो होतो. वाशीभोवती असणाऱ्या खाडीचं सौंदर्य खूप छान आहे. त्या खाडीकडे पाहिल्यावर अथांग समुद्राचा भास होतो. या खाडीच्या आसपास भटकावं, त्याभोवती असणाऱ्या माणसांना पाहावं, भेटावं, असं अनेकवेळा वाटलं; पण कधी जमलं नाही. आज ठरवलं, तिकडे जायचंच. तशी ती खाडीही समुद्राचाच भाग. त्याभोवती असणाऱ्या लोकांचं जीवनमान निसर्गाच्या चक्रावर अवलंबून असतं. कुणी खेकडे पकडत होतं, कुणी शिंपल्या वेचत होतं, कुणी मासे पकडायचं जाळं साफ करीत होतं, तर कुणी होडीला धक्का देऊन काठावर आणत होतं. आजूबाजूला मुलं पोहण्याचा आनंद घेत होती.
खाडीच्या काठावरचं ते सर्व चित्र म्हणजे स्वतंत्र विश्व होतं. माझं निरीक्षण सुरू असतानाच माझ्या मागून एका व्यक्तीने मला आवाज दिला, ‘अहो भाऊ, जरा होडीला धक्का देण्यासाठी येता का?’ मी मागे वळून पाहिलं, तर काठीचा आधार घेऊन उभी असलेली एक व्यक्ती काठावर असणाऱ्या होडीला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करीत होती, पण त्यांचं बळ कमी पडत होतं. मी गेलो. आम्ही दोघांनी मिळून त्या होडीला धक्का दिला. मला धक्का देण्याचा अंदाज नाही आला, होडी एकदम आतमध्ये गेली. त्या माणसाला तिला पकडता येईना. मी पुढं धावलो आणि ती होडी पकडली.
माझे कपडे भिजल्याचं पाहून त्या माणसाला वाईट वाटलं. तो माणूस म्हणाला, ‘भाऊ, थोड्या वेळात कपडे वाळतील.’ आपलं रिकामं जाळं ती व्यक्ती त्या बोटीत टाकीत होती. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही आता समुद्रामध्ये जाताय तर परत कधी येणार?’ ते म्हणाले, ‘नाही सांगता येणार, नक्की किती वेळ लागेल ते.’ मी म्हणालो, ‘मी येऊ का तुमच्याबरोबर?’ ते म्हणाले, ‘का?’ ‘सहज, तुम्ही काय काम करता, कसं करता, ते मला पाहायचं आहे.’ ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही कोळी हाव काय?’ मी म्हणालो, ‘नाही हो.’ ते माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते.
आम्ही निघालो. हळूहळू होडी खोल पाण्यात गेली. काठापासून बरंच दूर गेल्यावर जरा भीती वाटत होती. होडीला फारसा आधार नव्हता. होडी डुगडुग करायची. एका क्षणाला मला वाटत होतं की, आपण उगाच आलो बाबा. माझा चेहरा पाहून ती व्यक्ती मला म्हणायची, ‘‘नका घाबरू, काही होणार नाही.’ ती व्यक्ती त्यांच्या जाळं लावण्याबाबतच्या सीमा मला सांगत होती.
उंच उंच जाळ्यावर सगळीकडं रंगीबेरंगी निशाण लावलं होतं. आम्ही या काठावरून त्या काठावर आलो. जिकडं नजर जाईल तिकडं पाणीच पाणी होतं. त्या व्यक्तीने आतमधलं जाळं काठावर ठेवलं. जाळ्यातले मासे बाहेर काढताना मी त्यांना म्हणालो, ‘काय निसर्ग, काय रोज नवा अनुभव, तुम्हाला फार मजा येत असेल ना..!’ त्यांनी चेहऱ्यावर फार आनंदाचे भाव न दाखवता, नुसती मान हलवून होकार दिला.
आमच्या तासाभराच्या होडीच्या प्रवासात मी एकटाच बोलत होतो, ते काहीही बोलत नव्हते. असं वाटत होतं, त्यांचं सर्वस्व कुणीतरी हिरावून घेतलंय. त्यांनी सोबत आणलेला एक डबा घेतला. दूर शेंदूर लावलेल्या दोन दगडांजवळ त्यांनी डब्यात असलेला नैवेद्य ठेवला. मीही त्यांच्या मागे मागे गेलो. त्यांनी त्या दोन्ही दगडांसमोर हात जोडले. मीही नतमस्तक झालो. मी त्यांना विचारलं, ‘‘हा कोणता देव आहे?’’ ती व्यक्ती काहीच बोलली नाही. मी खोदून विचारल्यावर ते म्हणाले, ‘माझ्या बायकोवर इथंच अंत्यसंस्कार केले.’’ त्यांचं ते उत्तर ऐकून मी गप्पच बसलो. त्यानंतर थोडा वेळ गेल्यावर मी त्यांच्याशी बोललो. ते बरंच काही सांगत होते. बोलण्यातून जे पुढे आलं, ते फार धक्कादायक होतं.
निसर्गाच्या चक्रात माणूस खूप अडकतो, प्रचंड खस्ता खातो; पण तरीही जगण्याची उमेद तो सोडत नाही. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव विलास नाईक. वाशी भागात ते राहतात. मासे पकडण्याचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. विलास यांचं लग्न झाल्यावर दुसऱ्या वर्षी त्यांच्या पत्नी पाण्यात बुडून वारल्या. ती घटना ऐकताना माझ्या अंगावर काटा आला आणि विलास नाईक यांच्या डोळ्यांतून अश्रू. नाईक म्हणाले, ‘त्या दिवशी मला ताप आला होता.
टाकलेल्या जाळ्यातील मासे आणण्यासाठी माझी पत्नी माझं न ऐकता गेली. रात्री खूप उशीर झाला तरी तिचा पत्ता नव्हता. आम्हाला काळजी वाटू लागली, आम्ही शोध घेतला; पण तिचा शोध लागला नाही. माझे सगळे मित्र रात्री कंदील घेऊन, बॅटरी घेऊन या कडेहून त्या कडेला शोधत होते. दुसऱ्या दिवशी होडी सापडली. आम्हाला कळून चुकलं की, एकदम पाणी जास्त आलं, त्यात वाऱ्याचा मारा. होडी उलटली आणि बुडाली. तिला पोहता येत होतं; पण त्या दिवशी तिलाही बरं नव्हतं. काय झालं असेल काय माहिती!’
नाईक यांच्या अश्रूंवरून लक्षात येत होतं, त्यांचं त्यांच्या बायकोवर किती प्रेम होतं ते. आता नाईक बोलत होते आणि मी ऐकत होतो. मी नाईक यांना म्हणालो, ‘मग पुढे काय केलं? तुमचा परिवार, आई-बाबा कसे आहेत?’ नाईक म्हणाले, ‘मी बरीच वर्षं लग्न नाही केलं. आई म्हणायची, ‘बाबा लग्न कर, नातवाचं तोंड पाहायचं आहे.’ एका जवळच्या नातेवाइकाने मुलगी दिली. ती जेव्हा पहिल्यांदा गरोदर होती, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, तिला कॅन्सर आहे. तिच्या वडिलांनी तिचं आजारपण आमच्यापासून लपवलं होतं. आम्ही तिच्यावर उपचार केले; पण दुसरी मुलगी झाल्यावर ती वारली. माझ्या आई-बाबांना धक्का होता. पुढे कोरोनाच्या महासाथीमध्ये आई-बाबा गेले.’ गरीब, संकटांशी सामना करणाऱ्या मच्छीमारांच्या अनेक गंभीर समस्या त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. प्रामुख्याने मुंबईत उदरनिर्वाह, रोजगाराचं मुख्य साधन असणाऱ्या मच्छीमारांचं, त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य किती गंभीर स्वरूपाचं आहे, हे मला कळालं. मासेमारीसंबंधित किती माणसं मरतात, किती अपघात होऊन घरी बसतात, याबाबत अनेक गोष्टी विलास यांनी सांगितल्या. या मासेमारी करणाऱ्यांना कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न मला पडला होता. आम्ही अलीकडच्या टोकाला आलो. आणलेल्या माशांचं गाठोडं विलास यांनी डोक्यावर ठेवलं. आम्ही बोलत-बोलत विलास यांच्या घराच्या दिशेने निघालो.
रस्त्यात दोन ठिकाणी विलास यांच्या दोन मुली मच्छी विकण्यासाठी बसल्या होत्या. अगदी दोघी विशीच्या आतमधल्या. मोठी ज्योती आणि लहान मनीषा. दोघींचीही विलास नाईक यांनी माझ्याशी ओळख करून दिली. दोन्ही मुली ना शिक्षण घेत होत्या, ना एखादा छंद जोपासत होत्या. त्या दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर कमालीची चमक, समाधान दिसत होतं. आम्ही घरी गेलो. घरी दोन म्हातारी माणसं होती. विलास यांनी मला त्या दोघांची ओळख करून दिली. ते दोघेजण विलास नाईक यांच्या पहिल्या पत्नीचे आई-वडील होते. त्यांच्या मुलाने घरातून बाहेर काढल्यावर विलास यांनी त्यांना आसरा दिला.
घरात फोडणीसाठी तेल होतं की नाही हे माहिती नाही; पण त्या आजी विलास यांच्या दोन्ही बायकांच्या फोटोसमोर दिवा लावत होत्या. त्या घराची परिस्थिती पाहून वाटत होतं, इथं सर्वांत जास्त दारिद्र्य आहे; पण समाधान आणि धैर्य याबाबतीत विचाराल, तर त्या घराची, इथल्या माणसांच्या मनाची श्रीमंती विचारू नका. मला जेवण्यासाठी ते आग्रह करत होते. मी विलास यांचा निरोप घेऊन माझ्या परतीच्या प्रवासाला लागलो. एक माणूस प्रचंड त्रास, संकटांना सामोरं जाऊनही जगण्याची उमेद सोडत नाही. ज्यानं अपघातात पाय गमावला होता. ज्यानं आपली माणसं गमावली, त्या माणसाला आधार देणारा ना निसर्ग आहे, ना शासन व्यवस्था! आपल्या अवतीभोवती विलास यांच्यासारखी अनेक मंडळी दिसतील, ज्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि समाधान दिसेल; पण त्यांच्या मनात दुःखाची खूप मोठी कहाणी असेल. अशा माणसांशी बोला, त्यांना धीर द्या, त्यांचे अश्रू पुसा, म्हणजे निसर्ग त्यांच्या आणि तुमच्या डोळ्यांत अश्रू येऊ देणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.