अलीकडे पुण्यामध्ये आठवड्यातून किमान दोन दिवस तरी मुक्काम होतोच होतो. परवा भाऊसाहेब पाटील यांच्या ‘बीइंग भाऊसाहेब’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त पुण्यात होतो.
अलीकडे पुण्यामध्ये आठवड्यातून किमान दोन दिवस तरी मुक्काम होतोच होतो. परवा भाऊसाहेब पाटील यांच्या ‘बीइंग भाऊसाहेब’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त पुण्यात होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवार पेठ येथील ऑफिसमध्ये जाऊन तिथली कामं करायची होती. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन पोहोचलो. अजून सहकारी येणं बाकी होतं. जवळच पाटनूर गावचे माझे शेजारी बालाजी धोंडगे यांनी ‘पाटनूरकर प्रकाशन’ नावाने सुरू केलेल्या प्रकाशन संस्थेचं ऑफिस होतं. दुसऱ्याच्या दुकानावर पुस्तकं विकणारा हा माझा तरुण शेजारी स्वतःची प्रकाशन संस्था काढून, चांगल्या लेखकांची पुस्तकं गावागावांत नेऊन पोहोचवण्याचं काम करतोय, याबद्दल मला त्याचं कौतुक करायचं होतं. मी बुधवार पेठ येथेच असणाऱ्या धोंडगे यांच्या ऑफिसला गेलो. अजून धोंडगेदेखील तिथं आलेले नव्हते. ते येईपर्यंत आजूबाजूला जरा फेरफटका मारावा, या उद्देशाने मी बाहेर पडलो. रस्त्याने जात असताना माझी नजर बूट पॉलिश करणाऱ्या एका व्यक्तीवर गेली. ती व्यक्ती बूट इतके सुंदर चमकवत होती की, त्याच्या हातून आपलेही बूट चमकवून घेण्याचा मोह मला आवरला नाही. मी बूट पॉलिश करायला गेलो, तर तिथे अगोदर तिघेजण रांगेत थांबले होते.
त्या बूट पॉलिश करणाऱ्याला तिकडून कोणीतरी आवाज दिला, ‘अरे उकंड्या माझा बूट पॉलिश झाला का?’ ‘उकंड्या’ हे नाव कानावर पडल्यापडल्या माझ्यासह माझ्या बाजूला बूट पॉलिश करायला थांबलेले तिघेजण एकदम त्या बूट पॉलिश करणाऱ्या माणसाकडे पाहायला लागले. कोणीच काही बोलेना, सगळेजण शांतपणे उभे राहिले होते. मी त्या बूट पॉलिश करणाऱ्याला म्हणालो, ‘‘तुमचं नाव उकंड्या आहे का?’’ त्याने होकाराची मान हलवली. बूट पॉलिश करून घेण्यासाठी माझ्या बाजूला थांबलेला एक जण जरा अतरंगी होता. तो म्हणाला, ‘आपल्या महाराष्ट्रामध्ये मरीमाय, पोचीमाय, खंड्याबाई, बंड्याबाई अशी खूप देवांची नावं आहेत, तसं ‘उकंड्या’ हे नावदेखील कोण्यातरी देवाचं किंवा यांच्या आजोबांचं नाव असणार, म्हणून यांचं नाव ‘उकंड्या’ ठेवलं असणार.’ तो बूट पॉलिश करणारा अतिशय नम्रपणे म्हणाला, ‘नाही नाही, तसं अजिबात नाही. मी उकिरड्यावर सापडलो म्हणून, माझं नाव मला सांभाळणाऱ्या मावशीने ‘उकंडेश्वर’ ठेवलं. लोक उकंड्या, उकंड्या म्हणतात.’ थोड्यावेळानं बूट पॉलिशसाठी माझा नंबर लागला. आजूबाजूला कोणीही नव्हतं. मी विचारलं, ‘किती दिवसांपासून हे काम करता?’ तो म्हणाला, ‘मी हे काम करत नाही.
इथं बसणारा पोरगा सामान आणण्यासाठी पेठेत गेलाय. थोडा वेळ मी इथं बसलोय, तर लोक येत गेले. हे माझं दुकान नाही.’ ‘मग तुम्ही करता काय?’ तो म्हणाला, ‘काही नाही, जिथं जे काम मिळेल ते करतो. मी दोन्ही पायांनी अधू आहे, त्यामुळे मेहनतीची कामं मला जमत नाहीत.’’ त्याचं लक्ष पूर्णपणे त्या बुटाला चमकवण्यामध्ये होतं. म्हणजे बूट चमकवण्याची जागतिक स्पर्धा लागली असती, तर त्यामध्ये माझ्या बुटाचा पहिला नंबर आला असता, इतकं जीव ओतून त्याने त्या बुटाला चमकवलं होतं.
थोड्या वेळाने बूट पॉलिश करणारा तो मुलगा परत आला. तो त्या उकंडेश्वरच्या जागी बसला. उकंड्या बाजूला बसून तंबाखू चोळायचं काम करत होता. त्या दोघांचं बोलणं सुरू होतं. मीही त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी झालो. मला खरंतर उकंडेश्वरशी बोलायचं होतं. तो उकिरड्यावर कसा सापडला, हे विचारायचं होतं. बाजूलाच असलेल्या एका दगडावर मी बसलो. त्या दोघांच्या छान गप्पा चालल्या होत्या. मी उकंडेश्वरला म्हणालो, ‘तुम्ही राहता कुठं?’ तर त्याने ‘पलीकडल्या गल्लीत’ असं उत्तर दिलं. पलीकडे एक रसवंतीवाला होता. त्या रसवंतीवाल्याच्या रस काढायच्या मशिनला घुंगरं बांधली होती. त्या घुंगरांचा आवाज, आमचा आवाज यातून एक छान मधुर संगीत तयार झालं होतं. उकंडेश्वरच्या बोलण्यामधून मला बरेचसे विषय त्याच्या आयुष्याला घेऊन समजले होते. किती गंभीर विषय होता, तो ऐकणं मला सहन होत नव्हतं. मी उकंडेश्वरला म्हणालो, ‘मला तुमच्या मावशीला भेटायचं आहे.’
तो म्हणाला, ‘काय सांगावं साहेब, आमचं घर तुम्हाला घेऊन जाण्यासारखं नाही.’ मी म्हणालो, ‘तरीही आपण जाऊ या.’ तो माझी लहान मुलासारखी समजूत काढत होता; पण मी ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही, हे लक्षात आल्यावर त्याने मला होकाराची मान हलवली.
त्या बूट पॉलिशवाल्याचा निरोप घेऊन आम्ही बुधवार पेठच्या त्या गल्लीमध्ये एक एक पाऊल पुढे पुढे टाकत उकंडेश्वरच्या घराजवळ जात होतो. जाताना आमचं बोलणं सुरू होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला देहविक्रय करणाऱ्या महिला नजर काढून मोठ्या आशेने माझ्याकडे पाहत होत्या. ‘काय रे उकंड्या, किधर जा रहा है’, असं सर्रासपणे त्या महिला उकंडेश्वरला बोलत होत्या. एका घरात गेलो, ते जुनं घर पाहून इथं साप आणि घुशी, उंदीरच राहत असतील असं वाटत होतं. एका अंथरुणावर पडलेली मावशी उकंडेश्वरला पाहताच म्हणाली, ‘‘आलास का बाबा, बस बस.’’ माझी ओळख करून देताना उकंडेश्वर सांगत होता की, ‘‘या दादांना तुम्हाला भेटायचं होतं.’’ मावशी म्हणाली, ‘‘का बाबा, काय झालं?’’ मी म्हणालो, ‘‘काही नाही, सहज तुमच्याशी बोलायचं होतं. उकंडेश्वरचं ‘उकंड्या’ नामकरण कसं झालं, हेही तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं.’’
ती मावशी बिचारी काही न बोलता काही वेळ शांत बसली. मी, मावशी आणि उकंडेश्वर बोलत बसलो होतो. मावशी म्हणाली, ‘मी उस्मानाबादची, पुण्यात आले. एका मैत्रिणीच्या नादी लागून आई-वडिलांचं न ऐकता बुधवार पेठमध्ये येऊन राहिले. खूप पैसे कमवायचे आणि लवकर श्रीमंत व्हायचं, काही दिवस देहविक्रीचा व्यवसाय करायचा आणि मग पुन्हा कोणासोबत तरी चांगलं आयुष्य सुरू करायचं, या भावनेतून मी या कामाला सुरुवात केली; पण या कामामध्ये इतके पाय खोलात जाऊन रुतले की, पुन्हा वर निघणं शक्य नव्हतं.’ ती मावशी पुढे म्हणाली, ‘लहानपणापासूनच मला लेकरांची खूप आवड होती. माझ्या भावांची, बहिणीची लहान लहान मुलं माझ्या अंगा-खांद्यावर खेळली.
आमच्या गल्लीमध्ये एक उकिरडा आहे. त्या उकिरड्यावर एक बाळ कुणी तरी टाकल्याची गल्लीत ओरड सुरू झाली. त्या बाळाला मुंग्या लागल्या होत्या. एका पोलिसवाल्याने ते बाळ नेलं. असं एक-दोनदा नाही, तर अधूनमधून सारखं घडायचं. मनातल्या मनात वाटायचं, आपल्या आयुष्यामध्ये आपलं असं कोणीही नाही. असं एखादं बाळ घ्यावं, त्याला मोठं करून म्हातारपणाची काठी करावी; पण पुढे जायची हिंमत व्हायची नाही.’
आम्ही बोलत असताना एक महिला उकंडेश्वरच्या मावशीसाठी जेवणाचं ताट घेऊन आली. त्या मावशीने आणि उकंडेश्वरने त्या महिलेला माझी ओळख करून दिली. त्या महिलेचं नाव सविता होतं. सविता परळीची, तिचं सलीम नावाच्या मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत पुण्यामध्ये आली. सलीमने परस्पर एका व्यापाऱ्याशी करार करून सविताची विक्री केली. सविताची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी होती. आमच्या बोलण्यात सविताही सहभागी झाली होती. सविता म्हणाली, ‘असे खूप ग्राहक असतात की, ज्यांच्यासोबत भावनिक नातं जडू लागतं. ते नियमित येतात. कालांतराने त्यांच्यासोबत भावनिक नातं जोडलं जातं. अनेक वेळा गर्भ राहण्यासारखे विषय त्यातूनच पुढे येतात. मग राहिलेल्या गर्भाचं करायचं काय, हा प्रश्न निर्माण होतो. ज्याच्यापासून गर्भ राहिला आहे, तो स्वीकारत नाही.
तो म्हणतो, हे पाप माझं नाही, अन्य कुणाचं असेल. तिला वाटतं, आपलं कोणी नाही, या गर्भाला वाढवू. ती भावनिक होते. गर्भ बाहेर आल्यावर कळतं की, ही खूप मोठी चूक झाली. मग समाजाच्या भीतीखातर त्या गर्भाला उकिरड्यावर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. त्या उकिरड्यामधून मग कधी पोलिस घेऊन जातात, कधी सामाजिक सेवाकाम करणाऱ्या संस्था, तर कधी कुत्र्याच्या तोंडीही तो गर्भ लागतो. मावशी म्हणाली, ‘असंच एकदा डोळे न उघडलेलं अर्भक उकिरड्यावर असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांना कळण्यापूर्वी आम्ही ते अर्भक घेतलं, त्याला स्वच्छ केलं. त्याला लागलेल्या मुंग्या काढल्या, त्याची काळजी घेतली. दोन-तीन दिवसांनंतर त्या बाळाने डोळे उघडले. त्याने औषध-पाण्याला प्रतिसाद दिला. ते बाळ टवटवीत होतं, पण कुत्र्याने त्याचे दोन्ही पाय कुरतडले होते. त्याच्या पायाच्या छोट्या-छोट्या नसांमधून रक्त येत होतं.’’ मावशी उकंडेश्वरच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ‘हा तोच उकंडेश्वर आहे.
मी बसलो होतो तो भाग देहविक्रय करणाऱ्या महिलांचा भाग आहे, हे सर्वांना माहितीच होतं. तिथं असणाऱ्या अनेक महिला या अशा उकंडेश्वरच्या माता म्हणूनही त्यांचं संगोपन करतात, हेही तिथलं वेगळेपण होतं. मावशी, उकंडेश्वर, सविता या सगळ्यांची कहाणी वेगवेगळी होती. पण या दोन्ही महिलांच्या मनामध्ये अशा टाकून दिलेल्या मुलांविषयी असलेलं प्रेम आईसमानच होतं.
उकंडेश्वरचा हा सगळा प्रवास मी समजून घेतला. आता त्याला दोन्ही पायाने बरोबर चालता येत नाही. उकंडेश्वरचं मन त्या मावशीप्रती आणि सविताप्रती एक आई आणि एक बहीण या स्वरूपातच आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला झाल्या म्हणून काय झालं, त्यांनाही एक मन असतं. त्यांनाही वाटतं की, आपल्याला आई म्हणून कुणीतरी हाक मारावी.
बुधवार पेठ असो की राज्यातल्या अन्य देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्त्या, तिथं मुंग्यांनी वेढलेले असे अनेक गर्भ फेकल्याच्या वार्ता रोज येतात. ज्या ठिकाणी, वस्तीमध्ये असे उकंडेश्वर जन्माला येत असतील, तिथं त्या गर्भाच्या वाट्याला डोळे उघडण्याआधीच दुःख येतं; कुठे समाजाच्या भीतीपोटी, तर कुठे नाहक त्रासाला कंटाळून. या अर्भकांचं, गर्भाचं दुःख कधी संपणार, काय माहिती? असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी जड पावलांनी ऑफिसकडे निघालो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.