चळवळींच्या माहेरघरी साहित्यिकांचा मेळा

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे ‘गांधी जिल्हा’ म्हणून जगाला परिचित झाला.
ABMSS
ABMSSSakal
Updated on
Summary

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे ‘गांधी जिल्हा’ म्हणून जगाला परिचित झाला.

- संजय इंगळे तिगावकर sanjayingletigaonkar@gmail.com

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे ‘गांधी जिल्हा’ म्हणून जगाला परिचित झाला. याच ऐतिहासिक शहरात ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. मराठी साहित्यप्रेमींचा हा सोहळा तब्बल ५३ वर्षानंतर या शहरात होत आहे. गांधी-विनोबांच्या विचारकार्याचे आकर्षण असलेल्या साहित्यप्रेमींसाठी आणि वर्धाकरांसाठीही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. ‘चळवळींचे गाव’ अशी वर्धानगरीची ओळख असल्याने आणि परिवर्तनाच्या लढ्यात सर्व संघटनांचा एकोपा सातत्याने राहिला असल्याने हे संमेलन महाराष्ट्रासाठीच नव्हे देशासाठीही महत्त्वाचे ठरेल. स्वातंत्र्य लढ्यापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्‌मयीन चळवळीचे माहेरघर असलेल्या या शहराविषयी आकर्षण आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते अधोरेखित झाले आहे.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्ध्यात होत आहे. यापूर्वी १९६९ मध्ये वर्ध्यात ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तब्बल ५३ वर्षांनंतर त्याच परिसरात होणारे हे संमेलन गांधी-विनोबांच्या विचारकार्याचे आकर्षण असलेल्या साहित्यप्रेमींसाठी आणि वर्धाकरांसाठीही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. याच तारखांना विद्रोही साहित्य संमेलनही वर्ध्यात होणार असल्याने साहित्यप्रेमींचा आनंद द्विगुणित करणारा हा साहित्यिक मेळावा ठरणार आहे. ‘चळवळींचे गाव’ अशी वर्धानगरीची ओळख असल्याने आणि परिवर्तनाच्या लढ्यात सर्व संघटनांचा एकोपा सातत्याने राहिला असल्याने वर्ध्यातील ही संमेलने महाराष्ट्रासाठीच नव्हे देशासाठीही ‘माईलस्टोन’ ठरतील.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे ‘गांधी जिल्हा’ म्हणून जगाला परिचित झाला. जगाच्या नकाशात सेवाग्राम या राष्ट्रीय स्थळाने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. गांधीजींच्या सत्याग्रही विचारांचा वारसा लाभलेली ही कल्पभूमी, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबांची ही कर्मभूमी, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दसामर्थ्याने प्रेरित झालेली ही क्रांतिभूमी आहे. आजही विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात वर्धानगरीचे सातत्याने योगदान लाभते आहे. वर्धा जिल्ह्याने आजतागायत अनेक चांगले कलावंत, प्रबुद्ध विचारवंत महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिले आहेत.

वरदा म्हणजेच वर्धा नदीच्या काठावर हा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याला ‘वर्धा’ हे नाव प्राप्त झाले. इसवीसनपूर्व एक हजार वर्षांपासून या भागात मानवी वस्ती असावी, असे पुरातत्त्वज्ञांचे मत आहे. बुद्धकालीन संस्कृतीच्या खुणाही या प्रदेशात प्राप्त होतात. या भूप्रदेशावर वाकाटकाची, तसेच प्रवरसेनेची अधिसत्ता राहिली आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकात हा प्रदेश बहिमनी अधिपत्याखाली होता. त्यानंतरच्या काळात भोसल्यांची सत्ता या प्रदेशावर राहिली. एकेकाळी नागपूर जिल्ह्याचाच भाग असलेले वर्धा १८६० मध्ये स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आले. प्रारंभी वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय पुलगावजवळील ‘कवठा’ या गावी ठेवण्यात आले. १८६६ मध्ये ‘पालकवाडी’ या खेड्यात वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय स्थापन झाले. हे ‘पालकवाडी’ गाव म्हणजे आजचे वर्धा शहर होय! वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण प्रदेश वर्धा-वैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून वर्धा, वेणा, पोथरा, धाम, पंचधारा, यशोदा, बाकळी, कार या नद्या आणि उपनद्या या प्रदेशातून प्रवाहित झाल्या आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला दिशा देणारे जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सेवाग्राम होय. ‘स्वातंत्र्य प्राप्त झाल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही’ असा निश्चय करून गांधीजी १९३३ मध्ये कस्तुरबा आणि आपल्या निवडक सहकाऱ्यांसह वर्ध्यात दाखल झाले. काही काळ वर्ध्यात वास्तव्य करून वयाच्या ६७ व्या वर्षी हा महात्मा ३० एप्रिल १९३६ रोजी सेवाग्रामला राहायला आला आणि पूर्वीचे सेगाव गांधीजींच्या वास्तव्याने ‘सेवाग्राम’ झाले. गांधीजी १९४६ पर्यंत सेवाग्रामचे रहिवासी होते. स्वातंत्र्यलढ्याच्या या काळात हे छोटेखानी गाव देशाची राष्ट्रीय राजधानी झाले होते. आजही गांधीजींच्या अस्तित्वखुणा सेवाग्राम- वर्धा परिसरात सर्वत्र आढळतात.

गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनाने जगविख्यात झालेल्या ‘पवनार’ या ऐतिहासिक गावालाही अतिप्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. प्रवरसेन राजाची राजधानी असलेल्या या गावाचा उल्लेख ‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथात ‘पनार’ असा केलेला आहे. पवनार परिसरातील बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार, किल्ल्याचे अवशेष आणि मशिदीवरील कोरीव काम दीड हजार वर्षांपूर्वीच्या समृद्धतेची साक्ष देतात. रोमन साम्राज्याशीही पवनारचे व्यापारी संबंध असावेत, असे इतिहासकारांचे मत आहे. १९३७ मध्ये विनोबाजींनी येथे धाम नदीच्या काठावर परमधाम आश्रम स्थापन केला. याच आश्रमातून भूदान आणि ग्रामदानाची प्रेरणा भारतीयांना मिळाली. आश्रम परिसरात आजही प्राचीन काळातील शिल्पकला मूर्तींच्या रूपाने पाहावयास मिळते.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर गावाप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातील आष्टीही ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. आष्टी गावात झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनातील ‘पत्थर सारे बम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना’ या शब्दांनी तरुणाई पेटून उठली. पोलिस स्टेशनवर हल्लाबोल झाला. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि या उठावातील सहा तरुण शहीद झाले. १६ ऑगस्ट १९४२ रोजीच्या या स्वातंत्र्यलढ्याची नोंद भारताच्या इतिहासात झाली आहे.

वर्धा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उभे आहे. गांधीजींचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या आजोबांनी बांधलेले हे मंदिर १९ जुलै १९२८ रोजी हरिजनांसाठी खुले करण्यात आले होते. तत्कालीन परंपरागत मानसिकतेला छेद देऊन परिवर्तनाची दिशा देणारे वर्ध्यातील लक्ष्मीनारायण मंदिर अस्पृश्यांना प्रवेश देणारे भारतातील पहिले मंदिर होय. १९३२ मध्ये मगनलाल गांधी यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेले वर्ध्यातील मगन संग्रहालयही ग्रामोद्धार आणि आत्मनिर्भरतेची शिकवण देणारी एक ऐतिहासिक वास्तूच होय.

आचार्य विनोबांच्या प्रेरणेने आकाराला आलेली वर्धा जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणून गोपुरी येथील गीताई मंदिराचा उल्लेख करावा लागेल. गीताई मंदिराचे भूमिपूजन ४ नोव्हेंबर १९६४ रोजी विनोबाजींच्या हस्ते झाले होते. मंदिराची पायाभरणी ४ नोव्हेंबर १९६९ रोजी ‘सरहद्द गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या उपस्थितीत करण्यात आली; तर गीताई मंदिराचे लोकार्पण ७ ऑक्टोबर १९८० रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती एम. हिदायततुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. छप्पर आणि कळस नसलेल्या या एकमेवाद्वितीय मंदिराच्या शिळांवर विनोबांच्या गीताईचे अठरा अध्याय कोरलेले आहेत. दगडांवर संपूर्ण ग्रंथच अक्षरबद्ध असलेले हे खुले वास्तुशिल्पही जगातील एकमेवाद्वितीयच ठरावे. या मंदिराशेजारीच भव्य विश्वशांती स्तूप आहे. गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश हा स्तूप देतो.

अक्षरवाङ्‌मयाची मांदियाळी

महात्मा गांधी आपले मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या आग्रहाखातर वर्धावासीय झाले आणि वर्धा ‘गांधी जिल्हा’ झाला. गांधीजींच्या सहवासात अनेकानेक साहित्यिक आणि विचारवंतांचे दीर्घकाळ वास्तव्य वर्धा- सेवाग्राम येथे राहिले आहे. या काळातील भावविश्व अनेकांच्या साहित्यकृतीतून प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. विनायक नरहर उपाख्य, आचार्य विनोबा भावे, श्रीकृष्णदास जाजू, दादा धर्माधिकारी, काकासाहेब कालेलकर, धर्मानंद कोसंबी, आचार्य जावडेकर, शंकरराव देव, श्रीमननारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, शंकरराव लोंढे, उमाशंकर शुक्ल, डॉ. म. गो. बोकरे, मदालसा नारायण, निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग अशा अनेकानेक विचारवंतांनी गांधी विचारांची साहित्य परंपरा समृद्ध केली आहे. विनोबाजींची ग्रंथसंपदा मोठी आणि मौलिक आहेच, पण भगवद्गीतेचे सर्वात सोपे आणि सुबोध रूप असलेली ‘गीताई’ आजही अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे.

मराठी कवितेला नवे वळण देणाऱ्या केशवसुतांचे बालपण या परिसराने अनुभवले आहे. ज्येष्ठ साहित्यिक वामनराव चोरघडे यांच्या सर्जनशीलतेला आयाम इथेच लाभला आहे. संत साहित्याचे अभ्यासक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, ‘केकावली’कार श्रीधर विष्णू परांजपे, संस्कृत वाङ्‌मय अभ्यासक डॉ. सदाशिव डांगे, वाङ्‌‌मयीन इतिहासकार अ. ना. देशपांडे, डॉ. म. गो. बोकरे, भदंत आनंद कौसल्यायन, पतितपावन देव, ‘कोल्हटकर आणि हिराबाई’ लिहिणारे म. ल. वऱ्हाडपांडे, गोविंद विनायक देशमुख, चंद्रहास पांडुरंग जोशी, पद्माकर गणेश चितळे, डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे, न्यायतीर्थ सत्यभक्त, प्रा. मा. गो. देशमुख, या. मु. पाठक, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, डॉ. मधुकर आष्टीकर, के. ब. कदम, मधुकर वाबगावकर, नाट्यसमीक्षक द. रा. गोमकाळे, प्रा. भा. श्री. परांजपे, मा. गो. वैद्य, ‘मॉडर्न मराठी पोएट्री’ची चळवळ राबविणारे भगवान ठग आदी अनेकांचे साहित्यविश्वाला महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.

आपल्या कवितांमधून वऱ्हाडी बोलीला सन्मान प्राप्त करून देणारे ‘वऱ्हाडी शब्दकोश’कार प्राचार्य देविदास सोटे, डॉ. वि. गं. कावळे, मनोहरराव दीक्षित, वर्णेकर, प्राचार्य दिनकर मेघे, राम कोलारकर, अ. ल. लिमये, चंद्रकांत जोगी, आसाराम वर्मा, उषाताई देशमुख, प्र. चिं. शिजवलकर, ‘तांडा’कार आत्माराम कनिराम राठोड, डॉ. राम घोडे, ‘त्यागवती रमाई’कार नाना ढाकुलकर, बालसाहित्यकार दिनकर देशपांडे, डॉ. सुनीता कावळे, कविवर्य रामदास कुहिटे, अनंत भीमनवार, दीपमाला कुबडे, सुमती वानखेडे या साहित्यिक मांदियाळीतील काही जन्मतः वर्धेकर आहेत, तर काहींचे वास्तव्य काही काळासाठी वर्धा जिल्ह्यात राहिलेले आहे. वर्तमानकाळातही सकस साहित्यनिर्मिती या जिल्ह्यातून होते आहे.

कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील संशोधनामुळे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, डॉ. जे. सी. कुमारप्पा, डॉ. एम. सदाशिव राव, शंकरराव खोडके, नारायण पांढरीपांडे, डॉ. देवेंद्रकुमार गुप्ता यांचे नाव जागतिक पटलावर कोरले गेले आहे. अपघातातून वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करून जागतिक ख्याती प्राप्त केलेले प्लास्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दीक्षित यांचा जन्मही वर्ध्याचाच आहे. नरकेसरी बॅ. अभ्यंकर, भारतीय मजदूर संघ आणि किसान संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, कुष्ठरुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारणारे बाबा आमटे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते प्रा. श्याम मानव, आदिवासींचे आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहत कार्यरत असणारे ‘सर्च’चे डॉ. अभय बंग यांची वैचारिक जडणघडण वर्धा जिल्ह्याने केली आहे. अनाथांची माय म्हणून ख्यातनाम झालेल्या दिवंगत सिंधूताई सपकाळ यांचे माहेर आणि सासर वर्धा जिल्ह्याचेच.

महात्माजींच्या नेतृत्वात राजकीय स्वातंत्र्याचा लढा तर वर्धा जिल्ह्याने अनुभवलाच, पण विचार स्वातंत्र्यालाही या जिल्ह्याने वेळोवेळी चालना दिली आहे. या जिल्ह्यात झालेल्या सभांमधून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या विचारांचे बीजारोपण इथल्या मातीत झाले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील जलशांनी, राजर्षी शाहू महाराज आणि भास्करराव जाधवांच्या बहुजन समाज मेळाव्यांनी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाच्या विचारांनी कधीकाळी दिशादर्शन केलेल्या या जिल्ह्याची जनआंदोलनाची परंपरा आजही कायम आहे. अशा या बहुविध चळवळींच्या माहेरघरात अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरणे म्हणजे वाङ्‌मय चळवळीला मायेची ऊब देणारे ठरणार आहे.

(लेखक विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष असून, प्रसिद्ध कवी आणि साहित्य चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.