‘बजरंगा’ची कमाल

आकाराने भलामोठा, दांडगा, छाती आणि पोटाखालील भारदस्त भाग, दणकट पंजा अन् मोठा चेहरा असणारा ‘बजरंग’ वाघ त्याच्याच तोडीच्या; पण वयाने लहान असणाऱ्या ‘छोटा मटका’कडून पराभूत झाला.
Bajrang Tiger
Bajrang Tigersakal
Updated on

- संजय करकरे

आकाराने भलामोठा, दांडगा, छाती आणि पोटाखालील भारदस्त भाग, दणकट पंजा अन् मोठा चेहरा असणारा ‘बजरंग’ वाघ त्याच्याच तोडीच्या; पण वयाने लहान असणाऱ्या ‘छोटा मटका’कडून पराभूत झाला. ‘बजरंग’ने वर्चस्वाची लढाई गमावली होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासात सर्वात मोठे क्षेत्र व्यापणारा, निर्विवादपणे ते गाजवणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान ५० पिल्लांना जन्म देणारा ‘बाप’ वाघ म्हणून ‘बजरंग’चे नाव कायम लक्षात राहील. ‘तो’ अजेय होता. अनेक वर्षे त्याने आपले वर्चस्व राखले होते; पण ते टिकवण्याच्या लढाईतच झालेल्या त्याच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला.

‘तो’ अजेय होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जवळपास सर्व क्षेत्रांवर त्याचे वर्चस्व होते. सुमारे आठ वर्षे त्याने ते राखले होते. साधारण आठ ते दहा माद्या त्याच्या क्षेत्रात होत्या. त्या सर्व माद्यांना त्याच्यापासून ५० पिल्ले झाली होती. त्याचे नाव बजरंगबलीवरून ‘बजरंग’ असे पडले होते. बजरंगबलीसारखाच अत्यंत ताकदवान शरीरयष्टीचा हा वाघ मृत्युमुखी पडला तेव्हा मला मोठा धक्का बसला. त्याचे रक्ताने माखलेले शरीर पाहून मी व्यथित झालो होतो.

उतारवयात झालेली त्याची फरपटही लक्षात आली होती. शेवटच्या वर्षात तर त्याला अनेक ठिकाणी ‘घर द्या हो घर’ असे म्हणण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या १४ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून १४ किलोमीटर अंतरावरील वाहनगाव येथील एका शेतामध्ये दोन वाघांची जोरदार धुमश्चक्री झाली. त्यांचे भांडण शेताजवळ काम करणाऱ्या काही जणांनी दुरून अनुभवले.

दोन्ही वाघांचा जोरदार आवाज त्यांच्या कानावर आला होता. या घटनेच्या काही काळानंतर जंगलाजवळील एका शेताजवळ गावकऱ्यांना एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि अधिकारी तिथे दाखल झाले तेव्हा त्यांना जवळच एक जखमी वाघही दिसला. तो ‘छोटा मटका’ होता, हे स्पष्ट झाले.

मृत्युमुखी पडलेला वाघ ‘बजरंग’ होता. त्याच्या गळ्याजवळ, पायावर आणि चेहऱ्यावर खोल जखमा होत्या. गळ्याचा भाग रक्ताने माखून गेला होता. ‘बजरंग’ मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक वन्यजीवप्रेमी तसेच छायाचित्रकारांना मोठा धक्का बसला.

‘बजरंग’चे माता-पिता आणि त्याच्या भाऊबंदांबाबत माहिती नाही. साधारण २०११ च्या सुमारास अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात पहिल्यांदा त्याचे दर्शन झाले, असे वनविभागाचे जुनेजाणते कर्मचारी तसेच गाईड सांगतात. त्या सुमारास ताडोबाच्या या परिसरात काही नामवंत ‘दादा’ वाघ जसे ‘गब्बर’, ‘नामदेव’ व ‘टायसन’ होते.

या अनुभवी आणि दणकट वाघापुढे ‘बजरंग’चा निभाव न लागल्याने त्याने या व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील बाजूला असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रात आपला प्रवास केला. हा काळ ‘माधुरी’ वाघीण तसेच तिचा सखा ‘वाघडोह’चा होता. साधारण २०१४ च्या सुमारास ‘वाघडोह’ वाघाला ‘बजरंगा’ने आव्हान दिले असावे, असा माझा अंदाज आहे. कारण ‘माधुरी’ हे क्षेत्र सोडून मोहर्लीच्या बफर क्षेत्रात गेली होती.

तिच्यापाठोपाठ या क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व असणारा आणि आकाराने कमालीचा मोठा असणारा ‘वाघडोह’ वाघही बफर क्षेत्रात गेला होता. ‘माधुरी’ वाघिणीचे पिल्लू ‘सोनम’ आणि तिच्या अन्य बहिणी यांचे नव्यानेच क्षेत्र निर्माण झाले होते. आपल्या कथेतील नायक ‘बजरंग’ला या क्षेत्रात मग आपला हक्क आणि वर्चस्व निर्माण करता आले. ऐन तारुण्यात असलेल्या ‘बजरंगा’ने हळूहळू आपले क्षेत्र वाढवायला सुरुवात केली.

‘सोनम’, ‘लारा’ तसेच ‘वाघडोह’ परिसरातील त्या वेळेसची मादी ‘बजरंगा’च्या अधिपत्याखाली आली. तसा हा वाघ पर्यटकांच्या दृष्टीने सतत सावध असायचा. दर्शन दिले तरी फारसा पर्यटकांच्या जवळपास येणे टाळायचा; पण मोहर्लीचे हे क्षेत्र सतत पर्यटकांनी गजबजलेले असल्याने साहजिकच या परिसरातील या काही निवडक माद्या आणि ‘बजरंगा’चे दर्शन हे सातत्याने पर्यटकांना होत राहिले.

परिणामी अल्पावधीतच हा वाघ अनेक छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला. खऱ्या अर्थाने ‘बजरंग’ रमला तो ‘सोनम’ वाघिणीसोबत. मी त्याला तीन ते चार वेळा ‘सोनम’सोबतच तेलिया तलावाच्या परिसरात बघितले होते. मला आठवते, आम्ही महिला जाणीव जागृतीचा कार्यक्रम आगरझरीमध्ये घेत होतो.

तेव्हा बफर क्षेत्रातील या महिलांना जंगल सफारीसाठी आणले असताना तेलिया तलावाच्या परिसरात दुपारच्या वेळेस ‘बजरंग’ वाघ ‘सोनम’ तसेच तिच्या चार पिल्लांसह पाण्यात बसला होता. उन्हाने त्रस्त झालेला हा भलामोठा वाघ पाण्यात मान खाली घालूनच बसला होता. जवळच ‘सोनम’ होती आणि तिची पिल्ले पाण्याच्या बाहेर तसेच चिखलात पळापळी करत होते.

पाण्याजवळील एका काडीला धरून साधारण पाच-सहा महिन्यांची ही पिल्ले मध्येच आपल्या बापाजवळ जाऊन त्याच्याशी सलगी करण्याचाही प्रयत्न करीत होती; पण प्रत्येक जण आपापल्या परीने ‘बजरंगा’चा आदर करत होते. ‘सोनम’ची सुरुवातीच्या काळातील चार बाळंतपणे ‘बजरंगा’पासूनच झाली होती.

२०२० पर्यंत ‘बजरंग’ने आपले क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या जुनोना, देवाडा, आगरझरी तसेच मदनापूर, कोलारा परिसरापर्यंत विस्तारले होते. साहजिकच या परिसरातील माद्यांवरही त्याचे वर्चस्व होते. नंतरच्या काळात या परिसरात असणाऱ्या ‘छोटी मधू’, ‘शर्मिली’, ‘डब्ल्यू’ या माद्याही त्याच्या अधिपत्याखाली आल्या होत्या. 

नागपुरातील छायाचित्रकार आणि वन्यजीवप्रेमी अभिषेक बेदरकर सांगतो, ‘‘कोरोनानंतरच्या काळात ऑगस्ट २०२१ मध्ये भरपावसाळ्यात मी आगरझरीच्या जंगलात गेलो होतो. आम्ही सकाळच्या सफारीत ‘छोटी मधू’ व ‘बजरंग’ यांना बघितले. हे नर-मादी नवरगाव तलावाच्या फायर लाईनजवळ आम्हाला दिसले होते. त्या वेळेस दुरूनच त्यांचे मिलन चालल्याचे लक्षात आले.

त्या सुमारास ‘आंबेउतारा’ हा नरही आम्हाला त्यांच्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर दिसला होता. दुपारच्या सफारीत आम्ही याच तलावाच्या परिसरात बराच वेळ ‘छोटी मधू’ व ‘बजरंग’चे मिलन बघितले. तेव्हा ‘बजरंग’ आकाराने किती मोठा आहे याची प्रचीती आली. बऱ्यापैकी मोठी असणारी ‘छोटी मधू’ही ‘बजरंगा’पुढे अगदीच छोटी दिसत होती.

भरपावसात त्यांचे मिलन सुरू होते. मला कल्पना होती, की मिलनाच्या वेळी वाघ तसा आक्रमक असतो. पण, कदाचित मिलनात व प्रेमात बुडालेला हा वाघ अतिशय सहजतेने आम्हाला बघायला मिळाला. एक वेगळाच अनुभव मी त्यावेळेस घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला आम्ही ताडोबातील एनबोडी परिसरात बघितले. त्या वेळेस ९७ च्या पाणवठ्यावर ‘युवराज’ हा नर वाघही नजरेस पडला. आम्ही ‘बजरंग’ला बघत असताना त्याच्या पाठीवर जखम झाल्याचे लक्षात आले. जखमेच्या ठिकाणी छिद्रही पडले होते.’

२०२० पर्यंत ‘बजरंग’ वाघ साधारण नऊ-दहा वर्षांचा झाला होता. २०१४ ते २०२०-२१ पर्यंत त्याचा उज्ज्वल काळ होता, असे म्हणता येईल. साधारण याच काळात त्याने मोहर्लीच्या क्षेत्राबाहेरील ‘छोटी तारा’, मदनापूर क्षेत्रातील ‘जुनाबाई’ या वाघिणींबरोबर मिलन केल्याचे तेथील गाईड सांगतात. त्यानंतर मात्र त्याला मोहर्ली परिसरातील ‘तारू’, ‘पारस’, ‘आंबेउतारा’, ‘ताला’ तसेच ‘छोटा दडियल’ या नर वाघांशी सामना करावा लागला.

हे सर्व वाघ ऐन उमेदीत असल्याने साहजिकच ‘बजरंग’ला आपले क्षेत्र हलवावे लागले. त्या काळात तो ताडोबा तसेच नवेगाव, निमडेला या बफर परिसरातही फिरू लागला होता. ताडोबाच्या या परिसरातही ‘रुद्रा’, ‘मोगली’ व ‘युवराज’ या नव्या दमाच्या वाघांचे आव्हान त्याला मिळाले. साहजिकच उतारवयाकडे झुकू लागलेल्या या वाघाला मग सतत भटकंती करावी लागली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघ आहेत.

त्यातच नव्या वाघांचे सतत आव्हान निर्माण होत असल्याने जुन्या तसेच उतारवयाकडे झुकू लागलेल्या वाघांपुढे नवीन क्षेत्रात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी हे सर्व वाघ बफर क्षेत्राबाहेरील प्रादेशिक वनक्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करतात. या उतारवयात मग त्यांना जगण्यासाठी या क्षेत्रात असणाऱ्या गाई-गुरांवर अधिक अवलंबून राहावे लागते. ‘बजरंग’ वाघाचेही असेच झाले.

निमडेला बफर क्षेत्रात असणाऱ्या काही गावांमध्ये तो मग गुरांवर अवलंबून राहू लागला. याच काळात त्याला सतत अन्य नर वाघांकडून आव्हान निर्माण होत गेल्याने ‘घर देता का’ असे म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यातच नोव्हेंबरमध्ये नवेगाव परिसरात ‘छोटा मटका’ वाघासोबत त्याची मारामारी झाली आणि तो पराभूत झाला...

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.