जयची शोकांतिका!

उमरेडच्या अभयारण्यात जय आला त्या काळात ताडोबा, पेंच या जंगलातही अनेक वाघ ‘जय’च्याच तोडीचे होते; पण ते प्रसिद्द्ध झाले नाहीत.
Jai Tiger
Jai TigerSakal
Updated on

- संजय करकरे

उमरेडच्या अभयारण्यात जय आला त्या काळात ताडोबा, पेंच या जंगलातही अनेक वाघ ‘जय’च्याच तोडीचे होते; पण ते प्रसिद्द्ध झाले नाहीत. जयला प्रसिद्द्ध करण्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फायदा हॉटेल व्यावसायिक, स्थानिक, तेथील गाईड, जिप्सीचालकांना झाला; मात्र जसा जय जंगलातून गायब झाला, तशी ही सारी यंत्रणा कोलमडली.

नवीन जाहीर झालेल्या उमरेड अभयारण्यातील नवेगाव-देशमुख येथील विश्रामगृहात १७, १८ व १९ एप्रिल २०१३ ला मी गाईड ट्रेनिंग दिले होते. १ मेपासून उमरेड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन होते. त्या अनुषंगाने हे ट्रेनिंग होते.

कऱ्हांडला, ठाणा तसेच परिसरातील दोनतीन गावांतील पंधरा-वीस तरुण या ट्रेनिंगला उपस्थित होते. तीन दिवसांत मी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. या तरुणांसोबत जंगलात पायी फिरलो; पण हे नवीन अभयारण्य पर्यटकांना किती आकर्षित करेल याचा अंदाज नव्हता. त्याला कारणही तसेच होते. नागपूरपासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर हे अभयारण्य असले तरी पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प नागपूरच्या टप्प्यातच होते.

नवीन ठिकाण व वाघांची जेमतेम संख्या असल्याने पर्यटक उमरेडच्या या जंगलाकडे किती येतील हे सांगणे जरा कठीणच होते. १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाले. सुरुवातीला एकदोन गाड्या इथल्या जंगलात येत होत्या. जंगलात फारसे काही दिसत नाही, अशी चर्चा नागपूरच्या वर्तुळात सुरू होती.

३० जूनला अभयारण्य पावसाळ्यामुळे बंद झाले. सप्टेंबर महिना उजाडला आणि जय उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दाखल झाला. तो नागझिऱ्यातून साधारणपणे शंभरहून अधिक किलोमीटर अंतर पार करून इथपर्यंत पोचला होता. ऑक्टोबरमध्ये अभयारण्य पर्यटकांसाठी परत खुले झाले आणि उमरेडच्या जंगलाचे भाग्यच पालटले.

हा बिनधास्त, बेधडक वाघ बघता बघता उमरेडच्याच नव्हे, तर संपूर्ण भारतातल्या वाघप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला. जय उमरेडमध्ये ज्या वेळी दाखल झाला, त्या वेळी तिथे दोन नर वाघांचा वावर होता; पण या मोठ्या वाघापुढे इथल्या दोन वाघांनी माघार घेतली आणि उमरेडचा परिसर जयला निर्विवादपणे मिळाला. या वेळी या जंगलात चांदी, राई आणि फेरी अशा तीन वाघिणी होत्या.

जयने या तिन्ही वाघिणींसोबत संसार थाटला आणि त्यामुळे अभयारण्यातील पिल्लांची संख्याही झपाट्याने वाढली. या काळात १० हून अधिक पिल्लं या अभयारण्यात होती. उमरेड अभयारण्यात त्या वेळेस कऱ्हांडला गेटमधून सकाळी ३० व सायंकाळी ३० वाहनांना प्रवेश होता; पण त्याहून जास्त वाहने येऊ लागल्याने पर्यटकांना पार्कमध्ये एण्ट्री मिळणे अवघड होऊ लागले.

पुढच्या दोन वर्षांमध्ये जय वाघ देशातील अनेक छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला होता. अनेक प्रसिद्ध व्यक्ती उमरेडमध्ये येऊन या वाघाचे दर्शन घेऊन गेल्या. भारतातील सर्वांत मोठा वाघ, अडीचशे किलो वजनाचा वाघ, ‘टुरिस्ट फ्रेंडली’ वाघ अशी विशेषणे जयला मिळाली.

२०१२ ते २०१८ पर्यंत या अभयारण्यातील ठाणा बीटमध्ये कार्यरत असलेल्या नितीन राठोड या वनरक्षकाने जयला कमालीचे जवळून अनुभवले आहे. जंगलाच्या या परिसरात जयचा मोठा वावर होता. या वनरक्षकाच्या क्षेत्रात तीन गावे येत असल्याने तिथे जयकडून अनेक गुरांना मारण्याचे प्रकार घडले होते.

नितीन राठोड लोकांना हाताळण्यात कमालीचे वाकबगार होते. त्यांच्या काळात जयकडून तसेच त्याच्या पिल्लांकडून गायींना मारण्याच्या अनेक घटना घडूनही कधीही स्थानिकांचा उद्रेक झाला नाही. ते सांगतात, नवेगाव साधू गावाजवळ एका कंपार्टमेंटला लागून असलेल्या एका ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात जंगलाजवळ मोठ्या संख्येने गायी बांधल्या होत्या.

जय, चांदी व तिच्या चार पिल्लांनी या ठिकाणी हल्ला करून १५-१६ गायींना एकाच वेळी मारले होते. यातील दोनतीन गायींना ओढून ते जंगलात घेऊन गेले होते. काही गायी जंगलात पळून गेल्या होत्या. एवढा मोठा हा प्रकार घडूनही राठोड यांनी संयमाने परिस्थिती हाताळली.

जयचे त्यांना आठवड्यातून एकदा तरी दर्शन व्हायचे. अतिशय शांत स्वभावाचा हा वाघ होता. केवळ गायींना मारण्यापर्यंतच त्याची मजल होती. इतक्या वर्षांमध्ये कधीही त्याने वनकर्मचारी किंवा गावकऱ्यां‍वर धावून जाण्याचा प्रयत्न केला नाही.

तत्कालीन सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत यांच्याही जयबाबत अनेक आठवणी आहेत. २०१५ च्या सप्टेंबरमध्ये जयला पहिल्यांदाच पकडून सॅटेलाइट कॉलर म्हणजेच पट्टा गळ्यात बांधला होता.

जयचा वावर अभयारण्याच्या बाहेरील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने या वाघाला पकडून, त्याच्या गळ्यात पट्टा बांधला तर त्याचा नेमका ठावठिकाणा कळणे सोयीस्कर होईल व वाघ-माणूस संघर्ष टाळता येईल या उद्देशाने वन्यजीव विभागाने वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने जयला बेशुद्ध करून पट्टा बांधला होता.

या वेळी सावंत जयला बेशुद्ध करून पट्टा बांधण्याच्या मोहिमेत होते. ते सांगतात, जयला पकडण्यासाठी आम्ही टीम तयार केल्या होत्या. दोनतीन दिवस त्याचा माग घेऊन एका सकाळी रानबोडी तिप्पट परिसरात जयला बेशुद्धीचे इंजेक्शन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मारून पकडले होते. त्यानंतर त्याच्या गळ्यात सॅटेलाईट कॉलर बांधली. त्या वेळी जयचे वजन केले गेले.

तो त्या वेळी २२० किलो वजनाचा होता; मात्र काही काळानंतर या कॉलरमधून लोकेशन येणे बंद झाले. पुन्हा जयला तज्ज्ञांच्या मदतीने बेशुद्ध करून दुसरी कॉलर गळ्यात बांधली. वाघांच्या अभ्यासासाठी, त्याचा ठावठिकाण कळण्याच्या अनुषंगाने वाघाला बेशुद्ध करून अशी सॅटेलाईट कॉलर लावतात.

मी व सावंत एकदा दुपारपासून सायंकाळपर्यंत जयच्या मागावर अभयारण्यातून फिरलो होतो. या वेळी जय आम्हाला कमालीचा गुंगारा देत पुढे चालत जात होता. आम्ही गाडीने व चालत त्याच्या पंजाचा माग काढत फिरत होतो. अखेर गोठणगाव तलावाच्या जवळ त्याने आम्हाला हुलकावणी दिली.

आम्ही त्याला सोडून जंगलातून बाहेर पडताच गाडीतील वायरलेसवर जयने डांबरी रस्त्यावर बसून रस्ता रोको केल्याचा निरोप आम्हाला मिळाला. यानंतरही मी जयला बघितले होते; पण त्याचा फोटो काही काढू शकलो नव्हतो.

१८ एप्रिल २०१६ रोजी जय पवनीजवळील जंगलातून बेपत्ता झाला. तत्पूर्वीच तो अभयारण्यालगत असलेल्या कॉरिडॉरमधून नागभीड, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीच्या जंगलात फिरत असल्याचे लक्षात आले होते. साधारणपणे चारशे साडेचारशे चौरस किलोमीटर क्षेत्रात हा वाघ फिरत असल्याचे लक्षात आले होते.

उमरेडमधील वाघिणी व जवळपासच्या जंगलातील इतर वाघिणीही त्याच्या कार्यकक्षेत येत होत्या. सर्वसाधारणपणे नर वाघाचे क्षेत्र ४० ते ५० चौरस किलोमीटर समजले जाते; पण जयचे क्षेत्र कमालीचे मोठे होते. अनेक वेळा तो अभयारण्याला लागून असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्यातून पोहून पलीकडच्या बाजूला ये-जा करत असे.

जयसारखा सुप्रसिद्ध वाघ बेपत्ता झाल्यावर वनविभागासह अनेक वन्यजीवप्रेमींनी त्याला शोधण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मोर्चे निघाले, कॅन्डल मार्च निघाला, सह्यांची मोहीम झाली. वनविभागाने जयला शोधण्यासाठी पथकांची निर्मिती केली. गोंदिया, भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये त्याचा शोध घेतला.

अनेक निसर्गप्रेमी जयच्या शोधासाठी एकत्र आले. जो या वाघाबद्दल माहिती सांगेल, त्याच्यासाठी बक्षीस जाहीर केले. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत जय वाघ गाजला. अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. या सगळ्यानंतर सीआयडी चौकशीही झाली; पण ठोस काहीही हाती लागले नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी लोकसभेत जयचा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली होती. वनविभागही या माहितीबाबत ठाम होता.

देशातील सर्वांत मोठा वाघ अशी कीर्ती जयला मिळाली होती. हे अतिरंजितच होते. निश्चितच जय आकाराने आणि वजनाने मोठा होता. त्याला कारणही तसेच होते. जय मुख्यतः पाळीव जनावरांवरती अधिक प्रमाणात गुजराण करत होता. गुरांना खाणारे वाघ हे अधिक चरबी खाल्ल्याने थुलथुलीत होतात.

तो ज्या वेळेस पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये कॉलर घालण्यासाठी पकडला होता, त्या वेळेस त्याचे वजन २२० किलो होते. त्यानंतर सहा महिन्यांनीच तो गायब झाला. मग जय २५० किलोचा आहे ही माहिती कुठून आली हे कोडं मात्र उलगडलं नाही. दुसऱ्या वेळेस त्याला बेशुद्ध केले होते त्या वेळेस त्याचे वजन वनविभागाने केले नव्हते.

संध्याकाळ झाल्याने त्याला बेशुद्ध केल्यावर लागलीच त्याची पहिली कॉलर बदलून दुसरी घातली होती. त्या काळात ताडोबा, पेंच या जंगलांतही अनेक वाघ जयच्याच तोडीचे होते; पण ते प्रसिद्ध झाले नाहीत. जयला प्रसिद्ध करण्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत होती, असा कयास बांधायला हरकत नाही.

अर्थात, याचा फायदा हॉटेल व्यवसायिक, स्थानिक, तेथील गाईड, जिप्सीचालकांना निश्चितच झाला; मात्र जसा जय जंगलातून गायब झाला, ही सारी यंत्रणा, हे इमले कोसळल्याचेही लक्षात येते.

शोले चित्रपटात अमिताभ बच्चनने जयची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी तो मरतो. हा जय आपल्या कायम स्मरणात राहिला आहे. वाघांच्या दुनियेतील हा जयसुद्धा सर्वांच्या मनात कायम राहील यात शंका नाही.

अशीही एक कहाणी...

एक आटपाट नगर होते. या नगरात एक शेतकरी कुटुंब राहत होते. या नगराजवळ जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा त्या शेतकऱ्याला त्रास होत असे. या शेतकऱ्याने मग एक जालीम उपाय शोधला. त्याने त्याच्या शेताला विद्युत तारेचे कुंपण लावले. एके दिवशी या तारेत गळ्यात पट्टा असलेला एक वाघ सापडला. शेतकरी घाबरला. नेमके काय करावे हे त्याला सुचेना.

मग त्याने एकाच्या मदतीने या वाघाला जाळून टाकले. त्याची विल्हेवाट लावली; पण या घटनेने त्या शेतकऱ्याला अस्वस्थ केले. त्याचा रक्तदाब वाढला. त्याने जवळच्याच स्थानिक डॉक्टरकडे सल्ला मागितला. डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्याने शेतात घडलेला किस्सा कथन केला. यथावकाश ही माहिती बाहेर आली. यंत्रणा हलली. चौकशी झाली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. (या गोष्टीचा जयच्या कथेशी काहीही संबंध नाही. संबंध वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.)

(उत्तरार्ध)

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.