- संजय करकरे
मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीचे नाव वाघांच्या दुनियेत कायमचे नोंदले गेले आहे. व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात तिने कमालीचा मान मिळवला होता. तिने दिलेल्या २९ बछड्यांमुळे ती खऱ्या अर्थाने ‘सुपरमॉम’ नावाने ओळखली गेली. ‘कॉलरवाली’ने अशा काही वेगाने पिल्लांना जन्म दिला, की अवघ्या प्रकल्पात तिचा आणि तिच्या कुटुंबांचा लौकिक पसरत गेला. पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांना ओढून आणण्यात तिचा मोठा वाटा राहिला आहे.
१५ जानेवारी २०२२ ची संध्याकाळ मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासात कायमची नोंदली गेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील भुरादेव नाल्याजवळ या जंगलातील जगप्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीने अखेरचा श्वास घेतला. या घटनेच्या एक आठवडा आधी १७ वर्षांची ही वाघीण थकलेल्या अवस्थेत व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. नाल्याच्या परिसरात ती मोकळ्या जागेत संथपणे फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तिचा अंतिम प्रवास सुरू झाल्याची कल्पना सर्वांनाच आली होती. तिला जगवण्यासाठी थोडेफार प्रयत्नही झाले; परंतु अखेर तिने प्राण सोडला. ‘कॉलरवाली’ वाघीण इतकी प्रसिद्ध होती, की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपासून ‘बीबीसी’पर्यंत सर्वांनी तिला आदरांजली वाहिली. ‘अमूल’ कंपनीच्या सुप्रसिद्ध व सतत चर्चेत असणाऱ्या जाहिरातींवरही ती त्याच्या पुढच्याच आठवड्यात आदरांजली देऊन झळकली.
‘SHE EARNED HER STRIPES!’ असा चपखल मथळाही त्यांनी आपल्या या जाहिरातीत दिला होता. याच नाल्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशी या वाघिणीवर अंतिम संस्कार झाले. व्याघ्र प्रकल्पाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपासून तिथे काम करणारे रोजंदारी मजूर व वनरक्षकांपर्यंत अनेकांनी तिला आदरांजली वाहिली. कर्माझरी गावातील स्थानिक नेत्या शांताबाई यांनी तिला अग्नी दिला.
वाघांच्या दुनियेत ‘कॉलरवाली’ हे नाव कायमचे नोंदले गेले. आज आपण ‘कॉलरवाली’ हे नाव गुगलवर टाईप केले, तर या वाघिणीसंदर्भात असलेल्या शेकडो पोस्टस्, बातम्या व व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतील. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आणि संपूर्णच व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात या वाघिणीने कमालीचा लौकिक प्राप्त केला होता.
अनेक विक्रम तिच्या नावावर असून ‘सुपरमॉम’ या नावाने ती खऱ्या अर्थाने ओळखली जात होती ती तिने दिलेल्या २९ बछड्यांमुळेच. वाघिणीच्या आयुष्यात सर्वाधिक पिल्ले देण्याचा विक्रम ‘कॉलरवाली’च्या नावावर आहे. तिची २९ पैकी २५ पिल्ले आणि त्यांची पुढची पिढी आज महाराष्ट्रासह अनेक जंगलांत वावरत आहे. राजस्थानमधील सुप्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील ‘मछली’ या वाघिणीने २३ पिल्लांना जन्म दिल्याचा इतिहास आहे. हा विक्रम ‘कॉलरवाली’ने मोडला होता.
‘कॉलरवाली’ वाघीण जन्मापासूनच प्रसिद्धीच्या झोतात राहिली, असेच म्हणता येईल. २००५-०६ च्या सुमारास मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात बीबीसी वाईल्डलाईफची टीम दाखल झाली होती. त्यांना मोगली व वाघ यांच्या संदर्भात फिल्म तयार करायची होती. मात्र, त्या वेळेस या व्याघ्र प्रकल्पात असलेल्या ‘बडीमादा’ या वाघिणीला ‘चार्जर’ या नर वाघापासून चार पिल्ले झाल्याचे कळले.
मग फिल्ममध्ये काहीसा बदल करून बीबीसीची संपूर्ण टीम या वाघाच्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या छायाचित्रणाकडे वळली. सुमारे दोन वर्षे त्यांनी या जंगलात फिरून अत्यंत सुरेख अशी ‘टायगर, द स्पाय इन द जंगल’ नावाची फिल्म केली. या टीमने हत्तीवरून तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त कॅमेरे लावून वाघिणीचे आयुष्य कसे असते, ती आपल्या पिल्लांना कशा पद्धतीने वाढवते, पिल्लांना शिकार कशी शिकवते, विविध संकटांपासून पिल्लांना कशी वाचवते इत्यादींसह वाघांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग टिपले.
पाळीव हत्तीच्या सोंडेत लावलेला कॅमेरा, दगडात लपवलेला कॅमेरा, कासवाची प्रतिकृती करून त्याच्या पाठीवर ठेवलेला कॅमेरा इत्यादींसह तंत्रज्ञानाच्या अचाट आणि अफाट कौशल्याचा वापर करून त्यांनी या वाघिणीच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला. सुमारे ५० मिनिटांचे तीन भाग या फिल्ममध्ये आहेत. फिल्ममधील चार पिल्लांपैकी एक मादी होती, जे आजच्या आपल्या लेखाचे मुख्य पात्र आहे आणि ते म्हणजे ‘कॉलरवाली.’
‘कॉलरवाली’ वाघीण म्हणजे चारपैकी एक पिल्लू. २००८ मध्ये आईपासून ती वेगळी झाली आणि या सुमारास वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तिला पकडून तिच्या गळ्यात कॉलर लावली. वाघांच्या अभ्यासासाठी हा प्रयोग प्रथमच पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला होता. ‘कॉलरवाली’ वाघीण चार पिल्लांमध्ये आक्रमक होती आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती.
व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव होती आणि त्यातूनच या पूर्ण वाढ होणाऱ्या पिल्लाला या प्रयोगासाठी निवडण्यात आले. या वाघिणीला कॉलर लावली त्या वेळेसच खऱ्या अर्थाने तिचे नामकरण ‘कॉलरवाली’ असे करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्प तेव्हा प्रसिद्ध झालेला नव्हता. ‘बडीमादा’ आणि तिच्या चार पिल्लांमुळे हळूहळू त्याची कीर्ती पसरण्यास सुरुवात झाली. पर्यटकांचा ओढा तिकडे वळू लागला.
२००८ च्या सुमारास या परिसरात असणाऱ्या एका नरासोबत ‘कॉलरवाली’ने घरोबा थाटला. या वेळी तिला तीन पिल्ले झाली. मात्र, दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. अवघ्या पाच महिन्यांनंतर तिने दुसऱ्यांदा चार पिल्लांना जन्म दिला. या वेळेस ही पिल्ले व्यवस्थित मोठी होऊन जगली. यानंतर ‘कॉलरवाली’ने अशा काही वेगाने पिल्लांना जन्म दिला की संपूर्ण पेंच व्याघ्र प्रकल्पात तिचा आणि तिच्या कुटुंबांचा लौकिक पसरत गेला.
२०१० च्या सुमारास तिने पाच पिल्लांना जन्म दिला. एका वेळी वाघिणीला पाच पिल्ले होणे ही वाघांच्या आयुष्यातील अलौकिक अशी घटना मानण्यात येते. सर्वसाधारणपणे वाघाला दोन ते चार पिल्ले होतात. खाद्याची विपुलता असेल तर वाघीण अधिक पिल्लांना जन्म देते, असा अभ्यास आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक तृणभक्षी प्राण्यांची घनता असलेला भूभाग आहे.
येथे चितळ, सांबर, रानडुक्कर आणि नीलगाय यांची संख्या नजरेत भरणारी आहे. साहजिकच भरपूर अन्न आणि योग्य संरक्षण या दोन्ही गोष्टींची सांगड येथे घातली असल्याने वाघांच्या पिल्लांचा जन्म येथे स्वाभाविकपणे जास्त पाहिला गेला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे जन्म झालेली ही सर्व पिल्ले मोठी होऊन स्वतंत्र झाल्याचेही येथे बघितले गेले.
नागपूरचा सुप्रसिद्ध व्याघ्रतज्ज्ञ व छायाचित्रकार वरुण ठक्कर २००५ पासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील तसेच देशातील वाघांचा बारकाईने अभ्यास करत आहे. तो सांगतो, ‘मी कॉलरवाली वाघिणीला ती पिल्लू असल्यापासून बघत होतो. ती मोठी झाल्यानंतर तिने जितक्या वेळा पिल्लांना जन्म दिला त्या सर्वांना मी केवळ बारकाईने बघितलेच नाही तर त्यांची छायाचित्रेही टिपली आहेत. ही वाघीण पिल्लांकडे अतिशय बारीक नजर ठेवून असायची.
पिल्लांना व्यवस्थितपणे मोठे करणे, त्यांना आवश्यक ते शिक्षण देणे, शत्रूंपासून योग्य बचाव करणे हे काम ही वाघीण अतिशय काळजीपूर्वक करीत असे. साहजिकच तिच्या पिल्लांच्या मृत्यूचा दर सतत कमी राहिला आहे. या जंगलात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा नर वाघांचा वावर अधिक नसल्याने पिल्ले जगण्याचे प्रमाणही जास्त राहिले आहे. त्यामुळे १७ वर्षे इतक्या जास्त वयापर्यंत या वाघिणीने २९ पिल्लांना जन्म दिला.
यातील बहुतांश पिल्ले मोठी झाली. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पासोबतच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आज वाघांची जी संख्या बघायला मिळते त्या सर्वांच्या मागे ‘कॉलरवाली’चे अनन्यसाधारण असे योगदान राहिले आहे.’ वरुण पुढे म्हणतो, ‘ही वाघीण अतिशय शांत स्वभावाची होती. पर्यटकांच्या गराड्यात ती कधीही आक्रमक दिसली नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांना ओढून घेण्यात तिचा मोठा वाटा राहिला आहे.’
या वाघिणीला आता पेंचचे गाईड ‘माताराम’ (आजी बाई) म्हणून ओळखू लागले होते. तिचा पुढचा प्रवास पुढील शनिवारी...
(पूर्वार्ध)
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)
sanjay.karkare@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.