- संजय करकरे
संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा स्वभाव बेधडक व बिनधास्त असतो का? अर्थातच नाही. प्रादेशिकच्या जंगलात वावरणारा वाघ जर कोअर क्षेत्रात आला, तर त्याच्या स्वभावात काय बदल होतो याचे उदाहरण म्हणजे, ‘रावण’ ऊर्फ ‘कनकाझरी’ वाघ... ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्रात ‘कनकाझरी’ वाघाचे अस्तित्व होते. आता तो दिसत नाही. बफर क्षेत्राबाहेर तो वावरतो, असे म्हटले जाते; मात्र त्याने मधल्या काळात केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर देशातील अनेक छायाचित्रकारांना आपल्या अनोख्या आक्रमक स्वभावामुळे आकर्षित केले. तो नंतर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला...
प्रत्येक वाघाचा स्वतंत्र असा स्वभाव असतो. स्वभावाप्रमाणे ते लहानाचे मोठे होत असतात. आपण संरक्षित क्षेत्र म्हणजेच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सर्वाधिक बघत असतो. जिप्सी गाड्यांच्या गराड्यात अथवा त्यांच्या अगदी जवळून त्यांना वावरतानाही बघितले जाते. पर्यटन क्षेत्रात वावरणारे असे ‘टुरिस्ट फ्रेंडली’ वाघ सर्वाधिक चर्चेत असतात. पर्यटकांना सतत आजूबाजूला ते बघत असतात. मात्र, संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा स्वभाव असाच थेट बेधडक व बिनधास्त असतो का? अर्थातच नाही.
व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात असणाऱ्या विविध नियमांमुळे वन्यप्राण्यांना उत्तम तऱ्हेचा आसरा मिळालेला आहे. मर्यादित वेगात जिप्सी चालवणे, गाडीतून खाली न उतरणे, हॉर्न न वाजवणे, खूप काळ एकाच ठिकाणी वाहन उभे न करणे, वन्यप्राण्यांना दुखापत अथवा इजा होणार नाही याची काळजी घेणे, त्यांना आपल्या अधिवासात वावरताना बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करू नये इत्यादींसह अनेक नियमांचे पालन केले जाते.
हे नियम अर्थातच सोबत असणारा गाडीतील गाईड सांगत असतो आणि त्यांचे पालन करण्याचा प्रयत्नही करीत असतो. पर्यटन क्षेत्रात वावरणाऱ्या नियमित गाड्यांची सवय वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांनाही होऊन जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात हे पाहायला मिळते. कोअर क्षेत्राबाहेरच्या बफर क्षेत्रात मात्र चित्र काहीसे बदलते.
बफर क्षेत्रात संरक्षणाची यंत्रणा असली, तरीही तिथे गावकरी, शेतकरी आणि माणसांचा वावर होत असल्याने येथील वन्यप्राण्यांना सातत्याने त्यांच्यासमोर जावे लागते. बफर क्षेत्राबाहेर प्रादेशिक म्हणजेच टेरिटोरियलचे जंगल असते. त्या ठिकाणी असलेल्या जंगलात मानवाचा वावर अधिकच होत असतो. परिणामी येथे वावरणारे वन्यप्राणी अतिशयच सावध झालेले बघायला मिळतात. दिवसा फिरण्यापेक्षा त्यांचा अधिक वावर रात्रीचा असतो.
येथे वन्यप्राण्यांच्या स्वभावात कमालीचा बदल झाल्याचे लक्षात येते. कधी कधी कोअर क्षेत्रातील वाघ बफर क्षेत्रात गेल्यानंतर त्याच्या स्वभावात काही बदल होतात. तोच वाघ नंतर प्रादेशिक क्षेत्रात गेल्यावरही त्याचा स्वभाव बदलतो. तो प्राणी अधिक सावध झालेला पाहायला मिळतो, असे माझे निरीक्षण आहे. त्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील.
कोअर क्षेत्रामध्ये वावरणारा ‘येडा अण्णा’ वाघ प्रादेशिकच्या जंगलात गेल्यानंतर कमालीचा सावध आणि स्वतःची पुरेपूर काळजी घेत असल्याचे निरीक्षण आहे. त्याच्या अगदी उलट म्हणजेच प्रादेशिकच्या जंगलात वावरणारा वाघ जर कोअर क्षेत्रात आला, तर त्याच्या स्वभावात काय बदल होतो, याचे उदाहरण आजच्या गोष्टीतील वाघाबद्दल सांगता येईल. मी ‘रावण’ ऊर्फ ‘कनकाझरी’ वाघाबद्दल हे बोलत आहे...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘मदनापूर’ बफर क्षेत्रात कनकाझरी वाघाचे अस्तित्व होते. होते का म्हटले, तर आता तो या क्षेत्रात दिसत नाही. तो कुठे गेला याबद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही. बफर क्षेत्राबाहेर तो वावरतो, असे म्हटले जाते. मात्र त्याने मधल्या काळात केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर देशातील अनेक छायाचित्रकारांना आपल्या अनोख्या आक्रमक स्वभावामुळे खेचून घेतले. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी तो ‘T ३२’ नावाने ओळखला जात आहे.
‘टायसन’ या दणदणीत आकाराच्या नर वाघाचे ‘कनकाझरी’ हे पिल्लू आहे. त्याची आई काटेझरी परिसरातील एक मादी होती. तीन पिल्लांमधील हा नर वाघ त्याच्या दोन बहिणींसह २०१२ च्या सुमारास जन्माला आला. या सुमारास ताडोबातील विविध बफर क्षेत्रे खुली होत होती. कोअर क्षेत्रात वाहनांचा अधिक वापर होत असल्याने नव्याने हे क्षेत्र सुरू होत होते.
कोलारा बफर क्षेत्रात २०१५ नंतर हा वाघ अधे-मधे दिसायला लागला. मदनापूरच्या जंगलातील एका नाल्यातील पाणवठ्याला कनकाझरी हे नाव आहे. हा वाघ या परिसरात अधिक दिसत असल्याने साहजिकच त्याला या परिसराचे नाव सुरुवातीला मिळाले. हा वाघ पर्यटकांना जरी दिसत असला, तरी त्याच्या भित्र्या स्वभावामुळे तो सहसा त्यांच्या नजरेस व्यवस्थित पडत नव्हता.
दिसला तरी पटकन निघून जाणे, दाट झाडीतून बाहेर न येणे किंवा वाहनांच्या आवाजामुळे पळून जाणे, असे वारंवार घडत असे. वाघाच्या नैसर्गिक स्वभावानुसार त्याचे हे वागणे होते, असेच म्हणता येईल. पर्यटकांचाही येथे कमी वावर असल्याने तो लहानाचा मोठा होत असताना त्यांच्यापासून आणि सर्व वाहनांपासून दूरच राहिला.
नागपूरच्या एका छायाचित्रकाराने काढलेल्या अनोख्या फोटोंमुळे ‘कनकाझरी’ वाघ प्रसिद्धीच्या झोतात आला. नागपूरमध्ये बिल्डर व डेव्हलपर असलेले प्रियदर्शन गजभिये या वाघाच्या अनुभवाविषयी सांगतात... २०१७-१८ मधील एप्रिलचा महिना होता. संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिटे झाली होती. गाडी जंगलाबाहेर पडायची असल्याने आता काहीही दिसणार नाही, असेच होते.
आमची गाडी १६५ क्रमांकाच्या पाणवठ्यावर थांबली होती. इतक्यात झाडीतून एक वाघ आमच्याकडे बघत असल्याचे लक्षात आले. आमची एकमेव जिप्सी इथे असल्याने गाईडने आम्हा सगळ्यांना शांतपणे बसण्यास सांगितले. आम्हीही कॅमेरा सज्ज करून शांतपणे बसून राहिलो. दहा मिनिटे गेल्यावर हा वाघ समोर पाणवठ्याकडे चालत आला.
यावेळेस अतिशय मोठ्या आकाराच्या आणि ताकदवान दिसणाऱ्या या नर वाघाने नाराजी व्यक्त करीत आमच्याकडे बघून तोंड विस्फारून तो गुरगुरला. माझा कॅमेरा सज्ज असल्याने मी त्याची छायाचित्रे काढली. अतिशय नाराजी व्यक्त करीत तो पाण्याजवळ आला व आतमध्ये उतरला.
या बलवान वाघाच्या आक्रमक स्वभावामुळे आम्ही कमालीचे थरारून गेलो होतो. या वाघाचे हे पहिले व्यवस्थित छायाचित्र होते. मी ते सोशल मीडियावर टाकल्यानंतर या वाघाला कमालीची प्रसिद्धी मिळाली. एक आक्रमक दिसणारा व नाराजी व्यक्त करणारा हा वाघ नंतर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला...
मदनापूरच्या क्षेत्रामध्ये वावरणारा हा वाघ त्याच्या अशा वागण्यामुळे व विस्फारणाऱ्या चेहऱ्यामुळे ‘रावण’ या नावाने पुढे ओळखला जाऊ लागला. यावेळेस या क्षेत्रात ‘जुनाबाई’ या वाघिणीचा वावर होता. ‘जुनाबाई’सोबत ‘रावण’ छान रमला. ‘जुनाबाई’ला त्याच्यापासून दोन वेळा पिल्ले झाली. मग हे सर्व कुटुंब एकत्रितपणे या जंगलातील पाणवठ्यांवर दिसू लागले.
मात्र पिल्लांच्या सोबत रमणारा हा वाघ पर्यटक दिसल्यानंतर एकदम त्याचा भलामोठा चेहरा आक्रमकपणे दाखवून नाराजी व्यक्त करीत असे. साहजिकच आकाराने मोठा आणि आक्रमक वाघ पर्यटकांना भावून गेल्याचे लक्षात येते. २०२०-२१ पर्यंत या परिसरात ‘रावण’चा वावर होता. मात्र वाघांच्या सत्ता संघर्षात येथे ‘मटकासुर’ या नर वाघाची एन्ट्री झाली आणि ‘रावण’ला येथून माघार घ्यावी लागली.
असे म्हटले जाते, की ‘मटकासुर’ने ‘जुनाबाई’ची पिल्ले मारून तिच्यासोबत संसार थाटला. अत्यंत आक्रमक असणाऱ्या ‘रावण’लाही बलाढ्य ‘मटकासुर’पुढे हार पत्करावी लागली, हे मोठे दुर्दैवच म्हणता येईल. ‘मटकासुर’ हा वाघही कोअर क्षेत्रातून बफर क्षेत्राकडे ढकलला गेला होता.
‘रावण’ला मी केवळ दोन वेळाच बघितले; पण तेही ओझरते. पहिल्या वेळेस आमची गाडी पाणवठ्यापर्यंत पोहोचेपर्यंत ‘जुनाबाई’ आणि हे संपूर्ण कुटुंब या ‘रावण’सह झाडीमध्ये जाताना बघितले. दुसऱ्या वेळेस मात्र केवळ शेपटीवरच समाधान मानावे लागले होते. पण या वाघाची समाजमाध्यमांवर आलेली अनेक चित्तथरारक छायाचित्रे पाहून मी प्रत्येक वेळी रोमांचित झालो होतो.
मुख्य पर्यटन क्षेत्राच्या परिसरात नसलेला हा वाघ आपल्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झाला. या वाघाच्या प्रसिद्धीमुळे मदनापूर, कोलारा आणि बेलारा या पर्यटनद्वारातून जाणाऱ्या गाड्यांची संख्याही त्या वेळी कमालीची वाढली. प्रत्येक वाघाचा एक विशिष्ट काळ असतो. या पाच ते सात वर्षांच्या अल्पकाळात या वाघाने आपले अस्तित्व निर्माण करून आपली कीर्ती दूरवर पसरवली, हे पण तितकेच खरे आहे.
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)
sanjay.karkare@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.