- संजय करकरे
आगरझरी, देवाडा, अडेगाव आणि जुनोना असे सर्व जंगल क्षेत्र एकमेकांना लागून आहे. काही वर्षांपूर्वी ‘खली’ नावाच्या एका नर वाघाचा मोठा दरारा तिथे होता; पण अचानक तो एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. त्याच्या नंतर त्या परिसरात ‘तारू’ नावाच्या वाघाने आपले अस्तित्व निर्माण केले. काही महिन्यांतच ‘शंभू’ नावाच्या दुसऱ्या एका तरण्याबांड नर वाघाने तिथे प्रवेश केला आणि ‘तारू’ला आपला तळ हलवावा लागला. अनेक बलदंड वाघांनी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ‘शंभू’ने आपले भक्कम स्थान कायम राखले. त्यासाठी प्रसंगी त्याला इतर वाघांशी द्वंद्वही करावे लागले...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राकडे पर्यटकांची सर्वाधिक पावले वळत असतात. त्याला कारणही तसेच आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान १९५५ मध्ये घोषित झाले. त्यानंतर १९८६ मध्ये अंधारी अभयारण्य जाहीर झाले. १९९५ मध्ये दोन्ही क्षेत्रे एकत्रित करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली.
साधारण १९९५ नंतर व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने जे जे काम या क्षेत्रात झाले त्याची परिणिती या परिसरातील वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. वेगवेगळ्या व्यवस्थापनाचे प्रयोग या कोअर क्षेत्रात उत्तमरीत्या राबविले गेले. त्यामुळे वन्यप्राणी अधिक चांगल्या संख्येने दिसतात. ताडोबाच्या या कोअर क्षेत्राला लागूनच चांगले जंगल असल्याने व्याघ्र प्रकल्पाने त्याकडे आपले लक्ष वळवले होते. साधारण २०१३-१४ नंतर या बफर क्षेत्राला महत्त्व देण्यात आले.
चंद्रपूरहून आपण मोहर्लीकडे येतो तेव्हा रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला दिसणारे हे जंगल व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाखाली आल्यानंतर तिथे कमालीचे बदल झाले. २०१३ पूर्वी आगरझरी व देवाडा या परिसरात अनेक गुरांची चराई व बांबूची अवैध तोड मी बघितली आहे; पण व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व्यवस्थापनाखाली हे क्षेत्र आल्याने तिथे संरक्षण आले. त्याची परिणिती या सर्व क्षेत्रांतील वन्यजीवांना मिळाली.
आज या परिसरातील आगरझरी, देवाडा, अडेगाव आणि जुनोना या चार बफर क्षेत्रांत ज्या पद्धतीने पर्यटन सुरू आहे ते बघितल्यानंतर या सर्व गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. गेल्या दहा वर्षांतील हा सर्व बदल आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात फिरताना गाड्यांचे नियमन केले जाते. म्हणजेच प्रत्येक प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी किती गाड्या सोडायच्या या संदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत.
साहजिकच सुरुवातीपासून पर्यटकांचा ओढा कोअर क्षेत्राकडे असल्याने आणि तेथील मर्यादित प्रवेशामुळे बफर क्षेत्रातील पर्यटन सुरू झाल्यानंतर अनेकांना अनिश्चेने का होईना, तिथे जावे लागत होते. पण या क्षेत्रातही वाघांची संख्या चांगली वाढल्यानंतर पर्यटकांची पावले या बफर क्षेत्राकडेही वळू लागली.
त्यामुळे आज संपूर्ण देशात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर पर्यटन गाजले व गाजत आहे. आज या व्याघ्र प्रकल्पात साधारण बफरचे १५ प्रवेशद्वार असून अतिशय जोरदार पर्यटन या क्षेत्रात सुरू आहे. व्याघ्र पर्यटनाच्या दृष्टीने हे एक मोठे यश म्हणता येईल.
आगरझरी, देवाडा, अडेगाव आणि जुनोना हे सर्व जंगल क्षेत्र एकमेकांना लागून आहे. या क्षेत्रामध्ये काही वर्षांपूर्वी ‘खली’ नावाच्या एका नर वाघाचा मोठा दरारा होता. हा वाघ नावाप्रमाणेच अतिशय बलदंड व मोठा होता. साधारण पाच ते सहा वर्षे त्याने या बफर क्षेत्रावर राज्य केले. या परिसरातील पाच ते सहा माद्या त्याच्या क्षेत्रात आणि अधिपत्याखाली होत्या; पण अचानक हा मोठा नर वाघ एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडला आणि त्याच्या जाण्यामुळे ते क्षेत्र रिकामे झाले.
त्यानंतर त्या परिसरात ‘तारू’ नावाच्या दुसऱ्या नर वाघाने आपले अस्तित्व निर्माण केले; परंतु केवळ काही महिनेच त्याला तिथे आपला तळ ठेवावा लागला. ‘शंभू’ नावाच्या दुसऱ्या एका तरण्याबांड नर वाघाने या क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्याच्यापुढे ‘तारू’ला आपला तळ तेथून हलवावा लागला.
आज आपल्या कथेचा नायक ‘शंभू’ नावाचाच हा नर वाघ आहे. तो नेमका कुठून आला आणि त्याचे आई-वडील कोण होते याचा पत्ता नाही. ‘शंभू’चा जन्म साधारण २०१८ च्या सुमारास झाला असावा, असे काही निसर्ग अभ्यासकांचे म्हणणे आहे. या वाघाच्या उजव्या गालावर त्रिशूळ आकाराचा काळा पट्टा असल्याने त्याला ‘शंभू’ नाव मिळाले, पण हे नाव नेमक्या कुठल्या मार्गदर्शकांनी अथवा छायाचित्रकारांनी दिले याबाबत मात्र संभ्रम आहे.
ऐन तारुण्यात असलेला हा वाघ मात्र कमालीचा भारदस्त आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि पायावर असलेल्या जखमांच्या खुणा, त्याने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी काय धडपड केली असावी याची साक्ष देतात. हा नर वाघ आता या सर्व बफर क्षेत्राचा दादा आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने या क्षेत्रावर आपली पकड ठेवली आहे.
खरे तर ‘खली’ वाघाच्या जाण्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि त्या संधीचाच फायदा परिसरातील काही नरांनी घेतला. ‘वायमार्क’, ‘तारू’, ‘पारस’, ‘छोटा दडियल’ इत्यादींसारख्या नर वाघांनी या क्षेत्रावर आपली मांड ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांच्या पुढे ‘शंभू’ने जे भक्कम स्थान मिळवले होते, ते कायम राखले आहे. त्यासाठी त्याला ‘तारू’ तसेच ‘पारस’ या दोन नर वाघांशी द्वंद्वही करावे लागले आहे.
या वर्षाच्या अखेरीस २ डिसेंबरला देवाडा परिसरातील जंगलात ‘शंभू’ आणि ‘तारू’ हे दोघेही वाघ पर्यटकांच्या समोरच परस्पर भिडले होते. अत्यंत अरुंद आणि बांबूने वेढलेल्या जंगलात या दोघांचीही जबरदस्त फाईट पर्यटकांनी ‘याचि देही याचि डोळा’ बघितली. हे सर्व पर्यटक या वाघांच्या इतक्या जवळ होते की त्यांच्या लढतीचा व्हिडीओ बघत असताना काही क्षण असे वाटते, की हे दोघेही वाघ भांडता भांडता पर्यटकांच्या जिप्सीवरच आदळतील.
गिरक्या घेत आणि कान मागे करून प्रचंड ताकदीने हे समान वयाचे दोन वाघ उभे राहून, आपल्या पायांच्या नख्या बाहेर काढून, अतिशय त्वेषाने लढत असल्याचा व्हिडीओ मुंबईतील छायाचित्रकार व ताडोबात नियमित येणाऱ्या नितीन उले यांनी काढला आहे. या लढाईची आठवण काढून नितीन थरारून जातात. ते सांगतात, ‘‘आम्ही जंगलात फिरत असताना आम्हाला रस्त्यावरून ‘तारू’ वाघ जाताना दिसला.
आम्ही त्याच्या मागे जिप्सीने जात होतो. यावेळेस अचानक डाव्या बाजूने त्वेषाने दुसरा एक वाघ समोर आला. तो ‘शंभू’ होता आणि हे दोघेही वाघ एकमेकांना जोरदार भिडले. सुरुवातीला ही लढाई दूर होती; पण लढता लढता ते आमच्या गाड्यांच्या दिशेने आल्यावर चालक आणि गाईड यांची धावपळ उडाली. बराच वेळ ही लढाई सुरू होती. हे दोन्ही वाघ जोरदार लढत होते. ‘तारू’ला चांगल्याच जखमा झाल्या होत्या.
मध्येच ‘शंभू’ने अचानक जंगलात जाऊन सांबराच्या एका पिल्लाला मारले. त्याला जवळच असलेल्या पाणवठ्यातील पाण्यात बुडवून, त्याने स्वतःला आणि आपल्या जखमांना स्वच्छ केले. थोड्या वेळाने पुन्हा तो ‘तारू’च्या मागावर गेला. ‘तारू’ला पूर्णपणे पराजित करण्याचा निर्धारच जणू त्याच्या हावभावातून जाणवत होता.
काही वेळाने या दोघांचाही जंगलात दूरवरून आवाज ऐकू येत होता. वेळ संपल्याने आम्ही आमच्या गाड्या गेटच्या दिशेने वळवल्या.’’ वाघांच्या दुनियेत अशा तऱ्हेचे द्वंद्व नवीन नसले तरी ते पर्यटकांच्या समोर घडल्याने साहजिकच त्याची मोठी प्रसिद्धी झाली.
‘शंभू’ वाघाचा आकार आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर या परिसरातील अतिशय प्रसिद्ध झालेल्या ‘बिग डॅडी’ वाघ डोह वाघाची आठवण येते. ‘शंभू’ वाघही कदाचित ‘वाघ डोह’च्या कुळातील असावा, असे त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटते. आगरझरी बफर क्षेत्रात जिप्सी गाडी चालवणारा मंगेश किन्नाके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने ‘शंभू’ला बघत आहे. तो म्हणतो, ‘‘या वाघाने या परिसरात आल्यानंतरच आपला दरारा निर्माण केला होता.
‘शंभू’ने ‘शर्मिली’ आणि ‘छोटी मधू’ नावाच्या वाघिणींची पिल्ले मारली असावीत. कारण या दोन्ही वाघिणींची पिल्ले गायब झाल्यानंतर त्याने त्यांच्याशी मिलन केले. या परिसरात असणाऱ्या ‘डब्ल्यू’ तसेच ‘कॉलरवाली’ या वाघिणींसोबतही तो बघितला गेला आहे.’’ नागपूरचा छायाचित्रकार दीप काठीकारही या वाघाची एकूण देहबोली, तसेच त्याच्या आकारावरून खूश झाल्याचे लक्षात येते.
दीप सांगतो, ‘‘मला काही वेळा हा वाघ अतिशय चांगल्या पद्धतीने समोरून चालत येत टिपायला मिळाला आहे. माझ्याकडे अनेक चांगले व्हिडीओ आहेत. पर्यटकांचा विचार केला तर हा वाघ सौम्य आहे. त्याचा चेहरा उग्र वाटत असला तरीही त्याच्या वागण्यामध्ये आक्रमकपणा दिसत नाही.’
गेल्या वर्षी उन्हाळ्यात देवाडा परिसरात फिरत असताना मी ‘शंभू’ आणि ‘डब्ल्यू’ नावाच्या वाघिणीला एका नाल्यात झोपलेले बघितले होते. या दोघांची जोडी दाट झाडीत, पाण्याच्या काठावर झोपलेली होती. त्यांचे चांगले छायाचित्र काही मिळाले नाही. या ठिकाणी पर्यटकांच्या जिप्सींची मोठी गर्दी झाल्यामुळे एका विशिष्ट कोनातून हे दोघे वाघ व्यवस्थित दिसत असल्याने त्यांचे चांगले दर्शन होणे अवघड झाले होते. त्या गर्दीला टाळून आम्ही तेथून निघून गेलो होतो.
काही वाघांचे आयुष्य अनोखे असेच असते. पर्यटन क्षेत्रात जरी त्यांचा वावर असला तरीही त्याच्या पलीकडील भागात त्यांचे वागणे, त्यांचे अस्तित्व कसे असते हे समजणे कठीणच असते. प्रत्येक वाघाला आपण ठरवूनही बघण्याचे किंवा त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला तरीही तो अतिशय खर्चिक आणि वेळ घेणारा विषय आहे. त्यामुळे वाघांच्या आयुष्यात न समजणाऱ्या काही गोष्टी असू द्याव्यात, असे कधी कधी वाटते.
sanjay.karkare@gmail.com
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.