आगरझरीची राणी ‘छोटी मधू’

१२ सप्टेंबर २०१८ मध्ये आलेल्या एका व्हिडीओत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर परिसरात फिरणाऱ्या एका जिप्सीमागे धावणारी वाघीण पाहून गाईड आणि गाडीतील महिलांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो.
Tiger
Tigersakal
Updated on

१२ सप्टेंबर २०१८ मध्ये आलेल्या एका व्हिडीओत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर परिसरात फिरणाऱ्या एका जिप्सीमागे धावणारी वाघीण पाहून गाईड आणि गाडीतील महिलांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. ती वाघीण म्हणजे ‘छोटी मधू’.ती द्वेषाने अथवा चिडून गाडीमागे धावत नसून तिच्या चेहऱ्यावर एक बालीश व अल्लडपणा दिसतो आहे.

तिच्या चेहऱ्यावर आपल्यापुढे काहीतरी पळत असल्याचा आणि आपण त्याला पळवत असल्याचा आनंद बघायला मिळतो. गाडीच्या मागे धावणारी वाघीण म्हणून सुरुवातीला ती कुप्रसि झाली. आज मात्र ती ताडोबाच्या आगरझरी बफर क्षेत्राची राणी आहे.

‘मॅडम पकडून बसा...’

‘दादा...’

‘बापरे, धावते आहे ती... धावते आहे...’

‘दादा पळवा...’

हा आरडाओरडा आहे जिप्सीत बसलेल्या काही महिलांचा. या जिप्सीच्या मागे एक वाघ वेगाने धावत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

अतिशय वेगाने ही जिप्सी जंगलातून आणि बांबूच्या रांजीतून पळत असल्याचे व्हिडीओत दिसत असून गाडीतील महिलांचा आवाज, त्यांचा गोंधळ आणि त्यांची भीती स्पष्टपणे त्यात जाणवत आहे. या व्हिडीओमुळे व्याघ्र पर्यटन क्षेत्रात खळबळ माजून गेली. १२ सप्टेंबर २०१८ मधील हा व्हिडीओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर परिसरातील आहे. यू-ट्युबवर तो बघायला मिळतो.

गाडीतील महिलांनीच तो शूट केला असून त्यांचा आणि जिप्सीतील गाईड यांचा गोंधळ त्यात ऐकू येतोय. धावणारा वाघ दुसरा-तिसरा कोणी नसून आजच्या आपल्या कथेतील नायिका ‘छोटी मधू’ वाघीण आहे. व्हिडीओ बारकाईने बघत असताना असे लक्षात येते की ती वाघीण द्वेषाने अथवा चिडून गाडीमागे धावत नसून तिच्या चेहऱ्यावर एक बालीश व अल्लडपणा दिसून येतो.

तिच्या चेहऱ्यावर आपल्यापुढे काहीतरी पळत असल्याचा आणि आपण त्याला पळवत असल्याचा आनंद बघायला मिळतो. अर्थातच हा प्रसंग जंगलात घडल्याने जीवाचा थरकाप होतो. उघड्या जिप्सीतून व्याघ्र प्रकल्पात प्रवास करावा की नाही, असा प्रश्न अनेकांना त्यानंतर पडला होता.

या घटनेनंतर ताडोबा अंधारी प्रशासनाने खुलासा करून धावणारा हा वाघ अप्रौढ वाघीण असल्याचे नमूद करून, ती हल्ला करण्याच्या प्रयत्नात नसून कुतूहलापोटी गाडीमागे धावत असल्याचे म्हटले. तसा खुलासाही त्यांनी केला. मात्र या घटनेनंतर व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी, देवाडा, जुनोना व अडेगाव हे बफर क्षेत्र प्रसिद्धीच्या झोतात आले. या घटनेपूर्वी या वाघिणीतील हा अल्लडपणा अनेकांनी अनुभवला होता.

ही वाघीण आणि तिचे दोन भाऊ-बहीण गाडीच्या जवळपास सातत्याने घुटमळत असत. ते गाडीच्या मागे चालत येत असत. मात्र, वाघ गाडीमागे धावत असल्याचा हा व्हिडीओ साऱ्यांना धक्का देऊन गेला. या व्हिडीओनंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली. अर्थात या बंदीला हे एकच कारण होते अशातला भाग नाही.

अनेक पर्यटकांनी मोबाईलने ‘सेल्फी विथ टायगर’ असे अतर्क्य प्रकार सुरू केल्याचे दिसत होते. काही वेळा पर्यटकांचा मोबाईल गाडीतून खाली पडला, जिथे जवळच वाघ होता. काही वेळेस पर्यटकही गाडीतून घसरले. परिणामी व्याघ्र प्रकल्पाने सफारीच्या दरम्यान जंगलात मोबाईल नेण्यास बंदी केली.

व्याघ्र प्रकल्पात मोबाईल नेण्यास बंदी करणारा ताडोबा हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला. आज अनेक जण या मोबाईल बंदीच्या संदर्भात बोलतात. या मोबाईलचा गैरवापर म्हणजेच सेल्फी जंगलात काढण्याचा जो अतिशय विचित्र प्रकार होत होता, तो थांबला. त्यामुळे या बंदीचे समर्थन करणे मला योग्य वाटते.

‘छोटी मधू’चा जन्म २०१६ मध्ये झाला. तिच्या आईचे नाव ‘माधुरी’ म्हणून तिचे नाव ‘छोटी माधुरी’ पडले. नंतर ती ‘छोटी मधू’ झाली. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी ती ‘टी १२७’ या नावाने ओळखली जाते. ‘छोटी मधू’चा पिता ‘खली’ नावाचा एक मोठा नर वाघ होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी परिसरात ‘माधुरी’ उतारवयात असताना तिला तीन पिल्ले झाली होती.

त्यातील ‘छोटी मधू’ने आपल्या आईच्या क्षेत्रातच जम बसवला व तिथेच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या या परिसरातून चंद्रपूर ते मोहर्ली हा मुख्य डांबरी रस्ता जातो. या रस्त्यावरून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. ‘माधुरी’च्या नंतर ‘छोटी मधू’ने हे क्षेत्र मिळवले.

त्यानंतर साहजिकच अनेक वेळा डांबरी रस्ता पार करून पलीकडच्या जंगलात जाणारी ‘छोटी मधू’ सातत्याने पर्यटक तसेच जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांना, दुचाकीस्वारांना दर्शन देत असते. आपल्या आईसारखीच देखणी आणि भरदार शरीरयष्टीची ही वाघीण अल्पावधीतच पर्यटकांच्या ओळखीची झाली. दोन वेळा रस्ता पार करताना तसेच एक वेळा आगरझरीच्या परिसरात मला ती खूप छान बघायला मिळाली.

पर्यटकांच्या गराड्यात असतानाही ती निवांतपणे पिल्लांची काळजी घेत असल्याचे लक्षात आले. गाडीच्या मागे धावणारी वाघीण म्हणून सुरुवातीला तिला जी कुप्रसिद्धी मिळाली त्याचे नामोनिशान ती प्रौढ झाल्यानंतर बघायला मिळाले नाही. मात्र प्रत्येक वेळेस जिप्सीतील गाईड ही वाघीण दिसल्यानंतर सतर्क व सावध असल्याचे जाणवते. २०१८ ते १९ च्या दरम्यान ती या परिसरातील सर्वश्रेष्ठ ‘बजरंग’ वाघासोबत दिसत होती.

या दोघांच्या मिलनातून तिला पहिल्यांदा तीन पिल्ले झाली. या तीन पिल्लांची वाढ ती अतिशय काळजीपूर्वक घेत असल्याचे अनेक पर्यटकांनी बघितले आहे. २०२० मध्ये पुन्हा ‘बजरंग’पासून तिला तीन पिल्ले झाली. ही पिल्लेही तिने या परिसरातील अनेक नर वाघांपासून लपवून ठेवून वाढवली.

यावेळेस या परिसरात ‘आंबेउतारा’, ‘पारस’, ‘ताला’ व ‘शंभू’ असे अनेक नर वाघ ये-जा करत असल्याने साहजिकच ‘छोटी मधू’ने व्यवस्थितरीत्या त्यांनाही हाताळल्याचे लक्षात येते. काही वेळा पिल्लांना दूर ठेवण्यासाठी या नर वाघासोबत ‘खोटे मिलन’ करत असल्याचेही अनेकांनी बघितले आहे. सांबराचे पिल्लू तोंडात धरल्याचा ‘छोट्या मधू’चा एक अद्वितीय फोटो नागपूरचा सुप्रसिद्ध छायाचित्रकार दीप काठीकर याने टिपला आहे.

या छायाचित्रात या वाघिणीच्या डोळ्यातील एक निश्चयी नजर तसेच सांबराच्या पिल्लाच्या डोळ्यातील करुण भाव आणि अर्धवट उघडलेले तोंड त्याची असहाय्यता दर्शवते. या प्रसंगासंदर्भात दीप सांगतो, ‘१२ नोव्हेंबर २०२१ च्या सकाळी आम्ही देवाडा गेटमधून जंगलात प्रवेश केला. या अगोदरच्या चार सफारी ड्राय गेल्याने म्हणजेच वाघ न दिसल्याने सर्व जण आता आपल्याला तो दिसणारच नाही या अविर्भावातच गाडीत बसले होते.

सकाळची सफारी असल्याने जंगल खूपच फ्रेश होते. साधारण एक-दीड तास आमची भ्रमंती झाली; पण आम्हाला काही वाघोबाचे दर्शन झाले नाही. गाडीतील अन्य तिथेच डुलक्या काढत होते. या वेळी मला दूरवर रस्त्यावर एक वाघ दिसला. मी वाघ दिसल्याचे कोणालाही न सांगता गाडी जवळ नेल्यावर सर्व जणांना जागे केले. गाडीतील सर्व जवळच उभा असलेला वाघ बघून दचकले. ती ‘छोटी मधू’ असल्याचे लक्षात आले.

अतिशय आकर्षक व बिनधास्त असणारी ही वाघीण आहे. या काळात तिला तीन पिल्ले होती. त्यामुळे जवळपास पिल्ले असण्याच्या शक्यतेने आम्ही गाडी मागे घेऊन बंद केली. यावेळी अचानक या वाघिणीने उजव्या बाजूला असलेल्या जंगलात झेप घेतली. ही झेप अर्थातच शिकार करण्यासाठीची असावी, असा माझा कयास होता. अवघ्या काही सेकंदातच ही वाघीण सांबराचे लहान पिल्लू तोंडात धरून रस्त्यावर आली.

सांबराचे पिल्लू आपली अखेरची धडपड करत होते. ते जिवंत होते. ही वाघीण या जिवंत पिल्लाला घेऊनच आमच्या दिशेने थेट चालू लागली. आम्ही गाडी मागे घेत, तिचे चित्रण करत गेलो. काळा पाणी परिसरातील ही घटना आहे. साधारण पंधरा-वीस मिनिटे आम्ही तिला व्यवस्थित बघितले. त्यानंतर ही वाघीण ज्या परिसरात तिने पिल्ले ठेवली होती त्या ठिकाणी निघून गेली.

सांबराचे जिवंत पिल्लू वाघिणीच्या तोंडात बघितल्यानंतर व ती धडपड बघून गाडीतील काही जणांना कमालीचे दुःख झाले होते; पण आपल्या पिल्लांच्या वाढीसाठी या वाघिणीची सुरू असलेली धडपड मला तिच्या या कृत्यातून जाणवली. जंगलात असे अचानक काही प्रसंग घडतात की जे कायमचे आपल्या मनावर कोरले जातात. हा प्रसंग ही असाच होता.’

आज ही ‘छोटी मधू’ ताडोबाच्या आगरझरी बफर क्षेत्राची राणी आहे. या जंगलातील अन्य नर वाघ व वाघिणींशी दोन हात करून तिचे साम्राज्य टिकवून आहे. आपल्या आईचा वारसा ती जोरकसपणे जपत आहे.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.