सौंदर्यवती ‘फेरी’

उमरेड अभयारण्यात ‘जय’ची पिढी विस्तारत गेली आणि याच शृंखलेतील एका महत्त्वपूर्ण वाघिणीने या जंगलाला आणखीन प्रसिद्धीच्या झोतात नेले, ती वाघीण म्हणजे ‘फेरी’!
Tiger
Tigersakal
Updated on

- संजय करकरे

उमरेड अभयारण्यात ‘जय’ची पिढी विस्तारत गेली आणि याच शृंखलेतील एका महत्त्वपूर्ण वाघिणीने या जंगलाला आणखीन प्रसिद्धीच्या झोतात नेले, ती वाघीण म्हणजे ‘फेरी’! ‘फेरी’ हा खरंतर नावाचा अपभ्रंश आहे. ही वाघीण अतिशय सुंदर आहे. तिच्या दोन्ही गालाकडील पांढरा भाग, डोळ्याच्या वरचा पांढरा भाग, तसेच मानेकडील पांढऱ्या भागामुळे तिचे रूप अधिकच उठावदार झाले आहे. त्यामुळे तिच्या या ‘फेअरनेस’मुळेच तिला असे नाव मिळाले, जे ‘फेरी’ या नावाने प्रचलित झाले...

उमरेड-करंडला-पवनी अभयारण्य नागपूर जिल्ह्यात स्थापन होऊन अवघे दशकच झाले आहे. मात्र या अभयारण्याने संपूर्ण देशभरात लौकिक मिळवला तो तेथे असणाऱ्या विविध वाघांमुळे! सुरुवातीच्या काळात ‘जय’ नावाचे वादळ या अभयारण्यात आले. त्यानंतर ‘जय’ची पिढी या अभयारण्यात विस्तारत गेली आणि याच शृंखलेतील एका महत्त्वपूर्ण वाघिणीने या जंगलाला आणखीन प्रसिद्धीच्या झोतात नेले. ती वाघीण म्हणजे ‘फेरी’!

आता तुम्ही म्हणाल हे असले कसले नाव, पण ‘फेरी’ खरंतर नावाचा अपभ्रंश आहे. ही वाघीण अतिशय सुंदर आहे. तिच्या दोन्ही गालाकडील पांढरा भाग, डोळ्याच्या वरचा पांढरा भाग, तसेच मानेकडील पांढऱ्या भागामुळे तिचे रूप अधिकच उठावदार झाले आहे.

त्यामुळे तिच्या या ‘फेअरनेस’मुळेच तिला असे नाव मिळाले, जे ‘फेरी’ या नावाने प्रचलित झाले. मला या वाघिणीला बघितल्यावर मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘कॉलरवाली’ नावाची प्रसिद्ध वाघीण आठवते. तिचे आणि ‘फेरी’चे रूप काहीसे साम्य दर्शवणारे आहे.

‘फेरी’चा जन्म या अभयारण्यातील उमरेड वनपरिक्षेत्रातील त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या ‘चांदी’ नावाच्या वाघिणीच्या पोटी झाला. तिचा पिता ‘चैत्राम’ नावाचा वाघ. यावेळी चांदीला चार पिल्लं झाली होती, ज्यात तीन माद्या व एक नर पिल्लू होते. त्या तीन माद्यांमधील एक ‘फेरी’. ती मोठी झाली आणि उमरेडसोबतच कुही वनपरिक्षेत्रात फिरू लागली. याचवेळी तिची गाठ सुप्रसिद्ध ‘जय’ वाघाशी पडली.

या दोघांच्या मिलनातून २०१३-१४ मध्ये ‘बिट्टू’ आणि ‘श्रीनिवास’ दोन नर वाघ जन्मले. यावेळी हे दोन नर वाघ, ‘फेरी’ आणि ‘जय’ यांनी उमरेडचे जंगल खूप प्रसिद्धीच्या झोतात नेले होते. हे सर्व वाघ आकाराने बलदंड असल्याने पर्यटकांना हे भले मोठे वाघ बघून कमालीचा आनंद मिळत होता.

‘बिट्टू’ आणि ‘श्रीनिवास’ अतिशय बेधडक असल्याने पर्यटकांच्या गाडीजवळ जाणे यासह अनेक कारणांनी कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिले. यातील ‘श्रीनिवास’ मोठा होऊन जंगलाजवळील विद्युत तारेच्या संपर्कात येऊन मृत्युमुखी पडला, तर ‘बिट्टू’ ब्रह्मपुरीच्या जंगलात स्थायिक झाल्याचे सांगितले जाते.

‘गायब झाल्यानंतर दुसऱ्यांदा फेरीला ‘K मार्क’ नावाच्या वाघापासून दोन मादी पिल्ले झाली, ज्यांची नावे गाईड यांनी ‘सीता’ व ‘गीता’ अशी ठेवली होती. तिसऱ्यांदा ‘चार्जर’ नावाच्या वाघापासून ‘फेरी’ला चार पिल्ले झाली. यानंतर फेरीच्या आयुष्यात ताडोबातून या जंगलात आलेला ‘सूर्या’ आला आणि बघता बघता या दोघांचा संसार अधिकच फुलला.

सहसा वाघिणीला दोन, तर जास्तीत जास्त चार पिल्ले होतात. असे समजले जाते की वाघीण आपल्या पिल्लांना साधारणपणे दीड ते दोन वर्षे सोबत घेऊन काळजीपूर्वक त्यांना वाढवते. त्यांना शिकारीचे शिक्षण देते, आपले संपूर्ण कसब, आपले कौशल्य ती या पिल्लांना देण्याचा प्रयत्न करते. ‘फेरी’ आणि ‘सूर्या’ यांच्या मिलनातून ‘फेरी’ला एकावेळी पाच पिल्ले झाली.

देशातील अनेक सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात पाच पिल्ले जन्माला येण्याच्या घटना आहेत; पण उमरेडसारख्या लहान जंगलात एकाच वेळी पाच पिल्ले जन्माला येण्याची घटना खूपच मोठी होती. उमरेडच्या जंगलाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेण्यास ही घटना साह्यभूत ठरली. ही पाच पिल्ले लहान असताना मी बघितली.

२०२१ मधील मार्च महिना होता. आम्ही गोठणगाव या पर्यटन गेटवरती दुपारी दाखल झालो. जंगल सफारी सुरू झाली. सारे लक्ष केवळ आणि केवळ हे सर्व कुटुंब बघायला मिळेल का, याकडेच होते. ही पिल्ले व त्यांची आई गवती परिसरातील तलावाच्या मागच्या बाजूला होती. वानरांचे, चितळांचे अलार्म कॉल अधूनमधून या सर्वांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.

पर्यटक गाड्या इकडे-तिकडे फिरत होत्या, पण साऱ्यांचे लक्ष हे कुटुंब कधी बाहेर येईल याकडेच होते. सायंकाळपर्यंत वेळ निघून गेली आणि आम्ही परतीची वाट धरली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या फेरीत आमचे भाग्य होते. यावेळी ‘फेरी’ व पिल्ले गोठणगाव तलावाच्या जवळ आली होती. तलावाच्या पहारीवर मागेपुढे गाड्या थांबून होत्या. जवळच खालच्या बाजूला चितळांचे कॉल वाघाचे अस्तित्व सांगत होते.

आठच्या सुमारास सर्वप्रथम ‘फेरी’ तलावाच्या पहारीवर म्हणजेच बांधावर आली. दोन्ही बाजूला दूरवर उभ्या असलेल्या गाड्या बघून ती काहीशी निश्चिंत झाली. बांधावर उभे राहूनच तिने मागे वळून हळूच आवाज केला. डाव्या बाजूला असलेल्या झाडीतून पहिले पिल्लू बांधावर आले. साधारण तीन-साडेतीन महिन्यांचे ते असावे. पिल्लाची नजर गाड्यांकडे गेल्याबरोबर ते मागे फिरले.

दोन मिनिटे शांततेत गेली. पुन्हा एक एक पिल्लू हळूहळू बांध पार करून उजवीकडील खालच्या बाजूला उतरले. एकावेळी अत्यंत गोंडस असणारी ही पाच पिल्ले बघण्याचा आनंद येथे शब्दांत सांगणे अवघड आहे. पिल्ले सावध होती. दोन पिल्ले काहीशी धीट वाटली. काही काळ पर्यटकांच्या गाड्यांकडे त्यांनी आरामात बघितले. कॅमेऱ्याच्या एका

फ्रेममध्ये आई, तसेच पाचही पिल्ले काही टिपता आली नाहीत. दरम्यान, ‘फेरी’ने पण उजव्या बाजूच्या झाडीतून खाली उतरून चालायला सुरुवात केली होती. आईच्या मागे मागे दुडुदुडु उड्या मारत पाचही पिल्लांची ही वरात झाडीत निघून गेली. नंतरच्या काळात कधी ‘फेरी’ तर कधी एखाददुसरे पिल्लूच मला बघायला मिळाले.

२०१८ ते २०२३ पर्यंत या वनपरिक्षेत्रात काम केलेले नीलेश वाडीघरे यांनी या वाघिणीला खूप बारकाईने बघितले. ते सांगतात, ‘या वाघिणीला वनविभागाच्या दप्तरी ‘टी ६’ हे नाव सुरुवातीला मिळाले, जे नंतर ‘टी ३’ असे करण्यात आले.

या वाघिणीला पाच पिल्ले असल्याने साहजिकच त्यांचे व्यवस्थित मॉनिटरिंग केले जात होते. या वाघिणीची आणि तिच्या पिल्लांची प्रसिद्धी सर्वत्र झाल्याने संपूर्ण देशभरातून पर्यटकांची पावले या अभयारण्याकडे वळली होती.

अतिशय काळजीपूर्वक ‘फेरी’ पिल्लांची देखभाल करीत असे आणि तिला ‘सूर्या’ या नर वाघापासून योग्य प्रतिसादही मिळाला होता. पाच पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना सातत्याने खाद्याची गरज होती, पण या वाघिणीने पाळीव जनावरांना फार लक्ष्य केले नाही.

आमच्या दृष्टीने ते प्रमाण नगण्य असेच होते. जास्तीत जास्त काळ ती नैसर्गिक भक्ष्यावरच अवलंबून होती. चितळ, रानडुक्कर तर कधी गवाही तिने मारला होता. आमच्या दृष्टीने ती एक समंजस अशी वाघीण आहे.’

या अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वारावर पर्यटक मार्गदर्शकाचे काम करणाऱ्या अभिलाष हलमारे हा या वाघिणीबद्दल भरभरून बोलतो. तो म्हणाला, ‘मी २०१४ पासून येथे गाईडचे काम करत आहे. सुरुवातीपासून या वाघिणीला बघतो आहे. आता या वाघिणीचे वय साधारण १२-१३ वर्षांचे असेल.

ज्यावेळेस फेरीला पाच पिल्ले होती त्यावेळेस तर पर्यटकांचा एवढा जमाव असायचा की आम्हाला दुपारी जेवायलाही फुरसत मिळत नसे.’ सध्या या वाघिणीला ‘सूर्या’पासून झालेली चार पिल्ले आहेत. पूर्वीच्या पाच पिल्लांपैकी एका मादी वाघिणीने आपल्या आईच्याच क्षेत्रात हक्क सांगितल्याने ‘फेरी’ला काहीशी माघार घ्यावी लागल्याचे चित्र आहे.

आता सध्या ही वाघीण कुही, तसेच उमरेडच्या क्षेत्रातही बघायला मिळते. सध्या पावसाळा असल्याने तिची आठ-नऊ महिन्यांची पिल्ले एक ऑक्टोबरला पार्क सुरू झाल्यानंतर पर्यटकांना दिसतील आणि या सौंदर्यवती ‘फेरी’चे पुन्हा दर्शन पर्यटकांना होऊ लागेल.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.