एकाग्र का व्हायचं?

मानसिक स्थैर्य-शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहे. त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो.
Confidence
ConfidenceSakal
Updated on
Summary

मानसिक स्थैर्य-शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहे. त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो.

मानसिक स्थैर्य-शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहे. त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो. एकाग्रता हे सुदृढ मानसिकतेचं लक्षण आहे. मन सतत अस्थिर, अशांत राहिलं तर त्यातून अनेक गुंतागुंती तयार होतात.

मी जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना भेटतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो, तेव्हा जाणवणारी महत्त्वाची गोष्ट अशी, की काही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी आहे, याची त्यांना जाणीव असते. बहुतेकदा विद्यार्थी अभ्यासात कमी पडतात याचं कारण त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. आत्मविश्वास कमी असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा अभ्यास कमी असतो. अभ्यास कमी असल्यामुळे किंवा न झाल्यामुळे त्यांना परीक्षेचं टेन्शन येतं. टेन्शन आलं की एकाग्रता निघून जाते. खूप दडपण असेल तर माणूस फुलत नाही. कारण पुढे काय होणार? याची त्याला सतत भीती असते. परीक्षेसाठी आत्मविश्वास हा हवाच. कारण जोवर आत्मविश्वास येत नाही, तोवर विद्यार्थ्यांना एकाग्रता जमत नाही. एकाग्रता ही उत्तम कामगिरीची गुरुकिल्ली आहे. एकाग्रतेच्या पायावर आपली कामगिरी उभी असते. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो. अभ्यास कमी होतो यामागेही एकाग्रतेचा अभाव कारणीभूत असतो. मुलं जेव्हा वर्गात बसतात आणि त्यांना त्यांचे शिक्षक/ प्राध्यापक शिकवतात तेव्हा ते एकाग्रपणे शिकू शकतात का? विद्यार्थी जेव्हा पुस्तक उघडतात, तेव्हा ते एकाग्रपणे पुस्तक वाचू शकतात का? याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात...

परीक्षेची म्हणून वेगळी तयारी उशिरा करणारी मुलं मी अनेकदा बघतो. परीक्षा तोंडावर आली की, ती जागी होतात आणि तयारीला लागतात. जेवढा अवधी कमी होतो तेवढी अनिश्चितता वाढते आणि जेवढी अनिश्चितता वाढते तेवढीच साशंकता प्रचंड वाढते. प्रचंड साशंकता म्हणजे पुन्हा आत्मविश्वासाचा अभाव. ज्यांच्या मनात खूप साशंकता असते, त्यांचा आत्मविश्वास कमी असतो, स्वाभाविकपणे त्यांची एकाग्रताही कमी असते. म्हणजे थोडक्यात परीक्षा तोंडावर आल्यानंतर तयारी करणाऱ्यांना आपल्या यशाबद्दल कधीच खात्री नसते.

अनेक विषय, त्यातील अनेक धडे हे काही विद्यार्थ्यांना कळत नाहीत. ते धडे शाळेत शिकवण्यात आलेले असतात. त्याचा गृहपाठ देण्यात आलेला असतो. खाजगी शिकवणी जॉईन केली असेल तर खाजगी शिकवणीतही ते धडे शिकवले जातात. याबद्दल काही शंका असेल तर ते विचारण्याची विद्यार्थ्यांना मुभा असते. पण विद्यार्थी पुढेच येत नाहीत; कारण अनेकदा त्या विषयांमध्ये त्यांना रस निर्माण झालेला नसतो. एखादी गोष्ट आवडली नाही की त्याकडे दुर्लक्ष करायचं, हा काही विद्यार्थ्यांचा स्वभाव असतो. जे आवडतं त्याकडे माणूस पटकन लक्ष देतो. आवडणं आणि त्याकडे लक्ष देणं, आपले कान टवकारले जाणं, आपली नजर तिथे जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि जे आवडत नाही ते ऐकताना जांभया येणं, त्याचा कंटाळा येणं, त्याकडे दुर्लक्ष करणं हीसुद्धा मानवी प्रवृत्ती आहे. विद्यार्थ्यांना त्यावर मात करावी लागते. आपल्यामध्ये असे अनेक दुर्गुण असतात जे आपल्या अध्ययनामध्ये बाधा आणतात. त्यातला महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे आवड आणि नावड! एकदा ही नावड पक्की झाली की विद्यार्थी त्या त्या विषयांसाठी आपल्या आकलनाची दारं बंद करण्याची शक्यता असते. म्हणजे ते या विषयामध्ये लक्ष देतच नाहीत. वर्गात विशिष्ट विषयांच्या तासाला फळ्यापेक्षा खिडकीबाहेर बघणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा लक्षणीय असते किंवा फळ्याकडे बघत असले तरी मनामध्ये वेगळे विचार चाललेले असू शकतात; परंतु शेवटी हे सर्व त्यांच्या अभ्यासातल्या एकाग्रतेला बाधा आणणारे आहे. परिणामी त्यांची अभ्यासातली तयारी ही कमी होते आणि परीक्षेतला आत्मविश्वासही कमी होतो. स्वाभाविकपणे त्यांचा निकाल हा वाईटच असतो.

शेवटी आपण सगळी माणसं आहोत. माणूस निश्चल बसू शकत नाही. मग तो असे काही उद्योग करू लागतो ज्यात त्याचे मन रमते. कारण मन हे रमवावे लागतेच. काही मुलांचे मन अभ्यासात रमत नाही. मग ते मन ते खेळामध्ये, मोबाईलमध्ये, गॅझेट्समध्ये, टीव्हीमध्ये किंवा मित्रांमध्ये रमवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शुद्ध टाईमपास करतात. कारण अभ्यासाच्या वेळेचा बळी देऊन तो वेळ अन्य गोष्टींसाठी वापरणं म्हणजे ही पुन्हा परीक्षेमध्ये कामगिरी खालावयाची हमी असते.

आई-वडील आणि शिक्षक कंठशोष करून सांगत असतात, की वेळ वाया घालवू नकोस. तरीही विद्यार्थी तो वेळ वाया घालवत असतात... असं का घडतं? याचं हेच कारण आहे, की त्यांना त्या विषयांमध्ये, अभ्यासामध्ये रस उत्पन्न झालेला नसतो. जिथे रस नाही, जे नीरस आहे, त्यात त्यांचं मन रमत नाही. म्हणून ते मन ते अन्यत्र कुठेतरी गुंतवतात. मुलं जेव्हा अशा प्रकारे अभ्यासाच्या वेळेत खेळतात, तेव्हा आपण हे समजून घ्यायला पाहिजे आणि मुलांनीही समजून घ्यायला पाहिजे की चुकीच्या वेळी खेळणं हा उपाय असू शकत नाही. खेळाची म्हणून एक वेळ असते. खेळाचे म्हणून एक वेळापत्रक असतं; परंतु अभ्यासाच्या वेळेत आपण जर खेळू लागलो तर त्याचे परिणाम हे वाईटच होणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा आत्मपरिक्षण करून आपल्याला संबंधित विषयाच्या नेमक्या कोणत्या अडचणी भेडसावत आहेत, आपल्याला त्यातलं नेमकं काय कळत नाही हे स्पष्टपणे जाणून घेण्याची गरज असते.

एकाग्रता हा खूप मोठा गुण आहे. शिवाय ते एक तंत्र असल्यामुळे आपल्याला एकाग्रता आत्मसात करण्याची संधीही उपलब्ध असते. मानसिक स्थैर्य - शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहेच, त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो. एकाग्रता हे सुदृढ मानसिकतेचं लक्षण आहे. मन सतत अस्थिर, अशांत राहिलं तर त्यातून अनेक गुंतागुंती तयार होतात. केवळ विद्यार्थीदशेतच नव्हे तर पुढच्या आयुष्यातसुद्धा ही एकाग्रता खूप महत्त्वाची आहे आणि प्रयत्नांनी ती नक्कीच साध्य होते!

sanjeevlatkar@hotmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.