आमच्या ऑफिसमधला कार्यालयीन सहकारी दत्ता. त्याचा मुलगा इंजिनिअरिंग पास झाला. त्याने ऑफिसमध्ये पेढे वाटले.
आमच्या ऑफिसमधला कार्यालयीन सहकारी दत्ता. त्याचा मुलगा इंजिनिअरिंग पास झाला. त्याने ऑफिसमध्ये पेढे वाटले. माझ्यासमोर येऊन अवघडून म्हणाला, ‘सर! एक काम होतं... एक रिक्वेस्ट होती, गैरसमज करून घेऊ नका... जमत नसेल तर नाही सांगा, मला वाईट वाटणार नाही...’’ मला वाटलं त्याला बहुतेक पैशांची गरज असावी; पण त्याने जे काही सांगितलं तेव्हा तो मला खरोखरच ‘बाप माणूस’ वाटला...
दत्ता माझ्या टेबलासमोर येऊन उभा राहिला आणि त्यानं पेढे पुढे केले. मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, ‘वा! अभिनंदन दत्ता... पण पेढे कशाबद्दल?’ दत्ता म्हणाला, ‘मुलगा इंजिनिअरिंग पास झाला...’ मी पेढा खात खात दत्ताचं तोंडभरून अभिनंदन केलं...
दत्ता आमच्या ऑफिसमधला ज्येष्ठ आणि अनुभवी प्यून. सध्या त्याला ऑफिस असिस्टंट या पदावर बढती मिळाली होती. अतिशय कामसू, प्रामाणिक, मनमिळावू आणि नेहमी हसतमुख... त्याच्या मुलाला इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली हे ऐकून आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला. आम्ही गमतीने म्हटलं, दत्ता पार्टी पाहिजे! तर दत्ता हसतमुखाने म्हणाला, देऊ की!
त्याचा पगार आमच्या सर्वांपेक्षा सर्वांत कमी होता, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी जो आनंद असे, जी प्रसन्नता असे ती किती तरी जास्त पगार असून आम्हालाही कधी जमली नाही...
दत्ता माझ्या टेबलाशीच घुटमळत होता आणि निघताना अवघडून म्हणाला, ‘‘सर! एक काम होतं...’’ मी म्हणालो, ‘‘बोल ना! काय काम आहे?’’ तो म्हणाला, ‘‘तुम्हाला एक रिक्वेस्ट होती... गैरसमज करून घेऊ नका... जमत नसेल तर नाही सांगा, मला वाईट वाटणार नाही...’’ मला वाटलं त्याला बहुतेक पैशांची गरज असावी... मुलाचं पुढलं शिक्षण करण्यासाठी, ॲडमिशनसाठी त्याला पैसे हवे असतील, या समजुतीने मी त्याला थेट प्रश्न विचारला, ‘‘पैशांची अडचण आहे का? किती पैसे कमी पडतायत?’’
दत्ता गोंधळात पडला. म्हणाला, ‘नाही सर.. पैसे नकोत...’
दत्ताला बरंच काही बोलायचं असावं, पण तो धड बोलू शकत नव्हता. तोच इतका अवघडला होता, की त्याच्या मनातली अवघड गोष्ट मला सांगणं त्याला जास्त अवघड जात होतं! मी हसलो. म्हणालो, ‘दत्ता, तू टेन्शन घेऊ नकोस... आपण आज का एकमेकांना ओळखतो आहोत? तू आधी बैस...’
तो समोरच्या खुर्चीवर बसायला तयारही नव्हता, पण मी त्याला जबरदस्ती बसवलंच. दत्ता बसला आणि हळू आवाजात सावकाश बोलू लागला... माझी प्रतिक्रिया कशी असेल, मला काय वाटेल, माझा गैरसमज तर होणार नाही ना, अशा सावध पद्धतीने तो एक एक वाक्य बोलत होता. त्याचं ते एक एक वाक्य आणि ते ऐकून मला त्याच्या मनातल्या गोष्टी हळूहळू समजणं हे माझ्यासाठी अद्भुत होतं. मला दत्तामधल्या एका वेगळ्याच भावविश्वाची, एका वेगळ्याच पालकाची ओळख पटत होती. दत्ता हा केवळ दत्ता नव्हता तर वडील म्हणून, बाबा म्हणून किती तरी ग्रेट होता हे माझ्या त्या दिवशी लक्षात आलं!
दत्ता सांगू लागला...
दत्ताची परिस्थिती जेमतेमच होती. एका बकाल वस्तीतल्या बैठ्या चाळीत त्याची सिंगल रूम होती. त्याच्यासाठी आनंदाची आणि सुखाची गोष्ट म्हणजे ती त्याच्या मालकीची होती. त्याला नोकरी होती म्हणून त्याच्या संसाराचा गाडा सुरू होता. दत्ताची पत्नी पूर्वी लोकांकडे घरकाम करे. चार पैसे कमवे जे दत्ताला मोठा आधार होते. ती काही वर्षांपूर्वी निधन पावली. मग इंजिनिअरिंगला असलेल्या मुलाचा आणि शाळेत जाणाऱ्या मुलीचा सर्व सांभाळ दत्तानेच केला. तोच त्यांची आई झाला आणि तोच त्यांचा बाबा होता. मुलाप्रमाणे मुलीची प्रगतीही उत्तम सुरू होती. ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेई. तिला बक्षीस मिळालं की दत्ता आवर्जून आम्हाला ते सांगे. मुलगा इंजिनिअरिंग पास झाला याचं दत्ताला अप्रूप होतं, पण त्याला काही तरी चांगलं गिफ्ट द्यावं, अशी त्याची मनोमन इच्छा होती. म्हणून त्यानं मुलासाठी एक बाईक बुक केली. ती बाईक दत्ता ईएमआयवर घेणार होता. ही बाईक दोनतीन दिवसांत मिळणार होती. मुलाकडे चांगला आणि स्मार्ट मोबाईल फोन नव्हता. मुलासाठी लेटेस्ट मोबाईल फोन घ्यावा, अशी त्याची खूप इच्छा होती, पण आपणच सगळ्या गोष्टी भेट म्हणून दिल्या तर त्या भेटीचं मोल कमी होईल असं दत्ताला वाटत होतं.
दत्ता थेट म्हणाला, ‘‘साहेब, मोबाईलचे पैसेसुद्धा मी जमा केले आहेत... पण हा मोबाईल मी भेट दिला असं त्याला वाटता कामा नये... कारण त्याला असं वाटू शकतं, की आपले वडील आहेत... त्यांना कौतुक वाटणारच... केवळ मीच त्याला गिफ्ट दिल्या तर त्याला पुरेसं प्रोत्साहन मिळणार नाही... त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याला अजून काही जणांकडून गिफ्ट मिळाल्या तर बरं होईल, असं मला वाटतं...’’
माझ्यासाठी हा नवीनच प्रकार होता!
मी म्हटलं, ‘‘तुझ्या मनात काय आहे दत्ता?’’
तो म्हणाला, ‘साहेब... मी माझ्या मुलाला पुढल्या आठवड्यात तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ऑफिसमध्ये घेऊन येतो... तुम्ही प्लीज पुढाकार घ्या... सर्वांना विश्वासात घ्या... मी त्याला हवा होता तो मोबाईल आधीच विकत घेतला आहे... तो तुम्ही तुमच्या हस्ते ऑफिसतर्फे म्हणून त्याला गिफ्ट करा... तुम्ही त्याचं कौतुक केलं तर त्याच्या अंगावर मूठभर मांस अधिक चढेल, त्याला खूप छान वाटेल... मी काय साहेब घरचा पडतो! पण तुम्ही साहेब लोकांनी केलेला सत्कार, तुम्ही केलेलं कौतुक त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. त्याला कायम प्रोत्साहन देईल... तो पुढे अजून काही तरी चांगलं करेल... प्लीज नाही म्हणू नका...’
दत्ताने माझ्यापुढे अक्षरशः हात जोडले. माझे डोळे भरून आले होते आणि काळीज हललं होतं...
मी त्याचे जोडलेले हात हातात घेतले आणि म्हणालो, ‘आपण नक्की काही तरी चांगलं करू... तू माझ्यावर सोड... तू त्याला इथं कधी आणतोयस तेवढं मात्र सांग!’
दत्ता म्हणाला, ‘‘त्याचं पुढल्या ॲडमिशनचं चाललं आहे... पुढे शिकायचं की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आलेला जॉब करायचा, हेही तो ठरवतो आहे... पण पुढल्या आठवड्यात मी त्याला घेऊन नक्की येतो...’
दत्ता निघून गेल्यावरही मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतो... एका पालकाचं प्रेम आणि समजूतदारपणा मी नुकताच अनुभवला होता. मोबाईल विकत घेण्याचं श्रेय त्याचं होतं; पण मुलाचं मोठेपण आणि कौतुक अधोरेखित व्हावं, म्हणून त्यानं ते श्रेय सहजपणे सोडलं आणि आमच्याकडे ते आणून दिलं... केवढी मोठी गोष्ट होती ही!
मी ऑफिसमधल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांशी बोललो. सर्वांनाच दत्ताच्या मुलाचं आणि त्याहीपेक्षा जास्त दत्ताचं कौतुक वाटलं. दत्ताच्या मुलाचा सत्कार करताना दत्ताचाही सत्कार करावा, अशी कल्पना मी मांडली. कारण एखाद्या पाल्याचा सत्कार होतो तेव्हा त्याचं श्रेय पालकांचंही असतंच. मग पालकांचा सत्कार का नको? मुलाचे इंजिनिअरिंग यशस्वीपणे पार पाडण्यात दत्ताचे यश होतेच. विशेषतः तो ती जबाबदारी एकट्याने पार पाडत होता... दत्ताचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून आम्ही दत्तानेच आणलेला मोबाईल मुलाला भेट म्हणून दिला, त्याचा सत्कार केला. दत्ताचा मुलगा खूप खुश झाला, पण त्या दिवशी आम्ही अजून एक सरप्राईज ठेवलं होतं... ते म्हणजे दत्ताचा सत्कार. दत्ताकडे स्वतःकडे स्मार्टफोन नव्हता. आम्ही सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन काढून दत्ताला त्या दिवशी मुलगा इंजिनिअरिंग झाल्यानिमित्त मोबाईल भेट दिला! दत्ताच्या डोळ्यातला आणि चेहऱ्यावरचा त्या दिवशीचा आनंद आजही माझ्या डोळ्यापुढून हलत नाही... तो दिवस आमच्या ऑफिससाठी अविस्मरणीय होता!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.