पालकत्व हे उक्तीकडून कृतीकडे जेव्हा येतं, तेव्हाच ते यशस्वी ठरतं आणि मुलंसुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.
पालकत्व हे उक्तीकडून कृतीकडे जेव्हा येतं, तेव्हाच ते यशस्वी ठरतं आणि मुलंसुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. आपण उंचावर बसून राहून अधिकारवाणीने जेवढ्या सूचना करतो तेवढ्या सगळ्या वाया जातात. आपण मुलांबरोबर रमलो, मुलांना समजून घेतलं, मुलांची भाषा, मुलांचे अनुभव ऐकत राहिलो की आपल्याला मुलांचा प्रवास आणि त्यांच्या प्रवासातले अतिशय सुंदर टप्पेसुद्धा उलगडत जातात...
गोष्ट माझी, एका पालकांशी व्हाट्सॲपवर झालेल्या देवाणघेवाणीची आहे... दिवस रविवारचा होता. घरातले सगळेच मस्त सैलावलेले होते. ते दृश्य मोठं गमतीदार होतं. मुलांचे बाबा कोचावर बसले होते. आई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. मुलं मस्तपैकी जमिनीवर खेळणी मांडून खेळत होती. पालकांच्या कार्यशाळेत भेट झाल्यामुळे मुलांचे बाबा माझ्या परिचयाचे. मला त्यांनी व्हाट्सॲपवर सेल्फी पाठवला आणि मेसेजमध्ये सांगत होते, की मी रविवारचा दिवस हा मुलांसाठी आणि पत्नीसाठी देतो. दुसरं काही काही करत नाही... जगी सर्व सुखी, असा कोण आहे? याचे उत्तर ‘आम्हीच ’ असं आहे, असा पुढचा मेसेज होता!
मी उत्तरादाखल हात जोडले...
गमतीने मी त्यांना म्हटलं, ‘तुम्हाला आदर्श पालकांचा पुरस्कार द्यायला पाहिजे!’
तर त्यांनी स्माईली पाठवली... आणि ते मेसेजमध्ये पुढे म्हणाले, ‘मी चांगला पालक म्हणून वागण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करतो. आज आमच्या ऑफिसमधल्या मित्रांचं गेट-टुगेदर आहे. पण मी ठरवलं की जायचं नाही. आपला सगळा वेळ आज फॅमिलीबरोबर काढायचा... तुम्ही पालकांचे मार्गदर्शक आहात... तुम्हीच ठरवा, की मी आदर्श पालक आहे की नाही? तुम्ही मला पुरस्कार दिला, तर मला आनंद होईल...!’
त्यासोबत त्यांनी पुरस्काराचा चषक पाठवला!
मी त्यांना विनोदानं म्हटलं, की ‘तुम्ही पाठवलेल्या फोटोचं मी परीक्षण करून तुम्हाला पुरस्कार द्यायचा की नाही हे ठरवतो! चालेल का?’
त्यावर त्यांचा होकार आला!
मग त्यांच्यात आणि माझ्यात व्हाट्सॲपवरच संवाद सुरू झाला...
‘तुम्ही ऑफिसमध्ये बैठे काम करता का?’ माझा प्रश्न.
‘हो’ ते म्हणाले.
‘का?’ त्यांचा प्रतिप्रश्न आलाच!
‘कारण घरातसुद्धा तुम्ही बसून आहात!’, त्यांनी पाठवलेल्या फोटोचं निरीक्षण करत मी सांगितलं.
माझ्या म्हणण्यावर त्यांचा चेहरा पडला.
‘तुम्ही ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर काम करता का? म्हणजे बॉस वगैरे आहात का?’ मी त्यांना विचारलं.
ते ‘हो’ म्हणाले.
‘तरीच!’ मी मिश्कीलपणे म्हणालो.
‘होय मी माझ्या ऑफिसमध्ये बॉस आहे... पण माझ्या बॉस असण्याचा घरी पालक असण्याशी काय संबंध?’ असं त्यांनी विचारलं!
त्यावर मी त्यांना म्हणालो,
‘होय! संबंध आहे... कारण तुम्ही उंचावर बसलेले आहात आणि मुलं सबॉरडीनेट असल्याप्रमाणे, तुमच्या हाताखाली काम करत असल्याप्रमाणे जमिनीवर बसली आहेत! तुम्ही आणि तुमची मुलं समान उंचीवर बसायला हवं. मुलं जर जमिनीवर खेळत असतील, तर पालकांनीसुद्धा जमिनीवर मांडी ठोकून त्यांच्याबरोबर समरसतेने खेळायला हवं. पण तुम्ही तसं केलेलं नाही... तुम्ही मुलांपासून वेगळे बसलेले आहात. एका उंचीवर आहात. यातून वडील घरात आहेत, एवढाच मेसेज मुलांपर्यंत जातो. पण तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर खाली बसता... त्यांच्याबरोबर खेळायला लागता, त्यांच्या खेळातला एक भाग होता, त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा आणि मुलांचा रविवार कारणी लागला असं मी म्हणेन. मग तुम्हाला आणि मुलांना जी गंमत येईल ती केवळ आणि केवळ अद्भुत असेल!’
माझ्या म्हणण्यावर ते विचारात पडले.
‘या पैलूचा मी कधी विचारच केला नव्हता’ त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं.
मी माझं म्हणणं अधिक खोलात जाऊन विशद केलं.
‘उत्तम संवादामध्ये समान उंचीवरून, समान स्तरावरून संवाद साधला जाणं हे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या संवादाची ही पूर्वअट आहे. तुम्ही खालून वर आणि वरून खाली असा संवाद साधता तेव्हा त्याला आदेशाचं आणि आदेश पालनाचं स्वरूप येतं. समान उंचीवर, समान स्तरावर जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा त्यामध्ये विश्वास, आदर, प्रेम... हे सर्व काही येतं. ते मुलांना मनापासून आवडतं आणि हवं असतं!’
‘म्हणजे, मी आदर्श पालक पुरस्कारापासून अजून बराच दूर आहे तर!’, असं त्यांनी खंतावून म्हटलं.
‘अहो असं काय करताय, पालकत्व हाच एक पुरस्कार आहे! खूप मोठा पुरस्कार आहे... वेगळं आदर्श पालक व्हायची काही गरज नाही... आपण पालकत्वाला पुरेपूर न्याय देणं महत्त्वाचं आहे. पालकत्वाची स्पर्धा होऊच शकत नाही...’ मी त्यांची समजूत घातली.
‘अजून काही तुमचं निरीक्षण आहे का?’ त्यांनी उत्सुकतेने विचारलं.
मी म्हटलं ‘‘हो, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर अजून एक निरीक्षण मी मांडतो.’
‘हो! प्लीज सांगा...’ ते म्हणाले. त्यांना माझ्या सूचना बहुतेक आवडल्या होत्या.
‘तुम्ही पाठवलेल्या सेल्फीमध्ये मुलांची आई एकटीच स्वयंपाक करताना दिसते आहे... त्याही नोकरी करतात. त्यांच्या कामाला जर आपण सर्वांनी मिळून मदत केली असती... हातभार लावला असता... तर ते अधिक पूर्ण चित्र दिसलं असतं!’ मी म्हटलं.
त्यांनी मान डोलावली. खुलेपणाने त्यांनी माझी ही सूचनाही स्वीकारली.
ते म्हणाले, ‘पुढच्या रविवारी आम्ही सर्व जण मिळून स्वयंपाक करू... प्रॉमिस!’
मी त्यांना हसून प्रतिसाद दिला.
व्हाट्सॲप संवादाचा समारोप करता करता एवढंच सांगितलं, की ‘पालकत्व हे उक्तीकडून कृतीकडे जेव्हा येतं, तेव्हाच ते यशस्वी ठरतं आणि मुलंसुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वी होतात... आपण उंचावर बसून राहून अधिकारवाणीने जेवढ्या सूचना करतो तेवढ्या सगळ्या वाया जातात... हेच आपण मुलांबरोबर रमलो, मुलांना समजून घेतलं, मुलांची भाषा- मुलांचे अनुभव ऐकत राहिलो की आपल्याला मुलांचा प्रवास आणि त्यांच्या प्रवासातले अतिशय सुंदर टप्पेसुद्धा उलगडत जातात. अशा वेळी केलेल्या सूचना मुलं मनापासून स्वीकारतातही... मग रविवार असो की सोमवार, आठवड्याच्या कोणत्याही दिवशी आपण पालकत्व एन्जॉय करतो. पालकत्वाचा मनमुराद आनंद घेतो.’
थोड्या वेळाने त्या पालकांचा एक सेल्फी आला, ज्यात ते मुलांबरोबर जमिनीवर बसून खेळत होते!
त्यात त्यांनी म्हटलं होतं,
‘पालक म्हणून तुम्ही आज मला खरोखरच जमिनीवर आणलं आहे! थँक यू सो मच...’
मी त्यांना हसून प्रतिसाद दिला.
sanjeevlatkar@hotmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.