स्वयंप्रेरणेने हवा व्यक्तिमत्वविकास!

माझ्या दोन्ही मुलांमध्ये आत्मविश्वास नाही, ती लोकांमध्ये मिसळत नाहीत, अशी तक्रार घेऊन एक बाई माझ्याकडे आल्या होत्या. पुढच्या आठवड्यात त्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्याकडे आल्या.
Self motivated personality development
Self motivated personality developmentsakal
Updated on
Summary

माझ्या दोन्ही मुलांमध्ये आत्मविश्वास नाही, ती लोकांमध्ये मिसळत नाहीत, अशी तक्रार घेऊन एक बाई माझ्याकडे आल्या होत्या. पुढच्या आठवड्यात त्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्याकडे आल्या.

माझ्या दोन्ही मुलांमध्ये आत्मविश्वास नाही, ती लोकांमध्ये मिसळत नाहीत, अशी तक्रार घेऊन एक बाई माझ्याकडे आल्या होत्या. पुढच्या आठवड्यात त्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्याकडे आल्या. रोहित आणि रीमा या दोघांशी छान गप्पा मारल्या, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या; परंतु पालकांच्या आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी ते दोघेही त्यांच्या परीने स्वतःहून प्रयत्न करत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे त्यांना सध्या तरी मदतीची गरज नसल्याचे त्यांच्या पालकांना समजून सांगितले.

रोहित आणि रीमा यांची भेट लवकरच घडून आली... दोघेही माझ्यासमोर बसले होते.

बाजूला दुसऱ्या कोचवर त्यांचे आई-बाबा बसले होते...

मी रोहितशी गप्पा सुरू केल्या. त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत होतो. त्याची आवड काय? त्याचे छंद कोणते? तो चित्रपट कोणते पाहतो? त्याला गाणी आवडतात का? कोणत्या प्रकारची गाणी आवडतात?

रोहितचा कल फोटोग्राफीकडे दिसत होता. त्याने फोटोग्राफीबद्दल खूप सारी माहिती जमा केली होती. त्याच्याकडे वडिलांनी घेऊन दिलेला एक चांगला कॅमेराही होता. त्याच्या बाबांनी कौतुक करता करता सांगितलं की, त्या कॅमेऱ्यातून रोहितनं खूप चांगले फोटोही काढले होते. तो फोटोग्राफीची मासिकं, पुस्तके वाचत होता आणि नेटवरूनही तो फोटोग्राफीबद्दल नियमित माहिती जमवत होता...

या गप्पा सुरू असताना त्यात रीमाही सहभागी झाली. आई-बाबा मात्र गप्प होते. त्यामुळे माझा दोन्ही मुलांशी संवाद सुकर झाला. मुलांच्या आवडीचा विषय मी काढत होतो. मग मुलं त्यावर रंगून बोलत होती. रीमाला जुनी हिंदी गाणी आवडत. मग आम्ही जुन्या हिंदी गाण्यांवरही गप्पा मारल्या...

रीमाला जुन्या हिंदी गाण्यांची बऱ्यापैकी माहिती होती. म्हणजे कोणतं गाणं कोणी गायलंय, ते कोणत्या चित्रपटातलं आहे, ते कोणावर चित्रित झालंय, संगीतकार कोण, गायक कोण, त्या गाण्याचा इतिहास, त्यातल्या गमती-जमती... अशी खूप माहिती तिला होती. तिची स्मरणशक्ती आणि तिच्याकडची माहिती पाहून मी अक्षरशः अचंबित झालो!

मी तिला सहज विचारलं की, ‘तुझ्याकडे इतकी सगळी माहिती आहे, तर मग जुनी हिंदी गाणी तू गात का नाहीस?’

त्यावर ती संकोचली आणि हसत हसत म्हणाली, ‘छे छे मला नाही जमत गायलाबियला...’

इतका वेळ शांत बसलेल्या आईला आता मात्र गप्प बसवेना...

‘तेच तर मी तिला सांगते आहे किती दिवस! इतकी सगळी माहिती आहे... पण उपयोग काय? आज तुम्हाला म्हणून तिने माहिती सांगितली... बाकीच्यांपुढे तर तोंडच उघडत नाही... फार सुंदर गाता येत नसलं तरी काय झालं? चार चौघांना बरं वाटेल असं तर गाता येईल ना? नातेवाईक जमले... मित्र-मैत्रिणी जमले की गायला मजा येते... बरं वाटतं... मी तिला अनेकदा म्हटलं, की तुला गाण्याच्या क्लासला पाठवते... तुला इतकी आवड आहे तर तू गा! आणि जुन्यापेक्षा नवी गाणी गा! जुन्या गाण्यांचं कौतुक आता राहिलं नाही हो पूर्वीसारखं...’

आई बोलू लागल्या आणि दोन्ही मुलं गप्प झाली...

आई बोलतच होत्या. कारण त्यांना खूप आणि मनापासून बोलायचं होतं. त्या आता रोहितबद्दल बोलू लागल्या...

‘आणि रोहित तर काही बोलतच नाही! आता इतके समारंभ होतात... लग्न होतात... आम्ही सहलीला जातो... म्हटलं बरोबर कॅमेरा घेऊन चल. तुझी फोटोग्राफी दाखव लोकांना. कळू दे सगळ्यांना की तू चांगला फोटोग्राफर आहेस... तुलाही चांगली प्रॅक्टिस होईल... पण अशा वेळी तो कॅमेरा हातातसुद्धा घेत नाही...’

बाबा इतका वेळ शांत बसले होते; पण त्यांनाही बोलावंसं वाटत असावं. कारण ते थोडे चुळबुळत होते. मी त्यांना बोलण्याची विनंती केली. ते म्हणाले...

‘मुलं स्वतःमध्ये रमलेली असतात; पण लोकांमध्ये रमत नाहीत, ही त्यांच्या आईची तक्रार आहे... माझंही मुलांसारखंच आहे. मी खूप कमी बोलतो आणि उगीच उठून चारचौघांना भेटायला जावं, असाही माझा स्वभाव नाही. माझे मित्र मोजकेच आहेत; परंतु ते मी गेली अनेक वर्षे जपले आहेत... मुलांमध्ये हा जर दोष आला असेल, तर तो माझ्यामुळे आला हे मला मान्य आहे... पण तो दूर करण्यासाठी काय करायला हवं, हे मला माहिती नाही...’

बाबा प्रांजळपणे म्हणाले.

‘मी थोडं बोलू का?’, रोहितनं अदबीने विचारलं.

मी होकार देताच तो बोलू लागला...

‘मम्मीचं म्हणणं असं आहे की आम्ही स्मार्ट नाही आणि आम्ही स्मार्ट दिसायला हवं, स्मार्ट वागायला हवं, स्मार्ट बोलायला हवं... रीमाचं रीमा सांगेल... पण माझ्याबद्दल मी एवढेच म्हणेन की मला चमकोगिरी आवडत नाही. मी सगळ्यांशी बोलतो; पण स्वतःबद्दल खूप आणि जास्त सांगणं मला आवडत नाही... कारण मी अजून शिकतो आहे... मम्मीची इच्छा आहे की मी फोटोग्राफर म्हणून ओळखलं जावं... पण त्यालाही खूप वेळ आहे. कॉलेज संपल्यावर मी फॉर्मल फोटोग्राफी शिकणार आहे. त्यानंतर फोटोग्राफीतील चांगले अभ्यासक्रम शिकणार आहे... मी खूप नावाजलेल्या आणि आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरचं काम पाहतो, तेव्हा कळतं की मला खूप काम करायचं आहे. ते खरे फोटोग्राफर!

मी तर अजून ट्रेनी फोटोग्राफरसुद्धा नाही... मम्मीला वाटतं की मी चांगले एटिकेट्स शिकून घ्यावेत; पण काट्याचमच्याने जेवण्यापेक्षा मला हाताने जेवायला आवडतं... कुठे गेट-टुगेदरला गेलो... फॅमिली फंक्शनला गेलो की मी मिक्स होण्याचा प्रयत्न करतो; पण लोक एकमेकांबद्दल इतक्या कुचाळक्या करत असतात, इतकं गॉसिप सुरू असतं की त्याचाही कंटाळा येतो. शिवाय तो एज ग्रुप वेगळा पडतो. माझ्या एज ग्रुपच्या मुलांशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो; पण खूपदा प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं. बोलण्यालासुद्धा कॉमन विषय गरजेचे असतात... कॉमन विषय नसतील तर काय बोलणार, असा प्रश्न येतो. बहुतेकदा माझ्या वयाची मुलं मोबाईलवर दिसतात. मला मोबाईल फार वापरायला आवडत नाही... तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझा सोशल मीडियावरचा वावरसुद्धा खूप कमी आहे... मम्मीला मी हे सगळं सांगण्याचा खूप प्रयत्न केला; पण तिला असं वाटतं की माझ्यात कॉन्फिडन्स नाही... वास्तविक असं नाहीये...’

रीमाचंही तेच म्हणणं होतं!

तिला हिंदी ही विशेष भाषा घेऊन एमए करायचं होतं. तिला हिंदी भाषा खूप आवडते. त्यामुळे तिला हिंदीमधून कादंबऱ्या लिहाव्यात, हिंदीमधून गाणी लिहावीत असं वाटतं. ती थोडं फार हिंदी लेखन करूही लागली आहे, हेही तिने सांगितलं आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत रोहितने जे सांगितलं तेच तिनंही सांगितलं.

मी त्यांच्या आईकडे वळून त्यांना म्हणालो की ‘तुमची मुलं गुणी आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व संपन्न आणि उत्तम आहे. व्यक्तिमत्त्व हे आतून सुंदर आणि आनंदी असावं लागतं. मला दोघेही तसेच असल्याचं स्पष्ट जाणवतं आहे. तुमच्या दोन्ही मुलांना दिखाऊपणा जमत नाही. दिखाऊपणाने जोडलेली नाती ही शेवटी दिखाऊच असतात. तुमची दोन्ही मुलं ही अंगात उत्तम गुण आणि समजूतदारपणा असलेली आहेत. तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या चुकीच्या नव्हेत, पण त्या गोष्टींनी यांचं कधीच काही अडणार नाही... शेवटी आपण आपल्या कर्तृत्वाने आणि गुणवत्तेने ओळखलं जाणं हे महत्त्वाचं आहे. भपकेबाज किंवा दिखाऊपणाचा प्रभाव हा तात्पुरता असतो... आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना याची उत्तम जाणीव आहे... तुमच्या अपेक्षा मुलं एक दिवस नक्की पूर्ण करतील; पण सध्या ती जे काही काम करतायत ते उत्तम आहे, याची तुम्ही खात्री बाळगा...’

मी माझं बोलणं संपवताना त्यांना म्हणालो,

‘व्यक्तिमत्त्व संपन्न करण्यासाठी बाह्य प्रयत्न हे जरूर लागतात... मदत नक्की लागते... पण केव्हा? जेव्हा व्यक्तिमत्त्वविकासाचे व्यक्तीचे आपले स्वतःचे प्रयत्न हे कमी पडतात तेव्हा; पण तुमची दोन्ही मुलं स्वतःहून हे प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांना माझ्या मदतीची सध्यातरी गरज नाही... त्यांचं उत्तम चाललंय!’

मुलांच्या आईच्या मनात असलेल्या व्यक्तिमत्त्वविकासाच्या कल्पना त्या दिवशी बदलल्या असतील, अशी अपेक्षा ठेवून मी त्यांचा निरोप घेतला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.