तुमचे मिशन आणि तुमचा विचार...

आपण विचार काय आणि कसा करतो याला खूप महत्त्व आहे... आपण काय आणि कसा विचार करतो याचं आपण निरीक्षण करण्याची सवय लावण्याला त्याहून जास्त महत्त्व आहे...
तुमचे मिशन आणि तुमचा विचार...
Updated on
Summary

आपण विचार काय आणि कसा करतो याला खूप महत्त्व आहे... आपण काय आणि कसा विचार करतो याचं आपण निरीक्षण करण्याची सवय लावण्याला त्याहून जास्त महत्त्व आहे...

आपण विचार काय आणि कसा करतो याला खूप महत्त्व आहे... आपण काय आणि कसा विचार करतो याचं आपण निरीक्षण करण्याची सवय लावण्याला त्याहून जास्त महत्त्व आहे... आणि आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण असण्याला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपण चुकीचा विचार पुन:पुन्हा करतो, तेव्हा तो विचार आपली वृती, प्रवृत्ती बनतोच; पण तोच आपल्या कृतीचे कारण बनतो. स्वाभाविकच आपल्या चुकीच्या कृतीमागे चुकीचा विचार असतो; पण आपल्याला अनेकदा कळतही नाही, की आपल्या चुकीचं मूळ चुकीच्या विचारांत दडलंय...

प्रश्न आणखी जटील होतो जेव्हा आपल्या भावना, प्रतिक्रिया, स्वभाव हे सगळं चुकीच्या विचारांवर उभं राहतं! आपल्या जवळची माणसं आपण चुकतोय हे सांगण्याचा अनेकदा प्रयत्न करतात; पण आपण त्यांचं म्हणणं ऐकण्याच्या मनःस्थितीत असतोच असं नाही. कारण आपण जो विचार करतोय, तो बरोबरच आहे अशी आपली ठाम धारणा असते. आपण चुकू शकत नाही, आपण कधीच चुकू शकत नाही, हा अहंकारसुद्धा आपला घात करू शकतो.

म्हणून मुळात चांगला विचार करण्याची आपल्याला सवय लावून घ्यावी लागते. त्याआधी चांगला विचार म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं. विचारात एक चुंबकत्व असतं. म्हणजे असं, की आपण आपोआपच आपल्यासारख्या विचार करणाऱ्या व्यक्तींशी चटकन जोडले जातो. कारण त्यांचे विचार आपल्या विचारांशी साधर्म्य राखणारे असतात. त्यांच्यामुळे आपली आपल्या विचारांवर असलेली निष्ठा आणखी मजबूत होते. आपल्याला आयुष्यभर आपल्या विचारांना बळ देणारी माणसं आजूबाजूला लागतात. त्यामुळे होतं असं, की चुकीचा विचार करणाऱ्या व्यक्तींचाही एक गट तयार होतो. आपण चुकीचा विचार करत असू, तर आपोआपच त्या गटाचा भाग होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला कोण सावरणार? आपण चुकीच्या मार्गावर चालतोय हे कोण सांगणार? आपल्याला मदतीचा हात देऊन योग्य विचार करायला कोण शिकवणार? आपल्याला योग्य मार्गावर कोण आणून सोडणार?

याचं उत्तर एकच!

आपण... आपणच आपल्याला योग्य विचारांचा राजमार्ग दाखवू शकतो.

विचार हे अचानक आकाराला येत नाहीत. तुमच्या श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमचं मूल्य, तुमच्या जीवननिष्ठा तुमचे विचार कळत-नकळत घडवत असतात. विचारांचा आणि आचारांचा प्रबळ असा आंतरिक संबंध असतोच. आपली कृती कशी योग्य आहे, हे आपण सर्व जगाआधी आपल्या स्वतःला पटवून देत असतो. कारण आपल्या विचारात आणि कृतीत तफावत निर्माण झाली की आपल्यात एक प्रकारची नैसर्गिक अस्वस्थता तयार होते. म्हणूनच आपण आपल्या चुकीच्या विचारांच्या भोवती प्रसंगी निरुत्तर करणाऱ्या युक्तिवादाची अभेद्य भिंत उभी करण्याचा प्रयत्न करतो, पण हीच अभेद्य भिंत आपली कोंडी करते. आपल्याला चांगल्या विचारांपासून, आचारांपासून, मुख्य म्हणजे चांगल्या माणसांपासून वेगळं पाडते!

स्वार्थ हे चुकीच्या विचारांचं मूळ आहे.

स्व हा प्रबळ राहणार आहे.

कारण स्व हेच आपल्या जगण्याचं मूळ आहे. स्व ही आपली प्रेरणा आहे. आपण स्व हित पाहणं नैसर्गिक आहे, पण आपण जेव्हा केवळ स्वतःचा, केवळ स्वतःच्या हिताचा आणि केवळ स्वतःच्या भल्याचा विचार करतो, त्यापुढे दुसऱ्याच्या हिताचा विचार क्षुल्लक मानतो, दुसऱ्यांच्या मताला, विचारांना आणि भावनांना जराही किंमत देत नाही, त्यांचा विचार करत नाही... तेव्हा आपण स्वार्थी झालेलो असतो. स्वार्थ हा तुम्हाला वैचारिक आणि भावनिकदृष्ट्या अंध बनवतो. स्वार्थामुळे तुम्ही पराकोटीचे आत्मकेंद्री होता आणि जगापासून तुटले जाता...

आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन ही माणसाला मिळालेली अत्यंत अप्रतिम अशी साधनं आहेत. तुमचा सदसद्विवेक सतत जागृत ठेवणे, हे माणूसपणाचं लक्षण आहे. कारण फक्त आणि फक्त माणसांमध्ये विवेक असतो आणि हा विवेक आपल्याला लोकांशी जोडून ठेवतो. विवेक आपल्याला विचारांचा आणि भावनांचा समतोल साधायला शिकवतो. म्हणून आधी आपला विवेक जागृत ठेवायचा. तो सतत जागा पाहिजे. तोच आपल्या विचारांचा आणि भावनांचा पहारेकरी आहे. तो झोपलेला आपल्याला परवडणार नाही. त्याला थोडी जरी डुलकी लागली, तरी चुकीचे विचार आपल्या विश्वात घुसखोरी केल्याशिवाय राहणार नाहीत. कधी कधी कमी श्रमात खूप धन, संपत्ती, श्रेय जमवण्याचा मोह होतो. शॉर्टकट मारण्याचा अनिवार मोह होतो. ती आपली सत्त्वपरीक्षा असते. ‘आजकाल जगात इतकं सज्जन, इतकं चांगलं राहून चालत नाही... नाही तर लोक आपला गैरफायदा घेतील’’ हा धमकी वजा सल्ला तुम्हाला देणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटतीलच, पण ते तुम्हाला त्यांच्या टोळीत घेण्यासाठी आतुर आहेत, हे समजून घ्या!

तुम्ही आयुष्यात जे मिशन स्वीकारलं आहे, ते स्वार्थी असेल तर ते तकलादूही असेल. त्यात वैश्विक हित असेल तर त्याला कधीच तडा जाऊ शकणार नाही. कारण वैश्विक हिताची दृष्टी प्राप्त होणं म्हणजे साक्षात ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होण्यासारखं आहे. असं मिशन तुम्हाला कधीच खच्ची होऊ देत नाही. उलट ते तुमची उमेद सतत जागी ठेवतं. तुमची उभारी, आशा, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती क्रियाशील ठेवण्याचं काम हेच मिशन करतं.

तुमच्या मिशनमध्ये स्वार्थ शिरला असेल, तर त्याला अलगद दूर करा. तुम्ही जितके स्वतःचे आहात, तितकेच तुम्ही समाजाचेही आहात हे सत्य स्वीकारा. लोकहिताचा विचार करण्याची वृत्ती अंगी भिनवा.

तुम्ही तुमच्या मिशनमध्ये यशस्वी व्हाल यात शंकाच नाही!

sanjeevlatkar@hotmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.