‘संजीवन’मधली मातृशक्‍ती

महाबळेश्वरहून मी परतीच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये चहा घेण्यासाठी पाचगणीला थांबलो. पाणी पिऊन गाडीत बसणार तितक्यात ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हे गाणं माझ्या कानावर पडलं.
shashikalatai thakar
shashikalatai thakarsakal
Updated on

महाबळेश्वरहून मी परतीच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये चहा घेण्यासाठी पाचगणीला थांबलो. पाणी पिऊन गाडीत बसणार तितक्यात ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हे गाणं माझ्या कानावर पडलं. मी त्या गाण्याच्या दिशेनं निघालो. सहासात मुलं गाणं म्हणत होती. त्यांचा आवाज छान होता.

गाणं शिकवणारे शिक्षक स्वप्नील गिराडकर यांना मी माझा परिचय देत मुलांच्या गाण्याबद्दल कौतुक केलं. गाण्यानंतर आमच्या सर्वांच्या खूप गप्पा झाल्या. अगोदर गाणं, मग शाळा, उपक्रम. त्या शाळेचा इतिहास, संस्कार आणि विशेष करून शशी टीचर यांच्या कामाचं कौतुक, हे सारं काही अद्‍भुत होतं. ते सारे जण पुन्हा गाण्यात रमले. ललित किर्लोस्कर व प्रसन्न फिरोदिया यांच्यापर्यंत अनेक मोठी माणसं या शाळेचे विद्यार्थी होते.

बाहेर एक शिक्षक मुलांना फुटबॉल शिकवत होते. मी त्यांना विचारले, ‘सर, या शशी टीचर कोण आहेत? मुलांकडून त्यांच्याविषयी मी खूप ऐकले आहे. त्यांना मला भेटायचे आहे.’ ते म्हणाले, ‘त्या आमच्या संस्थेच्या चेअरमन आहेत.’ माझ्याशी बोलणारे सचिन कांबळे हे क्रीडा शिक्षक एकदम हाडाचे शिक्षक होते. आम्ही बोलत बोलत शशी टीचरकडे गेलो. सरांनी माझी शशी टिचर यांच्याशी ओळख करून दिली आमचं बोलणं सुरू झालं.

संजीवन विद्यालयाचा इतिहास १०२ वर्षांचा होता. शशी टीचर यांचं सध्याचं ९२ वर्षांचं वय, त्यामागं असलेला खूप मोठा इतिहास. शशिताई यांचा आजही कामात असलेला हातखंडा? पुढची दोनशे वर्षे नेमके काय करायचं हे त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न, ते सारं केलेलं आणि होणारं काम ऐकून मी थक्क झालो होतो.

मी टीचरला विचारले, ‘ही डायरी कशाची आहे?’ त्या म्हणाल्या, ‘पंधरा वर्षांपूर्वी आम्ही गडचिरोली भागातील १०० मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली होती. ती सर्व मुले येथे शिकून आज मोठमोठ्या पदांवर जिकडेतिकडे गेली. जाताना त्या मुलांनी मला एक डायरी लिहून दिली. त्यांचे फोटो, त्यांनी माझ्यावर, शाळेवर केलेल्या कविता, आठवणी या डायरीमध्ये आहेत. या मुलांनी मला फार जीव लावला होता. प्रचंड प्रामाणिक होती ही मुले.’

असे म्हणत त्या टीचर त्या मुलांच्या आठवणीत आलेले अश्रू पुसत होत्या. शशी टीचर यांच्या वडिलांनी दिलेल्या पेंटिंगचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे, असे त्या सांगत होत्या. शशिकलाताई नारायण ठकार (९६३७८३६६६१) या पाचवीला, त्यांचे नातेवाईक असलेले कृष्णराव पंडित आणि महादेव पंडित यांच्या पाचगणी येथील संजीवनी शाळेत शिकायला आल्या.

शशिकला यांची आई निर्मला आणि वडील नारायण हे दोघे शिक्षक होते. शशी टीचर यांच्यावर महात्मा गांधी यांच्या सामाजिक विचारांचा फार पगडा होता. उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांना अनेक ठिकाणांवरून खूप मोठ्या संधी चालून आल्या; पण शशी टीचर यांनी ठरवलं, आपण अवघं आयुष्य नवी पिढी घडवण्यासाठी वेचायचं. संजीवन शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. आज त्या संजीवन ट्रस्टच्या चेअरमन आहेत.

येथे गरीब, बहुजनांची या भागातली मुले शिकतात. या शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी देशाच्या सर्वच स्थानांवर पोहोचले आहेत. संजीवनमध्ये नियमित शिक्षणाशिवाय क्रीडा, कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जातो. संजीवन विद्यालय पहिली खासगी मालकी असलेली संस्था होती.

शशी टीचर यांनी संस्थेचं रूपांतर एका ट्रस्टमध्ये केले. २२ एकर परिसर असलेल्या या संस्थेत हिंदू संस्कृतीचे जतन करणारी गुरुकुल पद्धती आजही अस्तित्वात आहे. शशी टीचर यांनी त्यांच्या सामाजिक कार्यात बाधा येईल, शाळेच्या कामाची, युवक घडवण्याच्या प्रक्रियेला खीळ बसेल, म्हणून आयुष्यभर लग्न केले नाही. ९२ वर्षे संपली तरी त्या अजूनही स्वतः सर्व पाहतात.

शशी टीचर त्या पवित्र संजीवन नावाच्या मंदिराच्या पुजारी नव्हत्या तर तिथे शिकलेल्या त्या प्रत्येक मुलाच्या आई होत्या. आम्ही बोलताना शशी टीचर यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘‘कोरोना महासाथीच्या काळात शाळेची आर्थिक स्थिती खूप ढासळली आहे.

आर्थिक मदतीसाठी आम्ही अनेकांकडे गेलो; पण प्रतिसाद नाही. एकीकडे आम्ही पिढी घडवायचे काम करतो आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीमुळे उद्याचा दिवस काढायचा कसा, हा प्रश्नही येतोच येतो.’’ शशी टीचरने कांबळे सर यांना मला सर्व शाळा दाखवायला सांगितले.

तिथे असणाऱ्या प्रत्येक मुलानं एक स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न तिथल्या मंदिरमय वातावरणामुळे साकार होणार होते. पाचगणीच्या शाळा म्हणजे अवाच्या सवा फी, श्रीमंतांची शाळा, हे सारे समीकरण चुकीचे आहे, हे येथे आल्यावरच कळते. हे मी अनुभवत होतो.

संजीवन विद्यालयाचे प्राचार्य धनंजय शिरूर यांची त्या वेळी भेट झाली. आमच्याशी बोलताना शिरूर सर चित्रकलेच्या वह्या तपासत होते. माणुसकी आणि संस्कृती हे धोरण संजीवन शाळेचे होते, ते कसे हे अनेक उदाहरणांमधून प्राचार्य मला सांगत होते. आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तितक्यात ‘‘तुम्हाला शशी मावशीने बोलावले आहे. चला लवकर,’ असे म्हणत एक महिला तिथे आली.

कांबळे सर हे मला त्यांनी ओळख करून देताना म्हणाले, ‘या अनघा देवी टीचर शशी टीचर यांच्या बहिणीच्या कन्या आहेत. अगोदर येथे त्या शिक्षिका होत्या, आता विश्वस्त आहेत.’ मी म्हणालो, ‘मला शशी टीचरचे काळानुरूप केलेले निरीक्षण, निर्णय फार आवडले. त्या प्रत्येक वेळेला लागणाऱ्या घटकाची व्यवस्था करून ठेवतात.’

जशी शाळा, मुले, परंपरा, याची सांगड शशी टीचरने घातली होती. सेम तशीच सांगड अनघा देवी (९०४९९१९९१२) यांची होती. त्या आम्हाला घेऊन शशी टीचरकडे घेऊन जात होत्या. आम्ही शशी टीचरकडे पोहोचलो. मागच्या दोन तासांत शशी टीचरने माझ्यासाठी एका लिफाफ्यावर छान पेंटिंग केली होती. ज्या पद्धतीने त्यांनी जीव ओतून त्या स्वर्ग असणाऱ्या शाळेचे रूपांतर मंदिरामध्ये केले होते, तसेच त्या लिफाफ्यावर केलेल्या पेंटिंगचे होते.

मी ते पेंटिंग एका हातात घेतले. अन् दुसरा हात शशी टीचरच्या पायावर ठेवला. त्या सर्वांचा निरोप घेऊन मी संजीवन शाळेच्या बाहेर पडलो. मी विचार करत होतो, देशातल्या सर्व राज्यातून संजीवन शाळेनं मागच्या १०२ वर्षांत देश कुशलपणे चालण्यासाठी हजारो तरुण दिले. त्या शाळेसाठी शशी टीचर, अनघा देवी टीचर यांसारख्या अनेकानी आपलं आयुष्य वाहिले.

हे योगदान विसरून चालणार नाही. आज त्यांना आर्थिक मदत आणि पाठीमागे खंबीर राहणाऱ्या अनंत व्यक्तीची गरज आहे. आपल्या अवती-भोवती संजीवन शाळेसारख्या अनेक ऐतिहासिक असणाऱ्या शाळा आहेत, जिथे तुम्हा आम्हा सर्वांचा हातभार लावणे आवश्यक आहे. बरोबर ना...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.