तारीख २१ मे १९२२. लंडनच्या लॉइड्स इन्श्युरन्स कंपनीत एक तार आली - ‘इजिप्त’ जहाज त्याच्यावरच्या मालासकट बुडालं. आता नुकसानभरपाई द्यावी लागणार, ह्या कल्पनेने त्यांचं धाबंच दणाणलं.
तारीख २१ मे १९२२. लंडनच्या लॉइड्स इन्श्युरन्स कंपनीत एक तार आली - ‘इजिप्त’ जहाज त्याच्यावरच्या मालासकट बुडालं. आता नुकसानभरपाई द्यावी लागणार, ह्या कल्पनेने त्यांचं धाबंच दणाणलं. हे जहाज तर तसं जुनंच होतं; पण मग असं काय होतं त्यावर? पाहूयात.
१९ मे १९२२ रोजी ‘इजिप्त’ नावाचं ‘ पी अँड ओ’ कंपनीचं हे जहाज इंग्लंडच्या टिलबरी धक्क्यावरून मुंबईला जायला निघालं. सुमारे ५०० प्रवाशांची क्षमता असलेल्या या जहाजात फक्त ४४ प्रवासी होते.
प्रवाशांना माहीत नसलेली आणखीन एक गोष्ट त्या जहाजाच्या स्ट्राँगरूममध्ये होती - ती गोष्ट म्हणजे, सुमारे दहा लाख पौंड किमतीचं सोनं आणि चांदी; आणि लंडनमधून छापून घेतलेल्या सुमारे १० लाख रुपये किमतीच्या हैदराबाद संस्थानाच्या ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा.
हैदराबाद संस्थानाच्या नोटा? कसं काय? तर ऐका. पहिल्या महायुद्धात सोने-चांदीची कमतरता निर्माण झालेली असताना हैदराबादच्या निजामाने इंग्रजांना सुमारे २५ लाख पौंड किमतीचं सोनं-चांदी कर्ज म्हणून देऊ केलं होतं. या बदल्यात इंग्रजांनी निजामाला तेव्हढ्या किमतीच्या नोटा लंडनमधून छापून हैदराबाद संस्थानात त्या चालवण्याची परवानगी दिली होती. बाकी कोणत्याही भारतीय संस्थानिकाला (काही खास प्रसंगांची नाणी / मेडल्स सोडल्यास आणि तीही इंग्रजांच्या परवानगीने!) चलनी नाणी किंवा नोटा छापायची परवानगी नव्हती. निजामाच्या या नोटा लंडनमध्ये ‘वॉटरलो अँड सन्स’ नावाची कंपनी छापत असे (१८१० मध्ये सुरू झालेल्या आणि १९६१ पर्यंत टिकून राहिलेल्या या कंपनीचा इतिहासही वाचनीय आहे!). ह्या वॉटरलो अँड सन्सने छापलेल्या सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या हैदराबाद संस्थानाच्या ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा ‘इजिप्त’ जहाजावर होत्या.
२० मे १९२२ च्या पहाटे ‘इजिप्त’ फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. सकाळची वेळ. भरपूर धुकं. आसपासचं काहीच दिसत नव्हतं. इतक्यात धुक्यातच फ्रान्सचं ‘सीन’ नावाचं जहाज डावीकडून आलं आणि ‘इजिप्त’वर आदळलं. ‘सीन’ जहाजावर बर्फ कापायची यंत्रणा होती, त्यामुळे ‘इजिप्त’ डावीकडून अक्षरशः चिरलं गेलं. कोणी मदत करायच्या आधी फक्त २० मिनिटांत खजिन्यासकट ‘इजिप्त’ला जलसमाधी मिळाली!
‘इजिप्त’वरच्या खजिन्याची कल्पना सर्वांना होतीच. लगेचच तो शोधायची गडबड सुरू झाली. शेवटी सुमारे आठ वर्षांनंतर (म्हणजे १९३० मध्ये) ‘सोशिएटा रीक्युपेरी मारीट्टीमी’ (‘सोरिमा’) नावाच्या इटालियन कंपनीला त्याची जागा मिळाली. जिओव्हान्नी क्वाग्लिआ या माणसाची तो खजिना वर काढण्यासाठी नेमणूक झाली. या ‘इजिप्त’ जहाजाचा खजिना शोधायला म्हणून त्यांनी जे जहाज भाड्याने घेतलं त्याचं नाव ‘आर्टिग्लिओ’ होतं. पण, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता की, हा खजिना काढायचा कसा? ‘इजिप्त’ जहाज तर समुद्रतळाशी सुमारे १७० मीटर खोल बुडालेलं मिळालं होतं. इतक्या खोलवर डायव्हिंग करायची साधनं तेव्हा नव्हती; आणि पुढचा प्रश्न म्हणजे, त्या जहाजाला उभी समाधी मिळाली होती. खालच्या भागात खजिना असलेल्या स्ट्राँगरूमकडे सहजासहजी जाता येणार नव्हतं. बरं गेलं तरी ती स्ट्राँगरूम पाण्याखाली फोडून उघडायची कशी?
जिओव्हान्नीने ह्यावर शक्कल लढवली. त्याने सरळ डायव्हर्स पाठवून जहाजाच्या तळाशी असलेल्या स्ट्राँगरूमजवळ स्फोटकं लावली. त्यांचा स्फोट करून स्ट्राँगरूमच फोडली. मग डायव्हर्सच्या टोळ्या पाठवून हा खजिना वर काढणं सुरू झालं. मी चार-पाच वाक्यांत हे सगळं वर्णन लिहिलंय; पण हे काम सुरू होऊन संपायला पाच वर्षं लागली. २२ जून १९३२ रोजी पहिल्यांदा काही सोन्याच्या विटा वर काढण्यात जिओव्हान्नीला यश आलं. १९३५ पर्यंत सुमारे ९८ टक्के खजिना हाती लागला होता. बुडालेल्या सोनं-चांदीसोबतच निजामाच्या काही कागदी नोटाही वाचवण्यात जिओव्हान्नीला यश आलं होतं. त्यांना एकूण एक लाख पासष्ट हजार नोटा सापडल्या.
हैदराबादच्या निजामाने त्याच्या वकिलांकरवी त्यातल्या एक लाख अठ्ठावीस हजार नोटा काही किंमत देऊन विकत घेतल्या. या नोटा जरी ब्रिटनमध्ये छापल्या जात, तरी त्यावर निजाम सरकारतर्फे सही मात्र हैदराबादेत त्या जेव्हा इश्यू केल्या जात तेव्हाच होई (ती सही अर्थमंत्री सर अकबर हैदरी ऊर्फ हैदर नवाझ जंग यांची असे ). साहजिकच या नोटा विनासहीच्या होत्या. असं असूनही त्यांच्यावर “This note is of no monetary value. It was recovered in June 1932 by the Italian salvage vessel Artiglio from the bullion room of the liner Egypt sunk off Ushant on May 20, 1922 in a depth of 400 feet.”
असा मजकूर असलेले शिक्के मारण्यात आले. कंपनीकडून घेतलेल्या नोटा जाळण्यात आल्या. पण या निर्णयाची अंमलबजावणी नीट झाली नसावी, कारण त्या आजही अधेमधे विक्रीस उपलब्ध होतात. निजाम आणि सोरिमा यांच्या व्यवहारात एकंदरीत ३७००० न जाळलेल्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत असा अंदाज आहे. या नोटा लिलावासाठी अधेमधे जगभरातल्या मार्केटमध्ये येत असतात; आणि त्या भरपूर पैसे देऊन विकत घेणारे लोकही आहेत.
(सदराचे लेखक लंडनस्थित इतिहासाचे अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.