सावरकर आणि डायरी भगतसिंगांची!

सोशल मीडियावर काल एक मजेशीर गोष्ट पाहण्यात आली. भगतसिंग आणि सावरकर यांचे फोटो एकत्र करून त्यांची तुलना केलेली होती.
सावरकर आणि डायरी भगतसिंगांची!
Updated on
Summary

सोशल मीडियावर काल एक मजेशीर गोष्ट पाहण्यात आली. भगतसिंग आणि सावरकर यांचे फोटो एकत्र करून त्यांची तुलना केलेली होती.

सोशल मीडियावर काल एक मजेशीर गोष्ट पाहण्यात आली. भगतसिंग आणि सावरकर यांचे फोटो एकत्र करून त्यांची तुलना केलेली होती की, भगतसिंग कसे माफी मागण्याऐवजी फासावर चढले आणि सावरकरांनी कशी माफी मागितली वगैरे. भगतसिंग आणि सावरकर तसे समकालीनच. मग भगतसिंग यांना सावरकर हे खरंच माफीवीर वाटत होते का? त्यांना सावरकरांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर वाटत होता का? चला - आज हा प्रश्नपण पुराव्यानिशी तपासून पाहू या आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू या.

आधी भगतसिंगांची आणि त्यांच्या पार्टीची, म्हणजेच ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ची थोडी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं. त्यांनी मांडलेल्या असहकाराच्या तत्त्वांवर आधारित स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ महात्मा गांधींजींनी पुढे अहिंसा व सत्याग्रह ह्या मार्गांनी सुरू ठेवली. ही चळवळ देशव्यापी बनली होती. पण, फेब्रुवारी १९२२मध्ये चौरीचुरा इथं एक घटना घडली. सत्याग्रही मोर्चाला हिंसक वळण लागलं. या जमावाने २२-२३ पोलिसांना चौकीत कोंडून चौकीला आग लावली. यामध्ये पोलिसांचा मृत्यू झाला. या घटनेचं कारण देत गांधीजींनी ही असहकार चळवळ अचानक थांबवून टाकली. १९२२च्या गया इथल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेत त्या वेळी काँग्रेसचे सदस्य असणाऱ्या रामप्रसाद बिस्मिल यांनी गांधीजींना चळवळ मागे घेण्याबद्दल विरोध केला; पण गांधीजींनी ऐकलं नाही. पक्षात जहाल व मवाळ अशी उभी फूट पडली. मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली मवाळांनी ‘स्वराज्य पार्टी’ स्थापली. (जी पुढे १९३५मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाली!) पण, पक्षातून बिस्मिलसारखे जहाल मताचे तरुण बाहेर पडले ते मात्र कायमचेच!

या जहाल तरुणांनी १९२४ मध्ये लाला हरदयाल व डॉ. जदुगोपाल मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली अलाहाबादला एक पार्टी स्थापन केली, जिचं नाव होतं ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’. बिस्मिलकडे हत्यारं जमा करायची जबाबदारी होती. या पार्टीच्या आग्रा, अलाहाबाद, कानपूर, बनारस, लखनौ वगैरे ठिकाणी शाखा उघडल्या. ह्याच दरम्यान १९२५ मध्ये काकोरी ट्रेन लुटीचा बेत ठरला. या लुटीचा हेतू सरकारी खजिना लुटणं हा होता. बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद आदी मंडळींनी १९२५मध्ये ९ ऑगस्टला हा ८००० रुपयांचा खजिना लुटला. (ट्रेनमधल्या एकाही प्रवाशाला त्यांनी लुटलं नाही; पण गडबडीत एक प्रवासी मारला गेला!) सरकारने या कटाबद्दल विविध शहरांमधून एकूण ४० लोकांना पकडलं, त्यात १७ जणांना शिक्षा झाल्या. बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी व अश्फाकउल्ला खान यांना डिसेंबर १९२७मध्ये फाशी झाली. शचिंद्रनाथसेन सन्याल व सचिंद्र बक्षी यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अनेकांना १४-१०-७-५-४ वर्षं तुरुंगवास झाला. हे सगळं असलं तरी, चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती लागले नव्हते आणि भूमिगत राहून कार्यरत होते. त्यांचे जुने सहकारी फाशी गेले होते किंवा तुरुंगात होते. त्यांनी पुन्हा नवीन पक्षाची बांधणी सुरू केली. नव्या दिल्लीत फिरोजशाह कोटला इथं चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांनी एक पक्ष स्थापन केला, तो म्हणजे ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’. मूळ पक्षाच्या नावात ‘सोशलिस्ट’ची भर पडली आहे हे पहा. या पक्षाला सोव्हिएट रशियाप्रमाणे भारतातही साम्यवाद स्थापन व्हावा हे अभिप्रेत होतं.

१९२८ मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं. या कमिशनला शांततापूर्वक विरोध करणाऱ्या जमावावर लाठीमार करण्यात आला. अग्रभागी असणाऱ्या लाला लजपतराय यांनाही त्याचा मार बसला. पुढे १८ दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. लालांवर लाठी चालवण्याचा हुकूम देणाऱ्या ऑफिसरचं नाव होतं जेम्स स्कॉट. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी डिसेंबर १९२८मध्ये स्कॉटला मारून लालांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं ठरवलं. ऐनवेळी गडबडीत त्यांच्याकडून जॉन साँडर्स नावाचा पोलिस अधिकारी मारला गेला आणि हे सगळे क्रांतिकारक तेथून निसटून गेले. एप्रिल १९२९ मध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त ह्यांनी दिल्लीच्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत रिकाम्या बाकांवर बॉम्ब फोडले व पत्रकं टाकली. (ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या मॅक्सवेल नावाच्या ऑफिसरने त्याच्या बायकोला पत्राद्वारे त्याची माहिती कळवली. ही पत्रं ब्रिटिश लायब्ररीत आहेत.) हे दोघेही क्रांतिकारक पकडले गेले. पुढे लाहोरमधून सुखदेव व राजगुरूही पकडले गेले. ह्या सगळ्यांवर खटला चालवण्यात आला व १९३१ मध्ये २३ मार्चला त्यांना फाशी देण्यात आलं.

भगतसिंगांना डायरी लिहायची सवय होती. १९२९ पर्यंत ते नेमाने डायरी लिहीत असत. या डायरीत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या घटना नाहीत, तर त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींच्या किंवा त्यांच्या पुस्तकांतील वचनांच्या नोंदी आहेत. बहुतकरून त्या लेनिन, कार्ल मार्क्स, ट्रॉट्स्की वगैरे रशियन साम्यवादी नेत्यांच्या आहेत. त्यांचे विचार आणि वचनं यांचा भगतसिंगांवरचा प्रभाव लगेच कळून येतो. याच डायरीत एका पुस्तकातले दोन परिच्छेद आहेत. कोणतं बरं ते पुस्तक? त्याचं नाव ‘हिंदुपदपादशाही’ आणि कोण बरं त्याचे लेखक? विनायक दामोदर सावरकर!

सोबत मी भगतसिंगांच्या डायरीतला सावरकरांच्या ‘हिंदुपदपादशाही’मधला उतारा देतोय. हा उतारा भगतसिंगांनी स्वहस्ताक्षरांत त्यांच्या डायरीत लिहिलेला आहे. ही डायरी प्रकाशित आहे आणि ब्रिटिश लायब्ररीत ह्याची प्रत मला मिळाली.

पहिला उतारा - But what unresisting martyrdom failed to do, righteous and resisting force did and rendered tyranny impotent to do further harm

भावार्थ : (हिंदूंच्या) काही न करता (न लढता) हौतात्म्य पत्करण्यामुळे जे झालं नाही, ते त्यांच्या लढाऊ सैन्याने केलं आणि जुलमी राजसत्तेला दुर्बल करून टाकलं. दुसरा उतारा ः ''Rather get killed than converted'' was the best that the Hindu could do. Ramdas rose and standing on the peaks of Sahyadri exclaimed; " No : not thus : ''better get killed than converted'' is good enough: but it would be better so to strive as neither to get killed nor violently converted! by killing the forces of violence itself. Get killed if that must be but get killed while killing to conquer in the cause of Righteousness.

भावार्थ - ‘धर्मांतर होण्यापेक्षा मरण बरं’ ही हिंदूंची धारणा होती. रामदासांनी सह्याद्रीच्या शिखरांवरून साद दिली की - हे व्हायला नकोय. ‘धर्मांतर होण्यापेक्षा मरण बरं’ हे ठीक आहे; पण हिंसक प्रवृत्तींना मारून आपण स्वतः न मरणं किंवा आपलं धर्मांतर न होऊ देणं हा यापेक्षा अजून बरा पर्याय असेल. मरण आलं तरी बेहत्तर; पण ते योग्य मार्गाने लढताना यावं. (धर्माकरता मरावे । मरोनी अवघ्यासी मारावे । मारता मारता घ्यावे । राज्य आपुले ।)

काय वाटतं ह्या नोंदी वाचून? १९२९ साली भगतसिंगांनी डायरी लिहिणं बंद केलं असं मानूयात. त्याआधी सावरकर अंदमानातून सुटून रत्नागिरीत स्थानबद्धतेत आलेले होते. का मग भगतसिंगांना वाटलं की, असल्या ‘माफीवीरा’च्या पुस्तकातला उतारा आपल्या डायरीत उतरून घ्यावा? सावरकर माफी मागून सुटून आल्यावर त्यांना तो खोडून किंवा फाडून टाकावासा का नाही वाटला? मग सावरकरांच्या राजक्षमेच्या अर्जांचा आज आपण मात्र इतका बाऊ का केला आहे? स्वार्थी राजकारण म्हणूनच ना?

भगतसिंग आणि सावरकर यांसारख्या मृत्युंजयांची स्वार्थासाठी तुलना झालेली आज आपण गुपचूप पहात आहोत. ती तशी करायची तरी आपली लायकी आहे का, हे आपण तपासून बघितलं आहे का? राजकारणाच्या नावाखाली अजून किती अधोगती आपण करणार आहोत, याचा सारासार विचार कोणत्याही थोर व्यक्तीविरोधात सार्वजनिक मतप्रदर्शन करताना नक्कीच केला जावा. बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच!

(सदराचे लेखक इतिहासाचे लंडनस्थित अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.