गुरु टिळक-आगरकरांचे

पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या वीर मारुती चौकाकडून शनिवारवाड्याकडे जाणाऱ्या एका छोट्या सव्वादोनशे-अडीचशे मीटर रस्त्याचं नाव आहे, ‘केरूनाना छत्रे पथ’.
Kerunana
Kerunanasakal
Updated on
Summary

पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या वीर मारुती चौकाकडून शनिवारवाड्याकडे जाणाऱ्या एका छोट्या सव्वादोनशे-अडीचशे मीटर रस्त्याचं नाव आहे, ‘केरूनाना छत्रे पथ’.

पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या वीर मारुती चौकाकडून शनिवारवाड्याकडे जाणाऱ्या एका छोट्या सव्वादोनशे-अडीचशे मीटर रस्त्याचं नाव आहे, ‘केरूनाना छत्रे पथ’. ज्या पुण्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल ( पुरावे मागून!) प्रश्नचिन्ह उभं होऊ शकतं, तिथं ह्या रस्त्याला ज्यांचं नाव आहे, ते केरूनाना म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ - तर मग कोण होते बरं हे केरूनाना, ज्यांचं नाव दिलंय पुण्यातल्या ह्या रस्त्याला?

विनायक लक्ष्मण उपाख्य केरूनाना यांचा जन्म १६ मे १८२४ रोजी अलीबागजवळील नागाव इथला. आई-वडिलांचं छत्र लहानपणीच हरवल्याने केरूनाना मुंबईला चुलत्यांकडे आले. छत्रे मंडळींची मुंबईत बाणगंगा-वाळकेश्वर परिसरात मोठी जागा आणि जमीन वगैरे होती. (छत्र्यांचं मूळ गाव रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्याजवळचं बसणी. ह्या बसणीतून येऊन छत्रे मंडळींनी मुंबईत कसं बस्तान बसवलं, हा एक रोमहर्षक इतिहास आहे - तो पुन्हा कधीतरी!) मुंबईत शिकायला असलेल्या केरूनानांना लहानपणापासूनच गणित, खगोलशास्त्र आणि विज्ञान ह्या विषयांची खास आवड होती. पुढे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना शिकवायला असणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि प्रोफेसर आर्थर बेडफर्ड आर्लिबार ह्यांच्याकडून अनमोल मार्गदर्शन झालं. इंग्रजी ज्ञान आणि शिक्षणप्रसाराच्या सुरुवातीचा तो काळ. केरूनानांनी मन लावून हे सगळे विषय आत्मसात केले आणि त्यांत विशेष प्रावीण्य प्राप्त केलं.

केरूनानांचे गुरू प्रोफेसर आर्लिबार ह्यांनी १८४० मध्ये मुंबईत कुलाबा इथं एक वेधशाळा उघडली. प्रोफेसर आर्लिबारांना चुंबकत्व आणि खगोलशास्त्र ह्या विषयांत काही खास प्रयोग करायचे होते (१८४० मध्ये!) आणि त्यासाठी त्यांना मुंबई सरकारने वेधशाळेसाठी अनुदान दिलेलं होतं. प्रोफेसर आर्लिबारांनी केरूनानांना त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी नोकरीची ऑफर दिली. महिना पगार पन्नास रुपये. आवडते विषय, आवडते गुरू. केरूनाना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पुढे १० वर्षं केरूनानांनी ही नोकरी व संशोधन इमानेइतबारे केलं. ह्या दहा वर्षांतल्या वेधशाळेतल्या अनुभवांवरून केरूनानांना हे लक्षात आलं की, भारतीय परंपरेनुसार बनवल्या जाणाऱ्या पंचांगाचा मेळ प्रत्यक्षातील अवकाशातल्या ग्रहस्थितींशी बसत नाही. याचं मूळ कारण म्हणजे, भारतीयांचं रूढी-परंपरागत न बदललेलं आणि (जरी संपूर्ण नसलं तरी थोडंसं) कालबाह्य झालेलं गणित - ह्यामुळे येणारी ग्रहस्थितींची चुकीची स्थूलमानं. केरूनानांनी ह्यावर संशोधन करायचा प्रयत्न केला; पण ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. पण, ह्या नोकरीने केरूनानांच्या वैज्ञानिक विचारसरणीचा पाया घातला. कोणतंही तत्त्व हे पडताळा आल्याशिवाय मानायचं नाही, ह्याबद्दल त्यांचे विचार पक्के झाले.

इंग्रजीत असलेलं शास्त्रीय ज्ञान मराठीत आणण्यासाठी मुंबईत १८४८ मध्ये ‘ज्ञानप्रसारक सभा’ नावाची संस्था स्थापन झाली होती. या संस्थेच्या सभांमध्ये केरूनानांनी १७ वेगवेगळ्या विषयांवरील शास्त्रीय निबंध वाचले. ह्यात ‘भरती-ओहोटीचे नियम’, ‘कालमापन’, ‘सूर्यावरील डाग’ वगैरे भरपूर विषयांचा सामावेश होता. ह्या निबंधांसाठी वेधशाळेतल्या आपल्या अनुभवाचा केरूनानांनी व्यवस्थित उपयोग करून घेतला होता. ‘ग्रहसाधनांची कोष्टके’ आणि ‘तिथीचिंतामणी’ ही दोन महत्त्वपूर्ण पुस्तकंही लिहिली आहेत केरूनानांनी.

उपजत शिक्षकी पिंड असल्याने १८५१ मध्ये त्यांनी वेधशाळेतील नोकरी सोडून पूना कॉलेजच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली. पुढे व्हर्नाक्युलर स्कूल (ज्याचं नाव पुढे ट्रेनिंग कॉलेज झालं) आणि अहमदनगरची इंग्रजी शाळा इथंही त्यांनी शिकवलं. गणित, जीवशास्त्र आणि पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र) हे त्यांचे हातखंडा विषय. हे विषय ते इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही भाषांतून शिकवू शकत असत, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही जीवशास्त्रावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. १८७९ मध्ये निवृत्त होईपर्यंत केरूनाना पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत होते.

केरूनानांना तिथे शिष्य लाभले ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारखे. केरूनानांचं महत्त्व त्यांच्या ह्या शिष्यांच्या आयुष्यात फार मोठं होतं. टिळक १९१८ मध्ये लंडनला असताना एकदा पत्रकारांनी त्यांना मुलाखतीत विचारलं, ‘‘भारत स्वतंत्र झाल्यावर तुम्ही काय करणार?’’ टिळक क्षणात उत्तरले, ‘‘माझ्या पहिल्या प्रेमाकडे वळणार - गणिताकडे!’’ हे गणिताचं प्रेम टिळकांमध्ये निर्माण करण्याचं श्रेय संपूर्ण केरूनानांचं. (आठवून पहा - आपल्याला आवडणारा एखादा विषय फक्त तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे आवडत असतो!) टिळकांसारखा शिष्योत्तम फक्त इतक्यावरच थांबला नाही; वेधशाळेतल्या नोकरीत असताना केरूनानांनी योजलेली पंचांगशुद्धी टिळकांनी गुरुऋण मानून पूर्णत्वास नेली. पुढे जाऊन ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’सारखे खगोल आणि गणिताने सिद्ध झालेले ग्रंथही लिहिले. केरूनानांचा व्यासंग, सौजन्य, शिकवण्यातील कौशल्य, गरजू विद्यार्थ्यांना दिलेला आसरा आणि त्यांची फी किंवा पुस्तकांची भागवलेली नड - ह्या सगळ्याबद्दल खुद्द आगरकरांनी लिहून ठेवलेलं आहे. स्वतः आगरकरांना केरूनानांनी फीसाठी मदत केलेली होती. पहिल्या वर्षाची कॉलेजची फी भरायला आगरकरांकडे पैसे नव्हते, त्यांची सोय करण्यासाठी आगरकरांनी ठरवलं की, एक नाटक लिहावं आणि ते विकून पैसे उभे करावेत. केरूनानांना हे समजताच त्यांनी आगरकरांकडून ते हस्तलिखित मागून घेतलं, परस्पर फी भरून टाकली आणि आगरकरांना नाटक लिहिण्याऐवजी अभ्यासावर लक्ष देण्याविषयी बजावलं.

हे वाचून असं वाटेल की, केरूनानांना नाटकांचं वावडं होतं; पण तसं अजिबात नाही. केरूनाना स्वतः उत्तम पियानो वाजवत असत. भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण त्यांना होती. किर्लोस्कर नाट्यमंडळींतही त्यांची ऊठबस होती. त्या काळातही त्यांनी अती गाण्यांनी नाटकाचा रसभंग होतो वगैरे सल्ले मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकरांना दिलेल्याचे उल्लेख आहेत. त्यांची संगीत नाटकांविषयीची कळकळ पाहून खुद्द अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘संगीत सौभद्र’ हे नाटक केरूनानांना अर्पण केलेलं आहे. केरूनानांचे विचारही पुरोगामी होते, स्त्रियांच्या सामाजिक सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. (हा गुण आगरकरांनी उचलला!) पुण्यातील मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर ते होते. रमाबाई रानडेंबरोबर व्यासपीठावर ते अनेक सभांना हजर असत. केरूनानांचं शिक्षणक्षेत्रात अजून एक मोठं योगदान म्हणजे, मेजर कॅंडीच्या मराठी भाषेतून शालेय पुस्तक योजनेअंतर्गत त्यांनी लिहिलेली अंकगणित व पदार्थविज्ञान ह्या विषयांवरील पुस्तकं. ही पुस्तकं त्याकाळी फार लोकप्रिय झाली. केरूनानांची सुलभ भाषा आणि अंकगणितातली रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी उदाहरणं ह्यामुळे त्यावेळच्या शिक्षकवर्गात ही पुस्तकं सर्रास वापरली जात. केरूनानांनी अंकगणिताप्रमाणेच पदार्थविज्ञानाचं पुस्तकही खूप सोप्या भाषेत लिहिले होतं. यात निसर्गनियम, सृष्टीतील चमत्कार, चुंबकत्व, पदार्थांचे गुणधर्म वगैरे विषय ओघवत्या भाषेत मांडलेले आहेत.

रावबहादूर केरूनाना छत्र्यांचं निधन १९ मार्च १८८४ रोजी झालं. त्यावेळच्या ‘टाइम्स’सारख्या इंग्रजधार्जिण्या वर्तमानपत्रानेही केरूनानांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत ‘टाइम्स’ने लिहिलंय की, ‘‘...केरूनानांना जर पद्धतशीर युरोपियन शिक्षण मिळालं असतं, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून जगात गाजले असते!’’

अशा ह्या विद्यार्थिप्रिय, विद्वान, व्यासंगी तसंच टिळक - आगरकर - चिपळूणकर आणि इतर अनेकांचे लोकप्रिय गुरू असणाऱ्या केरूनानांचं नाव फक्त पुण्यातल्या एका गल्लीवजा रस्त्याची ओळख म्हणून शिल्लक राहू नये म्हणून हा लेखनप्रपंच !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.