पैसा होईल मोठा! (अतुल सुळे)

atul sule
atul sule
Updated on

विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकांबाबत धोरण काय असावं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आदी गोष्टींबाबत कानमंत्र.

विक्रम संवत २०७६ ची सुरवात तर धुमधडाक्‍यात झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) पुन्हा एकदा ४०,००० ची विक्रमी पातळी गाठली. यंदा मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पानं बाजाराची निराशा केली होती. मात्र, कंपनी करात मोठी कपात करून सरकारनं निराशा आणि मंदी दूर करण्याचा प्रयत्न केला. तशीच करकपात प्राप्तिकरातही होणार या या आशेवर निर्देशांक वर गेला. इक्विटी शेअरवरचा भांडवली नफा आणि लाभांश वितरण कराच्या (डिव्हिडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स) बाबतही सरकार फेरविचार करत असल्याची बातमी पसरली. शिवाय कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपक्षेपेक्षा चांगले आले. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं तिसऱ्यांदा व्याजांचे दर कमी केले. तसंच अमेरिका आणि चीनमधलं व्यापारयुद्ध निवळण्याची चिन्हं दिसू लागली. या सर्व सकारात्मक घटनांमुळं निर्देशांकानं परत एकदा विक्रमी पातळी गाठली. तज्ज्ञांच्या मते, पुढच्या दिवाळीपर्यंत निर्देशांक ४४,००० च्या आसपास पोचलेला असेल. सोन्यानं गेल्या वर्षी उत्तम परतावा (वीस टक्क्यांच्या आसपास) दिला असला, तरी संवत २०७६ मध्ये फार चांगला परतावा अपेक्षित नाही. स्थावर मिळकतीबद्दल बोलायचं झाल्यास, तूर्त फारसा बदल अपेक्षित नाही. फिक्स्ड‌ इन्कम (मुदत ठेवी, कर्जरोखे) यावरचे कमी झालेले व्याजांचे दर वाढण्याची शक्‍यताही धूसर आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपापल्या पोर्टफोलिओचा आढावा घेणं गरजेचं झालं आहे आणि त्याकरता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हितावह ठरेल.

‘एसएलआर’चा मंत्र :
कोणलीही गुंतवणूक करताना नेहमी ‘एसएलआर’चा मंत्र लक्षात ठेवावा. ‘एसएलआर’ म्हणजे ‘स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो’ नव्हे, तर ‘सेफ्टी, लिक्विडिटी आणि रिटर्न’ अर्थात ‘गुंतवणुकीची सुरक्षितता, तरलता आणि करपश्‍चात परतावा!’ कोणतीही नवीन गुंतवणूक करताना आरशासमोर उभे राहून स्वतःलाच तीन प्रश्‍न विचारावेत (याला ‘मिरर टेस्ट’ म्हणतात.)
१. या गुंतवणुकीत जोखीम किती, काय आहे आणि ती मला समजली आहे का?
२. गुंतवलेला पैसा मला गरज पडेल तेव्हा मिळू शकेल का?
३. या गुंतवणुकीतून मला करपश्‍चात परतावा किती मिळू शकतो?
या तिन्ही प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला समाधानकारक वाटली, तरच फॉर्म आणि धनादेशावर सही करावी.

जोखीम घेण्याची क्षमता : प्रत्येक व्यक्तीची जोखीम पत्करण्याची आणि नुकसान पचवण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि त्यानुसारच आपल्या पोर्टफोलिओची रचना करावी लागते. शेअर बाजारातली गुंतवणुकीत जोखीम असली, तरी महागाईवर मात करण्यासाठी थोडी फार गुंतवणूक बाजारात करावीच लागते. शेअर बाजारात अथवा शेअर बाजाराशी संबंधित (मार्केट रिलेटेड) गुंतवणूक किती असावी हे आपापल्या नुकसान पचवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. गुंतवणूक तज्ज्ञ मेहराब इराणी यांनी आपल्या ‘टेन कमांडमेन्टस फॉर फायनान्शियल फ्रीडम’ या पुस्तकात एक तक्ता दिला आहे तो असा :
किती नुकसान तुम्ही पचवू शकता (टक्के) गुंतवणूक किती असावी (टक्के)
५० ७५
४५ ७०
४० ६५
३५ ६०
३० ५५
२५ ५०
२० ४५
१५ ३५
१० २५
५ २०
० १२
वरील तक्‍त्याचं बारकाईनं निरीक्षण केल्यास दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील :
१. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक, तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. म्हणजेच कमीत कमी २५ टक्के गुंतवणूक, मुद्दल सुरक्षित ठेवून नियमित परतावा देणाऱ्या (फिक्‍स्ड इन्कम) ॲसेट्स‌मध्ये असावी.
२. तुमचा ‘रिस्क/लॉस टॉलरन्स’ शून्य असला, तरीसुद्धा पोर्टफोलिओचा परतावा वाढवण्याच्या दृष्टीनं कमीत कमी बारा टक्के गुंतवणूक मार्केटशी संबंधित प्रॉडक्टस्‌मध्ये करणं आवश्‍यक असतं. असं करण्यानं तुमच्या पोर्टफोलिओची ‘रिस्क’ कमी होते.

‘ऍसेट क्‍लास’ आणि त्याची वैशिष्ट्यं :
आपला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनवण्यापूर्वी किंवा त्याचा आढावा घेण्यापूर्वी वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकार (ॲसेट क्‍लास) कोणते आणि त्यांची ‘एसएलआर’च्या निकषावर वैशिष्ट्यं कोणती ते पाहू या.
ढोबळमानानं सांगायचं झाल्यास गुंतवणुकीसाठी दोन प्रकारच्या ऍसेटस्‌ उपलब्ध असतात. फिजिकल ऍसेट्स‌ म्हणजे ज्या संपत्तीला स्पर्श करता येतो. उदाहरणार्थ, स्थावर मिळकत (रिअल इस्टेट) आणि सोनं. पेपर ॲसेट्‌स म्हणजे अशी संपत्ती, की जिला स्पर्श करता येत नाही. उदाहरणार्थ, इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंडातली गुंतवणूक, मुदत ठेवी, कर्जरोखे, विमा, पोस्टातली गुंतवणूक. ज्यांनी काही दशकांपूर्वी प्लॉट किंवा फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली त्यांना उत्तम परतावा मिळाला हे जरी खरं असलं, तरी यापुढं असा परतावा मिळणं अशक्‍य वाटतं. कारण रिअल इस्टेटच्या किंमतींमधलं सॅच्युरेशन. शिवाय त्यात कर्ज काढून मोठी गुंतवणूक करावी लागते आणि खरेदी-विक्री सोपी नसते.
गेल्या वर्षी सोन्यानं उत्तम परतावा (वीस टक्के) दिला असला, तरी आपल्या पोर्टफोलिओच्या पाच-दहा टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक त्यात करू नये. कारण त्यावर मुदत ठेवींवर मिळतं, तसं व्याज किंवा शेअर्सवर मिळतो तसा लाभांश मिळत नाही. अर्थात सोन्याला तरलता उत्तम असते. अडीअडचणीच्या वेळी ते मोडता येतं किंवा गहाण टाकून कर्ज काढता येतं. सोन्यातली गुंतवणूक अतिशय सुरक्षित मानण्यात येते.

इक्विटी शेअर्समधील गुंतवणूक महागाईवर मात करण्यासाठी आवश्‍यकच असते. या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळू शकतो. शिवाय तरलताही चांगली असते. उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य भावाला, दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली, तर चांगला परतावा मिळून संपत्ती निर्मिती होऊ शकते. ज्यांना स्वतःचे शेअर्स स्वतः निवडण्याची सवड, आवड आणि कौशल्य नाही अशांसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडांमध्येसुद्धा लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, मल्टिकॅप, ईएलएसएस (कर बचत योजना), बॅलन्स्ड फंड, इंटरनॅशनल फंड्‌स, बॉंड/डेट फंड्स, इंडेक्‍स फंड्स असे अनेक प्रकार असून, प्रत्येक फंडाचे रिस्क- रिटर्न्स वेगवेगळे असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यात गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत : लम्पसम (एकरकमी) आणि एसआयपी/एसटीपी (दर महिन्याला छोटी रक्कम) सर्वसामान्य तरुण वर्ग आपली आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी एसआयपी करताना दिसतो. चांगल्या योजनेत दीर्घकाळासाठी एसआयपी केल्यानं नियमित बचत करण्याची सवय लागते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीनुसार दीर्घ काळानंतर चांगली रक्कम जमा होते. कंपाऊंडिंगचा (चक्रवाढ वृद्धी) फायदा मिळतो आणि मार्केट टायमिंग साधायचा प्रश्‍नच उरत नाही. एखादे दुसऱ्या वर्षी चांगला परतावा मिळाला नाही म्हणून किंवा मार्केट पडलं असताना ‘एसआयपी’ बंद करणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं ठरेल. कारण हीच तर कमी ‘एनएव्ही’नं जास्त युनिट्‌स जमवण्याची संधी असते. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीला तरलता चांगली असते आणि करसवलतीसुद्धा चांगल्या असतात.
चौथा ऍसेट क्‍लास म्हणजे ‘फिक्‍स्ड इन्कम' म्हणजेच या प्रकारात मुद्दल सुरक्षित ठेवून नियमित/ठराविक परतावा मिळणं अपेक्षित असते. उदाहरणार्थ, बॅंकांच्या, कंपन्यांच्या, पोस्टाच्या मुदत ठेवी, एसएसपी, पीपीएफ, कर्जरोखे, डेट फंड्‌स इत्यादी. एकेकाळी या योजनांमधून उत्तम परतावा मिळत असे. मात्र, अलीकडच्या काळात हा परतावा खूपच कमी आणि ‘मार्केट लिंक्ड’ झाला आहे. तरीसुद्धा आपल्या पोर्टफोलिओला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं असतं.

ऍसेट ऍलोकेशन :
एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे, की तुमच्या पोर्टफोलिओचा नव्वद टक्के परतावा तुमच्या ‘ऍसेट ऍलोकेशन’वर अवलंबून असतो आणि त्यामुळं तुमच्या पोर्टफोलिओचं ‘ऍसेट ऍलोकेशन’ तज्ज्ञांकडून तपासून घेणं आवश्‍यक असतं. तुमची संपत्तीची विभागणी, तुमचं वय, जोखीम पत्करण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टं किती लांब आहेत यावर अवलंबून असते. ढोबळमानानं सांगायचं झाल्यास एखाद्या तरुण; जोखीम पत्करण्याची क्षमता चांगली असलेल्या गुंतवणूकदाराचं संपत्ती विभाजन असं असावं :
- इक्विटी : ७५-८० टक्के
- फिक्‍स्ड इन्कम : १५-२० टक्के
- सोनं : ५ टक्के
फारशी जोखीम पत्करण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदाराची संपत्तीची विभागणी अशी असावी :
इक्विटी : ५० टक्के
फिक्‍स्ड इन्कम : ४० टक्के
सोनं : १० टक्के
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं आहे. तेव्हा आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा तज्ज्ञांमार्फत आढावा घेऊन, त्यात योग्य ते बदल करण्याची ही उत्तम वेळ आहे, असं वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.