मुलांना सर्व गोष्टी त्यांच्या भाषेत समजवल्या पाहिजेत. आपली प्रत्येक गोष्ट त्यांना पटेलच असं नाही आणि ती पटलीच पाहिजे असा अट्टाहासही धरू नये. आपल्या पोटी ‘खलील जिब्रान’ आला आहे, हे खलील जिब्रानच्या पालकांना माहीत होतं का? आपलं मूल मोठेपणी काय होणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. तेव्हा आधी त्याला नावं ठेवायची आणि मग मोठा झाल्यावर ‘हो हा आमचा मुलगा! आम्हाला माहीत होतं हा मोठा होणार!’ असं म्हणण्यात काही अर्थ नसतो.
मला पालक म्हणून आई लाभली; पण केवळ आई-वडील हेच आपले पालक असतात, असं मी मानत नाही, तर आजोबा, आजी, मामा-मामी, मावशा, आत्या, शेजारीपाजारी हे सगळेच आपले पालक असतात. कारण आपण लहान असताना ही सगळी माणसं आपली काळजी घेत असतात, आपल्यावर प्रेम करत असतात, आपल्याला काही ना काही शिकवत असतात. ज्यांचं आपण अनुकरण करतो आणि ज्यांचं आपल्याला ऐकावंसं वाटतं ते सगळे आपले पालक असं मला वाटतं. त्या अनुषंगानं मी माझ्या आईच्या आई-वडिलांकडून दातृत्व शिकलो. आजीकडून नकला शिकलो, आईकडून स्वाभिमान आणि कष्ट करण्याची वृत्ती शिकलो. ज्या मामांकडे वाढलो त्यांच्याकडून गमतीजमतीत वेळ कसा घालवायचा; तसंच आपल्या घरात आपल्याला किती आनंदानं, मजेत मस्त राहता येतं, हे शिकलो. शेजाऱ्यांकडून सिनेमा बघण्याची आवड आणि वेड शिकलो. आमच्या शेजारी धनगर नावाचे गृहस्थ राहात होते. त्यांच्याकडे वेगवेगळी साप्ताहिकं नेहमी असायची. त्यांचं वाचन बाघून मी वाचायला लागलो.
माझ्या आजोबांची एक आठवण सांगतो. ते प्रसिद्ध आचारी होते. त्यांच्या तारखा नक्की करून मग लग्नाचे हॉल बुक केले जायचे. आजोबा एकदा अचानक आजारी पडले आणि अंथरुणाला खिळले. त्यामुळं घरात येणारा पैसा थांबला, सगळं घर अस्थिर झालं. त्या काळी आमच्या घरावरून रोज कुल्फीवाला, भेळवाला जात असे. मला ते खाद्यपदार्थ दिल्याशिवायतो पुढं जात नसे. आजोबा एकदा मला म्हणाले : ‘‘मला कुल्फी खायची इच्छा झाली आहे, जा तुला आणि मला कुल्फी घेउन ये.’’ त्यांनी एक रुपया दिला. मी घ्यायला गेलो. कुल्फी साच्यातून काढल्यानंतर ती घट्ट दुधात बुडवून देतात. कुल्फी खाताना ते फार छान लागतं आणि ते आपल्याला जास्त मिळावं म्हणून मी चार आण्याची एक अशा चार कुल्फ्या घेतल्या. आपल्या कृतीवर खूश होऊन मोठ्या आनंदात घरी आलो आणि आजोबांच्या हातात दिल्या. ते म्हणाले : ‘‘चार कशा आल्या?’’ मी सांगितलं : ‘‘जास्त आणल्यामुळे त्यावरचा ‘माल‘ जास्त खायला मिळतो.’’ कोणी विश्वास ठेवणार नाही; पण ते ऐकताच आजोबांनी दोन कुल्फी फेकून दिल्या आणि मला म्हणाले : ‘‘एका रुपयाच्या दोन कुल्फ्या खाण्याची परिस्थिती असेल, तर अशा वेळी चार आण्याच्या चार नाही खायच्या.’’ म्हणजे ‘आहे तुझ्याकडे तर मिजाशीत रहा. चार आण्याच्या जास्त येतात म्हणून ते खाण्याची हाव धरू नकोस.’ जगण्याला एक मिजास पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं.
काळानुसार सगळ्याच गोष्टीत फरक पडलेला आहे. त्यामुळं माझं पालकत्व हे स्वातंत्र्यप्रचूर आहे. मी स्वातंत्र्याची फार दखल घेतो माझ्या पालकत्वामध्ये. कारण माझे आजोबा गेल्यानंतर माझ्या बाबतीत ‘हे कर, हे करू नको, सायन्सच घेतलं पाहिजे,’ असं केलं गेलं. शिवाय आमच्या घरामध्ये मीच एकटा पुरुष असल्यामुळं घरातली कामं नाही करायची, बाहेरची असेल तर करायची असंही सांगितलं गेलं. मात्र, आता माझं पालकत्व मला हे सांगतं, की मुलगा असो वा मुलगी- स्वतःचं ताट स्वतः घेतलं पाहिजे, स्वतः ठेवलं पाहिजे, कपडे आवरले पाहिजेत. शिवाय लहान मुलांनाही थोडं त्यांच्या मनानं जगू द्यावं, मनसोक्त खेळू द्यावं. एखाद्या दिवशी शाळेत नाही जावंसं वाटलं, तर ‘ठीक आहे, होतं असं काही वेळा,’ असा दृष्टिकोन पालकांनी ठेवला पाहिजे. एखाद्या परीक्षेत वीसपैकी अठरा मार्ग पडले म्हणून फार आनंदही व्यक्त करायचा नाही आणि एखाद्या विषयात नापास झाला म्हणून फार रागही करायचा नाही. कारण ती परीक्षा आहे, ती तेवढ्यापुरतीच आहे. खरी परीक्षा मोठं झाल्यानंतर जगण्याची आहे ना? मग आताच का मुलांच्यामागे ढोशा लावायचा? धाकानं नव्हे तर प्रेमानं मुलांना सांभाळलं पाहिजे. मुलांना तुमच्याकडं मन मोकळं करून बोलता आलं पाहिजे.
पालक म्हणून मला माझ्या मुलीला- रेवाला वाढवण्यात खूप आनंद वाटतो. मला तिला सोडून कुठं जावंसंच वाटत नाही; पण नाईलाज असतो. मी खूप पझेसिव्ह बाप आहे. रेवाचा जन्म झाला नव्हता, तोपर्यंत मी भविष्याचा अजिबात विचार न करणारा माणूस होतो; पण मुलगी झाली आणि बदललो मी. मला तिच्यासाठी सर्व काही करायला आवडतं. तसा प्रयत्न मी नेहमीच करतो; पण अभ्यास घेणं मला नाही जमत. खरं तर रेवाला मराठी माध्यम शाळेत घालायची माझी इच्छा होती; पण पत्नी मितालीचा आग्रह होता, त्यामुळं इंग्रजी माध्यमात घातलं. रेवासाठी स्वयंपाक करणं, तिला शाळेत सोडणं, तिच्यासोबत खेळणं यांसारख्या सर्व गोष्टी मी करतो. पालकांनी मुलांना काहीही न शिकवणं मला जास्त योग्य वाटतं. मुलांच्या प्रगतीच्या आड येणारी गोष्ट म्हणजे अतिजागरुक पालक होय, असं मला वाटतं. मुलांना काही शिकवण्यापेक्षा त्यांना जाणीव करून द्या, की ते खास आहेत, सुंदर आहेत. तसंच शिकवण्यापेक्षा मुलांना विविध गोष्टींची ओळख करून द्या. उदाहरणार्थ, त्यांना विविध पुस्तकांची ओळख करून द्या, छायाचित्र म्हणजे काय, पेंटिंग म्हणजे काय, गाणं म्हणजे काय, किशोरकुमार कोण, लता मंगेशकर कोण, साहिल कोण, गुलजार कोण, जेआरडी टाटा कोण... हे शब्द त्यांच्या कानावरून जाऊ द्या. त्यांना लहान वयात फारसं कळणार नाही; पण कानावरून जाणं महत्त्वाचं आहे. केवळ चांगलंच नाही, तर सभोवताली घडणारं वाईटही सांगा. हे वाईट आहे; पण असं घडतयं हे त्यांना समजू द्या. थोडक्यात काय, तर तुम्ही त्यांचा दृष्टिकोन तयार करा.
मुलं आपल्याला बरेचदा खूप काही शिकवत असतात. एकदा माझं आणि मितालीचं भांडण झालं. तिला अॕसिडिटीचा खूप त्रास आहे. त्यामुळं तिला खाण्यापिण्याची काही पथ्यं पाळावी लागतात. एकदा तिला खूप अॕसिडिटी झाली. मी तिला काय खाल्लं म्हणून विचारलं, तर तिनं प्रामाणिकपणे शेवपुरी खाल्ल्याचं सांगितलं. ते ऐकल्यावर मी खूप चिडलो तिच्यावर आणि ‘तुला कळत नाही का,’ वगैरे बरंच बोललो. थोड्या वेळानं रेवा आली. माझ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि मला म्हणाली : ‘‘काय चाललं आहे तुझं? एवढा का चिडलास?’’ मी म्हणालो : ‘‘चिडू नको का? ती बघ कशी वागते! तिला किती त्रास होतो मग!’’ यावर रेवा म्हणाली : ‘‘त्रास तिला होतोय ना! ती चुकली; पण तू का एवढी चिडचिड करतोयस?’’ मी म्हणालो : ‘‘अगं, राग नाही का येणार असं वागल्यावर?’’ त्यावर ती उत्तरली : ‘‘राग आला तरी बोलून का दाखवतोस?’’ तेव्हा साडेपाच वर्षांच्या असलेल्या मुलीनं मला किती मोठी गोष्ट शिकवली. काही दिवसांपूर्वीचा किस्सा. रेवा मला म्हणाली : ‘‘बाबा, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. तू वन अँड ओन्ली आहेस.’’ वगैरे. मी म्हणालो तिला : ‘‘अगं, तू आहेस की माझ्यासारखी.’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘नाही बाबा मी तुझ्यासारखी नाहीये आणि या जगात कोणीच कोणासारखं नसतं. प्रत्येक मेंदू वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. म्हणूनच तर आपण वेगवेगळी माणसं आहोत. आपण कोणालाच आपल्यासारखं बनवण्याच्या फंदात पडू नये.’’ साडेनऊ- दहा वर्षांची मुलगी हे सांगते. फार वेगळीच आहे ती. पुस्तकं वाचण्याचं प्रचंड वेड आहे तिला.
वडील म्हणून रेवाच्या जन्माचा प्रसंग माझ्या खूप जवळचा आहे. मी मुंबईत होतो आणि मिताली नाशिकला तिच्या मावशीकडं राहायला गेली होती. तिला २६-२७ जुलै तारीख दिली होती; पण १९ जुलैला मला काय वाटलं माहीत नाही; पण मी नाशिकला जायला निघालो. मितालीला काही बोललो नव्हतो. इगतपुरीला पोचल्यावर मितालीचा अचानक फोन आला : ‘‘तू कुठं आहेस? पोटातलं पाणी कमी झालंय; त्यामुळं आज अर्ध्या तासात डिलिव्हरी करावी लागेल असं डॉक्टर म्हणत आहेत.’’ मी रस्त्यातच आहे, हे ऐकल्यावर तिला खूप आश्चर्य वाटलं. मी हॉस्पिटलमध्ये पोचलो. डॉक्टरांनी मितालीला इंजेक्शन दिलं. मी डॉक्टरांना म्हटलं : ‘‘मला डिलिव्हरी पाहायची आहे.’’ मी आत गेलो. थोडा वेळ थांबलो; पण मितालीला होणारा त्रास आणि सर्व बघून मला अस्वस्थ होऊ लागलं. मी बाहेर आलो; पण थोड्या वेळानं जाणवलं, की ‘अरे, माझी पत्नी माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी इतका त्रास सहन करतेय, बाळ बाहेर येण्यासाठी धडपडतंय आणि मी बघूही शकत नाही!!’ मी परत आत गेलो. मुलगी झालेली बघताच आम्हा दोघांना खूप आनंद झाला. कारण आम्हाला मुलगीच हवी होती. नंतर मी पुन्हा मुंबईला आलो. चौथ्या दिवशी मी परत नाशिकला गेलो. विश्वास ठेवा, घरात पाऊल ठेवलं, मुलीला बघितलं आणि म्हटलं : ‘‘माझी मुलगी अशी का झाली आहे?’’ मला काहीतरी वेगळं वाटलं. घरात सगळेजण होते; पण माझं काय चाललं आहे त्यांना काही कळलं नाही. मुलगी रडत होती. मी म्हणालो : ‘‘मी आता हिला डॉक्टरकडं घेऊन चाललो आहे.’’ बाळाला उचललं आणि निघालो. डॉक्टरांकडं पोचलो. तिला बघितल्यावर ते लगेच म्हणाले : ‘‘काविळ झालीय मुलीला, तुम्हाला कळलं नाही का? तिला इनक्युबेटरमध्ये ठेवावं लागेल.’’ चार दिवसांच्या त्या बाळाला त्यामध्ये ठेवलं. त्या दोन रात्री मी विसरूच शकत नाही. दोन दिवस मी सतत तिच्याकडं बघत त्या इनक्युबेटरच्या जवळ उभा होतो. माझी आई मितालीकडं बघत होती, मी बाळाकडं बघत होतो, असं ते चित्र होते. दोन दिवसांनंतर डॉक्टर म्हणाले : ‘‘काविळ गेली आहे. आता धोका टळला आहे. तुम्ही नेऊ शकता तिला.’’ मी तिला हातात घेतलं, माझ्या डोळ्यांत पाणी होतं. आई रडत होती, मी रडत होतो. मी मुलीचं नाक पुसत होतो आणि माझी आई माझं नाक पुसत होती, असं ते विलक्षण चित्र होतं.
मुलीच्या बाबतीत माझ्या भावना खरोखरच टोकाच्या असतात. मी तिच्यासाठी जगतो. कितीही काम असलं, तरी तिच्यासाठी वेळ देतो. कारण पुढं मोठी झाल्यावर तिला तिचं वेगळं आयुष्य आहे. पुढं मित्र-मैत्रिणी, प्रेमात पडणं या गोष्टी होणार. एक-दोन ब्रेकअप होणार, मग परत तिला माझी आठवण होणार, पुढं ती लग्न करणार. या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात होणार; पण यात मी प्रत्येक वेळी तिच्यासोबत राहणार. मला ठाऊक आहे, की मी फार इंटरेस्टिंग बाप आहे. असं असणं मला आवडतं.
मुलांना सर्व गोष्टी त्यांच्या भाषेत समजवल्या पाहिजेत. आपली प्रत्येक गोष्ट त्यांना पटेलच असं नाही आणि ती पटलीच पाहिजे असा अट्टाहासही धरू नये. आपल्या पोटी ‘खलील जिब्रान’ आला आहे, हे खलील जिब्रानच्या पालकांना माहीत होतं का? आपलं मूल मोठेपणी काय होणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. तेव्हा आधी त्याला नावं ठेवायची आणि मग मोठा झाल्यावर ‘हो हा आमचा मुलगा! आम्हाला माहीत होतं हा मोठा होणार!’ असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. पालक म्हणजे सोबती असतो. जो आपलं अपत्य माझ्यासारखं आहे की नाही हे शोधण्यात जन्म घालवतो. त्यापेक्षा ‘याच्यासारखं मी काय करू शकतो, इतका नवीन मी कसा होऊ शकतो,’ ही संधी जो शोधतो तो पालक!
(शब्दांकन : मोना भावसार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.