भाषा संवाद : शब्दसंवाद : ‘उंबरठ्या’वर बोलू काही...

Marathi Article : पूर्वीच्या काळी दाराच्या लाकडी चौकटीला खालच्या तळाच्या बाजूस उंबराच्या (औदुंबराच्या) लाकडाची एक महिरपी पट्टी बसवली जायची, ती म्हणजे उंबरठा.
Umbartha
Umbarthaesakal
Updated on

लेखक : तृप्ती चावरे-तिजारे

स्वर आणि व्यंजन यांच्या उच्चारक्रियेत शरीर आणि बुद्धीच्या सहाय्याने संवाद कसा साधावा, हे आपण भाषासंवादाच्या मागील भागातून पाहिले. आता या भागापासून थेट शब्दांशी संवाद साधूया. मन, बुद्धी, स्मरणशक्ती, विचार आणि भावना हे घटक आपल्याला एखाद्या शब्दाच्या अर्थापर्यंत घेऊन जात असतात.

आपल्या मराठी भाषेला नवरत्नांची खाण असे म्हटले जाते, कारण या खाणीतील शब्द अर्थवाही तर असतातच; पण त्याहीपेक्षा ते भाववाही असतात, हे महत्त्वाचे. कारण, ते भाषेला प्रवाही तर करतातच; पण व्यक्तिमत्त्वालाही पैलू पाडतात. काही शब्द असे असतात, की ते या दोन्ही अवस्था ओलांडून माणसाला जीवनाच्या प्रवाहाच्या दिशेने नेत असतात. लेखमालेच्या या भागापासून आपण अशाच काही शब्दांशी संवाद साधणार आहोत. आजचा शब्दसंवाद आहे, ‘उंबरठा’ या शब्दाशी... (saptarang latest article Verbal Communication on umbartha)

उंबरठा... एक व्यापक, प्रवाही, जीवनवादी आणि सुंदर असा शब्द. पूर्वीच्या काळी दाराच्या लाकडी चौकटीला खालच्या तळाच्या बाजूस उंबराच्या (औदुंबराच्या) लाकडाची एक महिरपी पट्टी बसवली जायची, ती म्हणजे उंबरठा. आपल्या यज्ञ संस्कृतीने उंबराचं लाकूड पवित्र आणि अरिष्टनिवारक मानलं.

किडे, मुंग्या, सरपटणारे प्राणी यांपासून घराचे संरक्षण व्हावे, तसेच अदृश्य शक्तींचा आपल्या घरात प्रवेश होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रातही उंबरठ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी गावातील प्रत्येक घराला उंबरठा हा असायचाच, म्हणून मग त्या गावाची ओळखही तशाच शब्दात ‘शंभर उंबऱ्यांचं गाव’ अशी सांगायची पद्धत होती.

उंबरठा या शब्दातील ‘उ’ हे पहिले अक्षर क्रियादर्शक आहे. उ म्हणजे ‘वर जाणे.’ उदा. उंच, उगम, उक्ती, उचल, उच्चाटन, उत्सव, उत्साह, उज्ज्वल, उठावदार, उत्कर्ष, उड्डाण, उत्कृष्ट, उत्तम, उत्क्रांती, उत्तुंग, उत्पन्न आदी. या शब्दातून प्रगतीदर्शक अर्थाचा बोध होतो. यावरून मला दोन चारोळ्या सुचल्या, त्या अशा...

उंबरठ्यावर तडजोडीच्या

मर्यादेचा सूर जुळावा

पलीकडल्या टोकावर जाता

अलीकडलाही अर्थ कळावा

शोधूनी मजला मीच अंतरी

दुभंगलेला जीव जपावा

अहंकार मम कर्तृत्वाचा

उंबरठ्यावर मी अर्पावा...

कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग करणे आणि त्यासाठी आपण केलेली कृती कुठेतरी अर्पण करणे, ही प्रगतीची उच्च अवस्था. याचा अर्थ उंबरठा हा एक प्रगतीदर्शक शब्द आहे, असे मला याठिकाणी म्हणायचे आहे. पहिल्या ओळीत माझ्या मनातला उंबरठा तडजोडीचा आहे. म्हणूनच दुसऱ्या ओळीत त्याला मर्यादेचा सूर कळू पाहतोय.

तडजोड आणि मर्यादा हे शब्द मी माघार या अर्थानेच वापरले आहेत. अहंकाराची सुरवात ही संघर्षात असली, तरी त्याचे विसर्जन मात्र माघारीत असते, असे मला वाटते. उंबरठा म्हणजे मर्यादा... विस्तीर्ण जगाच्या अंगणातून दिसणाऱ्या दाराच्या उंबरठ्याच्या आत डोकावून पाहिले तरच मला माझ्याच मनाच्या प्रगतीचा राजमार्ग दिसू शकतो. (Latest Marathi News)

Umbartha
सह्याद्रीचा माथा : जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवर सर्वच गप्प कसे...

उंबरठा... अनेक व्यापक अर्थ

मराठी भाषेतील काही शब्द अर्थाच्या पलीकडे जाऊन एक वेगळाच सांकेतिक संवाद करू पाहत असतात. उंबरठा हा शब्द असाच एक व्यापक शब्द. एकाच वेळी अर्थ, संकेत आणि भावना असा तिहेरी दृष्टिकोन विस्तारणारा. उंबरठा म्हणजे घराची सीमारेषा खरीच; पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार ती तनाची, मनाची आणि बुद्धीचीही सीमारेषा आहे.

कुणी या उंबरठ्याच्या अलीकडे थांबतो, कुणी पलीकडे जातो. कारण, पुरुषार्थ आणि भावभावना यांच्यामधली ती एक अव्यक्त, पुसट; पण व्यापक सीमारेषा असते. डोळ्यांना न दिसणारी; पण दृष्टी असलेली... आतले आणि बाहेरचे जग यांना जोडणारी ही दृष्टी म्हणजेच उंबरठा.

दिवाळीला किंवा तिन्हीसांजेला या उंबरठ्यावर दिवा ठेवतात. जणू, बाहेर आणि आत, दोन्हीकडे दृष्टीप्रकाश पडण्यासाठी असे करीत असावे. या प्रकाशातच कर्तृत्व आणि पुरुषार्थाची दिशा दिसते आणि याच प्रकाशात भावभावना जिवंत ठेवणारे डोळेही वाचता येतात. आपण आपल्या जीवनात विचार आणि वर्तन यांची एक चौकट आखलेली असते.

ती चौकट बंडखोरीने ओलांडणारा किंवा तिला सदाचाराने पूर्णत्व देणारा दुवा म्हणजे उंबरठा. आपली जडणघडण, आजूबाजूचे वातावरण, समाजव्यवस्था, आपले गुण-दोष या सगळ्यांचे भान जागे करणारा पहारेकरी म्हणजे उंबरठा. मनुष्याचा स्वभाव घडण्याची किंवा बिघडण्याची क्रिया ही सतत याच्याच साक्षीने सुरू असते.

या प्रक्रियेत कधी गुण वाढीस लागतात; तर कधी दोष. गुण-दोषांच्या या गोळाबेरजेत आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे म्हणजे आपणच आखलेल्या चौकटींचा उंबरठा ओलांडून प्रयत्न करणे, संकुचितपणाचा उंबरठा ओलांडून व्यापकपणाच्या आकाशात विहार करणे. (Latest Marathi News)

Umbartha
दृष्टिकोन : सरकारी कामाची दुहेरी यंत्रणा; संघराज्य प्रणाली

असा हा उंबरठ्याचा महिमा

एका घराचा उंबरठा ओलांडून दुसऱ्या घराच्या उंबरठ्यावरचे माप ओलांडून प्रवेश करणारी नववधू म्हणजे संस्कृती आणि संस्कारांचं मूर्तिमंत प्रतीक. पण, याच प्रतीकाचा बुरखा बंडखोरपणे फाडणारा स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची मुख्य भूमिका असलेला गाजलेला चित्रपटही ‘उंबरठा’... मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उंबरठ्याचं अस्तित्व आढळून येतं.

बाल्यावस्थेत उंबरठ्याच्या बाहेर भीती, तर आत मायेची ऊब असते. किशोर वयात उंबरठ्याच्या बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे वावरण्याचे आकर्षण, तर उंबरठ्याच्या आत मनाची बंदिस्त घुसमट असते. आयुष्याला साहसाने सामोरे जाणारी मंडळी म्हातारपणात घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमतच हरवून बसतात; तर देहातून प्राण निघून गेले, की ज्याला ‘मृतदेह’ म्हणतात, तो पुन्हा कधीच उंबऱ्याच्या आत घेत नाहीत. असा हा उंबरठ्याचा महिमा.

उंबरठ्याच्या आत अन बाहेरचं जग

उंबरठयाच्या आत घर आणि पलीकडे जग असते. जग मोठं की घर? तर मला वाटते, जग. पण, तरीही जगात फार काळ राहिल्यावर माणसाला घराचीच ओढ असते ना! बाहेरचं बाहेर ठेवून, घरच्या उंबऱ्यातून आत प्रवेश केल्यावर त्याला वेगळेच समाधान लाभते. या उंबरठ्याच्या खांद्यावर हात ठेवून, माणसाला दोन मित्र नेहमीच सांभाळावे लागतात.

अलीकडचा मित्र म्हणजे घर किंवा प्रपंच; तर पलीकडचा मित्र म्हणजे जग किंवा परमार्थ. या दोन्ही मित्रांमध्ये अदबीने आणि प्रेमाने वावरावे लागते. असे वागण्यासाठी प्रपंच आणि परमार्थात योग्य ते संतुलन कसे राखायचे हेही उंबरठाच शिकवत असतो. प्रपंचात राहून परमार्थ साधायचा असेल तर उंबरठा कळावा लागतो; तर परमार्थात राहून प्रपंच टाळायचा नसेल तर उंबरठा स्वीकारावा लागतो.

उंबरठ्याशी आलो, याचा अर्थ घरापाशी आलो, असा होतो. घराचं दार उघडण्याआधी आणि बंद केल्यावरही नजरेसमोर सदैव हजर असतो तो, उंबरठा. या उंबरठ्यापाशी आम्ही कधी अडखळतो, कधी घुटमळतो, कधी पुढे जातो, कधी मागे येतो. आतल्या बाजूने असो, किंवा बाहेरच्या बाजूने, उंबरठा ओलांडायला हिंमत लागते, हे मात्र खरे...

जमाना कितीही पुढारलेला असला, तरी आजही मार्बलच्या उंबरठ्याला नमस्कार करून दुकानात पहिलं पाऊल टाकणारी मंडळी पाहिली की वाटते, उंबरठ्याचे लाकूड भलेही बदलले असेल; पण उंबरठा मात्र आजही जिवंत आहे. या जिवंतपणाशी साधलेला हा संवाद त्याच उंबरठ्यावर समर्पित. 

- क्रमशः

Umbartha
राजवंश भारती : उत्तर गुप्तवंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.