लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल
सटाण्याच्या दोघांकडून मी दुचाकी खरेदी केली होती. मात्र या निर्णयाने आयुष्यात व्यवहार कसा करावा, कसा करू नये याची अक्कल ४५ हजारांना मला विकत दिली. त्यामुळे कुठल्याही मोठ्या व्यवहारांमध्ये माझी आजतागायत फसवणूक झाली नाही म्हणजेच जणू काही माझ्यासाठी अडचण ही संधीमध्ये रूपांतरित झाली.
गो ष्ट आहे, साधारणतः १९९१ ते १९९३ मधील. सुरवातीला थोडी या घटनेची पार्श्वभूमी बघायला लागेल. १२ डिसेंबर १९८६ ला माझा नाशिकमधील ओपीडी म्हणजे दवाखाना सुरू केला होता. ओपीडी सुरू करतानाच माझ्या बाईने (आई) माझी ओपीडी आखीवरेखीव करून दिली, तसेच पहिल्याच दिवशी माझ्या हातामध्ये नवीकोरी स्कूटर बजाज कब इलेक्ट्रॉनिक (एमजेआय ६४५३) ची चावी ठेवली होती. खरे सांगायचे तर त्या वेळी आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती; परंतु बाईने हिंमत न हरता वडील पवनलालजी ओस्तवाल यांच्या आकस्मिक निधनाने उद्ध्वस्त होऊ पाहत असलेला संसार सावरला होता.
मलाही अंदाज नव्हता एवढी चांगली ओपीडी, दवाखाना, नवीकोरी स्कूटर सर्वकाही माझ्या हातात ठेवले होते. मागच्या एका कथेमध्ये (रोडरोलरची कथा) मी माझ्या ड्रायव्हिंगच्या आवडीबद्दल सविस्तर लिहिले होतेच, जे की शंभर टक्के आजही खरे आहे, म्हणजे मला ड्रायव्हिंगची आवड अगदी लहानपणापासूनच तर आजतागायतदेखील आहेच. त्यामुळे माझे कोणे एकेकाळचे स्वतःची दुचाकी असण्याचे स्वप्न होते ते माझ्या बाईने, ओपीडीच्या पहिल्याच दिवशी पूर्ण केले होते. स्वतःची पहिलीवहिली टूव्हीलर म्हटल्यावर माझा उत्साह गगनात मावेना. (Saptarang Latest Marathi Article by Dr Hemant Ostwal Positivity Nashik News)
ओपीडी सुरू झाली आणि ड्रायव्हिंगची आवड असल्याने भटकंतीदेखील. ते वर्ष होते १९८७. एकाच वर्षात माझे सहा अपघात झाले होते. त्यात दोन तर फारच मोठे जीवघेणे होते. हेड इंज्युरीसह बरेचकाही घडले होते. आईच्या म्हणजे आमच्या बाईच्या मनाने ध्यास घेतला, की आपण हेमंतची कुंडली बघून गाडी घ्यायला पाहिजे होती. ही गाडी काही त्याला धार्जिणी झाली नाही, म्हणजे या गाडीपासून त्याला फायद्याऐवजी तोटाच होतो आहे. कदाचित जीवदेखील जाऊ शकतो. तिने ताबडतोब एका शास्त्रोक्त पंडितांना गाठले.
त्यांच्याकडून कुंडली बघून कुठली गाडी घ्यावयाची, हे बघितले आणि ती आली हीरो होंडा. माझ्या नाव-जन्मराशीप्रमाणे जी माझ्या राशीला योग्य राहील ती आणि अशारीतीने माझ्या वाढदिवशी म्हणजेच १ जानेवारी १९८८ ला बाईने मला नवीकोरी हीरो होंडा हंड्रेड सीसी दुचाकी घेऊन दिली. तो योगायोगही असू शकतो आणि खरेही असू शकते, म्हणजे माझा परत १९८७ चा सहा अपघातांचा अपवाद वगळता १९७८ ते १९८६ तब्बल नऊ वर्षे आणि १९८८ ते आजतागायत दुचाकीचा अपघात झालेला नाही.
आता दुचाकी चालविणे नक्कीच कमी झाले आहे; परंतु आधीची नऊ वर्षे आणि नंतरची तब्बल १६ वर्षे लाखो किलोमीटर दुचाकी चालवूनही अपघात होऊ नये हा मोठा योगायोग, की पंडितांचे शास्त्र खरे हे समजायला मार्ग नाही आणि या वादात मला पडायचेही नाही. मात्र १९८७ मधील स्कूटरचे सहा अपघात मात्र डोक्यात फार मोठ्या आघाताच्या स्वरूपात संपूर्ण कुटुंबाच्याच बसले होते. १ जानेवारी ८८ ला घेतलेली माझी हीरो होंडा एमव्हीसी १६५० अतिशय चांगली चालली होती. गाडीला जवळपास तीन वर्षे होत आली होती.
वेळापत्रकाप्रमाणे सर्व्हिसिंग सोडले तर इतर काही कामे नव्हती; परंतु गाडी जुनी झाली, की कामे काढील आणि कदाचित त्यामुळे परत अपघात होऊ शकतो, या भीतीने मी हीरो होंडा विकून नवी हीरो होंडा घेण्याचे ठरविले (माझी ही भीती अनाठायी होती, ही अक्कल मला नंतर आली). डॉक्टरची दुचाकी, एकहाती वापरलेली, कमी चाललेली, अत्यंत चांगल्या कंडिशनमध्ये असल्याने माझ्या दुचाकीवर विकत घेण्यासाठी अक्षरशः उड्या पडल्या. मी गाडी विकतो आहे आणि परत नवीन घेणार आहे, ही बातमी माझ्या कार्यक्षेत्रात झपाट्याने फैलावली. माझी दुचाकी विकली जाण्याच्या आतच अमित आणि सुमीत या दोन बंधूंनी माझ्याशी संपर्क साधला.
हे दोन्ही बंधू चांदवडला श्री नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये विद्यार्थी होते. श्री नेमिनाथ जैन बोर्डिंगमध्ये वडिलांच्या हाताखालीच राहिलेले होते. त्या वेळी ते नाशिकच्या जैन बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत वास्तव्यास होते. त्याआधीही त्यांनी माझी भेट पवनसरांचा मुलगा (पवनलाल चंदुलाल ओस्तवाल) म्हणून दोन-तीनदा घेतलेली होती. दोघा बंधूंनी माझ्यासमोर एक प्रपोजल टाकले. त्यांनी एक हीरो होंडा (एमएच १५, सी १३९२) तीन महिन्यांआधीच घेतली होती, जी की तीन महिन्यांमध्ये पाच हजार किलोमीटर चाललेली होती.
हीरो होंडा त्यांनी बँकेकडून पतपुरवठा घेऊन घेतलेली होती. त्या वेळी नवीन हीरो होंडाची किंमत अंदाजे ३० हजारांच्या घरात होती आणि हे दोघे बंधू पाच हजार रुपये कमी करून द्यायला तयार होते. मीही विचार केला, की आपले पाच हजार रुपये वाचत असतील तर काय हरकत आहे घ्यायला. कारण माझी गाडी तीन वर्षे जुनी असून, २३ हजारांना गेली होती, म्हणजे आपल्याला सात हजारांऐवजी फक्त दोन हजार टाकायला लागतील हा विचार करून मी त्यांची हीरो होंडा घेण्याचा विचार करू लागलो.
यामध्ये अडचण एकच होती, ती म्हणजे त्यांनी हीरो होंडा घेताना बँकेकडून पतपुरवठा घेतलेला होता, म्हणजेच कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते सुरू होते. मी त्यांना सांगितले, की त्यांनी जर हप्ते पूर्ण भरून निल करून दिले तर मी विचार करतो. मग त्यांनी मला त्यांची खरी अडचण सांगितली. प्रकरण असे होते, की त्यांना सटाणा येथे आइस्क्रीम पार्लर टाकायचे होते. त्यासाठी त्यांना पैशांची सक्त गरज होती. त्यांच्याकडे थोडे पैसे होते आणि यातले २५ हजार रुपये त्यांना कामी येणार होते. १९९०-९१ मध्ये २५ हजार ही खूप मोठी रक्कम होती.
यासाठी मात्र त्यांनी मला खूपच भावनात्मक केले. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे कसे घनिष्ठ संबंध होते, त्यांच्यामुळेच त्यांचे शिक्षण कसे झाले होते, त्यांना ते वडिलांच्या जागी मानतात असे बरेच काही ते सांगत होते. पवनसरांनी आम्हाला एवढी मदत केली. आता तुम्ही आमच्या आयुष्याच्या व्यवसायाची घडी बसविण्यासाठी मदत करा. तुमच्यामुळे आमचे आयुष्यच सुधारून जाईल वगैरे वगैरे आणि मी त्या भावनांना बळी पडलो. खरे सांगायचे तर त्या भूलथापांना बळी पडलो आणि त्या व्यवहारासाठी मी तयार झालो.
माझा विचार असा होता, की आपले पाच हजार रुपये वाचत आहेत आणि समोरची मंडळी विश्वासू आहे. वडिलांच्या इतके जवळचे आहेत आणि आपल्यामुळे कोणाचा व्यवसाय नव्याने सुरू होत असेल आणि त्यांचे आयुष्य व्यावसायिकदृष्ट्या स्थिर होत असेल तर आपल्याला आनंदच आहे आणि असे म्हणून मी तो व्यवहार केला. रोखीने त्यांना २५ हजार रुपये दिले आणि गाडी ताब्यात घेतली.
पहिले दोन-चार महिने ठीकठाक गेले. गाडी चालविताना मात्र जाणवत होते, की ‘कुछ तो गडबड है.’ पाहिजे तेवढे कम्फर्ट गाडी चालविताना नक्कीच नव्हता. पाचव्या महिन्यामध्ये कळले, की दोन्ही हीरोंनी चौथ्या महिन्याचा हप्ताच भरलेला नाही. माझे तर तिथूनच इंडिकेटर्स लागायला सुरवात झाली. मोजून चार महिने आधी आश्वासन काय देतात, वचन काय देतात आणि लगेचच हप्ता भरायचा नाही? नाशिकला ते आल्या आल्या मी भेटीला बोलावले.
भेटीला येतानाच त्यांची पूर्वपीठिका तयारच होती. आइस्क्रीम पार्लरसाठी डीप फ्रीजरसाठी पैसे लागले म्हणून हप्ता भरला गेला नाही, पण आम्ही आता व्यवस्था केली आहे. आज आणि इथून पुढे अजिबात चिंता करू नका. आम्ही व्यवस्थित भरत जाऊ आणि त्यांनी तो हप्ता भरलादेखील. म्हटलं, चला जाऊ दे, झालं असेल एखाद्या वेळी. इकडे गाडीने मात्र नव्याचे नऊ दिवस जणू काही संपून आपले रंग दाखवायला सुरवात केली होती.
शोरूमच्या सर्व्हिस सेंटरला मी गाडी घेऊन गेलो असता योगायोगाने तेथील एक सीनिअर मेकॅनिक माझा पेशंट निघाला. त्याने गाडी व्यवस्थित बघितली. त्याच्या सीनिअर मित्राचीदेखील त्यांनी मदत घेतली. दोघांचेही एकमत झाले, की गाडी व्यवस्थित वापरलेली नाही. गाडी खूप रफ वापरली गेली आहे; परंतु आता एवढा मोठा काही प्रॉब्लेम नाही अशारीतीने जरा नाराजच म्हणजे आपण फसविले गेलो असल्याची भावना घेऊनच मी ओपीडीत परत आलो. म्हणता म्हणता वर्ष गेले आणि वर्षअखेरीस बँकेचे चार हप्ते थकले होते.
आठव्या महिन्यामध्ये तर शेवटी मी एक हप्ता भरून टाकला, जेणेकरून त्यांनी मोटारसायकल खेचून नेऊ नये. गेल्या सहा महिन्यांपासून दोघे बंधू मला तोंडही दाखवायला तयार नव्हते. निरोपाला साधा रिस्पॉन्सही द्यायला तयार नव्हते. नवव्या महिन्यापासून बाराव्या महिन्यापर्यंत माझे सटाण्याला चार चक्कर होऊन गेले होते. दुपारची ओपीडी आटपायची, जेवणाचे चार घास पोटात ढकलायचे, घाईघाईने सीबीएस म्हणजे सेंट्रल बसस्थानक गाठायचे, दीडची नाशिक जलद सटाणा गाडी पकडायची, जी तीन-सव्वातीनच्या सुमाराला सटाण्याला पोचायची.
घाईघाईने म्हणण्यापेक्षा पळत पळत या हीरो लोकांच्या आइस्क्रीम पार्लरवर जायचे, चारपैकी दोन वेळा ते सापडले, दोन वेळा ते गायब होते. दोन्ही वेळा अत्यंत गोड भूलथापा. आता दोनच दिवसांत भरतो, चारच दिवसांत भरतो, इतके भरतो, तितके भरतो, असल्या भूलथापा; परंतु माझ्याकडेही फार जास्त इतर मार्ग उपलब्ध नव्हते. गेल्या गेल्या भांडण व्हायचे; परंतु शेवटी मलाच गोडीत घ्यायला लागायचे. कसेही करून त्यांच्याकडून हप्ते भरून घेणे गरजेचे होते; परंतु पुढच्या चार-आठ दिवसांत कळायचे, की हे किती भामटे आहेत.
हे झाले बँकेच्या आघाडीवर. माझी फसगत झाल्याची भावना दिवसेंदिवस प्रबळ होत होती. अर्थातच त्याला दुसरेही कारण होते, ते म्हणजे, गाडीची कंडिशन. हळूहळू गाडीनेही दोन्ही हीरोंसारखेच तिचे रंग दाखवायला सुरवात केलेली होती. छोट्या कामांकडून मोठ्या कामांकडे आता ऑलरेडी सुरवात झाली होती. यादरम्यान माझ्या एका पेशंट मित्राने, श्यामने पेट्रोलपंपावरची नोकरी सोडून स्वतःचे गॅरेज टाकले होते. त्याने तसे ऑटोमोबाईल क्षेत्रातील शाश्वत शिक्षण घेतले नव्हते. कुठेतरी टामटुम बघून त्याने हे काम सुरू केले होते. तेथे तिला नेऊ लागलो अन् व्हायचे तेच झाले. गाडीचा पूर्ण सत्यानाश झाला. गाडीने आता मोठी कामे काढायला सुरवात केली होती.
सगळा खेळ सुरू होऊन अडीच वर्षे होत आली होती. अडीच वर्षांत मी पाच हप्ते भरूनदेखील सहा बाकी होते. गाडीच्या गॅरेजच्या चकरा आणि माझ्या सटाण्याला दोन्ही हीरोंकडे काहीही उपयोग होत नसलेल्या चकरा वाढतच होत्या. काय करावे आणि काय नाही मला काहीही सुचत नव्हते. इकडे गाडीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती. गाडीच्या बाबतीत एक गोष्ट सुदैवाने चांगली जमून आली होती, ती म्हणजे, माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा म्हणजे वृषालीचा पती सुभाष हा स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर होता.
त्याने कुठे नोकरी न करता अनुभव घेऊन स्वतःचे वर्कशॉप सर्व्हिस सेंटर सुरू केले होते. त्याला गाडी दाखविल्यानंतर त्याने शांतपणे टेबलावर बसून गाडीचे प्रॉब्लेम समजून सांगितले. त्याच्या मते, तात्पुरता एखाददुसरा प्रॉब्लेम सोडवून विषय संपणार नव्हता. कारण संपूर्ण इंजिन एकमेकांना आतमधून जोडलेले असते. कुठलातरी एक नवीन पार्ट टाकला तरीही त्याला जोडून काम करणारे आधीचे पार्ट खराब असल्याने तो नवीन पार्ट पण लवकर खराब होणारच होता. सोबत आज ना उद्या आधीचे खराब होत असलेले पार्ट पण बदलायला लागणार होते.
त्याऐवजी त्याने एक खरोखर सुंदर आणि प्रॅक्टिकल उपाय शोधून काढला, तो म्हणजे, एकदा संपूर्ण इंजिनच बदलून टाकायचे. ते महाग पडणार होते; परंतु खऱ्या अर्थाने तेच स्वस्त पडणार होते, असे अभ्यासाअंती लक्षात आले.
गाडी जवळपास संपूर्णपणे नवीन मिळणार होती हे त्यातल्या त्यात खूपच महत्त्वाचे होते. आता येथे सकारात्मकता खूपच कामी आली. कारण मी एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर अत्यंत वाईट परिस्थितीत सापडलेलो होतो. बँकेची संपूर्ण थकबाकी आता अकरा हजार रुपये झाली होती. इकडे गाडीचे संपूर्ण इंजिन नवीन घ्यायचा त्या वेळचा खर्च अंदाजे दहा हजार रुपयांच्या घरात होता. नवीन हीरो होंडाची किंमत अंदाजे ४० हजार रुपयांच्या वर गेली होती. इकडे बँकेची थकबाकी अकरा हजार, नवीन इंजिन बसविण्याचा खर्च दहा हजार, म्हणजे दोन्ही मिळून २१ हजार रुपये खर्च केला तर अतिशय चांगल्या कंडिशनची गाडी मिळणार होती. मी संपूर्ण सकारात्मकतेने विचार करायला सुरवात केली.
मला स्वतःला मानसिकता अशी तयार करायची होती, की आतापर्यंत काय झाले हे विसरून जायला लागणार होते. कारण ते डोक्यात ठेवले असते तर मी पुढे काहीच करू शकत नव्हतो. माझा आतापर्यंत संपूर्ण खर्च ऑलरेडी ४५ हजारांच्या आसपास होऊन गेला होता. तो मला विसरायला लागणार होता. मला तो खर्च ‘अक्कलखाते’ टाकायला लागणार होता आणि सकारात्मकतेने असा विचार करायला लागणार होता, की आपण जणू २१ हजारांत तीन वर्षे वापरलेली परंतु अत्यंत चांगल्या कंडिशनची जिथे इंजिन संपूर्ण नवे आहे अशी मोटारसायकल घेत आहोत, तरच मला हे शक्य होत होते.
त्या दोन्ही हीरोंशी भांडण करण्यात काहीही अर्थ उरला नव्हता. त्यांनी जे कर्म केले होते त्याची फळे त्यांना तिकडे मिळायला लागली होती. त्यांचे आइस्क्रीम पार्लर सव्वा ते दीड वर्षातच तोट्यात बंद पडले होते. माझे पैसे, सोबत त्यांचे पैसे संपून वरती ते कर्जबाजारी झालेले होते. त्यांच्या बाबतीत एकच डायलॉग लागू पडत होता, तो म्हणजे, ‘दुल्हे राजा’ या गोविंदाच्या सिनेमातील ‘नंगा न्हायेगा क्या, निचोडेगा क्या?’ त्यांच्यावर विचार करणे, त्यांच्याशी भांडण करणे हा शुद्ध आपल्या वेळेचा अपव्यय. सोबत अजून जास्त पैसे त्यांच्यावर खर्च करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैसे खर्च करून मनस्ताप विकत घेणे यापलीकडे काहीही नव्हते. त्याऐवजी सकारात्मकता अशी सांगत होती, की हेमंत सर्व विसरून जा आणि २१ हजारांत ही तीन वर्षे वापरलेली अत्यंत चांगल्या कंडिशनमधील हीरो होंडा तू घेऊन टाक.
यामध्ये फक्त एकच पण मोठी अडचण होती, रिस्क होती, ती म्हणजे, एवढे सगळे केल्यानंतरदेखील गाडी अमितच्याच नावावर राहणार होती. आत्ताच साधारणतः ४५ हजार रुपयांना घेतलेली अक्कल काम करायला लागली होती. मग मी आधी सटाणा येथीलच दोन प्रतिष्ठित ज्यांचा या दोन्ही भामट्या हीरोंवर जबरदस्त प्रभाव होता, ज्यांचे शब्द ते ओलांडूच शकत नव्हते जे की माझ्या एका मित्राचे मित्र होते त्यांना जाऊन भेटलो. त्यांना सत्य परिस्थिती समजून सांगितली. अर्थातच त्यांनी सगळ्यात पहिले माझीच अक्कल काढली.
काय डॉक्टर असा कधी व्यवहार करतात का? सांगायचं ना कधीच, हा सर्व विषय कधीच संपवून टाकला असता! इत्यादी इत्यादी मग त्यांनी खात्री दिली, की काहीही चिंता करू नका. गाडी ताबडतोब तुमच्या नावावर होऊन जाईल. आलेला मोठा नकारात्मक क्षण मी अत्यंत सकारात्मकतेने घेत मनाशी खूणगाठ बांधत ४५ हजारांना अक्कल विकत घेत गाडीचे इंजिनही संपूर्ण नवे करून घेतले आणि बँकेचे कर्ज संपूर्णपणे फेडून आरटीओमधून गाडी माझ्या नावावर करून घेतली.
आज मागे वळून बघितले तर मला जाणवते तेव्हा आलेले नकारात्मक क्षण मी अत्यंत सकारात्मकतेने स्वीकारले आणि आयुष्याचा विचार करता व्यवहार कसा करावा, कसा करू नये याची अक्कल फक्त ४५ हजारांना मला मिळाली म्हणजे फारच स्वस्तात मिळाली. कुठल्याही मोठ्या व्यवहारांमध्ये माझी आजतागायत फसवणूक झाली नाही म्हणजेच जणू काही माझ्यासाठी अडचण ही संधीमध्ये रूपांतरित झाली.
(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.