इंदिरा संत (१९१४ - २०००) नावाने विख्यात कवयित्रीचे पूर्वाश्रमीचे नाव इंदिरा गोपाळराव दीक्षित होते. तिचा जन्म कर्नाटकातील इंडी येथे झाला होता. वडीलांचे निधन झाल्याने तिचे बालपण काकाच्या तवंदी या छोट्याशा पण निसर्गरम्य गावात गेले.
पुणे व कोल्हापूरातून तिने बी. ए, बी. टी. डी., बी. एड्.चे शिक्षण घेतले. तिच्यासोबत फर्ग्युसनमध्ये शिकणाऱ्या नारायण माधव संत या समानधर्मी सहाध्यायाशी तिचा प्रेमविवाह १९३५ साली झाला.
उभयतांचा ‘सहवास’हा पहिलाच कविता संग्रह १९४० साली प्रकाशित झाला. त्यातील कवयित्रीच्या कविता सफल नि सुफल प्रीतिची साक्ष देणाऱ्या आहेत. दुर्दैवाने १९४६ साली नारायण संतांचे आकस्मिक निधन झाले नि तीन मुलांसह सारी जबाबदारी इंदिरेवर येऊन पडली.
सुखात काहीशी गोठून गेलेली तिची कविता या तीव्र आघातानंतर तीव्रतेने जागृत झाली नि लगभग पन्नास वर्षे बरसत राहिली. म्हणतात ना दुःख वाचा फोडते ते कवयित्रीच्या बाबत खरे ठरले. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi female poet indira sant nashik news)
कवयित्रीचे कदली, चैतू, श्यामली हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मृदगंध संग्रहात तिच्या आठवणीने न्हालेले लेख आहेत. गर्भरेशमी, शेला, मेंदी, रंगबावरी, मरवा, मृगजळ, बाहुल्या, निराकार, वंशकुसुम हे नऊ काव्यसंग्रह कवयित्रीने लिहिलेले आहेत.
कवयित्रीच्या रंगबावरी, शेला, मृगजळ या तीन काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून गर्भरेशमीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय अनंत काणेकर पुरस्कार व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा प्रतिष्ठेचा पुरस्कार इंदिरा संतांना मिळालेला आहे.
कवयित्रीच्या कवितेचा ‘विशुद्ध भावकविता’या शब्दात प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरव करतात तर त्यांची कविता ‘हस्तिदंतावरील कोरीव कामा’सारखी असल्याची ग्वाही प्रा. गंगाधर गाडगीळ देतात.
या कोरीव कामाचे उत्तम उदाहरण म्हणजे कवयित्रीच्या निसर्गकविता होत. निसर्गावर चेतनारोप करण्याची त्यांना हौस आहे. परीणामी निसर्ग नि कवयित्रीचे भावविश्व एकरुप होत जाते. मध्यान्ह कवितेत ती लिहिते,
मध्यान्हीच्या मनी येते
असे बुडावे डोळ्यांत !
न्हाऊनिया अमृताने
व्हावे चांदण्याची लाट !
मध्यान्ह चेतन होते, तिला ही मन येते. इतकेच कशाला ती गर्भारणीसारखी संथ संथ चालत जाते. कवयित्रीचे हे वर्णन तिच्याच शब्दांत पाहिले तर त्यातील बहारदारपणा चटकन लक्षात येईल.
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार ।
दिवसातील दुपारचा वेळ हा सर्वांत संथ जाणारा असतो. विशेषतः खेड्यात नि त्यातही पाच सहा दशकांपूर्वी दुपार पेंगुळल्यासारखी जायची. तिचे इंदिराबाईंनी केलेले वरील रसभरीत वर्णन मनाला भावून जाते.
गर्भवती स्त्री शुभवार्ता घेऊन येणारी असते तशीच दुपार पेंगुळलेली असली तरी महत्त्वाची कामे पूर्ण करणारी असल्याने गर्भवती वाटते. कवयित्रीची ‘अस्वस्थ’ ही कविता मनातील भाव निसर्गातून व्यक्तवित जाते
किती कडाडली वीज
किती घोंगावला वारा
किती झपाटले मेघ
किती कोसळल्या धारा
ओल्या गर्द मातीवर
जर्द पाकळ्यांचे मौन
पानापानाच्या टोकाशी
अस्वस्थाचा मुका कण
कडाडलेली वीज, घोंगावलेला वारा, झपाटलेले मेघ नि कोसळलेल्या धारा मनाच्या अस्वस्थ विचारांची वेगवेगळी आंदोलनेच अधोरेखित करतात.
कडाडलेली वीज रागाचे, घोंगावलेला वारा मनातील गोंधळाचे, झपाटलेले मेघ मनातील त्यावेळेच्या ध्यासाचे तर कोसळलेल्या धारा अवचित घडून गेलेल्या घटनेचे मनावरील पडसाद व्यक्तवित जाते.
थिजलेले मन गर्द मातीतून दिसते. जर्द पाकळ्या मनाची अस्वस्थता अधिक गडदपणे व्यक्त करते नि पानापानाच्या टोकाशी असलेला मुका कण मनाच्या टोकाशी भिडवीत मनातील निराशा मौनातून उलगडत जातो. तिच्या कवितेत सापडणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम प्रतिमा होय.
केस ओले पाठीवरी
काळ्या रात्रीचे मोकळे
चंद्रकोरीचे केशर
भांगामध्ये रेखलेले
रात्रीच्या वर्णनाला याहून विलक्षण दुसरी प्रतिमा कोठून सापडणार? सामान्य बाबीतही कवयित्रीला विलक्षण उपमा सुचतात. ‘पत्र लिही पण..’ या नितांत सुंदर कवितेत ती त्याला पत्रातून काय काय पाठवू नको सांगताना लिहिते,
चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून
यात शाई, वेलांटी, पूर्णविराम इ ना दिलेल्या काजळ, भुवई व गालावरील तीळाच्या उपमा पत्राला सजीवपण देतात. त्यामुळे पत्र वाचायची गरजच राहत नाही. ‘प्रियतम को खतिया लिखू म्हणणाऱ्या’ कबीराचा भावच त्यातून वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. कवयित्रीला मातीची ओढ आहे ती लिहिते,
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
यात तिने मातीचे ताजेपण म्हटले, ओलेपण नाही म्हटले. कारण ओलेपणा हळवी आर्द्रता व्यक्तवित जातो. तर ताजेपणा नित्यनूतनता बाणलेली दाखवितो.
तरी तिला तिचे जीवन अधुरे वाटते. यामागे दोन कारणे आहेत. एक युगुलाशिवाय पूर्णताच नसते; तिचा पती गेल्याने ती शक्यता संपली. दोन जीवाशिवाची गाठ पडल्याशिवाय पूर्णत्व लाभत नाही अन् जीवाशिवाची गाठ मरणोपरांत पडली तर पडते.
त्यामुळे शेवटची पंक्ती अर्थपूर्ण ठरते.
पतीचा विरह तिला तीव्रतेने छळतो. त्याची छाया तिच्या काव्यविश्वावर बृहत्तर पडलेली आहे. त्याच्या मृत्यूनंतर तो स्मृती रुपात उरलाय. आरंभी आरंभी ती स्मृती छळणारीच असते. त्यामुळे ती ‘तुला विसरण्यासाठी’कवितेत लिहिते,
असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभया कट्टीत…कट्टीत !
या पंक्तीचे रसग्रहण तरी कसे होणार? हृद्यातील अलवार भावना कवयित्रीने अलगद टिपल्या. ‘शब्दांनी कधी वेचता येतील की नाही असे वाटावे, अशा भावछटा इंदिराबाई वेचतात.’ असे प्रा. गाडगीळ म्हणतात ते येथे सार्थ वाटते. याच असहनीय विरहातून तिची कातरवेळेला ! ही कविता जन्मते.
तिन्ही सांजेला ‘कातरवेळा’ म्हणतात. तिन्ही सांजा म्हणजे घरी परतण्याची वेळ होय. पण कधी कधी कोणी घरी परतताना रस्ता भटकते वा घरीच पोहोचत नाही. म्हणून तिला कातरवेळा म्हटले जाते. कातरवेळेला या शीर्षकातूनच कवयित्रीला लागलेली अनामिक हुरहूर नेमकी टिपली जाते.
कवयित्रीचा प्रिय पती कामावरुन श्रमून रोज संध्याकाळी घरी परतत असे. तो आता कायमचा न परतण्यासाठी दूर निघून गेलाय. पण कवयित्रीच्या मनात ती वेळ अजून जिवंत आहे. कुठल्यातरी संध्याकाळी तिच्या चित्तचक्षुसमोर सारा पट उघडत जातो -
कातरवेळेला, रिकाम्या दारात
उभी मी रहात केव्हाहून
श्रमित आतुर, येशील हासत
ओढ ही मनात, वागते का?येई थंडगार, घेरुन अंधार
आणखी अंतर, गारठते
त्याची स्मृति उगाळत ती दारात उभी आहे, ही बाब ‘कातरवेळेला’, ‘रिकाम्या दारात’ नि ‘ओढ ही मनात’ वागते का ? या शब्दावरुन नि पंक्तीवरुन ध्यानात येते. खरेतर दार म्हणजेच रिकामी जागा होय. ज्यातून घरात प्रवेश करता येतो.
पण आता तो त्या दारातून कधीही कधीही येणार नसल्याने कवयित्री ‘रिकाम्या दारात’म्हणते. शिवाय तीही पूर्वीसारखी तो येईपर्यंत थांबत नाही. पूर्वी तो येईपर्यंत ती तेथेच थांबायची.
पण आता? त्यावेळेला क्षणभर जरी थांबले तरी तिला ‘आपण केव्हापासून उभे आहोत’ असे वाटते. तो परतणार नाही, माहित असतानाही त्यावेळेला त्याची ओढ तिला लागून रहाते. कवितेचे पहिलेच कडवे रसिकमनाला विचलित करुन जाते.
तिला त्या वळणदार, रेखीव रस्त्याने जाताना, विशेषतः त्या वळणावर त्याची चाहूल लागते. तो रस्ता, ते वळण, ते घनदाट वृक्ष त्याच्या संगतीत लोभस नि मोहक वाटत. पण आता तो नसल्याने ती विदीर्ण होऊन मनाशी म्हणते ‘नाही नाही; ते वळण नाही.
ती तर माझ्या काळजाला आरपार भेदणारी दुधारी कट्यार आहे.‘जेवताना तिने बनविलेले नाजूक साजूक पदार्थ पाहून अचानक तिलाच स्मरते, ‘अरे ! हे तर त्याला खूप आवडायचे ते पदार्थ पाहून तो खूष व्हायचा.
पण हाय ! ते पदार्थ तर येथेच आहेत. पण तोच इथे नाही. ’याचे भान येताच ते पदार्थ खाण्याची तिची इच्छाच मरुन जाते. पदरी तीन मुलं असल्याने तिला दररोज चुलीजवळ जावेच लागते. पण तोच नसल्याने स्वयंपाकातही मन लागत नाही. इतकेच कशाला
उघडता केव्हा, तुझे ते सन्मित्र
ज्ञानीयाचे ग्रंथ, बहूमोल
अधोरेखिते त्या, स्मृतीच्या शलाका
लाविती आग का, अंतराला
कधी कधी ती कपाटातील ग्रंथ उघडते. ज्ञानीयाचे ग्रंथ याचे दोन अर्थ संभवतात एक ज्ञानवर्धक नि दोन वीतराग जीवनाचा संदेश देणारे ज्ञानेश्वरांचे ग्रंथ होय. त्यांचे महत्व अधोरेखित करताना ती त्यास बहुमोल असे विशेषण लावते.
ते वाचताना त्याने त्यावर केलेल्या खूणा, अधोरेखित केलेल्या पंक्ती, ठेवलेल्या शलाका म्हणजे खुणेसाठी ठेवलेल्या काड्या तिला दिसतात. त्या पाहताच वाचलेले सारे विसरुन तिला त्याचेच स्मरण तीव्रतेने येऊ लागते. ग्रंथ बाजूलाच पडतो नि विदारक जीवनग्रंथ चित्तचक्षूसमोर उभा राहून मनाला आग लागते.
थोडक्यात प्रत्येक ठिकाणी कधी या तर कधी त्या बाबींनी त्याचीच आठवण तिला येत रहाते, नि तो आता कधीच परतणार नाही.
या जहरी जाणीवेने तिचे हृदय पिळवटून निघते. न राहवून ती त्याला आर्तस्वरात म्हणते,
तुजवीण आता, तुझ्या या संसारी
अंगाराच्या सरी, वर्षतात
आत बाहेरुन, लागलीसे आग
तुझा घेत माग, येऊ कोठे ?
रसिका ! पिळवटणाऱ्या हृदयाचे बोल तंतोतंत उमटावेत तसे या पंक्तीतील शब्द न शब्द आहेत. संसार पुरुषाच्या; पतीच्या नावे चालत असतो. पण दुर्दैव असे की पती निधनानंतर त्याचा संसार तिला चालवावा लागतो.
ही केवळ कवयित्रीचीच नाही तर प्रत्येक विधवा स्त्रीची दाहक कहाणी आहे. ती व्यक्त करताना ‘तुजवीण आता, तुझ्या या संसारी’ सारख्या सघन नि संपन्न पंक्ती कवयित्री निर्मिते. त्या पाहिल्या की तिच्या काव्यप्रतिभेची अलौकीक उंची, सहजोक्त भाषाशैली रसिक चित्ताला हरखून टाकतात.
त्याच्याशिवाय त्याच्या संसारात अंगाराच्या सरी वर्षतात म्हणताना, ती तिच्या अंतर्बाह्य जाळणाऱ्या चिरवेदनाच अधोरेखित करीत जाते. अत्यंत व्याकुळतेने ती त्याला पुसते, ‘तू जगाच्या पल्याड कुठे गेलास ते ज्ञात नाही.
मग तुझा माग घेत मी कोठे येऊ?’ कवयित्री येथे ‘कसे येऊ?’ ते विचारत नाही तर ‘कोठे येऊ?’ असा प्रश्न विचारते. कसे येऊ हा प्रश्न मनाची अनिश्चितता वा मनाची तयारी अर्धवट असल्याचा निदर्शक असतो, तर कोठे येऊ स्थान अनिश्चितता दाखवतो.
मृत्यूनंतरचे जीवन केवळ अनिश्चित कल्पनाविलास होय. मृत्यूपश्चात तो मिळणार याची थोडी जरी शाश्वती असती तरी ती पळभरही या जगात थांबली नसती. त्याच संभ्रमातून कोठे येऊचा प्रश्न जन्मतो.
प्रस्तुत कविता मृत पतीची याद करत असली तरी ती केवळ विलापिका नाही, तीत विरहभावना असली तरी मिलनाची तिळमात्र आशा नसल्याने चिर विरहाचे चित्रण करीत वेदनेचे गीत गाणारी व्यथा पूरेपूर भरलेली आहे.
कवितेमागे कवयित्रीची व्यक्तिगत कथा असली तरी ती कोणाही अकाली विधवा होणाऱ्या स्त्रीचे मनोभाव अचूकपणे टिपणारी आहे. त्यामुळेच ती केवळ इंदिराबाईची कविता न राहता तसे दुःख भोगणाऱ्या साऱ्याच भगिनींचे दुःख व्यक्त करणारी प्रातिनिधिक आविष्कृती बनते.
ही कविता वाचताना ‘तिच्या कवितेतून; स्वतः कवयित्री, आणि ज्याच्या व्यक्तिमत्वाला शरीर नाही असा तिचा दुरावलेला प्रियकर, ही दोनच पात्रे आढळतात. ’या म. द. हातकणंगलेकर किंवा इंदिराबाईंची कविता म्हणजे, ‘प्रेमळ व कलाभिज्ञ पतीबद्दल कवयित्रीच्या मनात उमटलेल्या स्मृतिलहरी किंवा विरहतरंग आहेत. ’या प्रा. गंगाधर गाडगीळांच्या मताशी वाचक सहमत होतो.(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.