गदिमांचे ‘पराधीन आहे जगती’!

सुमारे १५७ मराठी चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे लेखन त्यांनी केले.
Marathi Poet G D Madgulkar
Marathi Poet G D Madgulkar esakal
Updated on

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माडगूळकरांना चित्रपटसृष्टीत स्थिरत्व आले. सुमारे १५७ मराठी चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे लेखन त्यांनी केले.

गुरुदत्तचा ‘प्यासा’, राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभचा ‘ब्लक’चे मूळ कथानक गदिमांचेच होते. ‘जोगिया’, ‘चैत्रबन’ यांसारखे अनेक काव्यसंग्रह, ‘मामाच्या गावाला जाऊ या’ सारखी बालगीते, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘कानडा राजा पंढरीचा’ यासारखी तरल भक्तिगीते, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’सारखी एकाहून एक सरस देशभक्तिपर गीते तसेच सुमारे दोन हजारांहून अधिक गीते त्यांनी लिहिली.

या साऱ्यांची पावती विधान परिषदेत आमदारकी, पद्मश्री पुरस्कार, यवतमाळला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशा विविध माध्यमातून जनतेने नि जनताधिष्ठित शासनाने त्यांना दिला. एवढे सारे असूनही ‘गदिमा’ म्हटले की आठवते गीतरामायण! (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet G D Madgulkar nashik news)

गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात, गदिमांचा (१९१९ ते १९७७) जन्म सांगली जिल्ह्यातील शेटफळे येथे झाला. त्यांचे बालपण माडगुळे गावात गेले, तर शिक्षण कुंडलला झाले. दारिद्र्यामुळे त्यांना दहावीतच शिक्षण सोडावे लागले.

कुंडलला असतानाच ते आणि त्यांचे सवंगडी भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू लागले. या सहकाऱ्यात प्रतिसरकारचे शाहीर शंकर निकम, नागनाथ नाईकवाडी, जी. डी. लाड नि क्रांतिसिंह नाना पाटील होते.

गदिमांच्या मनांत सारखे येई, की आपण सावरकरांसारखे पोवाडे रचावे नि शंकर निकमला स्वातंत्र्यशाहीर बनवावे. त्यांची ही मनीषा काही वर्षातच पूर्ण झाली. प्रतिसरकारला आवाज त्यांनीच दिला, तोही इतका बुलंद की बा. भ. बोरकरांसारख्या कवीने भरसभेत आपली अंगठी देत शाहीर निकम यांचे कौतुक केले.

या पोवाड्यांनी मुंबईच्या सीताराम बिल्डिंगमध्ये शाहीर निकमला वाचवायला दीड हजार जनतेची संघटना उभी केली. हे पोवाडे गदिमांना स्मरत नव्हते. स्मरणार तरी कसे? हजारो कवने निर्मिणारा हा कवी, गीतकार होता. विस्मरणाच्या गर्तेतून वाचलेली काही पोवाड्यांची चरणे मात्रं मिळतात... त्यातील एक

नाना पाटील नाही एकला ।
त्याच्या दिमतीला ।
उभा ठाकला
मर्दांचा सारा सातारा प्रांत।
पोलादी संघटना सैन्यात ।
शेकड्यांनी शस्त्रसिद्धी हातात।

रामायणाचे वेड तसे भारतीयांना युगानुयुगापासून लागलेले. श्रीवाल्मीकीचे रामायण सर्वांचा आधार. पण कालिदास, भवभूती इ. संस्कृत कवींनी ‘रामायण’ या-ना-त्या प्रकारे काव्यविषय केले. गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस आजही कोट्यवधी लोकांच्या नित्यपाठात आहे.

दशमेश गुरू गोविंदांनी दशावतारात रामायण वर्णिले. एकनाथ, कृष्णदास मुद्गल, समर्थ रामदास आदी संतकवींनी रामाला मराठी मनात जागते ठेवले. मोरोपंतांना रामायणाचे एवढे वेड लागले, की ‘श्रीरामायण गाइले तरि पुनः गावेंचि ऐसें करी।’ म्हणत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सुमारे १०८ रामायणे लिहिली.

याचे कारण राम जन्मापासून मृत्यूपर्यंत अगदी स्मशानापावेतो सोबत असतो. राम काढला तर भारतीयांच्या जीवनात रामच राहत नाही.

आधुनिक काळात रामायण गाण्याचा मान गदिमांना मिळाला. तीच त्यांची खरी ओळख ठरली. गदिमांनी वाल्मीकींचे रामायण केवळ ५६ गीतांत बसविले.

ते गेय, प्रासादिक, सहजोक्त असल्याने मराठीमनाला ६०-६५ वर्षांपासून भावतेच आहे. गीतरामायणाविषयी जास्त काय लिहावे? स्वतः गदिमाच हनुमंताच्या मुखाने गातात,

जोवरि हे जग, जोवरि जीवन
तोवरि नूतन नित रामायण

गीतरामायणात गदिमांनी श्रीरामाची निसर्गरसज्ञ, कोमल हृदयी, रणधीर, राजधर्मी, कर्तव्यनिष्ठूर नि कृतार्थकाम राम अशी विविध रूपे चितारलीत. आज आपण त्यातील जीवनावर भाष्य करणारा ‘तत्त्वचिंतक राम’ पाहूया. तो मुख्यत्वे ‘दैवजात दुःखे भरता’ या गीतात सापडतो. या गीताचा मुख्य आधार वाल्मीकी रामायणातील अयोध्याकांड १०५ वा सर्ग आहे.

प्रसंग असा आहे, की भरताला स्वतःची आई ‘माता न तू वैरिणी’ वाटते नि पिता पत्नीवश वाटतो. दोघांनी श्रीरामावर व अयोध्यावासीयांवर अन्याय केला असे वाटते. श्रीरामाला अयोध्येला पुन्हा परत न्यायला तो येतो. दुःखीकष्टी नि मातापितरांना सारखा दोष देत असलेल्या भरताला श्रीराम सांगतात-

दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

दैवजात म्हणजे निष्क्रियता नाही. ‘दैवं चैवात्र पञ्चमम्’ असे गीतेचे प्रतिपादन आहे. याचा अर्थ दैव पहिले नसून पाचवे आहे. कर्ता, कामाची पृष्ठभूमी, वापरलेली साधने नि विविधांगी प्रयत्न हे पहिल्या चारात येतात. हे चार बरोबर असल्यावरही कार्य साधत नसेल तर पाचवे कारण दैव येते.

‘दैव’ ही बाब जर विचारवंतांनी स्वीकारली, तर कित्येक सुटलेले नि तुटलेले दुवे सहज जोडता येतील. थोडक्यात दैवजातचा संबंध कर्तृत्वाशी नसून कामाचे फळ मिळणे वा न मिळणेशी संबंधित आहे.

श्रीराम जन्मक्रमाने पहिले होते जी राजगादीच्या अधिकारात महत्त्वाची बाब होती. कर्तृत्वाने सर्वोत्तम होते- चारित्र्याने शुद्ध होते, जी गोष्ट राजाच्या अंगी असावी लागते.

Marathi Poet G D Madgulkar
सौम्य ‘रुद्र’

गुरूला लायक वाटत होते, जी बाब धर्माची मान्यता दाखविते, राजाला वारसदार वाटत होते, जी बाब देणाऱ्याल घेणारा ‘योग्य आहे’ची पावती होती, भावांना अधिकारी वाटत होते; जी बाब राजगादीच्या इतर दावेदारांना ‘आपल्यापेक्षा हाच योग्य’चा भाव दाखविणारी होती नि प्रजेला आदर्श वाटत होते; म्हणजे जनतेची निवड होती.

याचाच अर्थ साऱ्या बाबी जमून येत असताना, रामाचा कोणताही कसूर नसताना रामाला वनवासात पाठवावे, असे मातेला वाटावे, त्याचवेळी पिताही तिच्या धर्मबंधनात अडकून जावा हा दैवयोगच होता.

पिता अडकणे म्हणजे पुत्रही अडकणे होय. कारण रघुकुल रीतच होती ‘प्रान जाइ पर वचन ना जाइ।’ या पेचामुळेच श्रीराम दैवजात म्हणतात आणि भरताला सांगतात मानव पराधीन आहे. पराधीन असणे वाईट नसते.

उलट ते तुम्ही अनाथ नाहीत हेच अधोरेखित करते. नीती, न्याय, धर्म, शास्त्र इ. तुमचे नाथ असावेत, हाच भाव यातून प्रकट होतो. श्रीरामांनी न्याय नीति धर्म यांची चाड न मानता सत्तेसाठी शस्त्र उचलले असते, पित्याला कारावासात टाकलेले असते, सावत्र आईला सावत्र म्हणून हिणवित झिडकारले असते तर? ते तर रामाला सहजशक्य होते.

पिता दशरथ तेच सांगत होता, महर्षी जाबाली तेच कथन करीत होता. पण रामाने रघुकुलाची मर्यादा पाळली. त्यामुळे ते पराधीन झाले. हे पराधीनत्व स्वस्वीकृत होते. त्यामुळेच ते सांगतात, की आई-वडील कोणीच दोषी नाहीत.

राज्यत्याग, वनवास हे कर्मजात आहे. बघा! दैवजात म्हणता म्हणता श्रीराम कर्मजातही म्हणतात. त्यासाठी ते आधार घेतात पूर्वसंचितांचा ! पूर्वसंचित म्हणजे पूर्वीचे कर्म, ज्याचे फळ भोगावयाचे राहिले ते कर्म होय. येथे श्रावणाच्या माता-पित्यांनी दशरथाला दिलेल्या शापाची कहाणी जोडली, तर पूर्वसंचिताचा एक पदर पूर्ण होतो.

श्रीराम भरताला सांगतात, कितीही उन्नती साधली तरी ती कधीना कधी पतनात पालटतेच, सर्व वस्तूंचा शेवट नाश हाच असतो. वियोग होण्यासाठीच मीलन होत असते. वियोग हाच मुख्य असतो. बघा नं! जीवनात जुळलेली सारी नाती संपत जातात.

प्रियकर प्रेयसीने जीवनभर साथ न सोडण्याची शपथ वाहिली, तरी मृत्यू ती सोडायला लावतो. अगदी सोबत मृत्यू स्वीकारला तरी मृत्यूनंतरची गती वेगवेगळीच असते. मिलनानंतर वियोग ही निश्चित बाब असते.

वियोगानंतर मीलन ही अपवादभूत नि क्षणिक बाब असते. पुढे ते सांगतात, की मृत्यू जन्मासोबतच जन्मतो. त्यामुळे नाशवंत विश्वाचा विचार करू नये. भरताने पित्याच्या मृत्यूची वार्ता दिलेली असते ते आठवून शोकाकुल राम भरतासोबतच स्वतःच्या शोकाकुल मनाला समजवतात-
अतकर्य ना झाले कांही, जरी अकस्मात जन्मासोबतच मृत्यू येतो हे सत्य एकदा स्वीकारले, की कालिदासाप्रमाणे ‘मरणः प्रकृतिः शरीराणां’ अर्थात, मरण नैसर्गिक आहे हे सत्य स्वीकारले जाते.

त्यामुळेच ते तर्कसुसंगत वाटते. येथे कवी अकस्मात जरी म्हणत असला तरी ‘अकस्मात येणे’ हा मरणाचा स्वभाव आहे. त्यामुळे ती बाबही पूर्णतः अतकर्य राहत नाही. बोलता बोलता श्रीराम एका महान सत्याचा साक्षात्कार देतात.

मरण-कल्पनेशी थांबे खेळ जाणत्यांचा

खरंच किती अप्रतिम पंक्ती आहे ही! चिरंतन सत्याचे सार एकाच पंक्तीत सामावले आहे. केवळ एवढ्या एका पंक्तीवरून नोबेलचे नि ज्ञानपीठाचे हारच्या हार उतरून टाकावेत. मरण म्हणजे काहीही माहिती नसलेला अज्ञाताचा प्रदेश होय.

त्यामुळेच जाणत्यांच्या विचारांची झेप मरणाशी येऊन ठेपते. मित्र असो की शत्रू मृत्यूनंतर सारे संपते. साऱ्या पुरुषा-महापुरुषांची चरित्रे बघा; मरणाशीच थांबलेली नि आत्मचरित्रे मरणाआधीच संपलेली दिसतात.

मरणाचे रहस्य कोणाला ठाऊक असणार? एखादा नचिकेत मृत्यूजवळ अडून बसणार. पण त्याने कथन केलेले रहस्य ज्ञाताच्याच कक्षेत येणार, अज्ञाताचा प्रदेश अज्ञातच राहणार. येथे श्रीराम मरणाला कल्पनामात्र मानतात, वास्तव मानत नाहीत.

यामागे दोन कारणे आहेत. पहिले मरण म्हणजे वस्त्र बदलणे होय नि दुसरे विश्वच मिथ्य असल्याने मरण कल्पित ठरते. या तत्त्वचिंतनातून दुस-या सार्वत्रिक सत्याला स्पर्श करीत ते भरताला पुसतात,

दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?

खरंच जगात प्रत्येकालाच दुःख आहे. आपल्या दुःखाविषयी पीडा आहे. ते दूर सारण्याची इच्छा आहे. पण दुःखमुक्त होताच येत नाही. कारण दुःख उभे असते सुखाच्या हव्यासावर! वाटते अमुक मिळाले, तमुक मिळाले की दुःख दूर होईल.

गंमत अशी, की ज्याचा ध्यास घेतो ते मिळाले तरी दुःख पुन्हा जसेच्या तसेच उभे राहते. कारण दुःख विविक्षित वस्तूच्या, व्यक्तीच्या अभावात नसते तर मनोभावात असते. मनोभाव काढला, तर मनच उरत नाही.

मग वन नि अयोध्या समानच भासते. दुःखमुक्त होण्याचा उत्तम उपाय म्हणजे सुखमुक्त होणे होय. माणसाचे सर्वाधिक सुख सामावलेले असते माणसात, आपल्या माणसांत.

मग ती आई, वडील, भाऊ, बहिण, पती, पत्नी, मुलेबाळे, मित्र, आप्त, सगेसंबंधी कोणीही असोत. यांचाच मोह, यांचाच हव्यास अधिक असतो. हा मोह दुःखमूल होय. हे प्रतिपादन करताना अयोध्या कांडातील १०५ व्या सर्गातील २६ व्या श्लोकात वाल्मीकी सांगतात -

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य तु व्यपेयातां कालमासाद्य कंचन ।।

Marathi Poet G D Madgulkar
लैंगिक समस्येवर बिनधास्त बोला!

इतक्यावेळ स्वप्रतिभेने विचरण करणारी गदिमांची प्रतिभा वाल्मीकींच्या प्रतिभेशी नाळ जोडत महर्षींनी संस्कृतात सांगितलेले सत्य मायमराठीत सांगू लागते-

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट

एक लाट तोडी दोघां, पुन्हां नाहिं गांठ

क्षणिक तेंवि आहे बाळा मेळ माणसांचा

रसिका! किती चपखल रचना केली आहे गदिमांनी ! अफलातून !! त्यामुळेच तर ते आधुनिक मराठीतील वाल्मीकी ठरले. वाल्मीकींच्या कष्टाला गदिमांनी ‘ओंडक्याचे’ सुभग रूप दिले.

जसे सागरात भेटणारे ते अनामिक ओंडके क्षणभर सोबत करतात, सोबत करताच बंध निर्माण होतात. तितक्यात एक लाट येते नि दोघांना वेगळे करते. मानवी जीवनातील मेळ याहून कोणता वेगळा आहे.

मोहाची, लोभाची, रागाची, द्वेषाची, काळाची वा यमाची लाट माणसाला माणसापासून दूर करीत जाते. तेव्हा हे भरता! उगाच अश्रू ढाळू नकोस तुझा नि माझा प्रवास इथून वेगळा आहे, तू अयोध्येचा राजा हो मी वनवासतला रंक होतो.’ असे श्रीराम सांगतात.

या सांगण्यात कुठेही व्यथा नाही, अगतिकता नाही तर सहजता आहे. ते पुढे सांगतात, ‘‘पुनःपुन्हा मला आग्रह करू नकोस. आपल्या प्रवासाच्या दिशा जरी भिन्न असल्या तरी पितृवचन पाळण्याची रीती मात्र समान असेल. आता तपस्व्याचा वेश सोड नि राजवस्त्र परिधान कर’ आणि निश्चयाने सांगतात-

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरी चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हे त्रिवार

‘चौदा वर्षांच्या आधी मी अयोध्येत येणार नाही. आता यापुढे तू किंवा कोणीही या दूर वनात येऊ नका. तुमच्याविषयी माझ्या मनात प्रेमच भरलेले राहील. तू अयोध्येचा मान वाढव मला तेच हवेय.’ सांगत भरताला निरोप देतात.

या छोट्याशा बत्तीस पंक्तीच्या गीतात गदिमांनी कथानक नि तत्त्वज्ञान अप्रतिम रीतीने बसविले. हे गीत ऐकताना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांसारख्या रणधीर शूराच्या नयनात आसवे तरळली.

जणू काही हे गीत त्यांचे आत्मनिवेदनच असावे. गीतरामायण गदिमांना भूषणभूत ठरले. स्वतः गदिमा एका ठिकाणी बोलता बोलता म्हणाले, ‘नरहरी पंडिताच्या भीष्मप्रतिज्ञेत

जगन्नाथे केले मज सर्व लोकांत बरवे

असे भीष्म श्रीकृष्णाला म्हणतात. मला या पंक्तीत बदल करून श्रीरामाला म्हणावेसे वाटते, ‘रघुनाथे केले मज सर्व लोकांत बरवे।’’ खरंच मराठीतील सर्व कवींना बाजूस सारत गदिमांना गीत रामायणकार बनविणे ही श्रीरामाचीच इच्छा होय. हे माझे नाही, तर बा. भ. बोरकरांसारख्या सिद्धहस्त नि प्रतिभासंपन्न कवीचे प्रतिपादन आहे.

जाता जाता ही बाब स्पष्ट करणे गरजेचे आहे की, दैवजात, पराधीन इ. शब्दांचा भडिमार असला, करुण रसाचा परिपोश असला तरी हे गीत अगतिकतेतून निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण नाही, तर पौरुषातून स्वीकारलेल्या असिधाराव्रताचे सूतोवाच आहे.

त्यामुळेच ते उच्च प्रतीच्या मनोभावांचे प्रतिनिधित्व करत मनात निनादत राहाते.

(लेख क्रमांक १२९)

Marathi Poet G D Madgulkar
भारतीयांच्या परदेशगमनाचं अपयश कोणाचं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.