कृष्ण बळवंत निकुंब (१९२०- १९९९) यांचा जन्म धुळ्याचा होता. सात बहिणीच्या पाठीवर जरी ते जन्मलेले होते, तरी त्यांचे बालपण कष्टकरच होते. प्राथमिक नि माध्यमिक शिक्षण नाशकातून तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईतून घेतले.
एम. ए. मराठीत ते प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. आरंभी त्यांनी कर्नाटक महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले व नंतर ते बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करीत.
कवीचे उर्मिला, उज्ज्वला, अनुबंध, अभ्र हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेत. भागवतातील पंचम स्कंधातील भागवत कथेवर आधारीत मृगावर्त हे खंडकाव्य कवीने लिहिले.
'एकोऽ हं बहुस्याम' या वैदिक मंत्राच्या बरोबर उलटा म्हणजे अनेकत्वातून एकत्वाकडे जाण्याचा प्रवास कवीने प्रस्तुत खंडकाव्यात आधारभूत मानला आहे.
यावर मार्मिक भाष्य करताना शुभदा शहा म्हणतात, ‘प्रत्येकाच्या मनात एक मृग आहे, तो आवर्तात फिरतो आहे, म्हणून मृगावर्त’ हे आवर्त म्हणजे आसक्ती, झपाटलेल्या इच्छा होत. हे खंडकाव्य कवीची उत्कृष्ट काव्यकृती होय, असे समीक्षकांचे मत आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet krushn nikumb nashik)
याशिवाय कवीने गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे ‘फणसाचे पान’ या शीर्षकाने तर अर्वाचीन कविंच्या निवडक कवितांचे ‘साहित्य पराग’ या शीर्षकाने संपादन केले. ‘साहित्यसमीक्षा’ ग्रंथातून समीक्षा लेखन केले, तर ‘पारख’ या ग्रंथातून नामदेव, तुकाराम ते बी पर्यंतच्या अनेक कवींच्या काव्याचे मूल्यमापन केले.
जीविताच्या कोलाहली
जन जाहले हैराण,
माझ्या जीवन-गीताची
तेथे घुमू द्या हो, तान !
असे गर्जत जरी कवीची कविता जन्मत असली तरी केशवसूतांप्रमाणे सामाजिक व्रत बांधून ती वावरताना दिसत नाही. ‘उन्मत्तास’ सारखी एखादी कविता तशी दृष्टी घेऊन येते पण तो कवीचा मूळ गाभा नाही. त्यामुळे तिच्यात क्रांतिकारी भावना नाही, असे भवानीशंकर पंडितांना वाटते, ते अचूक आहे. मात्र हैराण होणारे जन केवळ सामाजिक, राजकीय विषमतेनेच नसतात तर विफल नि विकल मनोभावानेही हैराण होत असतात, तेच कवीला अपेक्षित असावे हीच सौहार्द्रपूर्ण भावना मांडताना कवी,
हृदयीचा निमाला मदीय नन्दादीप
तम पसरे आता आंत, समोर, समीप
तरी तिमिरांतूनच ‘दीप-राग’ आळवुनी
उजळाया बघतो मी दुसऱ्याचे दीप !
कवी स्वतः अनेक प्रकारच्या तापात अडकलाय. तम म्हणजे ताप होय. पण या तापाला बाजूस सारुन तो रसिकांच्या मनातील दीप उजळायला तत्पर आहे. त्यासाठी तो सृष्टीसौंदर्यादी लोभस बाबी वापरतो.
त्यामुळेच, ‘शब्द, स्पर्श, रुप, रस,’ गंधादिक संवेदनांनी त्यांचे मन सृष्टि सौंदर्यात विलीन होते. त्याद्वारे प्रत्यक्षाचा सर्वंकष आस्वाद घेतघेत हळुहळू त्यांना सौंदर्यसमाधी लागते.
ही सौंदर्यसमाधी म्हणजे निकुम्बांच्या काव्यजीवनातला सर्वांत आनंदाचा क्षण होय’ असे कवी अनिलांचे प्रतिपादन आहे.कवीचा उज्ज्वला हा पहिला काव्यसंग्रह असून तो त्याच्या वयाच्या तेवीशीत प्रकाशित झाला होता. त्यास कवी अनिलांची मर्मग्राही प्रस्तावना आहे.
तीत त्यांनी कवीच्या परिपक्व काव्यप्रतिभेचे कौतुक केलेले दिसते. तर कठोर समीक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भवानीशंकर पंडितांना, ‘त्यांची उज्ज्वला स्नेहशील, रुचिर व प्रशांत आहे’ असा यथोचित अभिप्राय द्यावासा वाटतो, यात सर्वकाही आले.
घाल घाल पिंगा वाऱ्या ही समीक्षकांच्या, अनिलांसारख्या महान कवीच्या नि यच्चयावत रसिकांच्या मनास भावणारे तरल नि हृदयस्पर्शी कविता आहे. एका सासूरवाशीणीला माहेराची आठवण येते. आपल्या आसपास पिंगा घालणाऱ्या वाऱ्याला दूत करत ती विनवू लागते,
घाल घाल पिङ्गा वाऱ्या, माझ्या परसांत
माहेरी जा, सुवासाची कर बरसांत
कवितेची सुरवातच बहारदार आहे. कालिदास जसा मेघाला दूत बनवतो, तशीच कवितेतील नायिका पिंगा घालणाऱ्या वाऱ्याला दूत बनविते. पण गंमत अशी की हे पिंगा घालणारे वारे म्हणजे माहेराच्या मनांत पिंगा घालणाऱ्या आठवणीचे प्रतिबिंबच वाटावे असे आहे.
त्यामुळे ती त्याला आधी तिच्या अंगणांत पिंगा घालायची, घुटमळायची विनंती करते. माहेरच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या तिच्या भोवती पिंगा घातल्यावर त्याला तिचा मनोभाव कळेल. मग त्याने माहेराला जाऊन सर्वप्रथम हिचे क्षेम अर्थात ती सासरी संसारात सुखी असल्याचे माहेरी सांगावे, असे तिला वाटते.
यावरुन तिची आईबापाविषयी असणारी काळजीच दिसते. आपले दुःख सांगून मायबापाला घोर लावण्याऐवजी आपले चांगले आहे, हे कळवून सुखवावे हाच थोर भाव तिच्या मनात आहे.
ती सुखी आहे हे माहेरी वाऱ्याने स्वतः होऊन सांगणे म्हणजेच सुवासाची बरसात करणे होय. पण आईला सुखी आहे, हे सांगितल्यावरही वाऱ्याने आईच्या कानांत सांगावे की, मुलगी सुखी आहे पण
आई, भाऊसाठी परी मन खन्तावत !
विसरली का ग? -भादव्यांत वर्स झाल
माहेरीच्या सुखाला गं मन आंचवल
फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो‘’
आता ती मन उघड करु लागली. सासरी सुख असले तरी आई-भावाची आठवण येऊन तिच मन खंतावत. खंतावणे म्हणजे हातातून कयमचे सुटल्याची भावनेने जीव कासावीस होणे. होय नीट पाहिले तर यात तिच्या वडिलांचा उल्लेख नाही.
याचा अर्थ ती वडिलाविना पोरकी आहे, नि तिचे वडिल तिच्या अजाणपणीच वारलेले असावेत. म्हणून त्यांचा सरळ उल्लेख नाही. पण ते नसताना आई, भावाने लालन पालन केल्याची जाणीव तिला असल्यानेच तिच्या भावना अधिकच अलवार झाल्या, त्याच खंतावतं शब्दातून अचूक व्यक्त होतात.
तिला माहेरी जाऊन आता वर्ष उलटले. त्यामुळेही माहेराच्या सुखाला ती आंचवलीय ती काकुळतीने सांगते की मला पुन; पुन्हा माहेरची आठवण येते. बरे ती सासरी दाखविताही येत नाही. नाहीतर ही भरल्या संसारात अशी का खंगते?
या विचाराने सासरच्यांना ही दुःख होईल, म्हणून ती तिचे आसू चटकन पदराला पुसते तो पदर चंद्रकळेचा असल्याचे ती सांगते. यावरुन ती चांगल्या सुखवस्तू घरातील आहे नि माहेर वडिलाविना असल्याने यथातथाच आहे, हे लक्षात येते.
माहेर, माहेराच्या गोष्टी भरभर तिच्या डोळ्यांसमोर यायला लागतात. तिथे असलेली कपिला गाय, तिचे खोडकर नंदा नावाचे वासरु, अंगणातील पारिजातकाचे झाड, नि फुले वेचणारी ती सारंच आठवत. कपिला गाय नि तिचे वासरु तिला नकळत तिचे नि तिच्या आईच्या नात्याचे हळुवार
स्मरण करुन देते त्याचेच प्रतिबिंब
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय…!
येथे कवी ‘दाट’ चा करत असलेला शब्दप्रयोग रसिकांवर दाट प्रभाव टाकून जातो. यात आईला माय म्हणत तिची मायाच ती निश्चयाने सांगते, नि त्या मायेला दुधाच्या दाट नि मऊ सायीची आल्हादक उपमा देत ती भावनांचे टोक गाठते.
त्यामुळे तिचा कंठ दाटून येतो नि माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळ होतो, त्याच गहिऱ्या व्याकुळतेत ती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याला तोच संदेश पुन्हा देत थांबते.
माहेर नि माहेरच्या आठवणींनी चिंब होणाऱ्या कविता बहिणाबाई, पद्मा गोळे इ. कवयित्रींनी लिहिल्यात. त्यांची भावार्द्रता उत्कट आहे.
त्याशी तुलना करता कवीची प्रस्तुत कविता सासुरवाशीनीचे माहेर, आई विषयीचे केवळ उत्कटच नाही तर विदग्ध भाव टिपण्यात कमालीची यशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल.
स्त्रीने पुरुषाचे किंवा पुरुषाने स्त्रीचे भाव तंतोतंत टिपणे कठीणच असते. येथे कवीने ते यथातथ्य साधले आहे. त्यामुळे या कवितेबाबत तरी कवीने परकायाप्रवेशाप्रमाणे स्त्रीभाव प्रवेश लिलया साधला होता असे निश्चयाने म्हणता येते.
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.