सुर्व्यांचे ‘माझे विद्यापीठ’ : उपेक्षितांचे अंतरंग उलगडणारी कविता!

नारायण गंगाराम सुर्वे (१९२६-२०१०) १९२६-२७ मध्ये गंगाराम व काशीबाई सुर्वे यांना ते चिंचपोकळीत अनाथावस्थेत सापडले.
marathi poet narayan surve
marathi poet narayan surveesakal
Updated on

नारायण गंगाराम सुर्वे (१९२६-२०१०) १९२६-२७ मध्ये गंगाराम व काशीबाई सुर्वे यांना ते चिंचपोकळीत अनाथावस्थेत सापडले. दोघांनी त्यास आपले नाव देऊन मुलासारखे वाढवले. स्वतः निरक्षर असूनही त्यास चौथीपर्यंत शिकविले. १९३६ मध्ये गंगाराम निवृत्त होऊन कोकणात निघून गेले. जाताना दहावर्षीय नारायणाच्या हातावर दहा रुपये टेकवून गेले.

नारायणांनी स्वतःचे शिक्षण स्वतःच्याच कमाईवर जिद्दीने केले. मिळेल ती कामे करत होते. महापालिकेत ते शिपाई म्हणून काम करत होते. पुढे त्याच महापालिकेच्या शाळेत शिक्षक झाले व ‘नारायण मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे कवी म्हणून जगन्मान्या पावलेल्या कवींची प्रत्येक कविता केवळ वास्तवदर्शीच नाही, तर स्वानुभवावर आधारित असल्याने आत्मनिष्ठही आहे. शिवाय ती साऱ्या श्रमजीवी कामगार, उपेक्षितांचे अंतरंग उलगडणारी आहे, आजही विचारप्रवण करणारी आहे.

नारायण ज्या कामगार वस्तीत वाढत होते, तेथील मार्क्सवादी चळवळीचा त्याच्यावर खोल परिणाम पडला. पुढे पुढे ते समुदायाला मार्गदर्शन करू लागले. वयाच्या ३२ व्या वर्षीच त्यांनी रचलेले ‘डोंगरी शेत’ हे गीत खूप गाजले. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet narayan surve nashik)

अमर शेखादि अनेक शाहीर त्या गीतास चाली लावून मेळ्यातून सादर करीत. त्यानंतर ‘गिरणीची लावणी’ सारखी पाच-सहा गीते लिहित नारायणाने गीतकाराचा प्रवास थांबवला व ते कविता करू लागले. त्या कविता म्हणजे कामगार, कष्टकऱ्यांच्या वास्तव जीवनाची परखड नि वास्तव जाणीवच होती. त्या कविता मराठा, नवयुग इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. १९६२ मध्ये कवींचा पहिला काव्यसंग्रह ‘ऐसा गा मी ब्रह्म’ प्रकाशित झाला. त्यास १९६३ चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. पुढे ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘नव्या माणसाचे आगमन’, ‘सनद’, ‘गवसलेल्या कविता’ आदी संग्रह प्रकाशित झाले.

कवितांशिवाय ‘माणूस, कलावंत आणि समाज’ हा लेखसंग्रह नि ‘का. डांगे ः भारतीय राजकारणातील वादळ’ सारखी चारेक पुस्तके कवींनी संपादित केली. कवीच्या अनेक कवितांची भारतीय व विदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली. कवीला पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९९५ मध्ये परभणीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुर्व्यांनी भूषविले होते.

मायमराठीविषयी कवीला आत्मीयता आहे. त्यामुळेच ‘क्षणात जिंकीन’ कवितेत त्यांच्या मायदेशात येण्याचे आमंत्रण सर्वांना देतात. हे निमंत्रण फुला-तारकांना आहे, मेघ नि विजेला आहे. त्याला सह्याद्री ‘पिसारा उभारलेल्या मोरा’सारखा वाटतो. ते सूर्यदेवाला सांगतात, की ‘या भूमीपुढे तुम्ही माथा नमवा.’ कारण या भूमीत अनमोल नररत्ने जन्मली. ज्ञानेशाविषयी तर त्यांना कोण कौतुक आहे, ते व्यक्तविताना ते लिहितात,

ज्ञानीयांची कुणी
काढा बरे तीट
मराठीचा थाटा
संसार हो नीट
अमृताते पुन्हा
पैजा मी लावीन
थोर भल्या भल्या
क्षणात जिंकीन

marathi poet narayan surve
लढा सफाई कामगारांचा

पूर्वी पोरक्या ज्ञानदेवांनी अमृताते पैंजा जिंकल्या होत्या, आता हा अनाथ कवी तीच आस मनी बाळगतो आहे. ज्ञानीयाने पण प्रस्थापितांना धडका दिल्या होत्या. प्रस्थापितांना धक्का नि धडका देणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच करणे होय. ते ठाऊक असल्याने कवी लिहितात,

कामगार आहे, मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे.

सिकांना, कवीचा हा गुन्हा ‘गुन्हा’ वाटलाच नाही. उलट तो दाहक असूनही लोभस वाटला. कारण ‘प्रत्यक्षात एक नि बोलण्यात एक’ असा कवीचा खाक्या नाही, तर त्यांची कविता नि जीवन एकरस आहे. त्यामुळेच ‘जसा जगत आहे, मी तसाच शब्दांत आहे.’ या कवींच्या जित्याजागत्या अनुभूतीतून उतरलेल्या शब्दांना रसिक दाद देऊन जातात.

असे असले तरी वास्तविक जगात केवळ कवी म्हणून उपजीविका करणे अत्यंत जिकिरीचे असते. लोककवी मनमोहनांना सदुसष्ट जन्माचे पाप फेडण्यासाठी आपण कवी म्हणून जन्मलो, असे वाटते. तीच व्यथा व्यक्तविताना ‘शब्दांचे ईश्वर’ कवितेत कवी लिहितात, ‘कविता विकण्यापेक्षा रद्दी विकली असती, तर बरे झाले असते.

निदान देणेकऱ्यांचे तगादे चुकविता आले असते किंवा लोकसेवक बनलो असतो, तर फियाटमध्ये फिरत, चार कारखाने काढीत, दारिद्र्यात दिवंगत कवीचे स्मारके बांधली असती,’ असे कथन करता करता त्यांचे कवित्व उसळी मारून वर येते नि ते गर्वाने सांगतात,

आम्ही नसतो तर हे सूर्य-चंद्र तारे बिचारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते

हे अगदी खरंय; कामगार, मजूर, उपेक्षित वर्गाचे चित्रण कवी जसेच्या तसे कवितेतून उतरवतो. ‘पोष्टर’, ‘तुमचंच नांव लिवा’, ‘सत्य’, ‘मुंबई’, ‘शीगवाला’, ‘मनीआर्डर’ या त्यातील उल्लेखनीय कविता होत. कवीची ‘कुटुंब’ कविता, तर उपेक्षितांचे दारिद्र्याने पोळलेले जीवन अधोरेखित करते, तर ‘आई’ विराट दुःख साठवून अवतरते.

marathi poet narayan surve
मानवी चेहरा न हरवण्याची जबाबदारी

कवीच्या वरील पंक्ती केशवसूतांच्या ‘आम्ही कोण’चेच भरणपोषण करतात. कवीचा हा जातपिंड पाहूनच पु. लं. ना म्हणावे वाटले की, ‘अरे, केशवसूत कशाला शोधताय? आजचा केशवसूत परळमध्येच राहतोय.’ कवीची ‘ऐसा गा मी ब्रह्म’ ही कविकल्पना नि वास्तविक जीवन यातील विरोधाभासी स्थिती उपरोधिक शब्दांत व्यक्तविणारी रसाळ कविता आहे. कवितेत कवी

घालीन मी साऱ्या । ब्रह्मांडास पाठी।
सोडवीन गाठी । दिक्कालाच्या ।।

अशा विश्वव्यापी गर्जनेने प्रारंभ करतो. ढगांचे हत्ती, सूर्याची लगोरी, वाऱ्यांची भिंगरी सारख्या वर्णनाने त्यावर कळस चढविला जातानाच, राईचा पर्वत नि पर्वताची राई करणाऱ्या दोन्ही बाबी आपल्यात असल्याची ग्वाही तो देतो. तेव्हा रसिक ज्ञानेश- तुकयाकडे पाहावे तसे विस्मयाने कवीकडे पाहतात. तितक्यात

ऐसा गा मी ब्रह्म । विश्वाचा आधार ।
खोलीस लाचार । हक्काचिया ।।

ही अंतिम ओवी कानावर पडते. यातील व्यंगाने ओठांवर स्मित अवतरले तरी मन व्यथेने तीळ तीळ तुटते. कवीची ही कविता व्यंग-उपरोधाचा उत्कृष्ट नमुना आहे.
कवीची ‘माझे विद्यापीठ’ ही ३६ कडव्यांची नि ७२ पंक्तींची दीर्घ कविता आहे. कवितेच्या आरंभीच आपली परिस्थिती वर्णिताना कवी,

ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.
अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

कवीने वर्णिलेली ही स्थिती त्याच्या वास्तवाला धरून होती. अनाथ म्हणून जगात आलेल्या त्याला न आई-बाप ठाऊक होते ना जातपात, मग गणगोत कुठून येणार? ज्याच्या मालकीचे काहीच नसते, त्याला केवळ नि केवळ पायाखालची जमीनच असते. तीही स्थायी नसते, ‘पुढे सरक’ म्हणताच ती पुढे सरकते. रात्री झोपायला हक्काचे ठिकाण म्हणजे एखाद्या बंद दुकानाचा आडोसा किंवा फुटपाथच. या जीवनाला कवी उठवळ जीवन म्हणतो.

marathi poet narayan surve
अपरिहार्य यांत्रिकता आणि मानवी चेहरा

उठवळ’ म्हणजे कोणतेही स्थैर्य नसलेले; कोणतेही पाश नसलेले, अर्थहीन नि नीरस! असे जीवन जगताना, आपण रस्त्यावरचे सर्व खांब मोजलेत, पाट्यांवरची बाराखडी वाचल्याचे तो सांगतो. ‘पाट्यांवरची बाराखडी’ हा अत्यंत मार्मिक शब्दप्रयोग आहे. सामान्यतः पाटी काही कामानिमित्तच आपण वाचत असतो. काम नसेल तर ती अक्षरे शब्द न बनता निव्वळ अक्षरे उरतात. तेच कवीला सांगायचे आहे.

कवीचा व्यवहार बेरजेचा नव्हता, तर जन्मापासून केवळ नि केवळ वजाबाकीचाच आहे. सांगताना कवी त्याचे अनाथपण, उपेक्षितपणच व्यक्तवितो.
बांदेवाडीच्या वस्तीतील जातीपातीत विभागलेले वाडे, वस्त्या, चिडियाघराभोवती गोंगाट करणाऱ्यांचे थवे, अशा भाकरीसाठी करपलेल्या वस्तीचे हृदयद्रावक वर्णन तो करतो. तो नाल लावणाऱ्या याकूबकडे नालांचे खोके सांभाळण्याचे काम करतो.

मोबदल्यात त्याला बोलाची जिलेबी मिळते. तो याकूब त्याच्या विद्यापीठातील एक गुरूच आहे. त्याचा दंग्यात मृत्यू झाला. त्याचे नि कवीचे धर्माचे, जातीचे वा रक्ताचे कोणतेही नाते नव्हते. तरी त्याच्यासाठी कवीच्या डोळ्यांच्या कडा ओलवल्या. मात्र त्याच्या मृत्यूनंतर कवीने ‘नंग्यांच्या दुनियेत वाट चालायचीय’चा धडा गिरविला. आपल्याला भेटणारा माणूस पिता, मित्र तर कधी नागवणारा होऊन भेटल्याचे सांगत, कवी कबुली देतो, की

तरी का कोण जाणे ! माणसासारखा समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते अजून काही पाहिलेच नाही
नाही सापडला खरा माणूसः मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो?
सदतीस जिने चढून उतरताना, मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो?

कवितेतील या ओळी जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान चढत्या क्रमाने सांगणाऱ्या आहेत. ‘माणसासारखा समर्थ सृजनात्मा’ ही केवळ कवीची इहवादी धारणाच दाखवीत नाही, तर वैश्विक सत्य अधोरेखित करते. जगातील यच्चयावत चांगल्या-वाईट बाबी ही माणसाचीच देणं आहे. इतकेच कशाला धर्म नि ईश्वरसुद्धा मानवी मनाची उपज आहे.

marathi poet narayan surve
निसर्गाच्या कुशीतली कलाकुसर

खरोखर त्याला ब्रह्म, ईश्वर ही नावे दिली कोणी? माणसानेच होय! आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर ‘त्याला कोणतेही नाव नाही’ हे वेदांती तर सांगतातच, पण प्रसिद्ध चिनी रहस्यदर्शी लाओत्से ‘त्याला कोणतेही नाव नाही’ सांगत ‘नाव देताच तो वा ती लुप्त होतो’ची साक्ष देतो.

थोडक्यात, आध्यात्मिक नि इहवादी ही दोन्ही सत्ये या पंक्ती उधृत करतात. कवीने वयाच्या ३७ व्या वर्षात लिहिलेल्या, या पंक्ती गोंधळल्याची कबुली देत, त्यांच्यातील प्रांजळता दाखवितात नि ‘अजून काही पाहिलेच नाही’ चा त्यांचा भाव, त्यांची उत्कट जिज्ञासा नि जिवंतता दाखवितात.
कवीला वाटते, आयुष्य वरवर पाहता पुस्तकाच्या कव्हरसारखे गुळगुळीत, गुटगुटीत, बाळसेदार दिसते. पण आत खाटकाने सोललेल्या धडासारखे ओळीने मांडलेले असते. हळवा असलेला कवी स्वतःच्याच स्मृती उगाळत बसतात. तेव्हा कधीतरी त्यांना ते पेन्शनरासारखे वाटते. व्यथित होऊन ते स्वतःशीच उद्गारतात,

‘‘हे नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो’’
चुकचुकतो कधी जीव; वाटते, या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो

स्वतःला हुकूम करून तयार करायला हवे होते, मनगट वळवायला हवी होती, स्वतःला झोकून द्यायला हवे होते. गतगोष्टींचा विचार करता काळीज काजळीसारखे कुरतडत राहते. कवीची ही भावना त्याच्यातील चिंतनशील विचारशीलताच दर्शविते. पुढे तो स्वतःला म्हणतो,

किती वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात

कवीच्या या कथनातील सत्य व्यक्तवायला वेगळ्या भाष्याची गरजच नाही. अनुभव हेच सत्य असतात, ग्रंथ वा शब्द; आदर्श, कल्पनांनी पोसलेले असतात. त्यामुळे कवीला ग्रंथ बाटगे वाटतात. त्यापेक्षा कामगार नि परिचारिका निर्मितीक्षम वाटतात. कढ आल्यासारख्या जुन्या घटना त्यांना वारंवार आठवतात, अचानक उचल खातात. याकूब का मेला? आफ्रिकन चाचा का कोंडला गेला? चंद्राचा पोर युद्धात कसा मारला गेला, ते आठवू लागते. सोबतच जिचे मूल युद्धात मेले ती चंद्रा आठवते.

marathi poet narayan surve
कौरव...पांडव आणि सदसद्विवेक...!

अडाणी असून, रोज पेपर घेणारी, मुलाच्या शोधात नकाशे जमविणारी, त्याची वाट पाहत स्टेशनवरून भिरभिरणारी, बराकीतून फिरणारी आणि पोरगा म्हणून कवीलाच कुशीत ओढणारी तीही मरते. कवीच्या अश्रूंचे दगड होतात. पण नाती मात्र त्यांना तोडवत नाहीत. तितक्यात त्याला ‘आफ्रिकी चाचा’ दिसतो, त्याला ‘सुव्वर, इंडियन, काले कुत्ते’ अशा शिव्या घालणारे गोरेसाहेब दिसतात. अचानक आफ्रिकी चाचाच्या डोळ्यांत पेटलेला विद्रोहाचा निखार दिसतो आणि क्षणात साखळदंडात अडकवलेला तोच डोळ्यांसमोर येतो.

त्याचे ‘बेटा!’ म्हणून गदगदीत कंठाने काढलेले शब्द आठवतात, पाठीवरून फिरविलेला हात आठवतो नि सरते शेवटी हा आपला गुरू कोठे असेल?चा प्रश्न मनाला चुटपूट लावून जातो. शेवटी तो उद्गारतो,

आता आलोच आहे या जगात, वावरतो आहे या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे; आपलेसे करायलाच हवे; कधी दोन घेत; कधी दोन देत

कवीने जीवन विद्यापीठातून कमावलेले सारे ज्ञान नि त्यावर काढलेला वरील उतारा किंवा तोडगा सर्वांनाच लागू होणारा आहे. कवीची ही कविता केवळ वास्तवदर्शीच नाही, तर स्वानुभवावर आधारित असल्याने आत्मनिष्ठही आहे. शिवाय ती साऱ्या श्रमजीवी कामगार, उपेक्षितांचे अंतरंग उलगडणारी आहे, आजही विचारप्रवण करणारी आहे.

(लेखक प्रसिद्ध मनोचिकित्सक आहेत.)

marathi poet narayan surve
आयुष्याच्या ‘रिंगणा’भोवतीचा कल्लोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.