अमृतातेही पैजा जिंके : दुःख हवे ! महापुरुषांचे मनोगत !!

Marathi Poetess Padma Gole
Marathi Poetess Padma Goleesakal
Updated on

पद्मावती विष्णू उपाख्य पद्मा गोळे (१९१३ ते १९९८) यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगांवचा, पटवर्धन राजघराण्यातील होता. त्यांचे वडील विनायकराव पटवर्धन कवयित्रीच्या दहाव्या वर्षी निधन पावले.

त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्याला स्थानांतरीत झाले. त्यामुळे कवयित्रीचे एम. ए. पावेतोचे शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनापासूनच कवयित्रीने लेखनास आरंभ केला होता. नाटककार म्हणून तिचा सुरु झालेला साहित्यप्रवास कवयित्री म्हणून विस्तारीत पावला.

‘प्रीतिपथावर’, ‘नीहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’, ‘श्रावणमेघ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. नीहार नि स्वप्नजा या काव्यसंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. कवयित्री पद्मा गोळे यांच्या कवितेचा रसास्वाद शब्दबद्ध करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध.... (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet padma gole nashik)

दुःखाचे स्वागत करताना ही कवयित्रि लिहिते,

वामनाच्या पावलांनी
माझे दुःख आले घरा,
घाला सौभाग्याचे हेळ
सोनकेळ लावा दारा….
माझ्या मिटल्या कळ्यांनो !
उघडा गं चोरखण
माझ्या दुःखाच्या चरणी
अर्पा आपुलाले धन

या पंक्तीत मिटल्या कळ्यांना अर्थात आपल्या सुप्त क्षमतांना जागृत होण्याचे आवाहन करीत सोनकेळ लावून दुःखाचे स्वागत करायचे आमंत्रण ती देते आहे.

दुःख म्हणजे अंतर्मुख होण्याची प्रक्रिया हे दार्शनिक तथ्य ती ओळखते. इतकेच नाही तर निराशा, उदासी, अज्ञात हुरहूर यांच्याकडे ही ती त्याचदृष्टिने पाहताना दिसते. निराशेला ती म्हणते,

निराशे ! तुझे शांत सौंदर्य शोभे
खुले फेन रंगी तुला पातळ
मुखी रम्य औदास्य नांदे सदाचे
कधी भावनांचे उठे वादळ

निराशेत रम्य औदास्य पाहणारी कवयित्रीची दृष्टीच विलक्षण आहे. निराशेकडे, उदासीकडे लोक एकतर तिरस्काराने पाहतात किंवा भयाने पाहतात. पण कवयित्रीला तीत ही रम्यता दिसते.

कारण निराशेचा भाव क्षणिक असतो, ही तिची जाणीव नि निराशेत होणारे जगाचे दर्शन विरागाकडे नेण्याचे सामर्थ्य देणारे ठरावे ही आशा हेच होय.

तिला वाटते निराशेने सुख-दुःखाची समानता माणसाच्या नजरेत आणून द्यावी, जीवनाच्या क्षणभंगूरतेचे दर्शन घडवावे. जेणे करुन क्षुद्र स्वार्थ बाजूस सारीत मनोभाव जगत कल्याणाकडे वळेल. कवयित्रीचा अनुभव तसाच आहे, म्हणून ती लिहिते

असे दिव्य सामर्थ्य लाभेल का गे
निराशे ! तुझी साधना साधिता?
निराशे ! परी बंद केलीस द्वारे-
मनांची, खुले राहिले एक जे
गवाक्षातुनी त्याच काव्याचिया या
जगद्रुप देखावया मी सजे !

Marathi Poetess Padma Gole
एका केमिस्टचे प्रभावी व्यक्तिचित्रण!

निराश मन सारी कवाडे बंद करुन विरागी होऊन बसते. पण त्याच्या एका उघड्या गवाक्षातून कवयित्रीचे हे काव्य झरते. निराशेला देवता म्हणत सर्जनशीलतेची प्रेरणा ती निराशेकडूनच मिळविते, यातच तिच्या विचारांचे सामर्थ्य आहे.

तिला वाटते निराशा नि दुःख केवळ अंतर्मुख करत नाही तर ते समानतेचा ध्वज फडकवित कार्यप्रवण करणारे असते. ही केवळ कवयित्रीचीच नाही तर गोविंदाग्रजांची पण अनुभूती आहे. ‘सुखदुःख’ कवितेत गडकरी सांगतात,

सुख निजभोगी नरा गुंगवी विसर पाडिते इतरांचा,
दुःख बिलगते थेट जिवाला; ध्वज फडकविते समतेचा

खरंच जगात दुःख नसते तर? तर न्याय, नीति, समता, बंधुता आदी महान तत्वांचा उदयच झाला नसता. जगातील यच्चयावत महापुरुष क्षणभंगूर सुखाला टाळत चिरतरुण दुःखाला कवटाळताना दिसतात. त्याचेच प्रतिबिंब कवयित्रीच्या ‘दुःख हवे’ या कवितेत पडताना दिसते.

‘दुःख हवें’ जपत मंत्र
वेडे कुणि तप करिती,
दुःखास्तव प्रभुपायी
सत्याग्रह आचरिती

‘सुख हवे’, ‘हे हवे ते हवे’ च्या सांसारिक गदारोळात दुःखाची मागणी करणारा नक्कीच वेडा असणार ! आणि दुःखासाठी तप करणारा, सत्याग्रह करणारा तर महान वेडा असावा ! भगवंतालाही असा वेडा पाहून आश्चर्य वाटले नि तत्काळ प्रसन्न होऊन प्रभूने त्याला विचारले, ‘तुला काय हवे, ते माग ! पृथ्वीवरील सर्व सुखे देतो किंवा जगात अजरामर करतो !’ त्यावर ते वेडे हसून भगवंतास म्हणाले,

‘’दुःख हवें, दुःख हवें---
दुःखाचा हृदिय ध्यास ‘’

क्षणाचाही विचार न करता प्रभू उदगारले ‘तथाऽस्तु ! दुःख दिले ! पण तुला कसले दुःख हवे ते तरी सांग ?’ त्याबरोबर ते वेडे बोलू लागले, ‘मला टिचभर हृदयाचे दुःख नको, माझ्या ओंजळभर प्रीतिचे दुःख नको, चार भिंतीत उबणारे दुःख नको, राजदरबारात रमणारे, उर्वशीच्या घुंगरात हरणारे दुःख मला नको’ तर मला हवे -

Marathi Poetess Padma Gole
संसदेतील (अ)भारतीयत्व

‘’दुःख असे द्या विशाल
घेइल जे निज कवेत
क्षितिजासह हे वर्तुळ !
दुःख हवे गरुडाचे गर्वोद्धत,
मातेच्या मुक्तीस्तव
आणिल जे जगी अमृत !...
दुःख हवे हे असले
संजीवक अन् समर्थ !
प्रभु ! अपुल्या हास्यासम
करुणामय दुःख हवे !’’

त्या वेड्यास अपेक्षित असलेले दुःख पृथ्वीला व्यापणारे विशाल आहे. विशालतेचा हा भाव कर्मणी नसून कर्तरी आहे. अर्थात ‘दुःखाला’ अनुलक्षून नसून ‘दुःख होणाऱ्याला’ अनुलक्षून आहे. त्यामुळे कवयित्रीला अपेक्षित विशालता समष्टीवाचक आहे.

व्यक्तिगत दुःख कितीही मोठे असले तरी ते फक्त व्यथा नि वेदनेला जन्म देते. याउलट समष्टीचे दुःख उत्कट आक्रोशाचे, उदात्त त्यागाचे प्रतीक बनत व्यक्तिचे व्यक्तीत्व विशाल नि उन्नत करणारे ठरते. बरे ! तिला ते केवळ विशालच नव्हे तर कार्यप्रवण करणारे हवे.

जे गरुडासारखे मातेच्या मुक्तीस्तव झगडून अमृत आणते, भगीरथासम महत्प्रयासाने ब्रह्मदेवाच्या कमंडलुतील गंगा शापित कोट्यवधी सागरसुतांच्या उध्दारासाठी पृथ्वीवर आणते. त्यामुळेच ती त्या दुःखाला संजीवक नि समर्थ म्हणते.

त्या वेड्याची ती वेडी मागणी ऐकून प्रभू हसून ‘तथाऽस्तू !’ म्हणाले तेव्हापासून ते दुःख अमर झाले तर ते वेडे जगांत मृत्युंजय ठरले. या साऱ्यांच पंक्ती महापुरुषांचे मनोगत उत्कटपणे इंगित करणाऱ्या आहेत.

नीट पाहिले तर प्रस्तुत कवितेत कवयित्री ‘दुःख हवे’च्या आवरणाखाली समष्टीचे दुःख नव्हे दुःख निवारण करण्याची संजीवक नि समर्थ शक्ती मागते आहे. जी कवितेचा आशय गहन करणारी आहे. त्यामुळेच ती रसिक मनाला आकर्षक तर चित्ताला प्रेरक वाटते.

जाता जाता हे ही सांगणे गरजेचे वाटते की, पद्मा गोळेंच्या या कवितांचा रसास्वाद घेतल्यावरही तितक्याच दर्जेदार अन्य कविता आपण सोडल्याची हळहळ मनास लागून रहाते.

(लेखक हे प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)

Marathi Poetess Padma Gole
शिरवळकरांची ‘दुनियादारी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.