शरच्चंद्र मुक्तिबोधांची उद्‍बोधक कविता : ‘म्हातारे शब्द’

शरच्चंद्र माधव मुक्तिबोध (१९२१-१९८४) यांचा जन्म माळव्यातील इंदूरचा असला, तरी त्यांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातील जळगावचे होते.
marathi poet Sharachchandra  Muktibodh
marathi poet Sharachchandra Muktibodh esakal
Updated on

जीवनाचे सत्य म्हणजे इतिहासातून जसा वारसा घ्यायचा असतो, तसाच इतिहासातील नकारात्मक वारशातून आपला हात आपण मोकळा करून घ्यायचा असतो. त्यासाठी पूर्वजांच्या चुका स्वीकारण्याची तयारी असावी लागते. पण, जे स्वीकारत नाहीत, त्यांना जागे करण्यासाठी कवी ‘म्हातारे शब्द’ असा शब्दप्रयोग करतात.

‘म्हातारे शब्द’ म्हणत त्या शब्दांना हिणविणारे शरच्चंद्र मुक्तिबोध मार्क्सवादाकडून हिंदू धर्मवादाकडे वळले. त्यांचे हे वळणे चूक की बरोबर यावर चिंतन इतरत्र करता येईल, मात्र त्यांच्या या परिवर्तनामागे त्यांचे बालपणातील वातावरण होते, हा समीक्षकांचा आरोप बरोबर वाटत नाही.

कारण त्याच वातावरणात वाढलेले त्यांचे थोरले बंधू अखेरपावेतो साम्यवादावर नि पुरोगामीत्वावरच ठाम होते. काहीही असो; पण कवीची ही कविता उद्‍बोधक नि आजही मार्गदर्शक नक्कीच आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet Sharachchandra Muktibodh nashik)

शरच्चंद्र माधव मुक्तिबोध (१९२१-१९८४) यांचा जन्म माळव्यातील इंदूरचा असला, तरी त्यांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातील जळगावचे होते. त्यांचे पणजोबा वासुदेवराव कुळकर्णी १९ व्या शतकाच्या प्रारंभी केव्हा तरी जळगावहून ग्वाल्हेरास स्थलांतरित झाले. कवीचे आडनाव कुळकर्णीचे मुक्तिबोध कसे झाले, याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एकीचे मूळ तर चक्क १२-१३ व्या शतकापावेतो जाते.

कवीचे वडील पोलिस खात्यात उपनिरीक्षक होते. कवीचे शिक्षण एम.ए., एलएल.बी. पावेतो झालेले होते. अनेकविध नोकऱ्या केल्यावर शेवटी कवी त्यांच्या आवडत्या मराठी अध्यापनाचे काम करीत नागपुराहून निवृत्त झाले. कवींची पत्नी वसंत हजरनवीस या कवींची बहीण होती. कवीच्या काव्यावर गजानन मुक्तिबोध, लोवलेकर, समर्थ रामदास यांच्या कवितांचा प्रभाव होता.

कवीचे वडीलबंधू गजानन माधव मुक्तिबोध हिंदीतील पहिल्या तारसप्तकातील कवी होते. त्यांच्या ‘चांद का मूह टेढा है’ या काव्यसंग्रहाने त्यास हिंदीतील पहिल्या प्रतीच्या नि मूलगामी कवीत स्थान मिळवून दिले. ते प्रारंभी प्रगतिवादी व नंतर प्रयोगवादी कवी म्हणून ओळखले जात.

प्रगतिवादी म्हणजे साम्यवादी नि गांधीवाद विरोधक, तर प्रयोगशील म्हणजे मानवतावादी व उत्क्रांतीशील अशी ढोबळ व्याख्या केली जाते. कवी अशोक वाजपेयी यांनी त्यांचे गुणवर्णन करताना त्यांना ‘गोत्रहीन कवी’ म्हणून गौरविले. गोत्रहीन कवी म्हणजे ज्याची कविता अन्य कोणा पूर्वकवीच्या अनुकरणातून उपजली नाही, तो कवी होय. हे सारे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे जवळपास याच बाबी शरच्चंद्रांना लागू होतात.

‘मुक्तिबोध और मुक्तिबोध ः गजानन माधव व शरच्चंद्र माधव’ या चर्चासत्रात बोलताना श्री. भा. जोशी यांनी ‘दोघांच्या साहित्यात गहन विचारशीलता, राजनैतिक चेतना, प्रगतिशीलतेची जाणीव होती. प्रस्थापिताला उद्‌ध्वस्त करण्याचे काम गजानन हिंदीत तर शरच्चंद्र मराठीत करीत,’ असे प्रतिपादले होते. प्रफुल्ल शिलेदार, दोघांनी मानवतेला केंद्रीभूत मानून रचना केल्याचे सांगत दोघे कवितेचे मूल्यमापन मानवतेवरच करीत असल्याचे सांगतात. स्वतः शरच्चंद्र हीच बाब निर्देशित करतात.

शरच्चंद्र कवी, कादंबरीकार नि समीक्षकही होते. ‘सृष्टी, सौंदर्य व साहित्यमूल्य’ या त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथाला १९७९ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. क्षिप्रा, सरहद्द व जन वोळतु जेथ ही त्यांची त्रिखंडात्मक कादंबरी आहे. जन वोळतु जेथे या कादंबरीचे शीर्षक त्यांनी समर्थ रामदासांच्या

जन वोळतु जेथे । अंतरात्माची वोळला ।

जन खौळले जेथे । अंतरात्माची खौळला ।।

या श्लोकातून घेतले.

marathi poet Sharachchandra  Muktibodh
गोष्ट सोपी, जगण्यासाठी!

‘वोळणे’ याचा अर्थ संतुष्ट होणे, सुखावणे होय. जन व मनाचे ऐकयत्व रामदास येथे साधू पाहतात, तीच कवीची दृष्टी आहे. ‘मार्क्स जनाचा विचार करतो; तर भारतीय दर्शन मनाचा विचार करते’ या दोहोंचे सूत्र मुक्तिबोध त्यांच्या साहित्यात जोडू पाहतात. त्यामुळेच ‘मार्क्सवादी असलेल्या मुक्तिबोधांनी नंतरच्या काळात भागवत धर्माचे क्रांतिकारत्व स्वीकारत, चैतन्यवादाचा पुरस्कार केला.’ हे यशवंत मनोहरांचे निरीक्षण अचूक ठरते.

कवीने ‘नवी मळवाट’, ‘यांत्रिक’ व ‘सत्याची जात’ हे तीन काव्यसंग्रह प्रसवले. यातील ‘नवी मळवाट’ हा १९४८ मध्ये प्रकाशित काव्यसंग्रह असून, यास कवीची स्वतःचीच दीर्घ प्रस्तावना आहे. तीत कवीने प्रामुख्याने नवकाव्याची चर्चा केलेली आहे. काव्यात नवेपणा आशय नि अभिव्यक्तीच्या रीतीतून प्रकटतो, सांगत ‘आजच्या वास्तवाच्या गर्भातील समतेच्या जीवनाचे उद्याचे वास्तव हीच नवकाव्याची आधारशीला होय,’ असे प्रतिपादन करीत वितृष्णा नि प्रक्षोभ हेच आजच्या कवितेचे युगतत्त्व आहे, यावर भर दिला आहे.

‘नवी मळवाट’ हे काव्यसंग्रहाचे शीर्षकच विरोधाभासी आहे. नवी म्हणजे कुणाला ठाऊक नसलेली नि मळवाट म्हणजे वापरून-वापरून जुनी झालेली. कवीला वाटते, मानवता, समता, बंधुता हीच जीवनाची खरी वाट होय. ती फार पूर्वी ठाऊकही असावी, म्हणून मळवाट आणि ती विसरली गेलेली मळवाट कवी नव्याने आठवून देतोय, म्हणून ‘नवी मळवाट’ होय.

कवीची वृत्ती समष्टी केंद्रीत असल्याने तो ‘प्रत्येकाचा ‘मी’ हा आता ‘आम्ही’ जाहलेला आहे’ असे गर्जत सांगतो. तमाची छाती फोडून, प्रकाशधारा कोसळवणारी त्याची कविता बलाढ्य प्रज्ञेचा मारा करीत जन्मणारी आहे. इतकेच नव्हे, तर तिचे रूप कथन करताना-

क्रुद्ध प्रचंड नवा मार्तंड उरांउरांत पेटला आहे

महा प्रखर त्याचा प्रकाश माझ्या उरांत कोंदला आहे

प्रकाशाचिया सागरावरी कोसळतात काळे पहाड

नभ-घुमट साठवीतसे ब्रह्मांड भेदी ध्वनि धडाड

त्याच ध्वनींनी प्रतिध्वनींनी प्रकाश गीत नावरे आता

उरी जन्मते नवी कविता

आज हृदयीं धगधग करी नवी सविता !!

कवीच्या मनातील महाकवीही तसाच आहे. ज्याच्या उरात संतापाची लाट उसळली आहे, प्रक्षोभ नि विद्रोहाची आग पेटली आहे, ती आग साधीसुधी नाही, तर प्रत्यक्ष सूर्यासारखी स्वयंभू नि सर्वभक्षी आहे. तशीच प्रकाश देणारी नि परोपकारीही आहे. त्यामुळेच महाकवीला बोलविताना तो गातो,

marathi poet Sharachchandra  Muktibodh
दृष्टिकोन : आयुष्य सुंदर जगण्यासाठी अध्यात्म आवश्यक

ये नाशांतुन, मृत्युंतुन, पीडेंतुन ये-स्वागत !

ये अश्रूंतुन, अपमानांतुन, दैन्यांतुन ये स्वागत !

ये तडफडत्या हृदयांच्या टपटपत्या रुधिरामधुनी

विश्वभक्षि रोषानल ज्वालांमधुनी ये तू स्वागत !

नाश, दैन्य, पीडा, अपमान हे सारे त्या शोषित, पीडित नि वंचितांचे अनुभव झाले; तर तडफडते हृदय, टपटपते रक्त, विश्वभक्षी क्रोध वा रोष हे परिणाम झाले. कवीला दिसणारा हा महाकवी कवीच्या सहोदरातच विद्यमान होता. पाहा नं! गजानन मुक्तिबोध ‘अंतःकरण का आयतन’मध्ये लिहितात-

बिना संहार के, सृजन असंभव है

समन्वय झूठ है

सब सूर्य फूटेंगे

व उनके केंद्र टूटेंगे

उडेंगे खंड

बिखरेंगे गहन ब्रह्मांड में सर्वत्र

उनके नाश में तुम योग दो

लहान्या भावाच्या एक पाऊल पुढे जात गजानन मुक्तिबोध शरच्चंद्रांचे पुढील मंतव्य व्यक्तवून ठेवतात. कवीच्या बहुतेक कविता सामाजिक मनाच्या जाणिवेतून निर्मित झालेल्या आहेत. ज्यावर मार्क्सबरोबर काहीतरी अधिक आहे. कवीच्या अशा कवितेकडे वळण्याआधी कवीच्या प्रेम व निसर्ग कवितांचा धावता आलेख घेऊयात.

कवीची प्रेमकविता ही निखळ प्रेमकविता नसून, क्रांतिकारी जाणिवेच्या कवीची कविता आहे. तीत मिलनाची ओढ आहे, विरह आहे, धुंदी आहे. सोबतच दुर्मिळ अशी जबाबदारीची जाणीवही आहे. त्यामुळेच तिला ‘व्याकूळ या उरि जळे काहि तरि’ची सल सांगताना माझ्यावर ‘जीव जडू देऊ नको’ अशी प्रियेलाच गळ घालतो; तर ‘विसर क्षणाचे मृदु नाते’ सांगत नाते जमण्यापूर्वीच तोडायला निघतो.

‘नको मनाला हळहळ असली,

तुला सोडुनी दूर जायचे ! दुजा कुणाला कळकळ कसली?’

म्हणत असतानाही अर्धपोट शोषित, वंचित त्याला स्मरतात. त्याला दूरदूरचे रस्ते बोलावू लागतात. आक्रंदणारी, तडफडणारी मानवता पीळ पाडू लागते. हे सारे पाहिल्यावर माझी जळती प्रीती कशी शांत राहणार? पुसत तो प्रियेला म्हणतो, ‘मला तुझ्याशी गळ्यांत गळा, डोळ्याशी डोळा भिडवायलाही त्याला फुरसत नाही’,

करशील ना क्षमा तूं मला?

माझ्या उत्कट आतुर जिवाचिये साजणी !

असे सांगत प्रीत थांबवितो. अशा प्रकारची प्रेमकविता वा. ना. देशपांड्यांच्या काही कविता वगळता मराठीत तरी दुसरी नाही. कवीने काही निसर्ग कविताही लिहिल्या. त्यातील काहीत तर लोवलेकरांसारखी रचनाही सापडते. ‘सांज ये हळूहळू’ हे तर उत्कट भावगीत वाटावे, अशी कविता आहे.

marathi poet Sharachchandra  Muktibodh
अमृतातेही पैजा जिंके : ‘घाल घाल पिंगा वाऱ्या!’ कृ. ब. निकुंबांचे आल्हादक भावगीत !

आज आपण पाहणार असणारी ‘म्हातारे शब्द’ ही कवीची मानवी इतिहासाला पुरोगामीत्वाची दीक्षा देणारी रचना आहे. कवी म्हातारे म्हणतो, वृद्ध नाही. वृद्धमध्ये वृद्धिंगत होण्याचा- वाढण्याचा भाव असतो. सोबत आदरही असतो. म्हातारा शब्दांत तिऱ्हाईततेचा, तिरस्काराचा नि मरणाच्या दारी असण्याचा भाव असतो.

कवीला तोच अपेक्षित आहे. शिवाय, तो म्हातारी अक्षरे म्हणत नाही. कारण, अक्षरे एकाअर्थी अर्थहीन नि ध्वनींचे प्रतिध्वनी मात्र असल्याने कालातीत असतात. शब्दांचे तसे नसते. ती अर्थाचा भार वाहतात. अर्थ कालसापेक्ष असल्याने तो विशिष्ट कालखंडानंतर कालबाह्य होतो. याचेच प्रतिबिंब कवीच्या १९८१ मध्ये प्रकाशित अस्मितादर्श दिवाळी अंकातील कवितेत दिसते.

अगोदर असतात काही निश्चल स्थिर शब्द

मग उगवतात त्याच्यावर काही नवे शब्द

मग शब्दांचे थरावर थर जमतात

होता-होता घनदाट शब्दसृष्टी उभी राहते

खरंय मानव त्याच शब्दांना, शब्दांवर चढलेल्या शब्दांच्या थरांना प्रमाण मानत चिटकून बसतो. असे शब्द शाश्वततेचा टेंभा मिरविणारे एखाद्या ईश्वराचे, देवदूताचे, धर्मग्रंथाचे, स्मृतीचे, विचारधारेचे प्रतिनिधी असतात. शतकानुशतके उलटली तरी त्यातील शब्दांना, त्यातील हरवलेल्या व आज निरर्थक ठरणाऱ्या अर्थांना, त्यातील कालबाह्य आज्ञांना माणूस अंधपणाने अनुसरत राहतो. ते कवीला रुचत नाही. तो लिहितो,

झिजल्या नाण्याच्या समान झिजून व्यर्थ झालेले

अवचेतनाच्या पुराण स्मृतींच्या समान विचित्र आकृतीवाले

जुनाट पोथीच्या पिंवळ्या खिळखिळ्या पानांच्या समान...

अत्यंत जीर्ण

कवी यात वापरत असलेल्या प्रतिमा अगदी साफ आहेत. नाणे झिजले, त्यावरील छापे नि आकडे संपले, की ते उरते फक्त नि फक्त धातूचे तुकडे. त्यांचे मूल्य होते कवडीमोलाचे. तसेच पोथ्यांचे असते. येथे कवी वापरत असलेली जुनाट, पिवळ्या, खिळखिळ्या, अत्यंत जीर्ण ही उपपदे त्यांची व्यर्थताच दर्शविते. कवीला ठाऊक आहे, बादरायण संबंध जोडणे हा मानवी मनातील जिव्हाळ्याचा भाग होय. त्यामुळे निरर्थकातून अर्थ मानवी प्रवृत्ती शोधत जाते. याचे वर्णन करताना कवी लिहितो,

धुक्यांत किंचित उजळ उठावा चंद्राचा डाग

तशाच हिरव्या अंधुक धुकट प्राचीन तयांच्या...

नयनावरून, तरंगतात

जुनाट मेलेल्या जगांचीं स्वप्नें...

marathi poet Sharachchandra  Muktibodh
अमृतातेही पैजा जिंके : ‘कविता स्फुरते कशी---’ काव्यनिर्मितीचे संजीवनी रहस्य !

जीवनाचे सत्य म्हणजे इतिहासातून जसा वारसा घ्यायचा असतो, तसाच इतिहासातील नकारात्मक वारशातून आपला हात आपण मोकळा करून घ्यायचा असतो. त्यासाठी पूर्वजांच्या चुका स्वीकारण्याची तयारी असावी लागते. पूर्वजांच्या चुका स्वीकारणे म्हणजे पूर्वजांशी नाते तोडणे नसते वा त्यांचा अवमान करणे नसते, तर त्यांच्या मर्यादा ओळखणे असते. मर्यादा ओळखल्या की आपण बदलत्या जगाशी इमान राखू शकतो. आपला हात जर आपल्याला मोकळा करता आला नाही, तर आपण जुनाट मेलेल्या जगाला सत्यात आणण्याची प्राचीन फिकट भूतांची गाणीच गातो आहोत, असे कवीला वाटते. तरीही जे त्या जुनाट जगाला चिटकून राहतात, त्यांना जागे करताना कवी सांगतो,

अहो, त्या म्हाताऱ्या शब्दांचे

वाळलें कधीच नसांत रक्त

जीवही कधींच झालेला मुक्त

अवशेष अस्थी या उद्‌ध्वस्त जगाच्या...

कष्टानें चढती छंदांची चढण

मरण मिरवी जीवन म्हणून

निःसत्त्व शब्द

म्हातारे शब्द !!

नसातील वाळलेले रक्त, मुक्त झालेला जीव, अवशेष, अस्थी त्याची मेलेली स्थितीच अधोरेखित करतात. तरीही हे वर्णन कमी की काय वाटून कवी ‘मरण मिरवी जीवन म्हणून’ अशी द्वाही मिरवितो. मरण नि जीवन दोन टोकं असतात. मरणात सारे संपते, कोणताही बदल घडविता येत नाही; तर जीवनात सारे परिवर्तन घडविता येते. जेव्हा मरणच जीवनाचे प्रतिनिधित्व करू लागते, तेव्हा परिवर्तनाला वावच राहत नाही. परिणामी, जीवन मरण बनते, हा एक अर्थ. दुसरा शब्द निःसत्व झाल्याने पूर्वीच्या काळातील धर्म अधर्म बनतो, न्याय अन्याय ठरतो. तो आज अनुक्रमे धर्म नि न्यायाचे छद्मी प्रतिनिधित्व करीत असल्याने, कवीस मरण-जीवनाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे वाटते.

कवीची ही म्हाताऱ्या शब्दांचा अव्हेर करणारी कविता पाहताना गजानन मुक्तिबोधांच्या ‘ब्रह्मराक्षस’मधील खालील पंक्ती प्रकर्षाने आठवतात,

ये गरजती, गुंजती, आंदोलिता

गहराईयों से उठ रही ध्वनिया, अतः

उद्भ्रांत शब्दों के नए आवृत्त में

हर शब्द निज प्रति-शब्द को भी काटता,

वह रूप अपने-अपने बिंब से ही जुझ

विकृताकार- कृती है बन रहा

ध्वनि लड रही अपनी प्रति-ध्वनि से यहा

marathi poet Sharachchandra  Muktibodh
तंत्रज्ञानाचं यश अन् अपयश

यात गर्जणारे, प्रतिध्वनीत व आंदोलीत करणारे, गहनतेतून येणारे शब्द उद्भ्रांत होतात. उद्भ्रांत म्हणजे चक्कर खातात, चक्रव्यूहात सापडतात. येथे कवी मनोविश्लेषणाच्या अंतगर्भात प्रवेश करतो. शब्द अर्थांचे वाहक असतात, हेच तो नाकारतो. उलट ते अर्थाला, सत्याला सीमित करतात, असेच त्याला वाटते.

कोणताही तरल मनोभाव, विचार, धारणा शब्दात पकडताच निर्जीव बनते. म्हणतात ना, ‘शब्दांत पकडता येत नाही वेदांत ही ‘नेति-नेति’ म्हणतो’ तर कबीर ‘गुंगे केरी शर्करा । बस खाये और मुस्काय ।’ म्हणतो ते त्यामुळेच. त्याच म्हणण्यातील मर्यादित अर्थाला धरून कवी शब्दाला समान प्रतिशब्दाचे विरुद्ध उभे करीत, ध्वनीला आपल्याच प्रतिध्वनी विरुद्ध उभे करीत मानवी वागण्यातील दुटप्पीपणा अंतर्बाह्य उभा करतो.

जाता जाता, हे नमूद करावेसे वाटते की 'म्हातारे शब्द' म्हणत त्या शब्दांना हिणविणारे शरच्चंद्र मुक्तिबोध उत्तरायुष्यात याच म्हाता-या शब्दांच्या आश्रयास गेले. मार्क्सवादाकडून हिंदू कर्मकांडाकडे वळले. मंत्रोच्चार नि पूजा अर्चनेत समय व्यतीत करू लागले. त्यांचे हे वळणे चूक की बरोबर यावर चिंतन इतरत्र करता येईल, मात्र त्यांच्या या परिवर्तनामागे त्यांचे बालपणातील वातावरण होते हा समीक्षकांचा आरोप बरोबर वाटत नाही.

कारण त्याच वातावरणात वाढलेले त्यांचे थोरले बंधू अखेर पावेतो साम्यवादावर नि पुरोगामीत्वावरच ठाम होते. काहीही असो; पण कवीची ही कविता आजही उद्बोधक नि विचारणीय आहे.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

marathi poet Sharachchandra  Muktibodh
‘जिजाऊ’च्या लेकींसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.