घेता... विंदांची अर्थसुंदर कविता!

कवी विंदा म्हटले, की पटकन ओठावर येते ती ‘देणाऱ्याने देत जावे’ ही गाजलेली तितकीच अर्थपूर्ण कविता.
Vinda Karandikar
Vinda Karandikaresakal
Updated on

कवी विंदा म्हटले, की पटकन ओठावर येते ती ‘देणाऱ्याने देत जावे’ ही गाजलेली तितकीच अर्थपूर्ण कविता. कवी तसे म्हणत असले तरी, संपूर्ण कवितेत माणसाने कोणाकडून काय घ्यावे वा शिकावे हाच विचार चढत्या श्रेणीत मांडलाय.

त्यावर कळस चढविताना ‘माणसाने देणाऱ्याचे हात घ्यावे. ‘दात्याचे हात’ सर्वात महत्वाचे असतात. तेच घेतले तर घेणारा ‘घेता’न राहता ‘दाता’बनून जातो. कवींना हेच अभिप्रेत आहे.

दातृत्वाचा भाव हरवलेला दाता बनणे ही मानवी जीवनातील सर्वोच्च पायरी आहे. नव्हे, नव्हे; ती मानव्याची खरीखुरी निशाणी आहे. या लेखमालेतील हा १२८ वा लेख आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet V D karandikar nashik news)

गोविंद विनायक तथा विंदा करंदीकरांचा (१९१८ - २०१०) जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ला येथील होता. त्यांचे शिक्षण कोल्हापूरात झाले. रत्नागिरी व मुंबईतील काही महाविद्यालयांतून त्यांनी इंग्रजी अध्यापनाचे काम केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता.

विंदा कवी, निबंधकार, भाषांतरकार, समीक्षक, तत्वज्ञ साहित्यिक अशा विविधांगानी परिचित आहेत. विंदांनी ‘स्पर्शाची पालवी’, ‘आकाशाचा अर्थ’ हे लघुकथासंग्रह लिहिले. अमृतानुभवाच्या अर्वाचीनीकरणाचा त्यांनी केलेला अभिनव प्रयोग मराठी रसिकांना रुचला.

परंपरा आणि नवता हा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेला असून राजा लिअर, ॲरिस्टाॅटलचे काव्यशास्त्र इ ग्रंथ अनुवादीत केले आहेत. धृपद, स्वेदगंगा, जातक, मृदगंध, विरुपिका, अष्टदर्शने हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

अष्टदर्शने या वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रहात देकार्त, स्पिनोझा, इम्यॅनुअल कान्ट, हेगेल, शाॅपेनहाॅवर, नित्शे, बर्गसाॅ या सात पाश्चिमात्य नि चार्वाक या पौर्वात्य अशा आठ दार्शनिकांच्या दर्शनाचा परिचय कवीने करुन दिलेला आहे.

त्यासाठी अभंग या काव्यप्रकाराचा कवीने उपयोग केला. प्रस्तूत संग्रहाला ज्ञानपीठ हा देशातील साहित्यक्षेत्रातला सर्वाेच्च पुरस्कार मिळाला.

उपरोल्लेखित अष्टदर्शनातील बहुतेक दर्शने इहवादी होत. प्रत्यक्षातही कवीचा वैचारिक प्रवास उजव्या विचार प्रणालीकडून डाव्या विचारसरणीकडे झाला.

रा स्व संघ ते मार्क्सवाद असा तो राहिला. इहवादी विचारसरणी स्वीकारताना कवीने कधीही विज्ञान नि अध्यात्म यांना परस्पर विरोधात उभे केले नाही, उलट त्यांची सांगड घालण्याकडेच कवीचा कल राहिला. पहा नं,

‘थर्मोडायनॉमिकल् । इक्विलिब्रियम’

आता म्हणा ‘मम’ । मोक्षासाठी.

काही केल्या आता । मोक्ष हा टळेना

याविना कळेना । दुजे सत्य.

सत्याची वाट ही नेहमीच एकाकी नि वाळवंटातून जाणारी असते. याची जाणीव असल्याने कवी सत्याच्या प्रवासासाठी ‘उंट’ या वाळवंटातून चालू शकणा-या वाहनाचा उपयोग करतो. वाळवंटातून प्रवास करताना त्याला उमर खय्याम नि मुहंमद भेटतो.

पण त्याचा सत्यशोधक यात्रेकरु तिथे न थांबता निळा पिरेमिड अर्थात परंपरागत दर्शनात अस्तित्वात नसलेले निखळ सत्य शोधीत पुढे सरकतो. त्यावेळी त्याने केलेली साधना किती बिकट होती याचे वर्णन करताना कवी लिहितो,

तहानेसाठी प्याला मृगजळ;

भूक लागता तहान खाई

‘मृगजळाचे पाणी पिणे’ ही प्रतिमा अदृश्य नि अकल्पनीय साधनेचे दर्शन घडविते. तर भूक लागल्यावर तहान खाणेची तपस्या साधनेतील खडतरता दर्शविते. बरे एवढे सारे साहल्यावर त्याला तो निळा पिरॅमिड दिसला का ? तर कवी सांगतो,

निळा पिरॅमिड दिसला का पण?

…खूण तयाची एकच साधी…

निळा पिरॅमिड दिसतो ज्याला

तोच पिरॅमिड बनतो आधी !

यातील गूढगहन आत्मदर्शन इहवादी नाही अन परंपरागत अध्यात्मवादी नाही असा कवीचा ग्रह आहे. पण नीट पाहिले तर तो ‘शिवो भूत्वा शिवं यजेत’चाच साक्षात्कार आहे.

‘तेच ते’ असणा-या कंटाळवाण्या जीवनाचा कवीला कंटाळा येतो जगणेच नकोसे वाटते त्यावेळी इंद्रियनिष्ठ अनुभव त्याला बांधून ठेवतात म्हणून तो सांगतो,

प्रेम करावे रक्तामधले,

प्रेम करावे शुध्द, पशूसम;

शत जन्माच्या अवसानाने

रक्तामधली गाठावी सम.

Vinda Karandikar
निरंतर कृतिशील

पशूसम प्रेम करावे असे कवी म्हणतो, याचे कारण पशूत्व इंद्रियजन्य सुखात रमणारे असते. ‘तेच ते’चे रटाळगाणे विचारी मनाला उबगविणारे असले तरी मानवातील पशूत्वाला ओढ लावणारे असते. ही ओढ व्यक्तविताना ‘तीर्थाटन’ कवितेत तो तिला म्हणतो,

तीर्थाटन मी करित पोचलो

नकळत शेवट तव दारी;

अन् तुझिया देहात गवसली

सखये मज तीर्थे सारी.

तिच्या अधरावर वृंदावन, नेत्रात प्रयाग, भालावर मानससरोवर, गालावर गया, कमरेवर काशी अशी सारी तीर्थक्षेत्रे मिळाल्यावर, त्याच्यात ‘वाटते जगावे’ची जीवनेषा निर्माण होते.

तीच पुढे ‘वाटते जगवावे’चा भाव जागवते. आपण जगावे नि इतरासही जगवावे या एकत्रीकरणातूनच मानव्याचे दर्शन सिध्द होत असते.

तेच कवीला हवेय. एकदा हे दर्शन सिध्द झाले की मानव्य नि मानवता केंद्रीभूत होते दारिद्रयरहित, विषमताहीन, शोषण मुक्त समाज हे कवीचे ध्येय आहे. व्यक्तीस्वातंत्र्य ही त्याची मूलभूत कसोटी आहे.

म्हणूनच दंतकथा कवितेत अमेरिका व फ्रांसमधील भांडवलशाही, विषमता अन आफ्रिकेतील गुलामगिरी त्याला अस्वस्थ करते. त्यातच डाव्या रशियातील व्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी पाहून तो कळवळतो,

असे म्हणतात की, रशियामध्ये एक मोठा तुरुंग आहे

त्या तुरुंगाला गज नाहीत ‘’आमच्या तुरुंगाला गज बसवा ‘’

असा अर्ज तेथील बंदिवानांनी सरकारकडे केलेला आहे.

मार्क्सवादाकडे वळलेल्या कवीने मार्क्सवादी रशियावर केलेले हे व्यंग डाव्या वा उजव्या विचारसरणी कवीला निराश करतात हेच दाखविते. कवीला वाटणारी हीच वेदना त्याच्या ‘ती जनता अमर आहे!’ कवितेतून अजूनच प्रखरतेने बाहेर पडते.

भटशाहीचे माजलेले स्तोम, ख्रिस्ताचे क्रुसावर चढणे, विधवांचे वपन, स्ति्रयांवरील अत्याचार, महारांच्या गळ््यात अडकवलेले मडके, मुलांच्या सुंता होताना किंचाळणारे ध्वनी इ पासून रोगराईचे माजलेले थैमान, बुध्दिशी व्यभिचार करणारे वकील इ. पर्यंत ती विस्तारत जाते, अंतःकरणाला पीळ पडून तो म्हणतो,

नाही रे संपत

आमच्याच रात्रीचा काळीकुटी अंधार

वाटते फिरावे होऊन समंध,

आणि लावावी रात्रीला आग;

कवीच्या या व्यथेशी कोणीही सहमत होईल. पण ही व्यथा संपणारच नाही, असे कवीला वाटत नाही. कारण जनतेच्या पोटात आग आहे, तिला तिसरा डोळाही आहे, वर्तमानाची; अन्यायाची चीड आहे आणि भविष्याची भेट आहे. म्हणूनच तो सांगतो,

जनतेच्या मुक्तीसाठी

अजून एक समर आहे;

आणि जिचा आत्मा एक

ती जनता अमर आहे !

कवीच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जाणिवांसह त्यात दडलेले मूलगामी तत्वचिंतन. घेता ही कवीची सुंदर कविता त्याचेच सुभग दर्शन घडविणारी आहे.

Vinda Karandikar
नाट्यपंढरी सांगलीचे ‘वारकरी’ डॉक्टर

ती रचनादृष्ट्या सहज, सुंदर असून अर्थदृष्ट्या सघन नि समजण्यास सरळ, सुगम आहे. कवितेचे ‘घेता’ हे शीर्षक ‘देणारा तो दाता तर घेणारा तो घेता’अशा सूचक नि समर्पक शब्दातून कवीने निर्मिले आहे.

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

या पंक्ती सूचवितात की देणाऱ्याचे देणे नि घेणा-याचे घेणे यात कोणताही गंड नाही. साधारणतः देणा-यात अहंगंड तर घेणाऱ्यात हीनगंड असतो.

येथे कवीला दोन्ही गंड दिसत नाहीत, तर देणे नि घेणे ही सहजक्रिया दिसते. देणे-घेणे असतानाही दोहोत गंड नसण्याची घटना केवळ मानव नि निसर्ग या दोन दृष्य घटकातच घडत असते.

हिरव्यापिवळ्या माळाकडून

हिरवीपिवळी शाल घ्यावी;

सह्याद्रीच्या कड्याकडून

छातीसाठी ढाल घ्यावी.

कवीला वाटते हिरवागार माळ माणसाला भरभरुन सौंदऱ्याचे देणे देतो आहे. माणसाने पुढे होऊन ते स्विकारायला हवे.

माळाचे हिरवेपिवळेपण मानवी जीवनातील यशापयश दाखवते नि माळाचे सौंदर्याने नटणे माणसाला भूत-भविष्यात नाही तर सारे काही विसरुन वर्तमानात जगायला शिकविते.

वर्तमानात जगणे म्हणजे ‘जे आहे’ त्यात आनंद मानणे होय. तितकयात कवीला बलाढ्य सह्याद्री दिसतो. त्याच्या मजबूत कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी असे कवी म्हणतो. छातीसाठी याचे कारण छाती हृदयाचे; भावनांचे घर असते.

कणखर वाटणारी माणसेही भावनांच्या आंदोलनात कोलमडून पडतात. कवीला वाटते अशावेळी मानवी मनातील स्वत्व जागवत त्याचे संरक्षण करणारी ढाल, त्याला शौर्यशील सह्याद्रीकडूनच मिळू शकते. इकडून तिकडे पळणारे, वेड्यापिश्या ढगाकडून माणसाने वेडेपिसे आकार घ्यावे.

वेडेपिसे आकार म्हणजे जीवनात क्षणोक्षणी येणाऱ्या भावनांशी तदाकार होणे होय. पण तदाकार होतानाही हे आकार क्षणिक होत. हे ओळखून तादात्म्य टाळण्याचे कौशल्य माणसाने ढगाकडून शिकायला हवे.

जे एखादा कसलेला अभिनेता पडद्यावर साकारत असतो तेच मानवाने जीवनचित्रात साधायला हवे, असे कवीला वाटते.

मानवाच्या मूलभूत समस्यांना कवी ‘रक्तामधले प्रश्न’ संबोधतो, त्याचे उत्तर कोणत्याही ग्रंथातून, शास्त्रातून वा विचारसरणीतून मिळणारे नसून मानवी जीवनातूनच मिळणारे असते. म्हणून तो त्यास ‘पृथ्वीकडून होकार’ घ्यावे असे सूचवितो.

‘उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी.’ असे जेंव्हा कवी म्हणतो, तेंव्हा त्याला अन्याय, अत्याचाराविरुध्द उसळून उठणारा माणूस अपेक्षित आहे. त्याची पिसाळलेली आयाळ म्हणजे निर्लोभी पराक्रम होय.

असे असले तरी माणसाचा खरा पिंड मंगलमय विश्वकल्याणाचा असायला हवा. माणसाला ती देण फक्त तुकोबाची माळच देऊ शकते.

त्यामुळे ती माळ त्याने भीमेकडून घ्यावी, भीमा केवळ तुकोबाचीच नव्हे तर यच्चयावत विश्वकल्याणकारी संतांचा विचार प्रवाहीत करणारी सरिता असल्याचे कवीला वाटते.

हिरव्या माळापासून तो थेट भीमेपावेतो कोणाकडून माणसाने काय काय घ्यावे, याची यादी करता करता कवीच्या मनांत एकसमयावच्छेदे या सा-या दात्यांचा विचार येतो. सर्वाकडून एकत्रितपणे काय घ्यावे. याचा विवेक करताना कवी लिहितो,

देणाऱ्याने देत जावे;

घेणाऱ्याने घेत जावे;

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे !

कवी ‘देणाऱ्याने देत जावे’म्हणत असला तरी, संपूर्ण कवितेत माणसाने कोणाकडून काय घ्यावे वा शिकावे हाच विचार चढत्या श्रेणीत मांडलाय. त्यावर कळस चढविताना कवी सांगतो माणसाने देणा-याचे हात घ्यावे.

‘दात्याचे हात’ सर्वात महत्वाचे असतात. तेच घेतले तर घेणारा ‘घेता’न राहता ‘दाता’बनून जातो. तेच कवीला अभिप्रेत आहे. याचाच अर्थ कवी प्रत्येकाला दाता बनण्याचे आवाहन करतो.

येथे दाता म्हणजे रुग्णालयात जाऊन शाली, चादरी वाटणारा, गोरगरीबांना अन्नधान्य वाटणारा नि ते वाटताना फोटो काढणारा गर्विष्ठ नि बेगडी दाता नकोय. तर दातृत्वाचा भाव नसलेला निसर्गासम सहज सरळ माणूस हवाय. जो वस्तू नाही तर स्वत्व, सामर्थ्य नकळत पुरवतोय.

दातृत्वाचा भाव हरवलेला दाता बनणे ही मानवी जीवनातील सर्वोच्च पायरी आहे. नव्हे, नव्हे; ती मानव्याची खरीखुरी निशाणी आहे. मानव दाता बनला तर अलम दुनियेतील सर्वप्रकारचे शोषण, विषमता तत्काळ मिटतील हा कवीला विश्वास आहे, जो खरा आहे.

जाता जाता हे ही नमूद करणे गरजेचे आहे कि, स्वतः स्वातंत्र्यसैनिक असूनही कवीने स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन नि इतर सुविधा नाकारल्या. इतकेच नाही तर विविध पुरस्कार नि सन्मानातून मिळणाऱ्या धनराशी अनेक सेवाभावी संस्थाना मुक्तहस्ते वाटून टाकल्या.

जणू काही वरील कविता जगण्याचाच कवीने प्रयास केला, त्यामुळेच म्हणावे वाटते उपरोक्त कविता एकप्रकारे कवीचा आत्मानुभवच होती.

(लेखक प्रसिद्ध मनोचिकित्सक आहेत.)

Vinda Karandikar
‘येलूर’ वन्स अगेन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.