संजीवन : गुमनाम हुतात्म्याची गाथा!

Poetry Book
Poetry Bookesakal
Updated on

व्यंकटेश शंकर वकील (१९०६) यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील वायगावचा तर वास्तव्य भिवापूरला होते.

कवीने अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके व अनुवादित साहित्य लिहिले. यातील जन्माचे सोबती हे प्रेमाच्या त्रिकोणावरील नाटक नि राहुल साकृत्यायन लिखित कथासंग्रहाचा अनुवाद वगळता, कविचे फारसे कोणतेच साहित्य उपलब्ध नाही.

इतकेच कशाला कविविषयी, त्याच्या मृत्यूविषयी माहिती उपलब्ध नाही. कवी मुक्तच्छंदाचा चांगल्या प्रकारे वापर करु शकत होता असा शेरा भवानीशंकर पंडितांनी मारलेला सापडतो. कवीच्या रचना पिंपळपान व विदर्भवीणा या प्रातिनिधिक संग्रहात समाविष्ट असून बहुसंख्य रचना दुर्मिळ आहेत. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poetry Sanjivan saga of anonymous martyr nashik news)

Poetry Book
गोडवा कडेपूरच्या कॉफीचा!

कवी स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेला होते. त्यापायी त्यांना खंडवा येथील तुरुंगात १९३०-३१ साली बंदीवास भोगावा लागला. तेथे तुरुंगातील भिंतीवर ‘दोस्तों हमें भूल न जाना ।’या ओळी लिहिलेल्या आढळल्या.

त्या वाचून कविने कुतुहलाने चौकशी केली असता, त्यांना समजले कि जसवंतसिंग नावाचा फाशीची शिक्षा झालेला एक राजबंदी तेथे शिक्षा भोगीत असताना त्याने हे वाक्य लिहीले. कवीच्या मनावर ते वाक्य नि तो हुतात्मा ठसला. त्याच्यावर कविने केलेली संजीवन ही रचना आज आपण पाहणार आहोत.

आरक्त जाहला श्रांत पथिक दिनमणी । क्षण उभा राहिला अपरेच्या अंगणी ।
तुडविणे नभाची वाट संपल्यावरी
जाहला मग्न तो निज प्रियाचुंबनी । तमजाळ विणित ये चेटकिणी यामिनी ।।

कवी फाशीच्या आदल्या रात्रीच्या वर्णनाने कवितेचा आरंभ करतो. तो सांगतो कि, सूर्य दिवसभर प्रवास करुन थकलाय नि क्षणभर पश्चिमेच्या अंगणात उभा राहिला. थोड्याच वेळात प्रियाराधनात तो मग्न झाला. त्याच्या पाठीमागे अंधाराचे जाळे विणीत रात्र चेटकिणी सारखी प्रकटली.

अपरेच्या दारात उभ्या राहिलेल्या सूर्याची प्रतिमा मनाला मोहून जाते तर चेटकिण यामिनी हृदयात घालमेल पैदा करते. हे सारे वर्णन हुतात्म्याच्या मनोभावाचे नसून हुतात्म्याच्या हौतात्म्याकडे आपलेपणाने पाहणाऱ्या कवीचे आहे, हे पहिल्याच कडव्यात चटकन ध्यानी येते. तितक्यात कवीच्या मनःचक्षूंना त्या राजबंद्याची कोठडी दिसू लागते.

एकांत कोठडी काळोखाचे घर । त्या भिंती रंगल्या धूलिनें धूसर
शृंखलाबध्द बंदि आंत एकला
सन्निध तयाच्या वा-याला नच थारा । वरि झरोक्यातुनी बघतो चंद्र बिचारा ।।

कवीने केलेले बंदिगृहाचे वर्णन अत्यंत हुबेहुब उतरले आहे. कारण कवी स्वतःच त्या तुरुंगात राहून आलेला आहे.

Poetry Book
‘वयम्’ला चार चांद!

फाशीची शिक्षा झालेल्या राजबंद्यांना दिली जाणारी वर्तणूक त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. त्या एकांत कोठडीत कोठूनही प्रकाश शिरु नये याची तजवीज केल्यामुळे ती कोठडी त्यांना काळोखाचे घर वाटते.

खरेतर घर अंधाराचेच असते, त्याला आडोसा लागतो, भिंतीचा; प्रकाशाला त्याची गरजच नसते. त्याचा वावर मोकळ्या मैदानावरच चालतो. ती काळोखी खोली, त्या धूळीने रंगलेल्या भिंती, ते एकटेपण, त्या हातापायात जखडलेल्या बेड्या त्याच्या अंतसमयाची चाहूल देत जातात.

झरोक्यातून डोकावणारा चंद्र स्वातंत्र्याची अंधूक आशाच व्यक्तवित जातो. त्यामुळेच कवी पुढील कडव्यात सांगतो, कि ‘हा आयुष्याचा अंतिम सर्ग असून , अंधारही अंतिमच आहे, कारण उद्या रविच्या साक्षीने मृत्यूचा दरवाजा उघडणार आहे.’

कशी गंमत आहे पहा, फाशीची शिक्षा नेहमी सूर्योदयालाच दिली जाते. कारण मृत्यूचे राज्य अक्षय प्रकाशाचे आहे. मरणाजवळ जाऊन परत आलेले दिव्य प्रकाशाचे दर्शन घेऊन आल्याचे सांगतात आणि हा राजबंदी तर मातृभूमिसाठी फासावर चढतोय, त्यामुळे कवी निश्चयाने सांगतो,

रवि साक्ष उद्यांच्या अक्षय दिव्य प्रकाशा । रवि साक्ष उद्यांच्या पूर्णविरामा नाशा ।।

यातील पहिली पंक्ती हुतात्म्याचा मनोभाव दाखवते. त्याला त्याचे मरण चिरजीवन भासते, किर्तीरुपाने उरणे वाटते. तर दूसरी पंक्ती कवीचा मनोभाव दर्शविते, ती हुतात्म्याचा देह नाश पावणारचे दुःख जागवित हळहळते.

न्याय मोठा विचित्र असतो; देशासाठी, तत्वासाठी, धर्मासाठी देहनाश पत्करणारे स्वदेहाची समिधा अर्पून मोकळे होतात अन छुटकमुटूक त्याग करणारे सत्तेचा भोग घ्यायला मागे उरतात. तीच व्यथा कवी व्यक्तवितो.

त्याची निर्भयता कवीच्या डोळ्यात कायमची भरुन रहाते. तो कायमचा उभा कसा राहणार ? मग नयनच त्यासाठी आसन होतात तर त्याच्या निःस्वार्थ शौर्यासाठी कवी हृदयाचे सिंहासन करतो आणि तो मात्रं शृंखलांचे झणत्कार करणारी पावले मंदमंद पण खंबीरपणे टाकीत, मुखाने क्रांतीची सिंहगर्जना करीत निघालाय.

स्वातंत्याचे वरदान लाभावे म्हणून क्रांतीचा जयघोष करीत त्याने स्वप्राणाचा नैवेद्यच महिषासूर मर्दिनीला अर्पण केला आणि प्रार्थना केली,

परदास्यशृंखलाबध्द देशमाउली । परसत्तापीडित माता मम गांजली।
परदास्यनिशेचा अंत आता होऊ दे
जयोस्तु उद्यांच्या स्वातंत्र्याच्या रवे । तव स्तवनगायना सज्ज खगांचे थवे।।

कोणाही देशभक्त हुतात्म्याचा मनोभाव इतका नेटका क्वचितच कोणी रेखाटला असेल. त्याला सलणारे परदास्याचे शल्य नि स्वातंत्र्याची आंस, स्वतःच्या प्राणाहून मोलाची वाटते. कोठेही घर संसाराचा विषय नाही, आईबाप, बायकापोरांचा विचार नाही. केवळ नि केवळ मातृभूमीच्या दैन्याची व्यथा नि तिच्या उज्वल भविष्याचे चिंतन. रसिकहो ! जगातील कोण्याही संन्यासात,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Poetry Book
सेवाभावी ‘सेवा कुटीर’

सर्वसंगत्यागी साधू-संतापेक्षा हा हुतात्मा कोठे कमी आहे?

‘उद्या उगवणा-या आरक्त रविला माझ्या रक्ताचे अर्घ्य अर्पण करीत, मुखाने मातृभूमीचे गौरवगीत गात मी गळ्यात फाशीची माळ घालून घेईन व देशार्थ मृत्यूचे दर्शन होताच डोळ्यांचे पारणे फिटेल.’ असा विचार करीत तो रात्रभर मंदमंद पावले टाकीत येरझा-या घालित होता. तितक्यात गगनांत शुक्राची चांदणी उगवली.

हातात शस्त्र घेऊन यमाचे चार दूत यावेत तसे शिपाई आले. त्याला वधस्तंभाकडे नेताना, तेही खिन्न होते. त्यांचेच पाय लटपटत होते आणि त्यांना पाहताच हा हसत हसत उद्गारत, ‘किती उशीर? पाच वाजून गेले असतील.’ त्यांच्यासवे झपझप पावले टाकीत निघाला जणु काही

वधुमंडप बघुनी उतावीळ हो वर । त्यापरी चढे तो फांशीघाटावर
निजकरें घातिली विवाहमाळा गळा

हे वर्णन वाचताना सुजाण वाचकाला श्री चापेकरांचा फटका या वीर सावरकरांच्या फटकयातील ‘फास बोहले मग पुरले’चे स्मरण होणे स्वाभाविक आहे.

त्यात कवीचा कृतीशील संकल्प असल्याने ती कविता अजरामर सदरात जाऊन बसली तर या कवितेत केवळ वाङ्मयीन स्मरण असल्याने विस्मृतीच्या अडगळीत पडली. कवी सांगतो, ‘त्याने फास स्वतःच्या हाताने घालत, क्रांतिची गर्जना केली. फास आवळला गेला नि त्याचा देह लोंबकळला.’ त्याची यशोगाथा विश्वांत दुमदुमत रहावी अशी कामना करीत कवी

सृष्टित नांदते पुनःश्च संजीवन

सांगत कविता संपवितो. खरेतर तो फासावर चढला हे सांगतानाच कविता संपवली असती तरी चालले असते. पण कवी निसर्गातील सजीवतेचे वर्णन करीत संपवितो. त्यामागे तीन कारणे आहेत.

पहिले, हुतात्म्याच्या हौतात्म्याचा जसा निसर्गाला फरक पडला नाही तसाच इथल्या आत्मविस्मृत समाजालाही फरक पडला नाही हे सांगणे.

दुसरे हुतात्म्याला फासावर चढविल्याने असुरी नि अत्याचारी सत्तेवरचा पाश ढिला पडत नसतो, तर पुन्हा नवा हुतात्मा जन्माला येत असतो हे सांगताना, कवी कळी अन फुलांचे उदाहरण देत संजीवन म्हणत नव्या क्रांतीच्या अंकूराचा उल्लेख करतो.

तिसरे कारण १९३२ मध्ये एखाद्या हुतात्म्यावर गौरवास्पद कविता वा लेख लिहिणे अपराध गणला जात होता. तो लपविण्यासाठी कवीने योजलेली ही युक्ती होती. पण व्हायचे तेच झाले खंडव्याच्या तुरुंगवासातून नुकत्याच सुटलेल्या कवीवर या कवितेसाठी पुन्हा राजद्रोहाचा खटला भरला गेला.

कवितेसाठी खटला भरल्या जावा इतका काव्यविषय इंग्रजांना महत्वाचा वाटावा नि याची पूर्वकल्पना असतानाही देहदंडाची तमा न बाळगता कवीने ही कविता करावी यातच कवितेचे महत्व अधोरेखित होते.

जाता जाता हे ही सांगणे गरजेचे कि या रसग्रहणाच्या मिषातून लेखक, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जसवंतसिंह या विस्मृतीच्या गर्तेत हरवलेल्या हुतात्म्याला नि त्याची गुणगौरव गाथा अक्षरबध्द करण्याचे धारिष्ट्य करणा-या देशभक्त कवीला वंदन करण्याची संधी साधतोय.

Poetry Book
वाघांची जंगलं पोसण्याची कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.