लेखक : राजाराम पानगव्हाणे
रस्ते आणि महामार्ग, लोहमार्ग, बोगदे टनेल, पूल, बंदरे, नदीतील व सागरी वाहतूक, लाटारोधक बांधकामे, नळयोजना यांचे व्यवस्थापन, जलवाहिन्या आणि कालवे, ड्रेनेज, जलसेतू, विमानतळ, स्थानके, हॉटेल्स, रुग्णालये, तटबंदी, औद्योगिक सयंत्रे, धरणे व बंधारे, सिंचन, भांडारगृहे, गोदामे, वखारी, स्मारके, नगररचना, अवकाशाचे समन्वेषण, अणुऊर्जा निर्मितीसाठी सुविधा, क्षेपणास्त्र तळ, विद्युत् वाहक तारा, संदेशवहन व रडार यासाठीचे मनोरे हे स्थापत्य अभियांत्रिकीतील काही महत्त्वाचे विषय आहेत.
सिव्हिल इंजिनियरिंग हा शब्द येण्याअगोदर तंत्रविद्याविषयक म्हणजे सर्व अभियांत्रिकीय कामे लष्करातील मंडळी करीत असत. त्यामुळे सैनिकी अभियांत्रिकी ही संज्ञा रूढ झाली होती.
त्यानंतर ही कामे लष्कराबाहेरील (सिव्हिलियन) मंडळी करू लागल्याने सिव्हिल इंजिनियरिंग ही संज्ञा पुढे आली. एकूणच सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Importance of Civil Engineering for Infrastructure nashik)
स्थापत्य अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीमधील एक महत्त्वाची शाखा आहे. पक्क्या बांधकामाची योजना आखणे, त्याचा आराखडा तयार करणे, प्रत्यक्ष बांधकाम करणे, त्याची देखभाल करणे व निगा राखणे या गोष्टी सर्वसाधारणपणे स्थापत्य अभियांत्रिकीत म्हणजेच सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये येतात.
सिव्हील इंजिनियरिंगच्या व्यापक व्याख्येत निवासी, कार्यालयीन, औद्योगिक इमारती व बांधकामे, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, सांडपाणी व टाकाऊ पदार्थ यांची विल्हेवाट, माल व प्रवासी वाहतूक प्रणाली, मानवी जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी व सुधारण्यासाठी पर्यावरणाचे नियमन यासारख्या गोष्टींची संकल्पना, उभारणी व व्यवस्थापन करणे याचा प्रामुख्याने समावेश होतो.
या शाखेत अभियांत्रिकीतील अनेक कामे केली जात असत. नंतर पुढे अभियांत्रिकीमध्ये काही शाखांचा विस्तार झाला. त्यापैकी बांधकामविषयक शाखेला स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी म्हणण्यात येऊ लागले.
पूर्वीच्या काळी इमारती व घरे, गवंडीकाम, जलवाहिनी, धरणे व बंधारे, पदार्थांचे बल, पाणी-पुरवठा, पूरनियंत्रण, पूल, बंदरे, बांधकाम तंत्र, बांधकाम, पोलादाचे लाकडाचे बांधकाम, हलक्या धातूंचे बांधकामाची सामग्री, बांधकामाचे दगड, बोगदा, भुयारी गटार, भूकंप-प्रतिरोधक बांधकाम, रस्ते, विमानतळ, संयोजक, संरचना अभियांत्रिकी, सिंचन, सिमेंट इत्यादी. प्रस्तुत नोंदीत स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास, बांधकामाचे स्वरूप आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखा यासंबंधी माहिती दिली आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कामाच्या स्वरूपात अनेक टप्प्यांवर कामे करावी लागतात. बांधकामाच्या संदर्भातील स्थापत्य अभियंत्यांच्या कामांची विभागणी बांधकामाच्या आधीची, प्रत्यक्ष बांधकाम चालू असतानाची आणि बांधकाम झाल्यानंतरची या तीन गटांत करता येते.
बांधकाम सुसाध्य आहे, की कसे? याचा अभ्यास, बांधकामाच्या जागेची बारकाईने केलेली तपासणी व अभ्यास आणि बांधकामाचा अभिकल्प तयार करणे ही बांधकामाच्या आधीची कामे आहेत.
ग्राहकांबरोबरचा व्यवहार व वर्तन आणि अभियंत्यांबरोबरची व ठेकेदारांबरोबरची सल्लामसलत ही बांधकाम चालू असताना करावयाची कामे आहेत. बांधकामाची देखभाल व त्याविषयीचे संशोधन ही बांधकाम पूर्ण झाल्यावर करावयाची कामे आहेत.
बांधकामाच्या आधीची कामे ज्यात प्रामुख्याने बांधकामाच्या प्रकल्पाची सुरुवात करण्याआधी तो प्रकल्प शक्य होणारे आहे, की नाही? याविषयीचा अभ्यास केला जातो. त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
प्रकल्पाच्या उद्दिष्टाचा तपशीलवार अभ्यास करणे, शिफारस केलेल्या अभिकल्पापर्यंत जाणार्या संभाव्य पर्यायी योजनांचा प्रारंभिक अभ्यास करणे, सुसाध्यताविषयक अभ्यास करताना पर्यायी पद्धती तपासले जातात.
ज्या जागेवर प्रकल्प सुरू करण्यासाठी परिस्थिती कशी आहे, यासाठी जागेची प्राथमिक तपासणी हा एक प्रमुख भाग आहे. जागा निश्चिती झाल्यावर जागेचा अधिक व्यापक प्रमाणावर बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते.
भूमी (मृदा) आणि जमिनीखालील बांधकामाचा भाग यांचा कसोशीने अभ्यास करण्यासाठी पैशांची गरज भासते. मात्र,या खर्चामुळे नंतर होऊ शकणार्या मोठ्या खर्चाची बचत ही निश्चितपणाने होत असते.
अभिकल्प म्हणजेच डिझाईन. या शिवाय बांधकाम प्रकल्प अपूर्ण मानला जातो. बांधकामाची कागदावर तयार केलेली डिझाईन हे स्थापत्य अभियांत्रिकीमधील एक मुख्य काम आहे.
उदा. पुलासारख्या बांधकामावर पडणार्या भारांचा वा प्रेरणांचा तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे असते.
वार्याचा (जोर), बांधकामामधील भागांच्या वजनाचा निश्चलभार, गतिमान वाहनाचा चलभार, हिम, बर्फ पाण्याचा भार, उन्हात उघडे पडण्याचा काळ इत्यादी बाबींचा डिझाईन बनविताना विचार केला जाणे गरजेचे आहे.
प्रत्यक्ष बांधकाम चालू असतानाची कामे स्थापत्य अभियांत्रिकीय कामाचा प्रस्ताव खाजगी रीतीने एखादी व्यक्ती म्हणजेच कन्सल्टन्सी ठेवू शकतो. प्रत्यक्ष काम सुरू असताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यात डिझाईन केलेली असताना प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्या लागतात. यासाठी लागणारा अंदाजीत खर्च म्हणजे एस्टिमेट हा एक सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.
सल्लागार अभियंता प्रथम प्रकल्पाची सुसाध्यता अभ्यासतो. नंतर तो योजना सुचवितो व प्रकल्पाला येणारा खर्च अंदाजे किती असेल ते सांगतो.
बांधकामाच्या अभिकल्पाची जबाबदारी अभियंत्याची असून तो आरेखने, विनिर्देशने व कायदेशीर दस्तऐवज पुरेशा तपशिलाने पुरवितो. यातून निविदेसाठीच्या स्पर्धात्मक किंमती कळतात. दरपत्रकांची तुलना करणे हे त्याचे काम असते. त्यापैकी एकाची तो शिफारस करतो.
बांधकाम झाल्यानंतरही देखभाल म्हणजेच मेंटेनन्स हे देखील दीर्घकाळ चालणारे काम आहे. यासाठी एजन्सी नेमणे, त्यावर देखरेख करणे त्याचे परीक्षण करणे, गुणवत्ता तपासणी तसेच बांधकामावर वातावरणाचा काय परिणाम झाला आहे, हे बघणे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतात.
यासाठी संशोधन शासकीय संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने, विद्यापीठे व इतर संस्था स्थापत्य अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील संशोधन करतात.
बहुतेक देशांमध्ये शासनाचे नियंत्रण असलेल्या अशा संस्था असतात. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अनेक शाखा असून त्यांची खास कार्यक्षेत्रे आहेत. अर्थात काही शाखांची कार्यक्षेत्रे परस्परव्यापी असू शकतात.
समाज व नागरी जीवन यांच्यातील नात्याचा प्रामुख्याने विचार सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. त्यामुळे या शाखेत नियोजनबद्ध विकास कामे, मनोरंजनाची उद्यानसदृश क्षेत्रे वा प्रदेश, शहरे व समाजाचा भाग यासाठी औद्योगिक संकुले, प्रस्थापित करण्यासाठी योजना आखतात.
हे करताना जमीन व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा वापर व विकास अपेक्षित असतो. यातून होणार्या पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक घटकांच्या परिणामांचे मूल्य-मापनही यात करतात.
सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय हिताची खातरजमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत समन्वय हेही सिविल इंजिनिअरिंगचे काम आहे.
इंजिनिअरिंगमध्ये स्वयंरोजगार व नोकरीच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. यात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केल्यास अमर्याद यश मिळण्याची शक्यता आहे. सिव्हिल इंजिनीअर्सना सुरुवातीचा काळ थोडा कठीण असतो.
सुरुवातीच्या काळात मिळणारा मोबदला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या तुलनेत कमी वाटतो. परंतु त्याकडे थोडे दुर्लक्ष करून प्रथम कामाचा जास्तीत जास्त अनुभव घ्यावा. त्यानंतर पुढील काळात प्रगती साधणे शक्य होते.
बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत, योग्य खर्चात, सुरक्षितपणे आणि गुणवत्ता टिकवून पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सिव्हिल इंजिनिअरवर असते.
देशातील आणि परदेशातील वास्तूप्रकल्प, रस्ते, पूल, रेल्वे, विमानतळ, धरणे, बंदरे, मेट्रो उभारणी, बीआरटी, मोनोरेल, बोगदे, ऊर्जा, दूरसंचार आदी प्रकल्पांवर काम करण्याची संधी सिव्हिल इंजिनीअर्सना मिळते.
विद्यार्थ्यांनी धाडस, चिकाटी, आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि चांगल्या कामासाठी लागणारा थोडा संघर्ष करण्याची मानसिक तयारी करून सिव्हिल इंजिनीअरिंग विद्याशाखेची निवड केल्यास त्यांचे भवितव्य उज्ज्वल ठरु शकते, एवढी क्षमता या शाखेमध्ये निश्चितपणाने आहे.
(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.