दृष्टीकोन - लग्न : जीवनातील अविभाज्य घटक

हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनात लग्न या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे...
Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनात लग्न या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला समूहाने राहायला आवडते.

त्यामुळे नातेसंबंधांमध्ये विस्तार व नवीन पिढीचा जन्म म्हणजेच अपत्य प्राप्ती, एकमेकांचे संरक्षण या नात्यातून लग्न ही संकल्पना उदयास आली असे म्हणता येईल. लग्न या संकल्पनेस पौराणिक कालापासूनचा वारसा आहे.

जसजसा काळ बदलत गेला तसतसं लग्न म्हणजेच विवाह संस्था याचे स्वरूपही बदलत गेले. अगदी सुरवातीच्या पौराणिक काळामध्ये देवदेवतांच्या विवाहपासून तर आता थेट डेस्टिनेशन मॅरेज असा लांबलचक प्रवास लग्नसंस्थेचा झालेला आपल्यास दिसतो.

काळानुरूप टप्प्याटप्प्याने लग्न संस्था व सोहळे यांचे स्वरूप बदलत गेले. मानवी जीवनात लग्न हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Marriage integral part of life nashik news)

मानवी जीवनात लग्न हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही.
मानवी जीवनात लग्न हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही.esakal

फार पूर्वी मानव समूहाने राहायचा. तो समूह एखाद्या कुटुंबासारखा असायचा. समूहाचा मुख्य माणूस हा मुखिया असायचा. त्याची आज्ञा सर्वजण पाळत असत. संकटाशी लढतांना समूहाला या मुखियाकडून सरंक्षण मिळत असे.

तरुण तरुणी एखाद्या विशिष्ट दिवशी आपला सहचर निवडीत असत आणि त्यांचा विवाह करून दिला जात असे. अगदी राजेमहाराजे यांच्या काळापासून स्त्रियांना आपला सहचर निवडण्याचे स्वातंत्र्य होते.

आपल्या इतिहासात अशी उदाहरणे सापडतील. त्या काळी स्वंयवर पद्धतीही अस्तित्वात होती. गांधर्वविवाह, राक्षसविवाह असे अनेक प्रकारचे विवाह अस्तित्वात होते.

गांर्धवविवाहाचे प्रसिद्ध उदाहरण दुष्यंत-शकुंतला होय. त्यांची प्रेमकथा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. द्रौपदी स्वंयवर, रुक्मिणी स्वयंवर, सत्यवान-सावित्री, पृथ्वीराज-संयुक्ता ही सारी स्वंयवर विवाहाची प्रसिद्ध आहे.

काही विवाहांनी आनंद दिला, तर काही विवाहांनी महाभारत जन्माला घातले. राक्षसविवाह म्हणजे एकतर्फी प्रेमाचा आविष्कार; पण तोही मान्य होता. त्यानंतरच्या इतिहास काळातही अनेक लग्नांच्या कथा आपणास सर्वश्रुत आहे

बालविवाह ही शोकांतिकाच

काळानुसार विवाह पद्धती बदलत गेल्या. परकीय आक्रमणे झाली. इंग्रजाचे राज्य आले. कालावधीमध्ये स्त्रिया मनाविरूद्ध लादलेल्या विवाहाला बळी पडल्या. काही राजकारणं विवाहाच्या मांडवात शिजू लागली.

जोधाराणी-अकबर बादशहा यांचा विवाह, हा राजकीय सौदा होता. आपले राज्य वाचविण्यासाठी जोधाराणीला मुस्लिम बादशहाशी मनाविरुद्ध विवाह करावा लागला. मात्र तिचे हिंदुत्त्व अकबर बादशहाने आदरपूर्वक जपले.

अशी काही कारणास्तव झालेली लग्ने कालांतराने सुखाची ठरलेली होती. तसेच काही काळापूर्वी काही कालावधीसाठी बालविवाह ही संकल्पना अनेक वर्ष प्रचलित होती.

पण काही समाजसुधारकांनी त्याविरुद्ध उठाव केल्यामुळे बालविवाह प्रथा शेवटी मोडून काढण्यात आली. पण आजही देशातील काही भागांमध्ये बालविवाह केले जातात ही शोकांतिका आहे.

Rajaram Pangavane
निरंतर कृतिशील

ग्रामीण- शहरी पध्दतीत विसंगती

काळानुरूप आज स्वरुप पालटत आहे. काळानुसार प्रत्येक संकल्पना बदलत गेल्या आहेत. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव. पण म्हणून विवाह परंपरेत झालेला प्रत्येक बदल चांगलाच आहे. प्रेम, जिव्हाळा भावना यांचे स्वरूपही बदलले आहे.

बदलं अपरिहार्य जरूर आहेत, पण भावना बदलायला नकोत. तेच नेमकं आज सर्वत्र दिसू येत आहे. आपल्या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा आग्रह, बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण यामुळे विवाह संस्थेवर खूप सखोल परिणाम झालेला आहे.

विवाहाच्या संबधित ग्रामीण भागातली परिस्थिती आणि शहरातली परिस्थिती यामध्ये अनेक प्रकारच्या विसंगती दिसायला लागल्या आहेत.

विवाहासंबंधीच्या कल्पना आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ग्रामीण आणि शहरी जीवनमानामध्ये लग्न सोहळ्यांबद्दल व त्याचे स्वरूप यामध्ये झपाट्याने बदल होत गेला, तो आर्थिक, सामाजिक अशा सर्वच अंगाने आपणास बघावयास मिळतो.

ग्रामीण भागामध्ये लग्नाच्या वेळी मुलीचे वय सर्वसाधारणपणे शहरी भागातील लग्नाच्या तुलनेमध्ये कमी असते.

शहरात विवाहाचे वय वाढतेय

ग्रामीण भागात कमी वयाचे वधू-वर बघावयास मिळतात. यांचे कारण, की लवकर लग्न झाल्यास लवकर जबाबदारी अंगावर आल्यानंतर माणूस आपल्या संसारामध्ये स्थिर होतो अशी साधी सरळ भावना होती व ती आजही आहे.

ग्रामीण भागात हे चित्र असताना शहरात मात्र त्याच्या नेमके उलटे चित्र आहे. शहरातली मुले आणि मुली यांच्या विवाहाचे वय फारच वाढलेले आहे. २५ ते ३० वर्षे झालेले आहे.

शहरातल्या मध्यमवर्गीय तरुणांचा जीवनक्रम ठरलेला असतो.जमेल तेवढे शिक्षण पूर्ण करणे हा त्याच्या जीवनातला पहिला टप्पा असतो. जेवढे शिक्षण झाले असेल तेवढ्या शिक्षणावर मिळू शकेल अशी नोकरी मिळविणे आणि नोकरी मिळून थोडी स्थिरता आली की लग्न करणे.

याच क्रमाने बहुतेकांची वाटचाल होत असते. शिक्षण झाले, की नोकरी, नोकरी लागली की छोकरी.पण आजकाल शिक्षणाचे एवढे व्याप वाढत चालले आहेत की निव्वळ पदवी प्राप्त केली की लगेच नोकरी मिळत नाही.

Rajaram Pangavane
नाट्यपंढरी सांगलीचे ‘वारकरी’ डॉक्टर

अशी होती पूर्वीची विवाह पध्दती

आजच्या आधुनिक तंत्रयुगात विवाहबंधदेखील बदलू पहात आहे. मान्य आहे, की जीवनाची गतिमानता आधीपेक्षा खूप वाढती आहे. दिवसेंदिवस अधिक वाढणार आहे. मधल्या काळात विवाह अगदी थोडक्या दिवसांत होत असे.

म्हणजे दोन दिवस किंवा तीन दिवस घरोघरी लग्नाच्या अक्षता, आमंत्रण जात असे. गरीब-श्रीमंत असा फारसा भेदभाव नसे. सर्वकाही घरी तयार व्हायचे. नवरी मुलगी मेकअपच्या पॅकेजच्या वगैरेच्या भानगडीत पडत नसे.

मुलीची आई, मावशी या तर जेमतेम लग्नाच्या वेळेपावतो कशाबशा तयार होत असत. ताटापाटांची जेवणं, आसनं, पंगतीत घरच्या बायका, मुली व मुले वाढीत असतं. त्यातच बरीच लग्नं जमायची आणि व्हायची. आजही तोच प्रकार आहे. पण विवाहाची पद्धती, संकल्पना बदलत गेल्यात.

आधुनिक व्हा, पण सर्वांना धरून...

सध्या जमान्यात लग्न ठरल्यापासून होईपर्यंत पाण्यासारखा पैसा वाहतो.आज मराठी कुटुंबातील विवाहदेखील आपले स्वरूप बदलत आहेत.

लग्न ठरल्यावर पहिली धाव ब्युटीपार्लरला घेतली जाते. मेहंदी, संगीत, पार्टीज, रिसेप्शन असा ८-१० दिवसांचा लग्नसोहळा सर्वत्र पाहायला मिळतो. काही वर्षांपूर्वी बैलगाडीने जाणार वऱ्हाड आता चार्टर प्लेनने जाऊ लागले आहे.

हा प्रवास अत्यंत कमी कालावधीत झाला आहे. स्वरूप जरी कितीही बदललेला असलं स्वभावाला वळण घालणं, परिस्थितीशी सामंजस्यानं सामोरं जाणं ही जमवून घेण्याची क्षमता अथवा कला प्रत्येकाने अवगत केली पाहिजे. बदलत्या काळानुसार आधुनिक जरूर असावं पण सर्वांना धरून राहावं.

कोरोनाने बदलले होते संदर्भ

कोरोना महामारीने जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. यापासून विवाह सोहळे सुद्धा काही वेगळे नाही. विवाह संकल्पना अजूनच बदलली आहे. जमावबंदी, सोशल डिस्टिन्सिंग यामुळे लग्नांमध्ये आमंत्रिताची संख्या रोडावली जरूर.

पण कार्यक्रम मात्र कमी झाले नाहीत. हौसेला मोल नाही, हेच खरचं! कोरोनाने मात्र विवाहपद्धतीमध्ये खूपच बदल घडून आला हे कुणीही नाकारू शकणार नाही.

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रुप आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत)

Rajaram Pangavane
‘येलूर’ वन्स अगेन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.