प्रेम होईना तुझ्याने! समंजस प्रियकराचे मनोगत

Marathi poet madhav julian
Marathi poet madhav julianesakal
Updated on

माधव ज्युलियन (Madhav Julian) यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेली कविता (Poetry) म्हणजे प्रियकर प्रेयसीतील हितगूज नसून प्रियकराचे स्वगत आहे. तिच्या नकाराने उत्तेजित होऊन तिची निर्भत्सना न करता समजूतदारपणे तिचा नकार समजून घेणारा दुर्मिळ प्रियकर कवीच्या कल्पनाविश्वात अवतरला.

तिचा नकार असला तरी स्वतःच्या प्रीतीवरील त्याची श्रद्धा अविचल आहे. मनात ठसलेली ती आता केवळ त्याच्या मनातच उरणार असल्याने त्याच्यातच मिळून जाणारी आहे. ती देहाकार नसली तरी स्मृतिशेष उरणार आहे, कळत-नकळत त्याच्याशी एकरूप होणारी आहे. (saptarang Latest Marathi Article on marathi poet madhav julian by dr neeraj dev nashik news)

माधव ज्युलियन (१८९४-१९३९) अर्थात विख्यात कवी माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील आवडस होते. त्यांचा जन्म आजोळी बडोद्यास झाला. कवीचे प्रारंभीचे शिक्षण बडोदा, अहमदाबाद येथे, तर उच्चशिक्षण मुंबई येथे झाले.

त्यांनी १९१८ ते १९२५ दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली. विस्मयकारक गोष्ट म्हणजे प्राध्यापकीसोबत ते शालेय शिक्षक म्हणूनही काम करत. १९२४ ते १९२६ या दरम्यान ते अमळनेरच्या प्रताप शाळेत शिक्षक होते.

१९३६ मध्ये जळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. १९३९ मध्ये त्यांना छंदोरचनासाठी डी लिट प्रदान करण्यात आली. त्यानंतर नऊच महिन्यांत त्यांचे कर्करोगाने निधन झाले.

कवीने स्वतःच्या नावाला ज्युलियन नाव जोडून जे काव्यमय बनविले ते ज्युलियन नाव त्यांनी मारी कॉरेलीच्या ‘गॉड्स गुड मॅन’ या कादंबरीतील उपनायकाच्या नावावरून घेतले. हा उपनायक काव्यवेडा असून, स्वानंदमग्न नि स्त्रीसहवासाने भारून जाणारा आहे. त्याच्यात एकप्रकारची निरागसता आहे. कवीच्या आत्मप्रतीत नि स्त्रीवश कविमनाला ते कोठेतरी भावले असावे.

कवी रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. रविकिरण मंडळात राजकवी यशवंत, गिरीशांसारखे कवी होते. तरी काही काळ मंडळात असणाऱ्या आचार्य अत्र्यांच्या मते, ‘रविकिरण मंडळात रवी एकटे पटवर्धन होते, तर बाकीची सगळी किरणे होती.

’ खरे पाहता त्याच काळात पटवर्धनांसोबतच भा. रा. तांबे नि यशवंत अत्यंत लोकप्रिय होते अन् सकस काव्यलेखनातही सरस होते, याची जाणीव माधव ज्युलियनांच्या गुणीच गुणरागीच सरल मनाला होती म्हणून ते स्वतःच्या कविता पुनःपुन्हा परिष्कृत करीत. इतकेच नव्हे, तर भा. रा. तांब्यांच्या सकस, सरस नि सरल प्रतिभेला नमन करीत ते लिहितात -

तू प्रसाद, तू रस, खरा कवी!
अशी स्तुतिसुमने उधळीत माधवराव स्वतःविषयी लिहितात
तुझ्यापुढे का व्हावी अरुचिर
रातकिड्यापरि माझी किरकिर

आपल्या समकालीन कवीला तू प्रसाद, तू रस, खरा कवी म्हणताना स्वतःच्या काव्यप्रतिभेला रातकीड्याची किरकिर म्हणण्याची हिंमत विरळाच कदाचित दाखवील वा न दाखवील. कवीला स्वतःची काव्यप्रतिभा गूढ शक्तीची कृपा वाटते म्हणून नम्रपणाने तो म्हणतो-

ही गड्या, न माझी मुळी काव्यसंपदा,
ही कृपा गूढ शक्तीची,
म्हण तीस ‘‘धन्य शारदा!’’

अशा निरलस वृत्तीच्या या कवीने सुमारे साडेचारशे कविता नि विरहतरंग, सुधारक नि नकुलालंकार ही तीन खंड काव्ये, उमर खय्यामच्या रुबायांची चपखल भाषांतरे केलेली आहेत. कवीचा फार्शीचा व्यासंग दांडगा होता.

त्यामुळेच कवीच्या काव्यात अनेक फारशी रुपके, शब्द आढळतात. त्यासोबतच अरेबिक येत असल्याने कवीचा इस्लामचा ही अभ्यास असावा, असे त्याच्या काही कविता वाचताना वाटते. कवीला पुरोगामित्वाची ओढ होती. त्यामुळेच समकालीन केमाल पाशावर काव्य करताना ते आढळतात.

पुढील काळात कवी भाषासुधारक झाल्यावर त्याने त्याच्या जुन्या कवितातील फार्शी, अरेबिक इत्यादी परभाषिक शब्द काढून सर्व कविता सुधारून घेतल्या. तरीही फार्शीत पदोपदी आढळणारी आढ्यताखोर प्रेयसी कवीच्या काव्यातून वावरताना दिसते.

ती नेहमीच प्रियकरापेक्षा उच्च सांपत्तिक नि सामाजिक स्थानावर असते. प्रियकर तिच्यापुढे दासासारखा लीन होतो व असेना हीन मी प्राणी?! न पर्वा, तू महाराणी । सारखे प्रेयसी प्रियकरातील अंतर तो वारंवार दाखवितो. तरीही ती प्रेयसी बेपर्वा, बेफिकीर दिसते. ती त्याला नादाला लावते, खेळवते नि वाऱ्यावर सोडून देते. ती लहरी, चंचल, मनाचा थांग लागू न देणारी नि निष्ठूरसुद्धा आहे. तिच्या अगदी उलट प्रियकर आहे.

माधव ज्युलियनांनी चितारलेली ही प्रेयसी मराठीत त्यांच्या आधी नि नंतरही कुणी चितारली नाही, असा समीक्षकांचा दाखला आहे. कवीची ‘प्रेम होईना तुझ्याने’ ही उत्कट गझल आज आपण पाहणार आहोत. कवितेतील निष्ठावंत प्रियकर प्रेयसीला सांगतो-

प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहू दे
आचरुं या धर्म तूझा तू नि माझ्यामुदे

त्याने जिवाभावाने तिच्यावर प्रेम केले, पण ती त्याला प्रतिसाद देत नाही. तेव्हा समजूतदारपणे तो सांगतो, की तुझ्याने प्रेम होत नसेल तर ते राहू दे. तुझ्यावाटचे प्रेम मीच करून घेईल. आपल्या दोहोंचा धर्म अर्थात कर्तव्य मी माझ्यातच पूर्ण करील.

तिने ज्याअर्थी प्रेम नाकारले, त्याअर्थी तिची भूमिका नि कर्तव्य दोन्ही तिथेच सरले. पण प्रियकराच्या मनातील ती त्याच्या मनातच उरली असल्याने दोन्ही भूमिका त्याच्याचकडे आल्यात. तुझ्याकडून प्रेम होत नाही हा काही तुझा दोष नाही. त्यामुळे मनात किंतू परंतु न ठेवता तू सुखी राहा. प्रेम हट्टाने होत नसते तर तशी मनोभावना मनात निर्माण व्हावी लागते, याची जाणीव

Marathi poet madhav julian
पैलवानावर खिळली नजर...

असल्यानेच तो त्याच्या प्रियेला सांगतो-
प्रेम द्या अन् प्रेम घ्या काव्यींच हा सौदा पटे !

‘प्रेम द्यावे म्हणजे प्रेम मिळते’ हा एकप्रकारचा सौदाच झाला. तो काव्यातच शोभून दिसतो. प्रेमात तर सौदा नि व्यवहार नसतोच. त्यामुळे तो तिच्याकडे माझ्यावर प्रेम करच, असा हट्ट करताना दिसत नाही. उलट तिच्यात प्रेम निर्माण होत नाही या दैवगतीला किंमत न देता, तो तिची ओढ चित्तात स्वप्नवत जपणार असल्याची ग्वाही देतो. मात्र दैवगतीने नशिबी आलेली अतृप्त प्रीतीची

दशा वर्णताना खिन्नतेने हसत तो म्हणतो,
वारि-भासाची मजा ती वालुकेच्या सागरी

यातील गहन अर्थ निराश प्रेमीजनांनाच कळू शकतो. त्याला ती विरणारी प्रीती मृगजळासारखीच वाटते. पळावे तिथवर वालुकामय सागरात पाणीच पाणी दिसते. पण प्रत्यक्षात पाणीच नसते. पळण्याने तहान अजूनच वाढणार असते. तसेच दैववशात अव्हेरलेली प्रीती सफलतेची वृथा आस बाळगत झुरते.

पण ती आस वृथाची आहे हे कळल्यावर मनांत रडण्याची इच्छा उरत नाही, तर खिन्नतेने ते स्वतःवरच हसायला लागते. कुठेतरी तटस्थ भाव निर्माण झाला, की मृगजळाला पाणी समजून जे आपण पळालो त्यावर स्वतःलाच हासू येते. तोच भाव प्रियकराच्या मनात निर्माण होतो.

तिच्याकडून प्रेम होत नसल्याने त्याला स्वर्ग अर्थात तिच्यासोबत जगण्याचे सुख अवतरण्याआधीच थांबल्यासारखे वाटते. पण त्याचवेळी भूतलावरील संपदा संपली नाही अर्थात जे आहे त्यातील कणभर सुख उरलेले आहे, ही जाणीवही तो व्यक्तवितो. सामान्यतः जे जवळ असते त्याचे मोल माणसाला नसते नि जे सुटले त्याचे मोल अनमोल वाटत असते. प्रेमात तर ही गोष्ट फारच मोठ्या प्रमाणात दिसून येते. तिथे विवेक जागृत ठेवण्याचे विस्मयचकित करणारे कसब कवीचा प्रियकर करताना दिसतो. त्यामुळेच तो तिला सांगतो-

प्रेम होईना तुझ्याने, राख कां घालूं शिरी?
कां स्मशानाची कळा आणूं मनाच्या मंदिरीं?

कवीचे हे शब्द प्रियकराचे सुजाणत्वच अधोरेखित करीत जाते. प्रेम ही नैसर्गिक भावना. ती जर ज्याच्यावर आपण निरतिशय प्रेम करतो त्या व्यक्तीत निर्माण होत नसेल, तर साधारणत; प्रेमी व्यक्ती भावनावश होऊन स्वतःचे जीवन उदासीनतेत झोकून देत असते.

त्याला स्वतःचे सारे जीवन अर्थहीन, नीरस वाटू लागते. चेहऱ्यावर अवकळा पसरते. तिच्यावाचून जग असून नसल्यासारखे वाटते. पण हा प्रियकर सांगतो, की तुझ्याने प्रेम होईना म्हणून मी डोक्यात राख घालून घेऊ का? माझ्या मनमंदिराला स्मशानाची कळा आणू का?

खरेतर इथे पूर्णविराम हवा होता पण तो प्रश्नार्थक विचारतो. कारण त्याच्या मनातील वादळ त्याला शमवायचे आहे. एक दृष्टीने पाहता प्रेयसीला सांगण्याच्या बहाण्याने तो स्वतः स्वतःलाच समजवत चाललाय. त्याच तालात तो

प्रेम होईना तुझ्याने, जाऊं दे ते बापडे !
मत्स्मृतीला माळ तू घालू नको वाया पुढे !

अव्हेरलेल्या, नाकारलेल्या आपल्या प्रेमाला तो बापडे म्हणताना स्वतःची निराशाच नकळत व्यक्त करतो. सरते शेवटी त्याला वाटते जरी तिने आपली प्रीती स्वीकारली नसली, तरी ती नाकारल्याची आठवण तिने बाळगणे म्हणजे पुढेमागे कुठेतरी तिलाच अस्वस्थ करणारे आहे.

तिला तेवढाही त्रास पडू नये म्हणून तो तिला विनंती करतो, की ती स्मृतिही तू काढून टाक अर्थात मला विसरून जा. त्याच्या या वक्तव्यात तो स्वतःची नाहीतर तिची काळजी घेताना दिसतो. ही बाब प्रियकराचे निरलस प्रेमच दाखवून जाते. कवीच्या या शेवटच्या कडव्याने काव्याला आगळाच उठाव मिळालेला आहे.

प्रस्तुत कविता वाचताना लक्षात येते, की हे प्रियकर प्रेयसीतील हितगूज नसून प्रियकराचे स्वगत आहे. तिच्या नकाराने उत्तेजित होऊन तिची निर्भत्सना न करता समजूतदारपणे तिचा नकार समजून घेणारा दुर्मिळ प्रियकर कवीच्या कल्पनाविश्वात अवतरला.

मात्र तिचा नकार असला तरी स्वतःच्या प्रीतीवरील त्याची श्रद्धा अविचल आहे. मनात ठसलेली ती आता केवळ त्याच्या मनातच उरणार असल्याने त्याच्यातच मिळून जाणारी आहे. ती देहाकार नसली तरी स्मृतिशेष उरणार आहे. कळत-नकळत त्याच्याशी एकरूप होणारी आहे. त्यामुळेच प्रस्तुत कविता प्रियकराच्या प्रेमाचे आत्मप्रत्यय दाखविणारी ठरते.

सुमारे नव्वद वर्षांपूर्वी १९ एप्रिल १९३३ ला लिहिलेली ही कविता वाचताना, एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची बदनामी वा हत्या करण्यास उदयुक्त होणाऱ्या आजच्या संगणक युगातील प्रियकरांशी तुलना करता, कितीतरी पटीने विकसित मनाचा प्रियकर कवीने चितारून ठेवलाय, याचीच साक्ष देते.

Marathi poet madhav julian
वन्यजीवांना शॉक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.