कवयित्री शांता शेळके (१९२२-२००२) यांचे नाव ठाऊक नसलेला मराठी रसिक विरळच म्हणावा लागेल. याच आठवड्यात १२ ऑक्टोबरला कवयित्रीची जन्मशताब्दी होती. या लेखातून त्यांच्या काव्याचा रसास्वाद घेत आपण त्यांना श्रद्धांजली अर्पूयात.
शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा. त्याचे वडील वन विभागात होते. १९३० मध्ये शांताबाई आठ वर्षांच्या असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कवयित्रीचे पुढील शिक्षण पुण्यात झाले. त्यांना शिकवायला श्री. म. माटे, के. ना. वाटवे आणि रा. श्री. जोगांसारखी दिग्गज मंडळी होती. पुढे त्यांनी संस्कृत भाषेत मुंबई विश्वविद्यालयातून एम. ए. केले. त्यात त्यांना तात्यासाहेब केळकर यांच्या नावे दिले जाणारे सुवर्णपदक मिळाले. काही वर्षे त्यांनी आचार्य अत्रेंच्या नवयुग व मराठात काम केले, नंतर नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज, मुंबईच्या रुईया नि महर्षी दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले.
कवयित्रीने जवळपास शंभर पुस्तके लिहिलीत. त्यात काव्यसंग्रह, कादंबऱ्या, आत्मचरित्र, अनुवाद असे अनेक प्रकार अत्यंत कुशलतेने हाताळलेत. कवितेचा विचार करता कवयित्रीचे वर्षा, रूपसी, गोंदण, जन्मजाहनवी, तोच चंद्रमा असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कवयित्रीने लावण्यांपासून चित्रपट गीतांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे काव्य सफाईने हाताळले आहेत. कवयित्रीची ‘रेशमांच्या रेघांनी लाल काळ्या जाळ्यांनी’ सारखी लावणी असो, ‘वल्हव रे नाखवा हो वल्हव रे’, ‘वादळवारं सुटलं रे’सारखे कोळीगीत असो वा ‘शूर आम्ही सरदार’सारखे देशभक्तिपर गीत असो वा ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’सारखे महानंदा चित्रपटातील भक्तिगीत असो आजही रसिक मनाला वेड लावतात. (Saptarang Latest Marathi Article on shanta shelke by dr neeraj dev Nashik News)
कवयित्रीला कविता सखी वाटते, त्यामुळेच कवितेशी गुजगोष्टी करताना ती सांगते,
हर्षखेद वा गूज मनिची
मूक लाजऱ्या मनोभावना
लपविल्या ज्या जगापासुनी
प्रकटविले तुजपुढती त्यांना
इतरांना सांगता न येणारे हर्षशोक, मनातील गुजगोष्टी, व्यथा, वेदना, इतकेच नव्हे तर सलज्ज प्रीती ती सर्वप्रथम कवितेलाच सांगते. ही कविता तिची युगायुगाची सखी आहे. दुःख, संकटाच्या प्रसंगी तीच तिला सावरायला धावून येते. इतकेच नव्हे, तर एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे वा कामधेनूप्रमाणे तिची सारी स्वप्ने पूर्ण करायला कविताच पुढे येते. हे सांगताना कवयित्री सांगते,
अमूर्त माझी सारी स्वप्ने
तुजमध्ये गे मूर्त जहाली!
कविता इतकी जिवलग सखी असल्यानेच असेल. जगाच्या स्वार्थाच्या बाजारात जेव्हा कधी मन विटून जाते, उद्विग्न होते, उदासीनतेचे मळभ दाटून येतात तेव्हा तो रागही कवयित्री कवितासखीवरच काढते नि तिला म्हणते
जा, जा, कविते, नलगे आता।
मजला तव सहवास।
कविता खरीखुरी सखी असल्यानेच कवयित्री इतक्या हक्काने कवितेला असे बोल ऐकवू शकते. कवयित्रीला निसर्ग विलक्षण मोह पाडतो. निसर्ग नि मानवातील नाते उलगडताना कवयित्री,
मातीचे झाड । झाडाची मी । माझी पुनः माती ।
त्याच्या पानाच्या रेषा माझ्या तळहाती ।।
असे पारदर्शक वर्णन करताना दिसते. ते वाचल्यावर कुणीही कवयित्रीच्या कवितेच्या मोहात अलगद पडला नाही, तरच नवल म्हणायचे. कवयित्रीची प्रेमकविता औदासिन्याने झाकाळून गेलेली दिसते. त्यामुळेच ती एकाकीपण, विरह मिरविताना दिसते. एका कवितेत ती म्हणते,
जीवन म्हणजेच एक दीर्घ विरहगीत ।
क्षण मिलन, चिरवियोग हीच इथे रीत ।
प्रीतिच्या विरहाची व्यथा गात असताना भोगलेल्या सुखाचे क्षणही त्यांची कविता आठवते. ‘क्षणभर’ या कवितेत उन्मुक्तपणे कवयित्री सांगते,
अजुन भासती या गालावरती ।
दीर्घ चुंबने अजुन तुझी ।
ती ओठांवर जळती ।
ही भौतिक सुखासक्ती व्यक्तवितानाही आत्मसमर्पणाची आस कवयित्री कधी लपवित नाही. त्यामुळेच ‘मी विलीन अंती होईन रे तुजठायी।’ चे स्त्रीसुलभ आश्वासनही देऊन जाते.
कवयित्रीची कविता केवळ निसर्गात नि प्रणयात गुंतणारी नाही, तर तिला आत्मरतीचा प्रगल्भ नि उन्नत गाभाही आहे किंबहुना आत्मचिंतनाचा हा गाभाच केंद्रवर्ती आहेसे वाटते. याचा अचूक वेध घेणारी कवयित्रिची ‘मी’ कविता आज आपण पाहू या.
कवितेच्या आरंभी कवयित्री सांगते, ‘ढगांची पटले भेदत उंचच उंच गरुडभरारी घेणारी ती मी नसून हिरवळीत जिथे कोमल फुले फुलतात, तिथे झुलणारे चिमुकले फुलपाखरू मी आहे.’ येथे कवयित्री स्वतःला ‘गरुडभरारी ती मी’ असेही म्हणू शकली असती. पण ती तसे म्हणत तर नाहीच, पण उच्चार करून धिक्कारताना दिसते. कारण गरुडाची भरारी गगनगामी असून, सामान्य मानवी जीवनापासून दूर जाणारी आहेत.
त्यात एक प्रकारची उग्रताही आहे. कवयित्रीला वाटते, ते तिला लागू होणारे नसून कोठेतरी बहरलेल्या हिरव्यागार हिरवळीत इकडून तिकडे झुलणारे चिमुकले फुलपाखरू हेच तिचे प्रतीक आहे. येथे चिमुकले फुलपाखरू म्हणताना केवळ जमिनीशी जडल्याचा भावच नाही, तर स्वतःचे सामान्यत्वच कवयित्री दाखवीत आहे.
पुढे ती सांगते, ‘क्षणात गहन अंधःकाराला उजळून टाकणारी वीज मी नाही, तर आकाशात दिसणाऱ्या ढगातून चमचमणारी जी इवलीशी चांदणी ती मी आहे.’ वीज कडकडून येते, येताना आपण आल्याची भयप्रद सूचना देते अन् ती इतरांना समजेपावेतो क्षणभरात विरून जाते. याउलट गगनात चमकणारी चांदणी स्वतःचे वेगळेपण न दाखवता, तिचा चिमूटभर प्रकाश वाटत राहाते. कवयित्री त्या चांदणीशी स्वतःला तुळते कधी कधी तिला वाटते, ‘सुगंध उधळीत येणारी गुलाबकलिका मी नसून पानामागे लाजून लपून बसणारी मी साधीभोळी तुळशीची मंजिरी आहे.’
येथे कवयित्री गुलाबकलिकेला उद्दाम सुंगध उधळणारी मानिनी म्हणते. कारण तुमची इच्छा असो वा नसो ती तिचा सुगंध तुमच्यापर्यंत पोचवतेच. याउलट तुळशीची मंजिरीला शोधत तुम्ही जाता नि पानामागे लपलेल्या तिला स्वतः घेता कवयित्रीला स्वतःची प्रतीती मंजिरीत सापडते.
‘मोठमोठ्या दुंदुभि वाटाव्यात असा आसमंत घुमविणारा नाद करणारी सागर गर्जना मी नसून झऱ्याचे कडेकपारीतून मंजूळ कलरव करणारा अस्फुट ध्वनि तो मी आहे.’ असे सांगत ती शेवटी सांगते,
व्देषाचे नाही भयंकर मी तांडव
क्रोधाची नाही ज्वाला मी अभिनव
जे फुले अकारण चिमण्या गालांवरी -
त्या हास्यामधली केवळ मी माधुरी !
‘मी द्वेष, विद्वेषाचे भयंकर तांडव नाही, क्रोधाची अभिनव ज्वाला नाही’ असे कवयित्री ठासून सांगते. येथे ती अभिनव असा शब्दप्रयोग हटकून करते कारण कोणत्याही क्रोधादिसाठी पेटविलेली ज्वाला कशी नवी आहे ते सांगावे लागते. तिथे कारण परंपरा द्यावी लागते. तिच्यापाठी भूतकाळ उभारावा लागतो, भविष्याची स्वप्ने पेरावी लागतात. पण ‘ते मी नाही’, असे कवयित्री येथे दोनदा नाकारते तर मी केवळ अहेतुक, सहजपणे फुललेल्या हास्यातील माधुरी असल्याचे सांगत ती कविता संपवते. कवयित्री येथे वापरत असलेली विशेषणे नीट समजून घेतली नाहीत तर कविताच समजणार नाही, कवयित्रीचा भाव समजणार नाही.
ती अकारण म्हणते, अकारण म्हणजे अहेतुक ज्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. कारण नाही जेथे कारण नसते तेथे भूतकाळ नसतो नि जिथे अपेक्षा नसते तिथे भविष्यकाळ नसतो. जेथे हे दोन्ही नसतात तेथे वर्तमानकाळ विद्यमान असतो, तोही असा वर्तमानकाळ की जो वर्तमानातच विरतो. हे प्रतीक आणखी स्पष्ट व्हावे म्हणून ती हास्यामधली केवळ माधुरी म्हणते. केवळ हास्य न म्हणण्यामागे कारण हे आहे, की हास्यामागे राग, द्वेषादी विकार वा अहंकाराचा दर्प असूही शकतो. रावणाच्या हास्यात तोच तर दिसतो. याउलट ज्या हास्यात माधुर्य असते ते निरलस, निष्पाप नि विरून जाणारे असते, तेच कवयित्रीला अपेक्षित असलेले दिसते.
नीट पाहिले तर या कवितेत तिने धिक्कारलेली सर्व प्रतीके गरुड, वीज, गुलाब, सागर गर्जना स्वतःचा ठसा जोरजबरदस्तीने उमटवून जाणारी आहेत. स्वतःची छाप उमटवून जाणारी आहेत. याउलट कवयित्री ज्यांच्याशी तादात्म्य पावते ती प्रतीकं चिमुकले फुलपाखरू, चांदणी, तुळशीची मंजिरी, झऱ्याचा नाजूक कलरव किंवा हास्यातील माधुरी अत्यंत नाजूक, अलगद उतरणारी, आकर्षक असली तरी तितकीच सामान्य आहेत. ही जशी सामान्य आहेत, तशीच चटकन विरणारी आहेत. नितळ, निर्हेतुक आहेत.
त्याच्याशी कवयित्रीचा ‘मी’ जेव्हा नाते सांगतो त्या वेळी ‘नो बडी वॉटस् टू बीकम नोबडी’ या उक्तीला जबरी चपराक देणारा ठरतो. हा ‘नोबडी’ लाओत्से सारख्या रहस्यदर्शीलाच मोह घालतो, तोच कवयित्रीला भावताना दिसतो. विख्यात तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती सांगतात, त्याप्रमाणे खरे जीवन, जीवनाचा खरा आनंद केवळ ‘इथे नि आता’त आहे, तोच कवयित्री या काव्यातून व्यक्तविताना त्याच अनुभूतिला ‘मी’तून व्यक्त करताना दिसते. कवयित्रीच्या काव्यातील याच गुणांमुळे वाटते, की मालती किर्लोस्कर म्हणतात त्याप्रमाणे ‘शांताबाईंची कविता मराठी कवितेचे एक अविस्मरणीय शिल्प आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.