लेखक : के. एस. आझाद
मुलांच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे ही अत्यंत महत्त्वाची असतात. मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती कशी आहे, याचा अंदाज या काळात येण्यास सुरवात होते. त्यामुळे या वयात म्हणजेच शालेय जीवनातील सुरवातीच्या काही वर्षांत मुलांमध्ये शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्थैर्य राहण्यासाठी व्यायाम ही अत्यंत आवश्यक बाब आहे. जसजसा काळ बदलत आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलत आहे. काळानुसार बदलले पाहिजे. पण आपल्या पाल्यांसाठी काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? हे पालकांनी ओळखणे गरजेचे आहे.
का ही वर्षांपूर्वी मुलांना अंघोळीनंतर सूर्यनमस्कार घातल्याशिवाय दुधाचा ग्लास मिळत नसे. घरातील ही एक प्रकारची शिस्तच होती. आता मुले उठल्यावर डायनिंग टेबलवर येतात. मुले पूर्वी मांडी घालून जमिनीवर बसून जेवत असत. आता टेबलावर बसतात. पूर्वी मुले शाळेत चालत जात व चालत येत.
आता बसने किंवा व्हॅनने जातात व येतात. पूर्वी शाळेच्या मैदानावर शाळा सुटण्याच्या अगोदर किंवा मधल्या सुटीत संपूर्ण मैदान मुलांनी भरलेले असायचे. आता सद्यःस्थितीतील वाढत्या बांधकामांमुळे व खेळांसाठी मैदाने उपलब्ध नसल्याने मैदानी खेळांचे क्षेत्रच खुंटत चालले आहे. (saptarang latest marathi articles by KS Azad on Outdoor games exercise away from children nashik news)
मुले शाळेतून घरी आल्यानंतर अंधार पडेपर्यंत खेळत असत, त्यानंतर घरी पोचल्यावर मुले इतकी दमत, की कसेबसे अंथरुणावर पडताच ती झोपी जात.
पण आता शाळा सुटली, की मुले क्लासला जातात. घरी आल्यानंतर टीव्ही, मोबाईल पाहतात किंवा होमवर्क करतात. या सर्व दिनचर्येत शारीरिक कसरत, शारीरिक व्यायाम लोप पावला आहे, असंच दुर्दैवाने म्हणावा लागेल. शहरातील मोकळ्या जागेत मैदाने नाही. पूर्वीची घरे देखील मोठी असायची, घराच्या मागे पुढे जागा असायच्या, तिथेही खेळण्याची सोय व्हायची. आता अशा शक्यता धूसर झाल्या आहेत.
पालकांची अनावश्यक आस्था
जागेच्या कमतरतेमुळे सध्या उंच उंच अपार्टमेंटमध्ये नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्य करावे लागते. त्यामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. हवा, पाणी, अन्न प्रदूषण आणि बाहेरचे बेसुमार खाणे हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. पूर्वी वर्गात किंवा संपूर्ण शाळेत एखाद-दुसरा मुलगा लठ्ठ असायचा. आता एका वर्गात चार-पाच मुले लठ्ठ आढळतात.
यासाठी शारीरिक हालचालींचा अभाव आणि मुलांच्या खाण्याविषयी पालकांची अनावश्यक आस्था कारणीभूत आहे. म्हणून या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांना नियमित व्यायाम आवश्यक आहे. याकडे व्यायाम असे न बघता हसत-खेळत व्यायाम आणि खेळ ही संकल्पना रुजविणे काळाची गरज आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मुलांना समजून सांगा, पटवून द्या
सहज केलेल्या निरीक्षणातून असे लक्षात येईल, की मुले खेळताना इतकी एकाग्र झालेली असतात, की आसपास काय चालले आहे, त्याची त्यांना अजिबातच कल्पना नसते. खेळताना मुलांचे मन आणि शरीर अगदी एकरूप झालेले असते. मुलांना खेळांमध्ये रस असतो, आवडही असते. पण याचे महत्त्व त्यांना समजेल, रुचेल आणि त्यांची गोडी वाढेल, अशा पद्धतीने त्यांना पटवून दिले, तर ते या विषयांत अधिक आवडीने सहभागी होऊ शकतात.
उदाहरणार्थ- फुटबॉल खेळताना कोणी जास्त धावतो, तर कोणी कमी, त्यातून कोणाचे किती कौशल्य आहे, त्याचा मुलांना अंदाज येतो. मग तेव्हा आपण त्याला सांगितले, की तुला तुझ्यातील ही कौशल्ये वृद्धिंगत करायची असतील, तर यासाठी व्यायामापासून सुरवात करावी लागेल. त्यानंतर ही मुले अधिक रस घेऊन व्यायाम करू लागतील.
महाभारतातील अर्जुनाने मारलेला बाण पाहून टाळ्या वाजविण्यापेक्षा स्वतःची एअरगन घेऊन निशाणा भेद करावा, अशी मुलांची इच्छा व्हायला हवी. जेव्हा ते असे करू लागतील, तेव्हा त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून सांगणे सोपे होईल. अर्थात, एकाग्रतेसाठी व्यायाम किती आवश्यक आहे, हेदेखील त्यांना पुढे आपसूकच कळेल.
खेळ स्पर्धाविरहित असावा
लहानपणी खेळल्या जाणाऱ्या खेळांकडे आपण गांभीर्याने बघतच नाही. उलट कोणी मूर्खपणा करत असेल, तर त्याला आपण ‘पोरखेळ’ अशी उपमा देतो. पण खरे पाहिले तर खेळाला आपण प्रोत्साहन द्यायला हवे.
जिंकणे किंवा हारणे यात जेव्हा खेळ बांधला जातो, तेव्हा त्या खेळातला आनंद संपलेला असतो. खेळाचे दोन प्रकार आहेत. स्पर्धा आधारित हा एक प्रकार, तर मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी उपयुक्त असणारा स्पर्धाविरहित हा दुसरा प्रकार. या दोन्ही प्रकारच्या खेळात आणि त्यांच्या अर्थांमध्ये गुणात्मकदृष्ट्या खूप फरक आहे.
व्यायामाची सवय लावावी
पहिल्या प्रकारच्या खेळात स्पर्धेत सहभागी होणे, ती जिंकणे या भावनेला प्राधान्य आहे. दुसऱ्या प्रकारात स्पर्धा नसल्यामुळे मूल सहजपणे नैसर्गिकपणे खेळात रममाण होत स्वतःसाठी वेळ घालवायला शिकतं. वाढत्या वयाच्या मुलांसाठी शरीराची किमान हालचाल गरजेची असते.
अगदी लहान वयापासून हलक्याफुलक्या व्यायामाची मुलांना सवय लावली, तर त्यांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरते. अगदी तीन वर्षांपासून तुम्ही मुलांना थोड्या थोड्या व्यायामाची सवय लावू शकता. व्यायाम केल्यामुळे मुले दमतात, त्यांना भूक लागते. या सगळ्यांचा परिपाक म्हणून त्यांची वाढ चांगली होते.
व्यायामाचा तिटकारा येऊ नये
मुलांचे व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करायचे अवजड किंवा अवघड व्यायाम नव्हेत. तर त्यांच्यासाठी व्यायाम म्हणजे थोडीशी हालचाल करणारे, थोडा घाम काढणारे खेळ. मुलांना घरात बसून ठेवण्यापेक्षा त्यांना मोकळ्या मैदानात खेळायला घेऊन जावे. उड्या मारणे, फुटबॉल, चेंडू खेळविणे अशा गोष्टी तुम्ही त्यांना करायला लावू शकतात.
मुलांच्या शाळेतील विविध स्पोर्ट्स इव्हेंटसाठी त्यांना प्रोत्साहित करा. मुले खेळासाठी करणाऱ्या प्रयत्नांना दाददेखील द्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाची सुंदर गोष्ट म्हणजे मुलांवर व्यायामाची जबरदस्ती नको. त्यांना व्यायामाचा तिटकारा येईल, असे तर अजिबात करू नये.
व्यायाम आनंददायी, खेळकर हवा
मोठ्यांसाठी जसे व्यायामाचे काटेकोर वेळापत्रक केले जाते, तसे तर मुलांसाठी अजिबात ठेवू नये. उलट त्यांचा व्यायाम अधिक आनंददायी व खेळकर करण्याचा प्रयत्न करावा. सोपी योगासने, जिम्नॅस्टिकचे मुलांना प्रशिक्षण द्यावे. फुटबॉल, क्रिकेटसारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा.
या सर्व खेळांमध्ये शरीराचा तोल कसा राखला जावा, खेळताना डोळे आणि हातपायांचा योग्य समन्वय कसा राखावा, हे त्यांना समजावून सांगावे. या गोष्टीमुळे मुले आपोआप शिकतात. मुलांचे टीव्ही पाहणे, त्यांचा अभ्यास, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम या साऱ्या गोष्टींमधून व्यायामाला वेळ काढण्याची गरज आहे. गृहपाठ, खेळ आणि व्यायाम याचे योग्य वेळापत्रक बनवले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.