भावनिक गुंत्यांची वीण (महेश बर्दापूरकर)

mahesh bardapurkar
mahesh bardapurkar
Updated on

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इप्फी) आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील (आयसी) १५ चित्रपटांनी यावेळी प्रेक्षकांना नात्यांतला प्रेमाचा, गुंत्यांचा पट उलगडून दाखवला. ‘पार्टिकल्स’ हा सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट असो, उषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून देणारा ‘माई घाट’ वा ‘बलून’, ‘क्रोनोलॉजी’, ‘सन मदर’, ‘द स्टीड’ यांसारखे गुंतवून ठेवणारे चित्रपट; जगभरात नात्यांतले बंधच अधिक महत्त्वाचे असल्याचं हे चित्रपट सांगून गेले. भावनिक गुत्यांचा प्रेक्षणीय कॅलिडोस्कोप असलेल्या स्पर्धेतील चित्रपटांचा हा आढावा...

जागतिक स्तरावरच्या आणि विशेषतः हॉलिवूडपटांचा तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्टस, व्हीएफएक्स हाच आत्मा ठरत असताना गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सिनेमा केवळ मानवी भावभावना आणि नातेसंबंधांवरच भाष्य करताना दिसला आणि हेच यावेळच्या महोत्सवाचं वैशिष्ट्यही ठरलं. यातल्या काही चित्रपटांत तंत्रज्ञानाचा संदर्भ देत त्यातही मनुष्य आणि त्याच्या भावनाच महत्त्वाच्या कशा आहेत, हे अधोरेखित करण्यात आलं. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट ठरलेला ‘पार्टिकल्स’ हे त्याचं उदाहरण. या कथेत फ्रान्समधील लार्ज हार्डन कोलायडर आणि तिथं सुरू असलेल्या प्रयोगाचा संदर्भ देण्यात आला आहे. पीए हा १७ वर्षांचा मुलगा शाळेत शिकतो आहे आणि तो स्टडी टूरसाठी या प्रयोगशाळेला भेट देतो. मोठ्या धडकेनंतर कणांचं स्वरूप बदलतं, त्याच्या गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडतात, अगदी तसंच मनुष्याच्या बाबतीतही घडतं. पीएच्या आयुष्यात तारुण्यात प्रवेश करताना असेच बदल घडू लागतात आणि आपल्या भोवतालचं जग वेगानं बदलत असल्याचं त्याला जाणवू लागतं. मानवी मन आणि एक अदृश्‍य कण यांच्यातलं साधर्म्य दाखवत सादर केलेली ही कथा समजण्यास कठीण होती, मात्र त्यातल्या वेगळेपणामुळंच तिला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं सुवर्णकमळ मिळालं. ब्लेज हॅरिसन या चाळीशीतल्या दिग्दर्शकानं सांगितलेली ही गोष्ट आजच्या तंत्रज्ञानाच्या अतिरेकानं भावनांच्या गुंत्यात अडकलेल्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी ठरली.

मानवी भावना आणि संशयाचं भूत...
स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळालेला ‘बलून’ हा चित्रपटही विज्ञान आणि मनुष्याच्या भावनांचा मेळ घालणाराच होता. गर्भनिरोधकांची अनेक साधनं आणि चाचण्या विकसित झालेल्या असताना चुकून दिवस राहणं आणि त्याच्या संबंधित महिलेच्या मानसिकतेवर होणार परिणाम पेमा सेदेन या दिग्दर्शकाच्या चिनी चित्रपटामध्ये उलगडला गेला. तिबेटमध्ये आनंदी जीवन जगणाऱ्या दागें आणि द्रोलकर या मेंढपाळ पती-पत्नीची ही गोष्ट. शहराच्या ठिकाणाहून मोठ्या कष्टानं आणलेले कंडोम ‘गायब’ झाल्यानं द्रोलकर गर्भवती राहते. त्याचवेळी तिचे सासरे वृद्धापकाळानं मरण पावतात. गावातील लामा दागेंला तुझे वडील पुन्हा तुझ्या घरात जन्म घेतील असं सांगतात. घरी येताच त्याला पत्नीच्या गर्भारपणाची बातमी समजते आणि तो मुलासाठी हट्ट करतो. गरिबी आणि तीन मुलं सांभाळण्याची कसरत करणारी द्रोलकर याला विरोध करते आणि एक सुखी कुटुंब वेगळ्याच संकटात सापडतं. ‘द सायन्स ऑफ फिक्शन्स’ या इंडोनेशियाच्या चित्रपटातही मानवानं चंद्रावर पाऊल ठेवल्याचा संदर्भ देत त्याचा मानवी आयुष्यावर नक्की काय परिणाम झाला, याचा शोध ब्लॅक ह्युमरच्या मदतीनं घेतला गेला.

‘क्रोनोलॉजी’ या अली अयादीन दिग्दर्शित तुर्कस्तानच्या चित्रपटामध्ये पती-पत्नीच्या नात्यातल्या विश्‍वासाच्या नात्याला तडा गेल्यास त्याचे किती गंभीर परिणाम घडू शकतात याचं हादरवून टाकणारं चित्रण होतं. हाकन आणि निहाल या दांपत्याला मूल होत नसल्यानं त्यांच्यात तणाव असतो. त्यात वैद्यकीय चाचण्यांनंतर याला निहाल जबाबदार असल्याचं समजल्यावर हाकन तिला धीर देतो. मात्र, पुढच्याच दिवशी तो निहालला एका अपरिचित व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये जाताना पाहतो. तो घरी जाऊन निहाल परत येण्याची वाट पाहतो, मात्र ती पुन्हा परत येत नाही. हाकन त्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर जातो, मात्र ती मानसिक रुग्ण असलेली व्यक्ती आत्महत्या करते. कथा पुढं सरकताना हाकनच्या मनातल्या संशयाच्या भूतामुळं नक्की काय अक्रित घडतं, याचं हादरवून टाकणारं चित्रण पाहायला मिळतं. एकाच कथेत सर्वच जण दोषी किंवा खलनायक असल्यानं हे आगळं कथानक कायमचं स्मरणात राहतं. ‘कॅप्टिव्ह’ या हंगरीच्या चित्रपटामध्ये जुलमी सरकार नागरिकांवर संशय घेतं, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते, हे पाहायला मिळतं. ही कथा सन १९५१मध्ये बुडापेस्ट शहरातली सत्यघटना आहे. कम्युनिस्ट राजवटीत पोलिस देशविरोधी कारवायांच्या संशयावरून नागरिकांना त्यांच्या घरातच ओलिस ठेवायला सुरुवात करतात. एका जोडप्याला त्यांच्या दोन मुलांसह घरात ओलिस ठेवल्यानंतर बेल वाजवून घरात आलेल्या प्रत्येकाला विनाचौकशी डांबून ठेवलं जातं. यातून या घरात अडकलेल्यांच्या आयुष्याची गोष्ट, त्यांच्या समस्या आणि या संकटावर मात करण्यासाठी त्यांच्यात झालेली एकजूट याचं नर्मविनोदी चित्रण चित्रपटात पाहायला मिळालं. ‘मॅरिगेला’ या चित्रपटात ब्राझिलमध्ये सन १९६९मध्ये झालेल्या सरकारविरोधी बंडाची गोष्ट सांगितली आहे. कार्लोस मॅरिगेला या क्रांतिकारकाचा ही चरित्रपट. सरकारच्या बंदुकीच्या भाषेत बोलणाऱ्या सैन्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा हा क्रांतिकारक. क्रांतीची बीजं जिवंत ठेवणं, नव्यानं सामील झालेल्या युवकांना प्रेरणा देणं आणि त्याच वेळी आपल्या पत्नी आणि मुलाला सांभाळण्याची तारेवरची कसरत करीत कार्लोस सरकारसाठी ‘ब्राझिलचा शत्रू नंबर एक’ कसा ठरतो याची डॅशिंग गोष्ट चित्रपट सांगतो. निधड्या छातीचा, मृत्यूला आव्हान देणारा कार्लोस सेऊ जॉर्ज यांनी ताकदीनं उभा केला. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पदर आईच्या मायेचे!
आपल्या मुलासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी, त्यांच्या सुखात आपलं सुख शोधणारी; मात्र या प्रयत्नात स्वतःच खलनायिका ठरणारी आई दोन चित्रपटांत पाहायला मिळाली. ‘सन मदर’ हा इराणचा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यातले वेगळेच पदर उलगडून दाखवतो. लैला ही दोन मुलांची एकटी राहणारी आई एका कंपनीमध्ये नोकरी करत असते. मंदीच्या लाटेमुळं तिची नोकरी जाण्याच्या मार्गावर असते. तिच्या कंपनीतला ड्रायव्हर कजेम लैलापुढं विवाहाचा प्रस्ताव ठेवतो, मात्र तिचा मोठा मुलगा आमिराली याला वेगळं ठेवण्याची अटही घालतो. लैला या प्रस्तावाला नकार देते, मात्र थोड्यात दिवसांत तिची नोकरी गेल्यावर कुटुंब सावरण्यासाठी तिला कजेमशी लग्नाशिवाय पर्याय राहत नाही. एका नातेवाईकाच्या मदतीनं ती आमिरालीला मूक-बधिर असल्याचं सोंग घ्यायला सांगून होस्टेलला दाखल करते. लैलाच्या संघर्षाची गोष्ट संपून आमिरालीचा संघर्ष सुरू होतो. या होस्टेलच्या रेक्टरला आमिरालीचा संशय येतो आणि त्याचे हाल सुरू होतात. होस्टेलमधून पळून आल्यावर आपल्या आईनं केलेला त्याग त्याला समजतो आणि तो पुन्हा होस्टेलला जाऊन आईची वाट पाहत बसतो...आई आणि मुलाच्या अनोख्या प्रेमाचं, त्यागाचं हेलावून टाकणारं चित्रण चित्रपटात पाहायला मिळतं. कलाकारांच्या अभिनयानं व विशेषतः आमिराली साकारणाऱ्या बालकलाकारानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

आई आणि मुलांतल्या प्रेमाची आणखी एक खूप वेगळी कथा ‘वॉच लिस्ट’ या फिलिपाइन्सच्या चित्रपटात अनुभवायला मिळाली. मारिया आणि अरदुरो हे जोडपं आपल्या तीन मुलांसह शहरातील गरिबांच्या वस्तीत राहत असतं. अमली पदार्थ घेणाऱ्या नागरिकांची यादी बनवून या समस्येवर कायमचा उपाय करण्याची योजना सरकार आखतं. आपल्या तारुण्यात अमली पदार्थ घेतलेल्या या जोडप्याचं नाव या यादीत येतं आणि दोनच दिवसांत अरदुरोचा एनकाउंटर होतो. मारियावर तीन मुलांना सांभळण्याची जबाबदारी येते. आपलाही एनकाउंटर होईल या भीतीनं ती पोलिसांना जाऊन भेटते. पोलिस तिला एक भयानक काम करण्यास सांगून अभय देऊ करतात. मुलांसाठी मारिया हे आव्हान स्वीकारते, मात्र मोठ्या मुलाला तिच्याविषयी संशय येतो आणि तोच वाममार्गाला लागतो. यातून बाहेर पडण्याचे मारियाचे सर्व मार्ग संपतात आणि ती एक भयंकर निर्णय घेते. या कथेचा शेवट आई-मुलातल्या मायेचा एक अनोखा पदर उलगडून दाखवतो. ‘द स्टीड’ या मंगोलियाच्या चित्रपटात आई-मुलाबरोबरच मुलगा आणि घोड्याच्या प्रेमाची परिकथेच्या अंगानं जाणारी गोष्ट पाहायला मिळाली. मातीशी नातं जोडलं गेलेला घोडा आपल्या मालकावरील प्रेमासाठी कोणतं दिव्य पार करतो याचं भन्नाट चित्रण या कथेत पाहायला मिळालं. घोड्यांच्या शर्यतीची दृश्‍य आणि देखणं छायाचित्रण यांमुळं चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. केरळमधला वादग्रस्त जालिकट्टू हा खेळ आणि त्यातून होणारा भयंकर हिंसाचार याची गोष्ट सांगणाऱ्या ‘जालिकट्टू’ चित्रपटात खेळ आणि सामाजिक दुष्परिणाम याचं चित्रण करण्यात आलं. या चित्रपटासाठी लिजो जोस पेल्लीस्सेरी यांना महोत्सवातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

उषा जाधव आणि ‘माई घाट’
पोलिस कोठडीत मरण पावलेल्या मुलाच्या आईच्या त्याला न्याय मिळवून देण्यासाठीच्या संघर्षाची सत्यकथा मांडणारा ‘माई घाट’ हा मराठी चित्रपट महोत्सवातला वेगळा चित्रपट ठरला. यातल्या माईच्या भूमिकेसाठी मरोठमोळी अभिनेत्री उषा जाधवला मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. इस्त्रीचा व्यावसाय करणाऱ्या माईचा तरुण मुलगा सायकलवरून चाललेला असताना त्याचा एका पोलिसाला धक्का लागतो आणि चिडलेला पोलिस त्याला कोठडीत नेऊन बेदम मारहाण करतो. त्यात मुलगा मारला गेल्यावर पोलिस हा अपघात असल्याचं दाखवतात. या घटनेमागचं सत्य समजलेली माई मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल १३ वर्षं लढा देते. शांतपणे, न रडता, आतल्या आत झुरत माई संघर्ष सुरू ठेवते. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात उषा जाधवनं साकारलेलं माईंचं पात्र प्रेक्षकांबरोबरच ज्युरी मेंबर्सनाही भावलं. या यशाबद्दल उषा जाधव म्हणाल्या : ‘‘कोणतीही आदळ-आपट न करता, शांतपणे व त्याचवेळी निग्रहानं मुलाला न्याय देणारी माई साकारणं अवघड काम होतं. वृद्धेचा मेकअप केल्यावर चेहऱ्यावर भावना व्यक्त करणं अधिकच अवघड होतं. मात्र, हे आव्हान स्वीकारून मी भूमिका साकारली आणि त्याचं चीज झालं. ज्युरी मेंबर्सनी पुरस्कार देताना केलेल्या कौतुकानं मी भारावून गेले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()